01 June 2020

News Flash

१६५. पुण्यस्मरण

या सदराच्या निमित्तानं ज्यांचं आपण वर्षभर स्मरण करीत आहोत त्या स्वामी स्वरूपानंद यांची आज पुण्यतिथी आहे. खरं पाहता तिथी ही तिथीसारखीच असते, पण सत्पुरुष अवतीर्ण

| August 22, 2014 01:01 am

या सदराच्या निमित्तानं ज्यांचं आपण वर्षभर स्मरण करीत आहोत त्या स्वामी स्वरूपानंद यांची आज पुण्यतिथी आहे. खरं पाहता तिथी ही तिथीसारखीच असते, पण सत्पुरुष अवतीर्ण होण्यासाठी किंवा महानिर्वाणासाठी जी तिथी निवडतात, ती विशेष ठरते. सत्पुरुषाचं महानिर्वाण तर चटका लावणारंच. देहबोधानुरूप जगणाऱ्या आपल्यासारख्या साधकांना तर महानिर्वाण म्हणजे त्या दिव्य देहाचं अखेरचं दर्शन असतं. त्या दर्शनाची ज्या तिथीला अखेर होते ती तिथी सत्पुरुषाच्या पुण्यस्मरणाशी अखंड जोडली जात असल्यानं ती ‘पुण्यतिथी’ ठरते! आणि योग पहा, सत्पुरुषांच्या काही विशेष कर्माचा जो सुप्त हेतू आपण आता पाहणार आहोत, त्यात हे पुण्यस्मरणच अंतर्भूत आहे! सद्गुरू प्रसंगोपात सेवा म्हणून काही र्कम साधकाला सांगतात. ही र्कम जेव्हा सद्गुरूंसाठी म्हणून पार पाडली जातात तेव्हा त्यांच्यातली विशेषता जाणवत नाही. ती कर्मे सांगण्यामागे सद्गुरूंचा जो विशेष हेतू असतो, तोदेखील जाणवत नाही. कारण बरेचदा ही र्कम अगदी साधी भासणारी अशीच असतात. आता साधी गोष्ट घ्या. स्वामीजी जवळ जवळ शेवटची दहा वर्षे दुपारी तीन वाजता दोन मोसंब्यांचा रस घेत असत. ती मोसंबी पावसला मिळत नसल्याने पुण्याहून दर आठवडय़ाला ती पाठविण्याची जबाबदारी वसंत र. देसाई पार पाडत. मला खात्री आहे, नंतर आयुष्यात कधीही जेव्हा जेव्हा वसंतरावांनी मोसंबं पाहिलं असेल तेव्हा तेव्हा त्यांना स्वामींच्या सेवेची आठवण अटळपणे आलीच असेल आणि स्वामींविषयीचं प्रेमही उचंबळून आलं असेल. आता देसायांच्या घरातल्या प्रत्येकाला स्वामींचा विसर पडतच नाही, हा भाग वेगळा. तर हा असतो या वरकरणी अगदी सामान्य भासणाऱ्या कर्माचा हेतू! सद्गुरूंच्या सान्निध्यात आपण असतो तेव्हा भौतिकाचा प्रभाव तात्पुरता ओसरला असतो. त्यांच्यापासून देहानं दूर जाताच मात्र मन वेगानं भौतिकाकडे खेचलं जाण्याचा धोका असतो. अशा वेळी भौतिकातच माझ्या सहज दृष्टीस पडतील, अशा काही वस्तू वा कृतींतून मला त्यांची सहज आठवण यावी, अशी योजना सद्गुरूच करून ठेवतात. एका तरुणानं सद्गुरूंना आग्रह केला, नवी दुचाकी घेतली आहे त्यावरून माझ्याबरोबर चला! ते म्हणाले, ‘‘येईन पण पायात चपला उलटसुलट घालीन!’’ म्हणजे डाव्या पायात उजव्या पायाची चप्पल आणि उजव्या पायात डाव्या पायाची चप्पल! तो म्हणाला, काही हरकत नाही. तशा चपला घातलेल्या सत्पुरुषाबरोबर त्यानं भटकंती केली. कालांतरानं लग्न होऊन तो संसारात पुरता गुरफटला. एकदा आपल्या लहान मुलाला फिरायला नेण्यासाठी म्हणून तो निघाला तेव्हा त्या मुलानं पायात उलट-सुलट चपला घातल्याचं त्याला दिसलं. त्या पाहाताच एकदम गुरुंचं स्मरण होऊन त्याला जाग आली! मग तो परमार्थासाठीही पुन्हा प्रयत्न करू लागला! तेव्हा वरकरणी प्रथम स्मरण हे भौतिकातल्या वस्तूंच्या योगानं सद्गुरूंचं झालं तरी ते स्मरणच आपला परीघ इतका वाढवत नेतं की त्या क्षुल्लक स्मरणाची अखेर व्यापक अशा सद्गुरू चिंतनातच होते! याच्या पुष्टीसाठी स्वामी स्वरूपानंद यांच्या एका पत्राचाच आधार घेऊ.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on August 22, 2014 1:01 am

Web Title: commemorate
टॅग God
Next Stories
1 काँग्रेसच्या घोडय़ावर भाजपचा अश्वमेध?
2 अस्मितांचा अंगार
3 अडय़ार के. लक्ष्मण
Just Now!
X