गोंदवल्याच्या समाधी मंदिरातला घंटानाद या खोलीतही मंद स्वरात ऐकू आला. जणू श्रींच्या नित्य अस्तित्वावर सत्याची मोहर उमटवणारा! हृदूनं घडय़ाळाकडे पाहिलं..
हृदयेंद्र – दादा आरती सुरू झाली. म्हणजे भोजनप्रसादाची वेळही झालीच. जाऊ या का?
अचलदादा – (मंदसं हसून) हो जाऊया. (सर्वजण खोली बंद करून जिना उतरू लागतात अचलदादा म्हणतात-) अनुग्रहाच्या वेळेत श्रीमहाराज खरंच असतील की नाही, याची शंका असेल एकवेळ पण आरतीनंतर भोजन नक्की असेल, याची शंका नाही!
हृदयेंद्र – दादा चिडलात?
अचलदादा – नाही रे! आरती सुरू झाली म्हणजे प्रसाद मिळणार, हेच जाणवतं आधी. आरतीमधली आर्तता कुठे जाणवते?
आरती सुरू झाली म्हणजे भोजनप्रसादाची वेळ झालीच, हे आपलं वाक्य अचलानंद दादांना रूचलेलं नाही, हे हृदयेंद्रला जाणवलं. त्याला वाईट वाटलं. तोवर मोबाइलकडे पाहात हसत दादा म्हणाले, ‘‘बाईसाहेबांचेही तीन मेसेज येऊन गेले! आरतीला चला, नंतर प्रसाद घ्यायचाय ना? तो प्रसाद नसेल तर आरतीची गोडी वाटेल का हो कुणाला?’’ दादा ही वाक्यं स्वत:शी बोलल्यागत पुटपुटले. तोवर मंदिर परिसरातील विविध मंदिरांत आरत्या, महानैवेद्य, ताम्बूल समर्पण सुरू होतं. मग समाधीमंदिरातील गोपाळकृष्णाची आरती झाल्यावर सभामंडपात ‘रघुपति राघव राजाराम। पतितपावन सीताराम।।’चं भजन सुरू झालं. मग भोजनप्रसादाची घंटा झाल्यावर सर्वजण भोजनमंडपात गेले. तिथए ‘जय जय श्रीराम’चा तालबद्ध मंत्रघोष शेकडो मुखांतून निनादू लागला. मग सर्व जेवू लागले. दादांच्या पत्नींची, माईंची दुरूनच दृष्टीभेट झाल्यानं हृदयेंद्रचा चेहरा आनंदला. प्रसादानंतर सर्वजण बाहेर पडले. माईही आल्याच.
माई – बाबा हृदय, किती दिवसांनी भेटतोयस! कसा आहेस? (हृदयेंद्रनं वाकून नमस्कार करत ‘मजेत’ असं सांगितलं.)
अचलदादा – आता हवं तर आमच्या खोलीवर चला.. अरे पण हो, कर्मेद्रजी तुम्हाला झोपायचं असेल ना?
कर्मेद्र – असं काही नाही.. झोप काय कायमचीच आहे.
योगेंद्र – (आश्चर्यानं) कम्र्या लेका एवढं परिवर्तन?
माई – मुलांनो झोपायचं तर खुशाल झोपा आणि चहाच्या वेळी या. हृदय यांना जराही घाबरू नकोस बरं का.. मीही आताशा घाबरत नाही.. (दादाही हसतात).
हृदयेंद्र – (हसत) भीती कसली? आपल्या माणसांना कुणी घाबरतं का? पण मला वाटतं दुपारीच भेटू. कारण कर्मूनंही काल पहाटेपासून गाडी चालवली आहे. रात्रीही झोपेत चुळबुळत होता. त्याला थोडा आराम द्यायला हवा.
माई – अगदी बरोबर. आमच्या खोलीत स्टो आहे, चहा-साखर, दूध आहे. चहालाच या..
अचलदादा – अग पण तुझ्या मैत्रीणी आहेत ना?
माई – त्या भोजनप्रसादानंतरच निघाल्यात..
माईंच्या हातचा चहा बऱ्याच दिवसांनी पिताना हृदयेंद्रला फार बरं वाटत होतं. चहा-बिस्किटं खाऊन झाल्यावर गप्पांना सुरुवात झाली.  
अचलदादा – तेव्हा ज्ञानेंद्रच्या सांगण्याप्रमाणे निसर्गदत्त महाराजांकडे लोक जात, पण खऱ्या अर्थानं त्यांच्याकडे कोणी पोहोचलंच नाही.. समाधीमंदिरात श्रीमहाराज आहेतच, पण शरीरानं तिथं जाऊनही आम्ही तिथं गैरहजरच असतो! अगदी तसंच या डोळ्यांनी सद्गुरूंचं रूप पाहूनही आम्ही ते खऱ्या अर्थानं पाहातच नाही.. महाराज देहात असोत की समाधीत आमची भवसमाधी कधी उतरतच नाही.. मग कसं पाहणार त्यांना? तिथं जातानाच तिथून निघाल्यावर दुनियेत काय-काय कामं करायची आहेत, याची यादीच तयार असते.. त्यातल्या कुठल्या कामांना महाराजांचा आशीर्वाद मागायचाय, याचीही खूणगाठ मनात पक्की असते.. मग त्यांच्यासमोर बसल्यावरही तेच सारं आठवत राहणार ना? मग जरा जास्त वेळ मोडला की झाली चुळबूळ सुरू.. कसं सांगावं यांना? अमका भेटायला येणार आहे, तमक्याला भेटायला जायचंय, अमकं काम दुपापर्यंत केलंच पाहिजे, तमक्या कामासाठी रात्री दूरध्वनी केलाच पाहिजे.. सगळे हेच विचार.. मनाचं होकायंत्र अहोरात्र भौतिकाच्या दिशेनं वळलेलं असताना ते रूप काय दिसणार हो?
चैतन्य प्रेम