News Flash

वैचारिक लाळघोटेपणा

स्वयंघोषित अर्थतज्ज्ञ, साहित्यिक, विचारवंत आणि सोयीनुसार नव्या-नव्या मालकांच्या पालख्या खांद्यावर वाहणाऱ्या आणि तरीही स्वत:ला आंबेडकरवादी

| August 17, 2015 04:42 am

स्वयंघोषित अर्थतज्ज्ञ, साहित्यिक, विचारवंत आणि सोयीनुसार नव्या-नव्या मालकांच्या पालख्या खांद्यावर वाहणाऱ्या आणि तरीही स्वत:ला आंबेडकरवादी म्हणवून घेणाऱ्या डॉ. नरेंद्र जाधव यांच्या डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्यावरील चार पुस्तकांचे रा. स्व. संघाचे सरसंघचालक मोहन भागवत यांच्या हस्ते दिल्लीत प्रकाशन झाले. जाधवांनी त्यांच्या पुस्तकांच्या प्रकाशनासाठी सरसंघचालकांना बोलावले, म्हणून त्यांच्यावर टीका होऊ लागली आहे. घटनादत्त अभिव्यक्तिस्वातंत्र्य मान्य केले, तर मग जाधवांवर टीका का होते, असा प्रश्न पडतो. उत्तर सोपे आहे. सार्वजनिक जीवनात अमुक एका विचारधारेचे आपण अनुयायी आहोत, असे म्हटले की, किंवा जाहीर केले की, मग तुमच्या आचार-विचार-उच्चारात थोडी जरी गफलत झाली, तर त्याचा जाब विचारला जातो. जाधव स्वत:ला आंबेडकरवादी म्हणवून घेतात आणि तरीही आंबेडकरी विचार व रा. स्व. संघ यांच्यात टोकाचे वैचारिक मतभेद असतानाही ते संघाच्या व्यासपीठावर जातात आणि त्यांच्या विचारांची भलामण करतात, हा शुद्ध भंपकपणा आहे. पुस्तक प्रकाशन सोहळ्यात सरसंघचालक म्हणाले की, राष्ट्रभक्ती हा आंबेडकर व संघ यांच्यातील दुवा आहे. त्यांच्या या वक्तव्याचीही अनेक अंगांनी समीक्षा होऊ शकते, त्याचा प्रतिवाद करता येऊ शकतो; परंतु दलित समाजाला हिंदूुत्वाच्या परिघातच कोंडून ठेवणे, हा संघाचा अजेंडा आहे आणि त्याबरहुकूम त्यांनी केलेल्या विधानाबद्दल काही आश्चर्य वाटण्याचे कारण नाही. आंबेडकर हे राष्ट्रभक्त होते, त्याबद्दल कुणाला शंका घेण्याचे कारण नाही, परंतु त्यापेक्षा किंवा त्याच्याही पुढे ते आणखी काही तरी होते, याचा जाणीवपूर्वक उच्चार केला जात नाही. भारतीय राज्यघटनेची निर्मिती आणि बौद्ध धम्माचा स्वीकार, याकडे सोयीस्कररीत्या दुर्लक्ष केले जाते. हिंदू, मुस्लीम, ख्रिश्चन अशी कोणतीच धर्मव्यवस्था त्यांना मान्य नव्हती. त्यात पारंपरिक वा कर्मकांडग्रस्त बौद्ध धर्माचाही त्यांनी अपवाद केला नाही. सर्वच धर्म संकल्पना या शोषण मूल्यावर उभ्या आहेत, अशी त्यांची धारणा होती. म्हणून त्यांनी निर्मिलेल्या घटनेच्या मुळाशी निधर्मी हे मूलतत्त्व आहे. संघाला भारत हिंदुराष्ट्र करायचे आहे, तर आंबेडकरांच्या संकल्पनेतील भारत निधर्मी आहे. आता या दोन परस्परविरोधी विचारांचा सांधा कसा जोडायचा आणि दुवा कसा साधायचा, या प्रश्नावर डॉ. हेडगेवार आणि डॉ. आंबेडकर यांचा मार्ग एकच होता, असा साक्षात्कार झालेल्या नरेंद्र जाधव यांनी प्रकाश टाकला तर बरे होईल. सरसंघचालक माझ्या पुस्तकाच्या प्रकाशनाला आले, हा आंबेडकरी विचारांचा विजय आहे, असे ते मानतात. पुढे ते असेही म्हणतात की, मी भाजपमध्ये जाणार नाही, मी आंबेडकरवादीच राहणार. खरे म्हणजे जाधवांना आंबेडकरवादी म्हणणे हाच विरोधाभास ठरावा असा आजवरचा त्यांचा प्रवास आहे. त्यामुळे ते स्वत:बद्दल काय म्हणतात, त्याकडे दुर्लक्ष करणेच बरे. सत्तेच्या आणि सत्ताधाऱ्यांच्या वळचणीला राहून आपल्या स्वकथित मोठेपणाचा फुगा फुगवण्याचे कसब अनेकांनी आत्मसात केलेले असते. नरेंद्र जाधवांना तशी मखलाशी आजवर जमून गेली आहेच. परवाच्या कार्यक्रमात ज्या हातोटीने त्यांनी विचारांची सरमिसळ लीलया साधली त्यामुळे त्यांचे काय व्हायचे ते भले होवो, मात्र विचारांशी प्रतारणा करण्याच्या ओंगळ प्रवृत्तीचा दर्प त्याला येत आहे. आंबेडकरी विचारांचे अवकाश अशाने कलुषित होते हे वास्तव अधिक केविलवाणे आहे.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on August 17, 2015 4:42 am

Web Title: conceptual slaver
Next Stories
1 भावी पिढीची शोकांतिका
2 ‘मॅगी’मग्नतेचे धडे
3 पवारांचे चहापान
Just Now!
X