News Flash

कार्यकर्त्यांनी याचा अर्थ काय काढावा?

तळकोकणात राष्ट्रवादी आणि राणे समर्थक यांच्यात काही महिन्यांपासून चालू असलेले बंड लोकसभा निवडणुकीच्या निमित्ताने पेटून उठले आहे.

| April 15, 2014 12:32 pm

तळकोकणात राष्ट्रवादी आणि राणे समर्थक यांच्यात काही महिन्यांपासून चालू असलेले बंड लोकसभा निवडणुकीच्या निमित्ताने पेटून उठले आहे. आघाडीचे उमेदवार नीलेश राणे यांचा प्रचार करणार नाही, अशी ताठर भूमिका राष्ट्रवादी काँग्रेसच्या जवळपास सर्वच कार्यकर्त्यांनी घेतल्यामुळे या सर्व घटना घडत आहेत. ही ताठर भूमिका १०० टक्के योग्यच आहे हे काही गोष्टींचा विचार करता स्पष्ट होईल. नारायण राणे काँग्रेसमध्ये गेल्यानंतर सिंधुदुर्गात मूळ काँग्रेस आणि राणे समर्थक काँग्रेस असे दोन भाग झाले. यामध्ये राणे समर्थक काँग्रेसने आघाडीचा किती धर्म पाळला हे सिंधुदुर्गातील जनतेला चांगलेच माहीत आहे. ज्या वेळी दीपक केसरकर यांनी आपल्या नगराध्यक्ष पदाच्या जोरावर सावंतवाडी शहराचा कायापालट केल्यानंतर त्यांनी आमदारकीची निवडणूक लढवली आणि आमदारही झाले. यामध्ये शरद पवारांची त्यांना पूर्ण ताकद मिळाली हे ते जाहीरपणे मान्य करतात. हळूहळू त्यांनी आपल्या नियोजनबद्ध कामाच्या जोरावर जिल्ह्य़ातील राष्ट्रवादीची ताकदही वाढवली, त्यांना मानणारा मोठा वर्ग तयार झाला; परंतु हे सर्व समर्थक काँग्रेसला परवडणारे नव्हते म्हणूनच त्यांनी त्यांच्या विरोधात कारस्थाने चालू केली. केसरकरांचा सर्वतोपरी कसा पाडाव होईल हेच बघितले जाऊ लागले. जिल्ह्य़ातील सर्व स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीमध्ये समर्थक काँग्रेस विरुद्ध राष्ट्रवादी अशाच लढती होऊ लागल्या. नंतर राष्ट्रवादीचे निवडून आलेले सदस्य फोडणे, त्यांच्या कामांना मंजुरी नाकारणे यांसारखी कृत्ये आरंभत त्यांची चोहोबाजूंनी कोंडी आणि अपमान चालू केला. या सर्व प्रकाराला विरोध म्हणून दीपक केसरकरांनी येणारी लोकसभा निवडणूक राणेंच्या दहशत प्रवृत्तीविरोधात मी लढवणार हे जाहीर केले होते.
या सर्व प्रकारांमुळे राष्ट्रवादी पक्षाची आणि कार्यकर्त्यांची कशा प्रकारे कोंडी होत आहे याची वारंवार कल्पना केसरकर व कार्यकर्त्यांकडून शरद पवार आणि पक्षाच्या वरिष्ठ नेत्यांना देण्यात येत होती. त्यासाठी राष्ट्रवादीच्या नेत्यांनी जिल्ह्य़ामध्ये येऊन यावर तोडगा काढावा आणि आपल्या कार्यकर्त्यांना पाठबळ द्यावे, अशी याचना करण्यात येत होती; परंतु वरिष्ठ नेत्यांनी याला केराची टोपली दाखवली, कारण त्यांना त्यांच्या वरच्या पातळीच्या तडजोडी मोडायच्या नव्हत्या.
जिल्ह्य़ातील सामान्य कार्यकर्त्यांचा विचार केला नाही म्हणूनच ही वेळ आली आहे. ज्या वेळी जिल्ह्य़ातील स्वत:च्याच पक्षातील कार्यकत्रे यावर तोडगा काढण्याची विनंती करत होते तेव्हा या नेत्यांना वेळ मिळत नव्हता; परंतु आता चारच दिवसांत शरद पवार, अजित पवार यांसारख्या वरिष्ठ नेत्यांना कसा काय वेळ मिळाला? याचा अर्थ तुमच्या कार्यकर्त्यांनी काय काढावा?  तुम्हाला नारायण राणेंसोबत समझोता करायचा आहे आणि जिल्ह्य़ातील कार्यकर्त्यांनी तुमच्याच पक्षासाठी जिवाचे रान केले, रक्ताचे पाणी केले, अशा कार्यकर्त्यांची किंमत शून्य असा अर्थ.
या नेत्यांना प्रश्न असा आहे की, ज्या राणे समर्थकांनी सिंधुदुर्गात तुमचा पक्ष आहे कुठे, असे वारंवार विचारले, राष्ट्रवादी संपवणारी भाषा केली, त्यांना आत्ताच दीपक केसरकर आणि राष्ट्रवादी का आठवते? कारण त्यांना फक्त  आपल्या मुलाचाच विजय पाहिजे.. तुमच्या पक्षाबद्दल त्यांना काहीही किंमत नाही. अशांसाठी तुम्ही तुमच्याच प्रामाणिक, सुसंस्कृत आणि तुमच्यावर नितांत प्रेम करणाऱ्या आमदाराला जाहीर सभेत ‘अवदसा आठवली’ असे संबोधलात हे कितीसे योग्य आहे? अशी टीका करण्याआधी तुम्ही तुमच्या इतिहासात डोकावे.
शरद पवार यांना पंतप्रधान पदाचे डोहाळे असताना थेट सोनिया गांधींवर परदेशी जन्माचा मुद्दा उपस्थित करून पक्षप्रमुखालाच डिवचले होते आणि पक्षाचेच दोन भाग केले होते. उलट केसरकरांनी पवारांचा आणि पक्षाचा आदर ठेवून तटस्थ राहण्याची भूमिका घेतली होती. मग ‘अवदसा’ कोणाला आठवली? पवार यांना की केसरकरांना हे जनतेला दिसून आलेय. असो. थोडक्यात पक्षासाठी लढणाऱ्या कार्यकर्त्यांचा आवाज दाबून त्यांच्या सामाजिक आणि राजकीय इच्छाशक्तीची हत्या केली आहे हे मात्र नक्की.
– भरत माळकर, मुंबई

‘मोदी लाट’ भाजपच्या अंतर्गत लोकशाहीस घातक
प्रकाश बाळ यांच्या ‘मतपेटीतून हुकूमशाहीकडे’ या पत्र-लेखासंदर्भात श्री. राजेंद्र कडू व श्री प्रसाद दीक्षित ठाणे यांची पत्रे (लोकमानस, ९ एप्रिल) वाचली. राजेंद्र कडू यांनी म्हणल्याप्रमाणे आपण इतिहास कोणत्या दृष्टिकोनातून पहातो त्यावर आपले मत बनणे अवलंबून राहाते.. याचप्रमाणे वर्तमानकाळातील घटनांकडेही (उदा.-  एका रिक्षा चालकाने केजरीवाल यांच्या श्रीमुखात लगावली या घटनेकडे ) आपण वेगवेगळ्या पद्धतीने पाहू शकतो. थोडक्यात तुम्ही ज्या पद्धतीने इतिहासाकडे किंवा चालू घटनांकडे पहाल तसा त्याचा अर्थ लावता येईल. त्यामुळे प्रत्येकाने स्वतंत्र विचार करण्याची तयारी लोकशाहीत ठेवणे गरजेचे आहे. संरक्षण दलातील सैनिकाप्रमाणे हो ला हो म्हणून लोकशाहीत वागणे अपेक्षित नाही. सैन्यात हुकूम मानणेच अपेक्षित असते हे ठीक; परंतु देशात लोकशाही हवी अशी प्रत्येक पक्षाची अपेक्षा असते.. पण बहुतेक नेत्यांना पक्षातील लोकशाही गरजेची काय, उलट नकोच असते.
प्रसाद दीक्षित यांनी म्हटल्या प्रमाणे ‘पंतप्रधानपदाचा उमेदवार निवडणुकीपूर्वी जाहीर करून भाजपने चांगली प्रथा सुरू केली आहे’ असे मलाही वाटते. पण आज होत असणाऱ्या प्रचाराचे निरीक्षण केल्यास असे दिसते की सरकार कोणाचे ? तर एनडीएचे तर नाव नाहीच पण भाजपचे सरकार येणार असा सुद्धा प्रचार न करता ‘मोदींचे सरकार’ असा अधिकृत प्रचार केला जात आहे. भाजपची लाट आहे असे न म्हणता ‘मोदींची लाट’असे म्हटले जात आहे. याचा अर्थ मोदी बोले भाजप चाले. त्यामुळे भविष्यात लोकांनी मला मते दिली आहेत, सर्वत्र देशभर मी दौरे करुन सत्ता मिळवली आहे त्यामुळे अखेरचा शब्द माझा असला पाहीजे असे मोदी म्हणू लागले तर त्यांचे काय चुकले ?
दीक्षित म्हणतात ते बरोबर आहे. कांग्रेस (गांधी), द्रमुक ( करुणानिधी) अण्णा द्रमुक (जयललिता,) समाजवादी (मुलायम) राष्ट्रीय लोक दल (लालूप्रसाद) अगदी आम आदमी पार्टी सुद्धा (केजरीवाल). असे सर्वच पक्ष एकानुवर्ती आहेत. डावे पक्ष सोडता सर्वच पक्ष एका व्यक्तिभोवती फ़िरत आहेत. मग भा.ज.प. व इतर पक्ष यांमध्ये वेगळेपण ते काय?  पण भाजप मात्र वेळोवेळी आपल्या वेगळेपणाचा दावा करत आहे; त्यामुळे प्रसाद दीक्षित म्हणतात त्याप्रमाणे आपला दोष झाकण्यासाठी इतर पक्षांकडे बोट दाखवणे योग्य वाटत नाही. या एकानुवर्तीपणामुळे आडवाणी, मुरली मनोहर जोशी, या संस्थापक पक्ष-नेत्यांना अपमानित होऊन पक्षाच्या नावे मोदी यांनी केलेली मानहानी सहन करावी लागली. मोदी भाजपलाही रा.स्व.संघाप्रमाणे एक शिस्तबद्ध संघटन करण्याच्या मार्गावर आहेत असे या प्रचार-पद्धतीतून दिसू लागले आहे. त्यामुळे निदान भाजप संघटनेतील तरी लोकशाहीच्या दृष्टीने मोदींची सध्याची घोडदौड ही धोक्याची घंटा आहे असे वाटू लागल्यास चूक ते काय ?
 –  प्रसाद भावे, सातारा .

विचारशून्य निवडणूक चिन्हे.. अनाकलनीय मीडिया!
निवडणूक आयोगाने जी अनेक निवडणूक चिन्हे अपक्ष उमेदवारांसाठी खुली केली आहेत त्यात खाट हे एक चिन्ह आहे. आयोग चिन्हे देताना काहीही विचार करत नाही हे स्पष्ट आहे, कारण कित्येक ठिकाणी महिला उमेदवार असतात आणि त्यांना मिळणारी चिन्हे लाज आणणारी असतात. महाराष्ट्राच्या प्रथम महिला निवडणूक आयुक्त नीला सत्यनारायण यांनी आपल्या ‘टाकीचे घाव’ या पुस्तकात आयोगाच्या विचारशून्य कृतीवर आणि माध्यमांच्या वृत्तीवर प्रकाश टाकला आहे (पान १५). त्या लिहितात :-
‘‘बऱ्याच महिला उमेदवार माझ्याशी फोनवरून थेट संपर्क साधू लागल्या. ‘मॅडम, आम्हाला केळं चिन्ह म्हणून दिलं आहे. अय्या गं बाई, अशी कशी ही निशाणी? लाज वाटत्ये बाई.’ काहींनी ‘गाजराची निशाणी नको, कुकर नको’ अशा तक्रारी केल्या. सर्वात कळस म्हणजे एक बाई म्हणाली, ‘अवो, खाट आलीय मला, निशाणीला. तुम्हीही एक बाई माणूस. सांगा बरं, गावात चालेल का ही निशाणी? अवो, भलताच अर्थ काढत्यात पुरुष मंडळी.’
तिचे उद्गार ऐकून मीही चमकले. झटकन नव्याने आदेश काढून असल्या नऊ निशाण्या मी रद्द केल्या. नव्या जमान्याला शोभतील अशी टीव्ही, कॉम्प्युटर ही चिन्हे त्यांना दिली. मलाच हायसे वाटले.
तिकडे मीडियाने काहूर माजवले.. वार्ताहरांनी फोनवर फोन करून प्रश्नांची झोड उठवली..‘अहो, उमेदवार स्त्रियांनी या चिन्हांना हरकत घेतली आहे.’ मी माझ्या कपाळावर हात मारून घेत फोनवर बोलले. खरेच, मीडिया हेच प्रकरण मला अनाकलनीय वाटले.’’
दिलीप चावरे

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on April 15, 2014 12:32 pm

Web Title: cong in spot over clash between ncp rane men
Next Stories
1 नक्षलींना ठेचण्याआधी या तालिबान्यांना ठेचा
2 अतिउजवे अतिडाव्यांपेक्षा जास्त धोकादायक?
3 हुकूमशाहीचं मुसळ आणि ‘इटालियन कनेक्शन’
Just Now!
X