सगळ्याच काँग्रेसी सरकारांनी गांधी-नेहरूंना देव्हाऱ्यात बसवून त्यांचे विचार वाऱ्यावर उधळले. गांधी-नेहरू कालसुसंगत आहेत हे मोदी सांगत असताना काँग्रेस मात्र त्या कालसुसंगततेपासूनच तुटली. तेव्हा टीकाकारांना नेहरू कळले नाहीत असे म्हणताना भक्तांना किती कळले, हे पाहणे मनोरंजक ठरेल..
सोनिया गांधी, त्यांचे सदासंतप्त सुपुत्र राहुल गांधी यांच्यासह साऱ्या काँग्रेसची समस्या अशी आहे की त्यांची वातकुक्कुटे पूर्णत: बिघडली आहेत. त्यामुळे गेल्या पाच वर्षांत देशात कोणती हवा वाहात होती याचा अंदाजच त्यांना आला नाही. देश काय विचार करीत आहे हे त्यांना समजलेच नाही. आता लोकसभेतील पराभवानंतर ते समजले आहे अशातलाही भाग नाही. खूप मार खाल्ल्यानंतर एक प्रकारची बधिरावस्था येते. तसे काँग्रेसचे झाले आहे. आपल्या हातातून सत्तेबरोबरच काही तरी निसटत चालले आहे हे त्यांना जाणवत तर आहे. परंतु ते नेमके कसे होत आहे हेच त्यांना कळेनासे झाले आहे. राहुल गांधी यांना ते कळावे इतके त्यांचे राजकीय वय नाही. सोनियांमध्ये कळून काही वळावे इतकी शक्ती राहिलेली नाही. बाकीच्यांबद्दल बोलायलाच नको. सत्ता गेली याशिवाय अन्य काही समजावे इतकी त्यातील अनेकांची यत्ता नाही. त्यामुळे नरेंद्र मोदी यांनी काँग्रेसचे नेते सरदार वल्लभभाई पटेल यांचे दिवसाउजेडी अपहरण केले. त्याचा पत्ताही काँग्रेसजनांना लागला नाही. कदाचित पटेल हे काँग्रेसमधील उजवे असल्याने आणि त्यांचे आडनाव गांधी वा नेहरू नसल्याने तसे झाले असावे. पण तसे तर महात्मा गांधी हेही दोन्ही अर्थानी उजवेच. ते काँग्रेसचे दैवत. खरे तर ते राष्ट्रपिता. देशाची धरोहर. पण अतिडावे आणि उजवे, क्रांतिकारी आणि प्रतिक्रांतिकारी या सगळ्यांनाच गांधीविचाराचे वावडे. असे असले तरी या देशाच्या कोटय़वधी नागरिकांना त्यांच्यात महात्मा दिसतो. त्यांच्या नावामुळे काँग्रेसला मते मिळतात. त्यामुळे काँग्रेसच्या देव्हाऱ्यात त्यांचा टाक पुजला जातो. पण एके दिवशी सर्वाच्या डोळ्यांदेखत हे दैवतही त्यांच्या झाडूसह पळवण्यात आले. ते आधीच प्रात:स्मरणीय करून ठेवलेले होतेच. आता दूरचित्रवाणीच्या पडद्यावरील जाहिरातींतून तिन्ही त्रिकाळ त्यांचे स्मरण केले जाते. इतके की कोणाला वाटावे गांधीजींनी केवळ ‘झाडू चला चला के’च स्वराज्य घेतले. परंतु तरीही काँग्रेस स्थितप्रज्ञच. कदाचित एक गांधी गेले तरी काय फरक पडतो? आपल्याकडे दुसरे, तरुण तडफदार गांधी आहेत, असाही विचार काँग्रेसजनांनी केला असेल. त्यांच्या भक्तिभावनेबद्दल काहीही सांगता येत नाही. आता मात्र एखाद्याने तोंडावर अचानक पाणी शिपकारावे आणि झोप उडावी तसे काँग्रेसचे झाले आहे. गांधीजींनंतर आपल्या हातून पंडित नेहरूही जातात की काय या आशंकेने काँग्रेस पराभवाने कंबर मोडली असतानाही तटकन् उठून बसली आहे. हा झटकाही अर्थातच मोदी यांचाच.
मोदी यांचे एक वैशिष्टय़ आहे. त्यांचे विचार निवडणूकपूर्व व उत्तर अशा दोन कालखंडांत स्पष्टच विभागता येतात. निवडणुकीआधी ते नेहरूंवर टीका करीत होते. ‘पटेल हेच भारताचे पंतप्रधान बनावेत अशी सगळ्या भारताची इच्छा होती. तसे झाले असते तर देशाचे भाग्य काही वेगळेच असते,’ हा शोध त्यांचाच. ते स्वत: थोर इतिहास पुनल्रेखक असल्यामुळे त्यावर अनेकांनी डोळेझाक विश्वास ठेवला. पण गेल्या ऑक्टोबरमध्ये हे शोधकार्य करणाऱ्या मोदी यांना या ऑक्टोबरात एकाएकी नेहरूंबद्दल प्रेमउमाळा आला. हल्ली जातील तेथे ते म. गांधी आणि चाचा नेहरू यांचा नामजप करताना दिसतात. परवा ऑस्ट्रेलियातील मुलांशी बोलतानाही त्यांनी नेहरूंची आठवण काढली. तेथेच गांधीजींच्या पुतळ्याचे अनावरणही केले. वर आपल्या अशा वागण्याने आपल्या अनुयायांच्या मन-मेंदूवर काय परिणाम होईल याची अणुमात्र तमा न बाळगता आजच्या काळातही गांधीविचार कसे सुसंगत आहेत यावर प्रवचन झोडून टाळ्या घेतल्या. त्याआधी इकडे भारतात असताना त्यांनी, चाचा नेहरूंच्या जयंती दिनापासून इंदिरा गांधी यांच्या जयंती दिनापर्यंत शाळांमध्ये स्वच्छता सप्ताह साजरा करावा अशी मनीषा व्यक्त केली होती. बहुधा त्या घोषणेने काँग्रेसचे कान टवकारले असावेत. नेहरूंच्या १२५ व्या जयंतीनिमित्ताने काँग्रेसने गेल्या सोमवारी दिल्लीत एक आंतरराष्ट्रीय परिसंवाद ठेवला होता. त्यात सोनिया आणि राहुल यांनी भाजप आणि मोदी सरकारवर नामोल्लेख टाळून जोरदार टीका केली ती त्यामुळेच. या देशातून पंडितजींचे नाव, त्यांचा विचारवारसा पुसून टाकण्याचे प्रयत्न सुरू आहेत, अशी गर्जना करीत सदासंतप्त राहुल यांनी भाजपवर हल्ला चढविला. तर सोनियांनी, तथ्यांची मोडतोड करून नेहरूंचे कार्य आणि कर्तृत्व याबाबतची खरी माहिती लोकांपर्यंत पोहोचणार नाही असे प्रयत्न गेल्या काही वर्षांपासून सुरू आहेत, असा आरोप केला. सोनियांचे हे मापन अगदी बरोबर आहे. नेहरूंबाबत खोटय़ानाटय़ा गोष्टी रंगवून, निर्गल आरोप करून त्यांची बदनामी करण्याची मोहीम भारतात सुरू आहेच. संपूर्ण नेहरू घराण्याच्या चारित्र्य आणि धर्माबद्दल इंटरनेटवर अत्यंत  गलिच्छ मजकूर पेरलेला दिसतो. पण ही मोहीम काही आजकालची नाही. हा अत्यंत संघभावनेने पिढय़ानुपिढय़ा खेळला जाणारा खेळ आहे. तरुणाईचे मेंदू नासवण्याचे षड्यंत्र म्हणून त्याकडे दुर्लक्ष केले तरी फाळणी, काश्मीर, ६२ चे युद्ध येथपासून आíथक धोरणापर्यंतच्या अनेक मुद्दय़ांवर टीका केली जाते. त्यातील काही रास्त असते, तर काही आपापल्या पोथिनिष्ठेवर आधारलेली. त्याबाबत चर्चा व्हावी, संशोधन व्हावे, नेहरूंच्या खरोखरच असतील त्या चुका त्यांच्या नेहरू शर्टाच्या खिशात घालाव्यात, याला कोणाचीच हरकत असण्याचे कारण नाही. सोनियांचीही नसावी. त्यांचा आक्षेप नेहरूंचे विचार, त्यांची धर्मनिरपेक्षता, सर्वसमावेशकता, लोकशाहीवाद यावर प्रहार केले जात आहेत त्यावर आहे. सोनियांचा हा हरकतीचा मुद्दाही योग्यच आहे. समस्या एवढीच आहे की या गोष्टीची जबाबदारी काँग्रेसचीही आहे.
 सोनियांचा इतिहासाचा अभ्यास मोदींइतका पक्का नसला, तरी त्यांना सत्तरच्या दशकानंतरची काँग्रेस आणि तिचे कार्यकर्तृत्व माहीत असेलच. नेहरू हे लोकशाहीवादी होते. तसे तेव्हाच्या काँग्रेसमधील सारेच होते. तेव्हा ते केवळ नेहरूंचे वैशिष्टय़ होते असे म्हणता येणार नाही. त्यांचे वैशिष्टय़ हे होते की सरकार आणि पक्षच नव्हे तर संपूर्ण देश नेहरू म्हणेल ती पूर्वदिशा असे मानत होती. अशा परिस्थितीतही ते लोकशाहीवादी होते. भारतात ही शासनप्रणाली रुजण्यासाठी ते झटले. पुढे त्यांच्या कन्येनेच आणीबाणी आणली. आज मेनका गांधी भाजपमध्ये असल्याने संजय गांधींबाबत काहीही न बोलण्याचीच रीत आहे. पण एके काळी त्यांच्या रूपात हुकूमशहा दिसतो कसा आननी हे देशाने अनुभवले आहे. शासनव्यवहारात धर्माला स्थान नाही ही धर्मनिरपेक्षता. ती नेहरूंनी जपली. त्यांचे पौत्र राजीव गांधी यांनी ती धुळीस मिळविली. पुढच्या सगळ्याच काँग्रेसी सरकारांनी गांधी-नेहरूंना देव्हाऱ्यात बसवून त्यांचे विचार वाऱ्यावर उधळले. गांधी-नेहरू कालसुसंगत आहेत हे मोदी सांगत असताना काँग्रेस मात्र त्या कालसुसंगततेपासूनच तुटली. काँग्रेसच्या पराभवाला हे कारणीभूत आहेत. हे असेच सुरू राहिले तर गांधी-नेहरूंचे सांगता येत नाही, पण राहुल गांधी यांचे नाव नक्कीच विस्मरणात जाण्याचा धोका आहे. तो सोनियांच्या लक्षात आला नसेलच असे नाही. पण नुसताच कळून उपयोग नसतो, ते वळावेही लागते.