आयपीएल स्पॉट फिक्सिंगप्रकरणी भारतीय क्रिकेट नियमक मंडळाने (बीसीसीआय) नेमलेल्या समितीकडून बीसीसीआयचे माजी अध्यक्ष श्रीनिवासन, त्यांचे जावई मय्यप्पन आणि राजस्थान रॉयल्स टीमचा मालक राज कुंद्रा यांना ‘क्लीन चिट’ मिळणार, हे चौकशी समिती नेमण्याआधीच स्पष्ट झाले होते.  स्पॉट फिक्सिंग प्रकरण उघड झाल्यानंतर बीसीसीआय पदाधिकारांची बठक चेन्नईत झाली, त्या बठकीत माजी अध्यक्ष श्रीनिवासन यांच्या विरोधाता पंजाब क्रिकेट असोसिएशनचा एक सदस्य वगळता कोणीही ब्रसुद्धा उच्चारला नाही.
बीसीसीआय स्वतंत्र नियामक मंडळ असल्यामुळे त्यांच्या कारभारावर सरकारचे, प्रशासनाचे किंवा न्यायालयाचे कुठलेही नियंत्रण नाही. हजारो कोटींच्या घरात असल्येल्या आíथक उलाढालीमुळे बीसीसीआयचे पदाधिकारी बीसीसीआयला माहितीच्या अधिकारात आणायला तयार नाहीत त्यामुळे ‘हम करे सो कायदा..’  अशी एकाधिकारशाही बीसीसीआयची आहे. मुंबई उच्च न्यायालयाने स्पॉट फिक्सिंगप्रकरणी बीसीसीआयने नियुक्त केलेल्या समितीवर प्रश्नचिन्ह निर्माण करून नव्याने चौकशी समिती नेमण्याचे दिलेले निर्देश यादृष्टीने महत्त्वाचे आहेत. यामुळे एका अर्थाने बीसीसीआयच्या हुकूमशाही राजवटीला लगाम लागेल.
– सुजित ठमके, पुणे.

महामानवाला अनुयायांनी नव्याने समजून घ्यावे..
स्वातंत्र्यकवी सावरकरांची समशेर ए-लफ् ज उर्दूतही तळपली हे ऐकून तमाम सावरकरचाहत्यांचा ऊर खुशीने भरून आला आहे. प्रतिभेला सीमा आणि भाषा नसते, हे पुन्हा नव्याने समजले. या गजलांमध्ये वीररस आहे, तरीही हळवेपणा आहे मात्र तो प्रेयसासाठी नाही तर देशासाठी आहे. तरीही गजलेच्या सर्व लकबी (मॅनरिझम्स) त्यांनी उत्तम पाळल्या आहेत हे निदा फाजलीसारख्या ज्येष्ठ गजलकारानेही मान्य केले आहे. ‘लोकसत्ता’त नमूद केल्याप्रमाणे खरोखरच   मुसलमान कैद्यांकडून जर त्यांनी उर्दूची लिपी शिकून घेतली असेल आणि त्यानंतर गजला तयार केल्या असतील, तर ही घटना आजवर स्वातंत्र्यवीरांच्या केवळ हिंदुत्ववादी किंवा मुस्लीमद्वेष्टा या तयार केल्या गेलेल्या प्रतिमेला छेद देणारीच आहे.
हा शोध ‘सावरकरवाद म्हणजे िहदुत्व’ असेच गृहीतक मनाशी धरलेल्यांना अंतर्मुख करणारा आहे, असे वाटते. मुस्लीम समाजाला उद्देशून यापूर्वीही सावरकरांनी पत्रे लिहिली होती. त्यासाठी त्यांनी त्या धर्मातल्या योद्धय़ांचा दाखलाही दिला होता. सावरकर फार समजले नसूनही स्वत:ला त्यांचे भक्त म्हणविणाऱ्या अनेक भक्तांनाही अडचणीत टाकणारा हा शोध ठरावा. ‘सावरकर’ या महामानावाचा अत्यंत संकुचित अर्थ आजवर लावला गेला आहे. या सर्वाच्या समजुतीच्या कित्येक योजनेपलीकडे सावरकर होते. हे आता सिद्ध झाले आहे. खेदाने म्हणावेसे वाटते की महापुरुषाला मरण दोनदा येते. एकदा निसर्गाकडून आणि नंतर अनुयायांकडून. या महान स्वातंत्र्यकवीला मनाचा मुजरा; परंतु अजूनही त्याच्या बाबतीत संशोधनाला वाव असावा अशी शंका येते.
सौरभ गणपत्ये, ठाणे</strong>

‘कलंकशोभा’ या शीर्षकातून निषेध की गौरव?
‘कलंकशोभा’ हे शीर्षक लोकप्रतिनिधींचे निलंबन व अनुदार उद्गारांबाबतच्या बातमीला (शनिवार, २७ जुलै) ‘लोकसत्ता’ने दिले आहे. ना. सी. फडक्यांची एक वाचकप्रिय कादंबरी ‘कलंकशोभा’. शब्दाचा अर्थ ‘वाईट वर्तणुकीच्या माणसाकडून दुसऱ्याचे भले झाले म्हणून त्याच्या वाईट वर्तणुकीचा कलंकसुद्धा शोभादायक झाला’. आपल्या (?) लोकप्रतिनिधीच्या अशोभनीय उद्गारांबद्दल हल्लीच्या पत्रकाराने हा शब्द वापरला आहे.
इंग्लिश माध्यमाच्या शाळेत शिकलेला; मंग्लिशमध्ये लिहिणारा पत्रकारवर्ग सध्या वाढतो आहे. ज्या उद्गारांचा निषेध करायचा त्यांची तो हा शब्द वापरून प्रशंसा करतो आहोत, याबद्दल प्रथम संबंधित पत्रकारांचा निषेध करावयास पाहिजे.
अतुल म. शंकरशेट, गिरगाव, मुंबई.

मद्रास उच्च न्यायालयाचा निर्णय न पटणारा
मद्रास उच्च न्यायालयाने विवाहपूर्व संबंधांना कायदेशीर लग्न म्हणून मान्यता दिली असली तरी या निर्णयामुळे आज अनेक गुंतागुंतीचे प्रश्न निर्माण झाले आहेत. मुळात ‘लिव्ह इन रिलेशनशिप’ हा प्रकार आपल्या हिंदू धर्मात मान्यच नाही. लग्न न करता नुसते शरीरसंबंध ठेवणे ही विवाहाची व्याख्या चुकीची आहे. या कायद्याचा फायदा होईल की नाही माहीत नाही, पण या निर्णयाचा गैरफायदा अनेक जण घेतील, यात तिळमात्र शंका नाही. बदलत्या काळाबरोबर विचारही बदलायला हवेत, ही गोष्ट मान्य केली तरी विवाहपूर्व संबंध म्हणजे ‘लग्न’ ही कल्पनाच घृणास्पद आहे. अशा संबंधांना मद्रास उच्च न्यायालयाने मान्यता देऊन चूक केली आहे, असे म्हटले तरी काहीही वावगे ठरणार नाही.  ‘स्त्री’ने पतीबाह्य़ संबंध ठेवले तर हे कुठलाही भारतीय पुरुष सहन करू न शकणारा आहे. मोबाइलवरील आपल्या पत्नीने परपुरुषाशी चॅटिंग, फ्लर्ट केल्याने अनेकांनी घटस्फोट घेतल्याची अनेक प्रकरणे ऐकिवात आहेत, तर विवाहबाह्य़ संबंधांच्या पाश्र्वभूमीवर अनेक खून-खटले घडल्याचे आपण वृत्तपत्रांतून वाचतो. आपल्या संस्कृतीमध्ये ‘लग्न’ हे एक पवित्र बंधन मानले जाते.  त्यामुळे या निर्णयाचा समाज सहजासहजी स्वीकार करील, असे वाटत नाही.यावर गांभीर्याने व्यापक चर्चा होणे गरजेचे वाटते.
-संजय तांबे पाटील, औरंगाबाद.

अहमदनगर आणि कैरो या शहरांतील साम्य
अहमदनगर हे शहर भारतातील दक्षिण महाराष्ट्रात आहे. नगरमध्ये अहमदशहा, बुऱ्हाणशहा, सुलताना चांदबिबी यांची सत्ता होती. कैरो ही इजिप्त या मध्य  आशियातील एका देशाची राजधानी आहे. अहमदनगरचे हवामान कोरडे, उष्ण आहे. तसेच हवामान कैरो शहराचे आहे. परंतु या दोन शहरांतील महत्त्वाचे साम्य राजकीय म्हणावे लागेल. नगरमध्येही अनिल राठोड व भानुदास कोतकर यांनी लोकशाहीच्या व पक्षाच्या माध्यमातून सत्ता संपादन केली, उपभोगली पण विकासाच्या बाबतीत मात्र काहीच केले नाही. अहमदनगरमध्ये ही १९९०च्या दशकात विधानसभेचे दोन उमेदवार अरुण जगताप आणि अनिल राठोर यांच्यात व त्यांच्या समर्थकांत मारामारी, भांडणे होत असत, यातून शहराची शांतता भंग पावत असे. कैरोमध्येही सध्या मोर्सी समर्थक आणि विरोधक यांच्यात सारखी भांडणे चालू आहेत. लोकशाही मार्गाने सत्ता संपादन करून  एकाधिकारशाही राबवण्याचे प्रकारही दोन्ही शहरांत दिसले आहेत. नगरचा बेरोजगार तरुण अजूनही दुर्लक्षित आहे. भ्रष्टाचार दोन्ही शहरांत आहे. हे सगळे पाहता दोन्ही शहरांमध्ये  लोकशाही रुजवण्यासाठी, परिवर्तनासाठी बराच काळ लोटावा लागेल.
विश्वास किसन पेहेरे

खडीवाले यांची दिलगिरी
‘लोकसत्ता’च्या ‘विचार’ पानावरील ‘वॉर अ‍ॅण्ड पीस’ या सदरात स्किझोफ्रेनिया या विषयावर श्री. प. य. वैद्य खडीवाले यांनी ६ जुलै २०१३ रोजी माहिती दिली होती. या लेखात अनावधानाने वेदशास्त्रसंपन्न श्री. बाळुकाका भिडे यांच्याविषयी काही गैरसमज होतील अशी माहिती आली होती.  वैद्य खडीवाले सांगू इच्छितात की हा उल्लेख चुकीचा होता व चुकून दुसऱ्या रुग्णाऐवजी विनाकारण श्री. बाळुकाका भिडे यांचे नाव दिले गेले. वैद्य खडीवाले याबद्दल दिलगीर आहेत.

कुठला ‘परदेशी पैसा’?
‘अंधश्रद्धा समितीला परदेशातून पसा’ ही बातमी (लोकसत्ता, २४ जुलै) वाचली. येनकेनप्रकारेण अंधश्रद्धाविरोधी विधेयक अधिकाधिक लांबणीवर टाकण्याचा हा प्रकार वाटतो.
जसा काही एखाद्या परदेशी सरकारकडूनच राष्ट्रविरोधी कारवायांसाठी पसा आल्याच्या थाटात असले आरोप करण्यापेक्षा, अंधश्रद्धा निर्मूलन समितीच्या डॉ. दाभोलकरांनी केलेला खुलासा पाहावा. महाराष्ट्र फौन्डेशनकडून मिळालेल्या पुरस्काराची रक्कम कायदेशीर मार्गानेच भारतात आलेली आहे. ही रक्कम परदेशातच मौजमजेसाठी न उडवता त्यांनी ती ‘अंनिस’च्या कार्यासाठी नि:स्वार्थपणे दिली आहे तसेच सामाजिक जाणिवेतूनच परदेशातील मराठी माणसेच निधी देत आहेत, ही गोष्टही लक्षात घेणे जरुरीचे आहे.
– श्री. वि. आगाशे, ठाणे.