News Flash

बदमाश, बावळट, बुद्दू!

बलात्कार, खून आदी आरोप असलेल्या एका संत रामपालास हरयाणा सरकारने उच्च न्यायालयाच्या आदेशानंतरही अटक केली नाहीच, उलट आजाराचा त्याचा दावा कसा खरा आहे हे परस्पर

| November 12, 2014 01:20 am

बलात्कार, खून आदी आरोप असलेल्या एका संत रामपालास हरयाणा सरकारने उच्च न्यायालयाच्या आदेशानंतरही अटक केली नाहीच, उलट आजाराचा त्याचा दावा कसा खरा आहे हे परस्पर समिती नेमून न्यायालयास सांगितले! हे सारे प्रकार तिकडे घडतात असे म्हणत त्याकडे काणाडोळा करण्याची सोय महाराष्ट्राला होती.. ती आता उरली आहे का?

‘हे राज्य व्हावे ही श्रींची इच्छा’ म्हणून राज्य मिळाल्यावर कारभार श्रींच्या हाती देऊन चालत नाही. राज्य राज्याच्या नियमांनीच चालवावे लागते. हे शिवाजी महाराजांना कळले. त्यामुळे त्यांच्या काळात कोणाही संतमहंताचे प्रस्थ वाढले नाही आणि कोणताही बाबा-बापू हा राज्य व्यवस्थेपेक्षा मोठा झाला नाही. परंतु उठता-बसता छत्रपतींना वंदन करणाऱ्या त्यांच्या आजच्या वंशजांना याचा विसर पडलेला दिसतो. नपेक्षा हरयाणा आदी राज्यांत जे काही सुरू आहे ते चालते ना. तेथील पंजाब आणि हरयाणा उच्च न्यायालयाने राज्य सरकारला सोमवारी चार तडाखे लगावले. कारण न्यायालयाचे आदेश राज्य सरकारने पाळले नाहीत. हे आदेश होते कोणा संत रामपाल नावाच्या बाबास अटक करण्याचे. या बाबाच्या नावावर खून ते बलात्कार असे अनेक गुन्हे आहेत. तरीही त्याच्या भक्तांना त्याची चाड नाही. आपला गुरू म्हणजे कोणी ईश्वरी अवतार असल्याचा त्यांचा समज आहे. तसा तो असावयासही हरकत नाही. कारण कोणाचेही भक्त म्हणवून घ्यावयाचे असेल तर इतकी निर्बुद्धता ही किमान गरज असते. ही अशी निर्बुद्धता वातावरणात मुबलक प्रमाणावर भरून राहिलेली असल्याने या असल्या बकवास आणि बदमाश बाबाबापूंचा सध्या सुळसुळाट झालेला आहे. या बदमाश बापूंचे उद्योग आपापल्या आश्रमांपुरतेच मर्यादित राहिले असते तर ते एक वेळ समजण्यासारखे होते. कारण कोणी कोणाच्या पायी डोके ठेवावे हा ज्याचा त्याचा प्रश्न असतो. परंतु ही मंडळी कायदा धाब्यावर बसवू लागली असून त्यामुळे त्यांचा समाचार घेणे क्रमप्राप्त ठरते. त्याचमुळे हरयाणात जे काही घडत आहे, ते समजून घ्यावयास हवे.         
या रामपालाच्या नावावर गंभीर गुन्हे असल्यामुळे त्याच्यावर न्यायालयात खटला सुरू आहे. यास जेव्हा सामोरे जावयाची वेळ आली तेव्हा हा बदमाश महाराज आजारी पडला. हे महाराज आणि राजकारणी यांच्यातील साम्य. तुरुंगात जावयाची वेळ आल्यावर ज्याप्रमाणे सुरेश जैन वा तत्सम राजकारणी रुग्णालयाचा रस्ता धरतात तसेच या बदमाश बाबाने केले. त्याने प्रकृतिअस्वास्थ्याचे कारण दाखवत स्वत:स रुग्णालयात दाखल केले. येथपर्यंत एक वेळ समजून घेण्यासारखे होते. परंतु त्यानंतर जे काही घडले ते लोकशाही व्यवस्थेची लाज काढणारे आणि त्याचमुळे काळजी वाढवणारे आहे. या बाबाची लोकप्रियता लक्षात घेता त्यांना अटक केल्यास त्याच्या भक्तांचा रोष सहन करावा लागेल या भीतीने राज्य सरकारने त्यास अटक केली नाही. इतकेच नव्हे तर या बाबाचा आजार किती खरा किती खोटा याचा अंदाज घेण्यासाठी जिल्हा पातळीवर वैद्यकांची एक समिती नेमली. सरकारचाच उद्देश या बाबाला वाचवण्याचा असल्यामुळे या लाचार वैद्यकांनीदेखील त्याच्या आजाराचीच री ओढली. त्यामुळे सोमवारी जेव्हा न्यायालयात हा मुद्दा आला तेव्हा सरकारने या वैद्यकांचा अहवाल पुढे करीत बाबास अटक न करण्याच्या निर्णयाचे समर्थन केले. त्यावर संतापलेल्या न्यायाधीशांनी प्रथम ही अशी काही समिती नेमल्याबद्दल सरकारचे कान उपटले. ही समिती नेमण्यासाठी सरकारने उच्च न्यायालयाची परवानगी तर घेतली नव्हतीच पण त्याची साधी माहितीदेखील न्यायालयास दिली नव्हती. परिणामी संतप्त न्यायालयाने सरकारला फैलावर घेतले आणि १७ नोव्हेंबपर्यंत या बाबास समोर हजर करण्याचा आदेश दिला. त्याचे पालन न झाल्यास राज्याचे गृह आणि कायदा-सुव्यवस्था सचिव यांना हात बांधून न्यायासनासमोर उभे राहावे लागणार आहे. हे प्रकरण येथेच संपत नाही. न्यायालयीन आदेशाचे वृत्त बाहेर पसरल्यावर या बदमाश बाबाच्या बुद्दू भक्तांनी आश्रमाला वेढा घातला असून कोणत्याही परिस्थितीत आपल्या गुरूस अटक करू दिली जाणार नाही, अशी भूमिका घेतली आहे. तेथील स्थानिक संस्कृतीस जागत हे भक्तगण शस्त्रसज्ज असून त्यात महिलांचादेखील समावेश आहे. तेव्हा आता या परिस्थितीतून मार्ग कसा काढायचा हा प्रश्न सरकारला पडला आहे. खेरीज तेथे रामपाल हा एकच काही बोगस बाबा नाही. राम रहीम सिंग, आशुतोष महाराज आदी अनेक महाराजांनी तेथील व्यवस्थेस खुंटीला टांगलेले आहे. यातील राम रहीम सिंग याच्या अनुयायांनी मध्यंतरी मुंबईत हमरस्त्यावर हैदोस घातला होता. यास सिनेमातील नाचगाण्यातदेखील रस आहे आणि तसेच काही चित्रविचित्र कपडे घालून तो नाचबिचदेखील करतो. त्यासही कोणाची हरकत असायचे कारण नाही. परंतु डेरा सच्चा सौदा नामक पंथीयाचा प्रमुख असलेला हा बाबा आश्रमातील महिलांचे लैंगिक शोषण ते पत्रकाराची हत्या असे उच्च दर्जाचे गुन्हे दाखल होण्याइतका कर्तृत्ववान आहे. दुसरा आशुतोष महाराज तर गतप्राण होऊन काही महिने झाले. परंतु तरीही त्याचे शव त्याच्या भक्तांनी शीतकपाटात जपून ठेवले आहे. तो मेलेलाच नाही, असा त्यांचा दावा आहे आणि त्याच्या आश्रमाच्या आसपासदेखील भक्त वगळता कोणाला फिरकता येत नाही, इतका त्यांचा धाक आहे.     
इतके दिवस हे सारे प्रकार तिकडे घडतात असे म्हणत त्याकडे काणाडोळा करण्याची सोय आपल्याला होती. आता ती नाही. कारण या आणि अशाच बदमाश बाबाबापूंचे लोण महाराष्ट्रासारख्या प्रगत राज्यांतही अलीकडच्या काळात मोठय़ा प्रमाणावर पसरले आहे. येथील राजकारण्यांना आपापसांतील मतभेदांत तोडगा काढण्यासाठी भय्येगिरी करणारा कोणी महाराज लागतो, कोणा भुक्कड नरेंद्राच्या पायावर जाहीर डोके ठेवून त्याला मोठे करण्यात शिवसेनाप्रमुख दिवंगत बाळ ठाकरे आणि लता मंगेशकर यांच्यासारख्यांस आपण काही चूक केली असे वाटत नाही किंवा मुंबईतील कोणी डॉक्टरबापू स्वत:स परमेश्वर रामाचा अवतार म्हणवत पत्नीस सीतामाई करून धाकटा भाऊ लक्ष्मण असल्याचे घोषित करतो. वास्तविक या असल्या बदमाशांना खऱ्याखुऱ्या वनवासात पाठवण्याची गरज असताना शहाणेसुरते लोक अक्कल गहाण टाकून त्यांच्या कच्छपि लागताना दिसतात, तेव्हा परिस्थिती किती बिकट आहे, याचेच दर्शन घडते. या सर्व बाबाबापूंची मोठी दुकानदारी आहे. त्याच्या भक्तांना या बाबाबापूंच्या छबीच्या लेखण्यांपासून वहय़ांपर्यंत भक्तीची सर्व साधनसामग्री त्यांच्याच दुकानातून खरेदी करावी लागते. हे नवे देव हे या भक्तांच्या खरेदीचे भुकेले आहेत. मोठमोठय़ा सरकारी जमिनी हडप करून त्यांनी सरकारलाही लुबाडलेले आहे. परंतु हे समजून घेण्याची कुवत आणि इच्छा या बोगस बाबाबापूंच्या भक्तगणांना नाही.    
यातील चिंता वाढवणारी बाब म्हणजे अलीकडच्या काळात त्यांना राजमान्यताही मिळताना दिसते. वर उल्लेखलेल्यांतील बाबा राम रहिमाने भाजपच्या उमेदवारास आणि त्यातही नरेंद्र मोदी यांना उघड पाठिंबा दिला होता आणि भाजप वा पंतप्रधान यांनी तो अव्हेरण्याची हिंमत दाखवली नाही. जसे नेते तसेच त्यांचे अनुयायी. गेल्या आठवडय़ात मुंबईत देवेंद्र फडणवीस यांचा शाही शपथविधी पार पडला. तो खेळाच्या मैदानात डामडौलाने झाला यापेक्षाही या समारंभात तिडीक आणणारी बाब होती ती म्हणजे हे भगवे वस्त्रांकित बाबाबापूमहाराज. वास्तविक यापैकी काही तुरुंगात खडी फोडण्यास जाण्याच्या लायकीचे आहेत. परंतु आपण म्हणजे कोणी सात्त्विक धर्मसत्ता आहोत आणि या राजसत्तेस आशीर्वाद द्यायला आलो आहोत, असा त्यांचा आविर्भाव होता.     
प्रबोधनाचा वारसा मिरवणाऱ्या महाराष्ट्रास हे शोभत नाही. तेव्हा हे असले बदमाश बाबाबापू आणि बावळट राजकारणी यांच्यात अडकलेला हा बुद्दू समाज बाहेर काढण्याचे प्रयत्न तातडीने आणि जमेल तेथे करण्याची गरज आहे.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on November 12, 2014 1:20 am

Web Title: controversies created by spiritual gurus and saints in india
टॅग : Saints
Next Stories
1 मॅग्झिमम मोदी..
2 स्वाभिमानाची भातुकली
3 फ्रॉड म्हणजे रे काय भाऊ?
Just Now!
X