उचलेगिरी ही भारतीय सिनेमात नवीन नाही. मात्र चोरी झाली तर ती नक्की कुणाची? त्याचा कॉपीराइट कुणाकडे? आणि संबंधित अधिकार कुणाकडे? असे अनेक अतिशय गुंतागुंतीचे प्रश्न उद्भवतात. गाण्याची चोरी झाली तर त्यातील संगीत आणि गीत वेगवेगळे करून अभ्यासावे  लागते. शिवाय संगीत तंतोतंत उचलले आहे की थोडे फार?  थोडे फार म्हणजे किती?  हे सगळे शोधणे अतिशय जिकिरीचे आणि व्यक्तीसापेक्ष असते.

आपल्या भारतात कितीही राज्ये, भाषा, जाती, धर्म असू देत.. आणि त्यावरून आपल्यात कितीही तंटेबखेडे होऊ देत, पण असे दोन विषय आहेत ज्यावर या सगळ्या पलीकडे जाऊन आपण प्रेम करतो. पहिला म्हणजे क्रिकेट आणि दुसरा म्हणजे बॉलीवूड. बॉलीवूडचे चित्रपट, इथली गाणी आणि इथले नट-नटय़ा यांच्यासाठी आपली नेहमीच ‘जान हथेली पर’ असते. खरे तर हे बॉलीवूडशी संबंधित लोक नेहमीच कुठल्या ना कुठल्या विवादात अडकलेले असतात.. कधी हाणामाऱ्या, कधी प्रेमप्रकरणे, कधी कायदे हातात घेणे, तर कधी टॅक्स चुकवणे.. एक ना दोन.. पण तरी ना त्यांची प्रतिष्ठा कमी होते ना आपलं या मंडळींवरचं प्रेम.
बॉलीवूड आणि काही प्रमाणात टॉलीवूड आणि मॉलिवूड अनेकदा ज्या प्रवादात अडकलेले असते तो म्हणजे चोरी किंवा उचलेगिरी. कल्पनांची चोरी, कथानकांची चोरी आणि मुख्य म्हणजे गाणी आणि संगीताची चोरी. मग ते ‘उरूमि’ या मल्याळम चित्रपटातील प्रसिद्ध गाणे हे एका कॅनेडियन संगीतकाराच्या गाण्याची सहीसही कॉपी होती म्हणून त्याचे प्रदर्शन थांबविण्याचे आदेश असोत किंवा ‘आय लव्ह एनवाय’ हा चित्रपट एका रशियन चित्रपटावरून चोरलेला आहे असा आरोप.. त्यातल्या त्यात संगीताच्या चोरीचा आरोप तर अगदी नेहमीचाच. बॉलीवूडमधल्या एकूण एक दिग्गज संगीतकारांवर संगीतचौर्याचा आरोप त्यांच्या कारकीर्दीत कधी ना कधी झाला आहे. मग आर.डी. बर्मन असो की ए.आर. रेहमान की गेला बाजार प्रीतम आणि अन्नू  मलिक.. अगदी कुणी म्हणता कुणी यातून सुटले नाही; पण तरीही यातले काही फार गुणवान संगीतकार म्हणून गणले गेले तर काही चोर. काहींचे संगीत दुसऱ्या संगीतावरून प्रेरित होते, तर काहींचे अगदी सरळ कॉपी आणि ही कॉपी कधी रीतसर मूळ कलाकाराला मोबदला आणि श्रेय दोन्ही देऊन केलेली होती, तर कधी सरळ सरळ चोरी.
अल्बर्ट आइनस्टाइनचे एक सुप्रसिद्ध वाक्य आहे.. सक्सेस इज वन पर्सेट इन्सपिरेशन आणि ९९ पर्सेट पर्सपिरेशन; पण आपल्या बॉलीवूडकरांनी मात्र या वाक्याला बरेचदा सोयीस्कररीत्या उलटे केलेले दिसते आणि त्यांच्यासाठी हा फॉम्र्युला ‘यश= ९९% प्रेरणा (म्हणजे चोरी)+ १% मेहनत’ असा उलटा झालेला दिसतो. ‘नजरें मिली दिल धडका’ हे ‘कम सप्टेंबर’वरून उचललेले गाणे असो किंवा ‘खामोशी’मधले ‘जाना सुनो’ हे  ‘िब्रग द वाइन’वरून उचललेलं गाणं.. या गाण्यात सही सही कॉपी केलेली दिसते.
काही दिवसांपूर्वीच आर.डी. बर्मन यांच्या जीवनावरील ‘पंचम अनमिक्स्ड’ नावाचा ब्रह्मानंद सिंग यांचा चित्रपट पाहिला. यात अनेक दिग्गजांनी पंचमला एखादे गाणे कसे सुचले याबाबत सांगितलेले किस्से आहेत. आशाबाई यात ‘रात ख्रिसमस की थी’ हे गाणे कुण्या विदेशी चित्रपटातल्या एका सस्पेन्स पाश्र्वसंगीतावरून कसे स्फुरले ते सांगतात, तर उषा उथ्थुप म्हणतात की, ‘जगातली प्रत्येक धून ही मला वापरण्यासाठी आहे’ असे पंचमला वाटायचे. अर्थात तो ती धून खरोखर प्रेरणा म्हणून वापरत असे आणि त्यावरून बनलेले गाणे हे प्रत्यक्षात वेगळे असे आणि मूळ संकल्पनेपेक्षा किती तरी सुंदर असे. हा खरोखर ‘प्रत्यक्षाहुनि प्रतिमा उत्कट..’ असा अनुभव असे.
आपण मागच्या एका लेखात पाहिलं होतं की, कॉपीराइट हा कधीही कल्पनेवर मिळत नसतो. कॉपीराइट मिळण्यासाठी ती कल्पना गाण्यात, नाटकात व्यक्त होणं फार गरजेचं असतं आणि होतं असं की, अशा एखाद्या गोष्टीची जेव्हा चोरी होते तेव्हा ती पूर्णत: होत नाही. त्यातला काही भाग किंवा एखादी मूलगामी कल्पना चोरली जाते आणि त्यात भरपूर बदल केले जातात. ज्यामुळे अशी कलाकृती मूळ कलाकृतीपेक्षा भिन्न भासते. शिवाय पूर्ण चित्रपटाचा विचार करायला गेलं, तर त्यातल्या वेगवेगळ्या भागांवर वेगवेगळ्या लोकांचे कॉपीराइट्स आणि संबंधित अधिकार असतात. दिग्दर्शक, कथा-पटकथा लेखक, संगीतकार, गीतकार, छायाचित्रकार यांचे कॉपीराइट्स, तर वेगवेगळे कलाकार, गायक, साऊंड रेकॉर्डिस्ट यांचे संबंधित अधिकार. त्यामुळे चोरी झाली तर ती नक्की कुणाची? त्याचा कॉपीराइट कुणाकडे? आणि संबंधित अधिकार कुणाकडे? असे अनेक अतिशय गुंतागुंतीचे प्रश्न उद्भवतात. गाण्याची चोरी झाली तर त्यातील संगीत आणि गीत वेगवेगळे करून अभ्यासावे लागते. शिवाय संगीत तंतोतंत उचलले आहे की थोडे फार? थोडे फार म्हणजे किती? कॉपीराइट कायद्यानुसार ती कल्पनेची चोरी आहे की अभिव्यक्तीची? हे सगळे शोधणे अतिशय जिकिरीचे आणि व्यक्तीसापेक्ष असते.
चित्रपट उद्योगात गुंतलेला पसा पाहता हा उद्योग अतिशय कडक कॉपीराइट संरक्षणाची आणि कॉपीराइट असलेल्या कामावर पुरेपूर मोबदल्याची मागणी सतत करत राहतो. अलीकडे जुन्या गाण्यांच्या ओळी नव्या चित्रपटांमध्ये आणि जाहिरातीत वापरण्याचा ट्रेंड येऊ पाहतो आहे (आठवून पहा ‘कहानी’मध्ये वेळोवेळी बॅकग्राऊंडला ऐकू येणारी आरडीची गाणी किंवा त्याचेच ‘आज कल पांव जमीं पर’ वापरून केलेली जाहिरात). जुन्या चित्रपटांवरील गाण्यांचे हक्क ज्या म्युझिक कंपन्यांकडे आहेत ते अशा एकेका ओळीच्या वापरासाठीदेखील लाखो रुपये मागत आहेत.
दुसऱ्या एका प्रकारची चोरी म्हणजे मुळात बनलेले चित्रपट अनधिकृतरीत्या पाहणे आणि ऐकणे. कडक कॉपीराइट संरक्षणाची वारंवार मागणी करूनही नवनवीन माध्यमांच्या उगमामुळे चोरी थांबवणे दिवसेंदिवस अशक्य होऊ पाहात आहे आणि म्हणूनच अतिरेकी कॉपीराइट संरक्षणाचे वेड झुगारून देऊन हळूहळू का होईना जगभरातील चित्रपट उद्योग कलाकृतींच्या वितरणासाठी नवनव्या वाटा चोखाळू पाहतो आहे. अधिकाधिक कलाकार यासाठी नवी बिझनेस मॉडेल्स वापरताना दिसत आहेत. यातला एक प्रकार म्हणजे  ‘फ्रीमियम’, ज्यात कलाकार त्यांच्या कामाचा काही भाग फुकट उपलब्ध करून देतात आणि उरलेल्या भागावर ‘अ‍ॅड ऑन’ म्हणून पसे घेतात. बीट टोरेंट्सचा ‘बंडल’ हा प्रकार हे याचेच उदाहरण आहे आणि हा प्रकार वापरून कित्येक कलाकार भरपूर श्रीमंतही झाले आहेत.
भारतात अशा प्रकारे कॉपीराइट कायदा झुगारून देणाऱ्या बिझनेस मॉडेल्सची फारशी चलती नाही, पण काही तुरळक घटना आता इथेही होऊ लागल्या आहेत. शेखर कपूर यांचे ‘क्यों कि’ हे व्यासपीठ यातलाच एक प्रकार म्हणता येईल. (पहा: http://www.qyuki.com) अनेक कलाकारांनी एकत्र येऊन एखादी कलाकृती बनविण्याचे, तिच्या वितरणाचे, त्यातून मानधन मिळविण्याचे नवनवे प्रकार या व्यासपीठावर उपलब्ध आहेत. अनेकदा कॉपीराइटने संरक्षित कलाकृतींवर पसे कमावणारे लोक कलाकार नसून त्यातले मध्यस्थ (रेकॉर्ड लेबल्स किंवा प्रॉडक्शन हाऊसेस) असतात. त्यामुळे खरा आíथक फायदा तर कलाकारापर्यंत पोहोचत नाहीच, पण उलट त्या कलाकृतीचा आस्वाद घेणे सर्वसामान्य रसिकांना अवघड होते. यामुळे कलाकाराला ना पसा मिळतो ना प्रसिद्धी. हे उमगून कपूर यांनी हे व्यासपीठ निर्माण केले आणि कॉपीराइटचा अतिरेक असलेली मळलेली वाट सोडून द्यायची ठरवले.
देवाशीष माखिजा हे भारतीय फिल्म उद्योगातले एक लेखक आहेत आणि त्यांनीही या क्षेत्रातील कॉपीराइट्सचा अतिरेक नाकारला आहे. त्यांच्या म्हणण्याप्रमाणे कॉपीराइट तुमची कल्पना संरक्षित करतच नाहीत आणि चोरणाऱ्याला कॉपीराइट कायद्यात न अडकता चोरी करण्याच्या अनेक वाटा माहितीच असतात. त्यामुळे यात फारसे न अडकता आपले काम सरळ लोकांना वापरू द्यावे आणि फक्त आपला नामनिर्देशाचा नतिक हक्क शाबूत ठेवावा.
कॉपीराइट्सबद्दल पूर्ण अज्ञान, मग भरपूर ज्ञान, मग त्याचा अतिरेकी वापर, त्यातून कमालीची बंधने, त्यामुळे खऱ्या कलाकारांना फायदा न होता मधल्या लोकांच्या भरल्या जाणाऱ्या तुंबडय़ा आणि त्यातून कॉपीराइट्स झुगारून देऊन चोखाळण्यात आलेल्या या काही नव्या वाटा.. इथे हे वर्तुळ पूर्ण होते. या वर्तुळाकृती प्रवासाकडे पाहताना राहून राहून अदनान सामी याचे ‘मुझको भी तू लिफ्ट करा दे’ हे गाणे आठवते. पूर्णत: नक्कल करणारे कलाकार जणू मूळ कलाकाराला ‘तुझी कलाकृती चोरू दे’ म्हणून हे गाणं गाऊन विनवत असतात, तर अतिरेकी कॉपीराइट्सच्या बंधनांना झुगारून देत कपूर किंवा माखिजा यांच्यासारखे लोक आपली कलाकृती एका उंचीवर नेऊन ठेवून ‘लिफ्ट’ करत असतात!