कल्पना आणि अभिव्यक्ती यांमध्ये फरक आहे.. या तत्त्वाच्या आधारे ‘कॉपीराइट’चा विचार होतो. लेखकाच्या, कवीच्या, नाटककाराच्या ‘अभिव्यक्ती’ला कॉपीराइट मिळतो; कल्पनेला नव्हे! त्यामुळेच एका कल्पनेवर आधारित अनेक नाटके आली, चित्रपट निघाले, तरी कॉपीराइट-भंगाचे खटले उभे राहात नाहीत..
‘अंदाज’, ‘संगम’, ‘चाँदनी’, ‘साजन’, ‘हम दिल दे चुके सनम’, ‘कॉकटेल’, ‘स्टुडंट ऑफ द इयर’.. सांगा बघू या बॉलीवूड चित्रपटांमध्ये काय साम्य आहे?.. अर्थातच हे साम्यस्थळ म्हणजे, बॉलीवूडचा आणि आपल्या सगळ्यांचा लाडका प्रेमाचा त्रिकोण. कितीही चावून चोथा झाला तरी प्रेक्षक खेचणारा प्रेमत्रिकोण. दर तीनपकी एका हिंदी चित्रपटात कुठे ना कुठे हा त्रिकोण असायचाच आणि आपण तो तेवढय़ाच चवीने मिटक्या मारत पाहतोही.. आता असे पाहा की, चित्रपटाची कथा आणि पटकथा हे शेवटी एक ‘साहित्य’ आहे. म्हणजेच ती एक ‘कलाकृती’ आहे आणि अर्थातच म्हणून तिला ‘कॉपीराइट कायदा’ लागू होतो. म्हणजे ज्याने कुणी पहिला प्रेमत्रिकोणावर बेतलेला चित्रपट बनवला असेल त्याचा या कल्पनेवर कॉपीराइट असणार. मग त्याची कॉपी इतरांनी केल्यावर या हक्काचे उल्लंघन झाले नाही का? आणि झाले तर त्यावर त्याने काही कृती का केली नाही? या प्रश्नांचे उत्तर म्हणजे कॉपीराइट या कल्पनेतील एक अत्यंत महत्त्वाची संकल्पना.. जिला म्हणतात कल्पना आणि अभिव्यक्तीमधील द्विभाजन (कीिं ए७स्र्१ी२२्रल्ल ऊ्रूँ३े८).
दुसऱ्या एका बौद्धिक संपदेचे म्हणजे पेटंट्सचे उदाहरण घेऊन पाहू. समजा राजीवने एका सौरऊर्जेवर चालणाऱ्या मोबाइल फोनचा शोध लावलाय. त्याची बॅटरी अशी आहे की, सूर्यप्रकाश पडताच आपोआप चार्ज होऊ लागते. ही कल्पना अतिशय नवी आहे म्हणून राजीवने भारतात त्यावर पेटंट घेतले आहे. आता पेटंट फाइल करताना संशोधकाला त्याच्या संशोधनाचे अतिशय विस्तृतपणे वर्णन करावे लागते. म्हणून राजीवने फोनमधली सौरऊर्जेवर चार्ज होणारी ही बॅटरी कशापासून बनलेली असेल, तिचे डिझाइन कसे, ती कशी काम करेल, तिचे शास्त्रशुद्ध रेखाटन कसे असेल वगरे सगळे नीट वर्णन केले आहे. समजा यानंतर काही दिवसांनी संजीव नावाच्या एका दुसऱ्या संशोधकाने याच कल्पनेवर आधारित एक मोबाइल फोन बनवला आणि राजीवच्या संशोधनाबद्दल माहिती नसल्याने त्यानेही आपल्या कल्पनेवर पेटंट फाइल केले. पेटंट ऑफिसमधला परीक्षक जेव्हा संजीवच्या संशोधनाचा अभ्यास करेल तेव्हा त्याला लगेच कळेल की, संजीवचे संशोधन अगदी राजीवसारखेच आहे. अर्थात ज्या भाषेत या दोघांनी आपआपल्या संशोधनाचे वर्णन पेटंटच्या मसुदय़ात केले आहे ते अर्थातच वेगळे आहे. पण भाषा वेगळी असली तरी ज्या मूळ संकल्पनेवर दोघांचे संशोधन बेतलेले आहे ती संकल्पना एकच आहे. थोडक्यात काय, तर संशोधनाची अभिव्यक्ती भिन्न असली तरी कल्पना एक आहे. म्हणून संजीवच्या संशोधनाला पेटंट मिळणार नाही, कारण राजीवला आधीच तशाच कल्पनेवर पेटंट मिळाले आहे. हा झाला ‘पेटंट कायद्या’तला नियम.
आता हाच नियम ‘कॉपीराइट कायद्या’च्या संदर्भात आधी सांगितलेल्या प्रेमत्रिकोणाच्या वर्णनाला लावून पाहू या. इथे सगळ्या चित्रपटांची प्रमुख संकल्पना काय आहे? तर प्रेमाचा त्रिकोण. मग प्रेमत्रिकोणावर आधारित पहिला चित्रपट जर कॉपीराइटने संरक्षित केला तर पुढच्या सगळ्या चित्रपटांची संकल्पना सारखीच आहे. मग त्यांच्यात फरक कोणता? तर भाषा वेगळी असेल, नट-नटय़ा वेगळ्या असतील, घटना वेगळ्या असतील, पात्रांची नावे, घटना घडतात ती ठिकाणे, गाणी सगळे वेगळे असेल. म्हणजे थोडक्यात संकल्पना एकच असली तरी तिची अभिव्यक्ती वेगवेगळी असेल. मग पेटंट कायद्याचा नियम कॉपीराइटलाही लागू झाल्यास पुढच्या सर्व चित्रपटांना कॉपीराइट मिळूच शकत नाही किंवा त्या कल्पनेवर चित्रपट बनवणे हेच मुळात पहिल्या कॉपीराइटचे उल्लंघन ठरेल. पण असे होत नाही.. का? कारण कॉपीराइट हा ‘अभिव्यक्ती’वर दिलेला असतो.. ‘कल्पने’वर नव्हे.
पेटंट हे ज्या कल्पनेवर संशोधन आधारित आहे तिला संरक्षित करतात आणि कॉपीराइट मात्र कल्पनेची अभिव्यक्ती संरक्षित करतात. कारण या दोन्ही बौद्धिक संपदांचे उद्देशच वेगळे आहेत आणि हा पेटंट आणि कॉपीराइट्समधला एक महत्त्वाचा फरक आहे. ज्याला कॉपीराइट कायद्याच्या भाषेत म्हणतात कल्पना आणि तिची अभिव्यक्ती यांचे द्विभाजन.
जेव्हा कॉपीराइट कायद्याच्या उल्लंघनाचा एखादा खटला न्यायालयात चालवला जातो तेव्हा न्यायाधीश हे पाहतात की त्यात कल्पनेची कॉपी करण्यात आली आहे की अभिव्यक्तीची. म्हणजे समजा श्रावण महिन्यातील निसर्गावरची एक मूळ कविता आहे आणि दुसऱ्या कवीनेही याच विषयावर कविता लिहिली आहे, तर हे उल्लंघन नव्हे. पण दुसऱ्या कवीच्या कवितेच्या तिसऱ्या कडव्याच्या ओळी समजा आहेत :
‘मधुनच येती सरसर धारा मधुन कोवळे ऊन्ह पडे
श्रावणमासी आनंद मनी हिरवे होते चोहीकडे’
आणि पहिली आपली लाडकी बालकवींची कविता आहे :
‘श्रावणमासी हर्ष मानसी हिरवळ दाटे चोहीकडे
क्षणात येते सरसर शिरवे क्षणात फिरुनी ऊन पडे’
आता इथे पाहा.. नुसतीच कल्पनेची नव्हे तर भाषेचीही म्हणजेच अभिव्यक्तीचीही नक्कल करण्यात आली आहे आणि म्हणून इथे नक्कीच कॉपीराइटचे उल्लंघन होते आहे.
आणि म्हणून कॉपीराइट मिळण्यासाठी एखाद्या संकल्पनेचे कुठल्या तरी माध्यमात प्रबंधन (फिक्सेशन) होणे अत्यंत गरजेचे असते. ‘प्रेमाच्या त्रिकोणावर आधारित एक साहित्यकृती’ अशा विषयावर तुम्ही कॉपीराइट नाही मिळवू शकत.. तर तुम्हाला त्या संकल्पनेला प्रत्यक्षात आणावे लागते.. तिचे ‘फिक्सेशन’ कुठल्या तरी माध्यमात करावे लागते. मग ते माध्यम म्हणजे कथा असेल किंवा कादंबरी किंवा गाणे किंवा नाटक. त्या कल्पनेचा विस्तार करून.. त्याबाबत लिहून ती साहित्यकृती प्रत्यक्षात आणा.. मग त्या ‘माध्यमाशी बांधलेल्या’ कलाकृतीवर..  म्हणजे नाटकावर/ कादंबरीवर/ कथेवर तुम्हाला कॉपीराइट मिळेल.. नुसत्या कल्पनेवर नाही. कल्पनेवरच हक्क सांगायचा असेल, तर ‘पेटंट’ मात्र मिळू शकेल.
कॉपीराइट कायद्यातल्या संकल्पना-अभिव्यक्ती द्विभाजनाच्या मूलतत्त्वाचा पाया घातला गेला अमेरिकेच्या सुप्रीम कोर्टाने १३६ वर्षांपूर्वी दिलेल्या बेकर विरुद्ध सेल्डन या खटल्याच्या निकालात. हा खटला होता अकाऊंटिंग या विषयावरील एका पुस्तकाच्या कॉपीराइटबाबत. सेल्डनने अकाऊंटन्सीमधल्या ‘बुककीिपग’ या विषयावर एक पुस्तक लिहिले होते. या पुस्तकात त्याने एका विशिष्ट पद्धतीने स्तंभांची आणि शीर्षकांची मांडणी केली तर लेजर बुक वाचणे कसे सोपे होईल याचे वर्णन केले होते. बेकरही स्तंभ आणि शीर्षकांची थोडी वेगळी रचना असल्यामुळे वाचायला सोपे असणारे एक लेजरबुक वापरत होता. सेल्डनचे म्हणणे असे की, हे त्याच्या कॉपीराइटचे उल्लंघन आहे. या खटल्याचा निकाल देताना अमेरिकन सुप्रीम कोर्टाने सर्वप्रथम कल्पना आणि तिची अभिव्यक्ती या दोन भिन्न गोष्टी आहेत आणि कॉपीराइट अभिव्यक्तीवर आहे ही कल्पना मांडली. न्यायालयाने सांगितले की, सेल्डनचा कॉपीराइट त्याच्या पुस्तकावर आहे.. पुस्तकाची नक्कल करून जर कुणी तसेच पुस्तक विकत असेल आणि पसे कमावत असेल तर तो त्याला रोखू शकतो. पण त्यातल्या बुककीिपगच्या नव्या कल्पनेवर तो कॉपीराइट नाही. ती वापरण्यापासून तो कुणालाही रोखू शकत नाही.
‘इनसेप्शन’ हा हॉलीवूडपट पाहिलेल्यांना आठवत असेल की, हा चित्रपट आहे एका चोरांच्या टोळीवर. पण हे चोर चोरी कसली करतात? तर लोकांच्या मनात अतिशय खोलवर दडून बसलेल्या कल्पनांची आणि गुपितांची. डॉम कॉम्ब नावाचा यातला चोर एखादा माणूस गाढ झोपेत असताना त्याच्या स्वप्नांमध्ये प्रवेश करू शकतो आणि एरवी शोधून काढण्यास अशक्य असलेल्या कल्पना चोरतो. खरे तर हा चित्रपट एक थरारपट आहे.. पण माणूस त्याच्या कल्पनांना घट्ट चिकटून बसत असतो आणि खरे तर कल्पनांना चिकटून न राहता त्या चोरू दिल्या पाहिजेत.. वेगवेगळ्या लोकांच्या डोक्यात रुजवल्या पाहिजेत.. आणि मग त्या कल्पनांची अभिव्यक्ती ज्या निरनिराळ्या तऱ्हेने लोक करतील त्यानेच हे कलाविश्व समृद्ध होईल.. कल्पनांवर मालकी हक्क प्रस्थापित करून नव्हे! ..असे या दिग्दर्शकाला सांगायचे असेल का? कुणास ठाऊक.. मी तरी बौद्धिक संपदा हक्कांच्या चष्म्यातून हा चित्रपट पाहून त्याचा अर्थ असा लावला आहे.
‘इनसेप्शन’च्या दिग्दर्शकाचा माहीत नाही.. पण कल्पना-अभिव्यक्ती द्विभाजनाची कल्पना मांडणाऱ्या कॉपीराइट कायद्याचा उद्देश मात्र नक्की हाच आहे. कल्पनेवर मालकी हक्क न देता अभिव्यक्तीवर देण्याचा.. जेणेकरून एकाच कल्पनेच्या एकाहून एक सुंदर अभिव्यक्ती वेगवेगळ्या कलाकारांना करता येतील.. ज्याने हे कलाविश्व समृद्ध होईल.. आणि तुमच्या माझ्यासारख्या रसिकांना पर्वणी मिळेल!

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

*लेखिका औषध निर्माण शास्त्राच्या प्राध्यापिका असून बौद्धिक संपदा कायद्यातील पदवीधर व पेटंट सल्लागार आहेत.

मराठीतील सर्व कथा अकलेच्या कायद्याची बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Copyright of ideas
First published on: 04-06-2015 at 12:43 IST