News Flash

खेळांमधले घर कौलारू..

स्नूकरच्या जागतिक स्पर्धेतील सुवर्ण पदक आदित्य मेहताने पटकावले याकडे क्रिकेटमध्ये मश्गूल भारतीय समाजमनाने दुर्लक्षच केले. झिम्बाब्वेत आपल्या क्रिकेटपटूंनी परदेशी भूमीवर फारा दिवसांनी विराट विजयाची नोंद

| August 6, 2013 05:01 am

स्नूकरच्या जागतिक स्पर्धेतील सुवर्ण पदक आदित्य मेहताने पटकावले याकडे क्रिकेटमध्ये मश्गूल भारतीय समाजमनाने दुर्लक्षच केले. झिम्बाब्वेत आपल्या क्रिकेटपटूंनी परदेशी भूमीवर फारा दिवसांनी विराट विजयाची नोंद केली त्याच तोडीच्या अशा क्रिकेटेतर पराक्रमांतील मातब्बरी ओळखली पाहिजे. भारतातील क्रीडाविश्वाच्या उभारीसाठी ते आश्वासक ठरेल.
देशांतर्गत राजकीय आणि सामाजिक जीवन वेगवेगळे भ्रष्टाचार, घोटाळे, स्त्रियांवरील अत्याचार अशा नकारात्मक घटनांनीच भरलेले असताना क्रीडा क्षेत्राने गेल्या काही दिवसांत ज्याला बऱ्या म्हणता येतील अशा बातम्या पुरवल्या. यात आनंदाची बाब ही क्रिकेटच्या बरोबरीने, किंबहुना कांकणभर अधिकच, चांगले काही घडले ते क्रिकेटेतर क्रीडा प्रकारांत. आपल्याकडे क्रीडा म्हणजे फक्त क्रिकेट असेच दुर्दैवाने समजले जात असल्याने अन्य खेळ आणि खेळाडू यांना तशी आपण दुय्यमच वागणूक देत असतो. एखादा विश्वनाथन आनंद वा एखादी पीटी उषा वा सायना नेहवाल. बाकी सर्व क्रिकेट आणि क्रिकेट म्हणजे सचिन आणि तत्सम. वस्तुत: जगातील डझनभर देशही क्रिकेट खेळत नाहीत. ज्या ब्रिटनमध्ये आधुनिक क्रिकेट जन्माला आले त्या क्रिकेटच्या पंढरीतील लॉर्ड्स मैदानावरील सामन्यांची गर्दीदेखील अलीकडे पातळ झालेली आहे. एके काळी लॉर्ड्सवर क्रिकेटचा सामना खेळावयास मिळणे हे साक्षात परमेश्वराच्या दरबारात सदेह उपस्थित राहायला मिळण्याइतके पुण्यवान मानले जात होते. आता परिस्थिती तितकी उत्साही नाही. ब्रिटिश अभिजन अलीकडे फुटबॉलच्या सामन्यांना गर्दी करतात. एके काळी फुटबॉल हा असंस्कृत आणि धसमुसळा खेळ मानला जात असे आणि त्यामुळे बुद्धिजीवी या खेळापासून दूर राहात असे. हा स्वत:स शहाणा समजणारा वर्ग क्रिकेटच्या मैदानांवर दिसायचा. आता तसे नाही. फुटबॉल हा आता मध्यम आणि उच्च मध्यमवर्गाचाही आवडता खेळ बनला आहे. परंतु आपण त्या खेळात गावकुसाबाहेरच आहोत. जगभरात साधारण २०० देश फुटबॉल खेळतात. त्यात आपला क्रमांक शेवटाच्या अगदी लगतचा आहे. आपण अजूनही गडय़ा.. आपुले क्रिकेट बरे याच मानसिकतेत आहोत. अन्य खेळांतील विजयांची आपल्याला तितकीशी पर्वा नसते.
 स्नूकर या ज्यास शिष्टमंडळींचा खेळ म्हणता येईल अशा क्रीडा प्रकारात आदित्य मेहता या अवघ्या अठ्ठावीस वर्षीय तरुणाचे विश्वविजेतेपद हे याचे एक उदाहरण. राजकारणी आणि सत्ताधीश हे प्रसारमाध्यमांच्या कार्यक्रम पत्रिकेवर नाचत असतात. जे विषय प्रसारमाध्यमांना कमी महत्त्वाचे असतात त्याकडे त्यामुळे राजकारण्यांचेही दुर्लक्ष होते. या वर्गाचा कल सर्वसाधारणपणे बातमी आणि प्रसिद्धीच्या दिशेने असतो. ज्या विषयात पडल्याने प्रसिद्धीच होणार नसेल तर त्या विषयाला हात घालाच कशाला असा विचार सत्ताधीश वर्ग करत नसेलच असे नाही. त्यामुळे महाराष्ट्राच्या राजकारण्यांचे आदित्यच्या विजयाकडे लक्ष गेलेले नाही. एरवी मुंबईच्या प्रश्नांवर पोडतिडिकीने बोलणाऱ्यांना आदित्य कोण आणि त्याने केले काय, हे अद्याप लक्षात आलेले नाही. वस्तुत: आदित्य महाराष्ट्राचा. त्यातही मुंबईचा. गेल्याच आठवडय़ात स्नूकरच्या जागतिक स्पर्धेतील सुवर्णपदक आदित्यने पटकावले. कोलंबिया या देशातील काली येथे झालेल्या या स्पर्धेत या आदित्यने आपल्या चीनच्या प्रतिस्पध्र्यास धूळ चारून इतिहास रचला. आतापर्यंत जागतिक क्रीडा स्पर्धेत स्नूकरचे सुवर्णपदक आपणास कधीही मिळाले नव्हते. यासीन र्मचट, सुभाष अगरवाल, गीत सेठी आदी एकापेक्षा एक शैलीदार आणि अत्यंत कुशल खेळाडू आपल्याकडे निपजले. त्यातील काही जगज्जेतेही झाले. परंतु एकालाही जागतिक क्रीडा स्पर्धात सुवर्णपदकावर नाव कोरता आलेले नाही. आदित्यने ही नकारघंटा शांत केली आणि पहिल्यांदा या स्पर्धेत जन गण मन ही धून उपस्थितांच्या कानावर पडली. याआधी बॅडमिंटनपटू प्रकाश पदुकोण यांनी १९८१ साली कांस्य पदक मिळवून पहिल्या तीनातील तिसऱ्या पायरीवर उभे राहण्याची संधी मिळवली होती. त्यानंतर थेट हे आदित्यचे सुवर्ण. तेही स्नूकरसारख्या खेळातील. यासाठी त्याचे अधिक अप्रूप. म्हणजे कांस्यपासून सुवर्णापर्यंत पोहोचण्यास आपल्या देशास जवळपास ४२ वर्षे लागली. हेही नसे थोडके. बॅडमिंटन असो वा स्नूकर. हे सर्व एकल खेळ. ज्यात वैयक्तिक कामगिरीचा कस लागतो. अशा खेळात नैपुण्य प्राप्त करावयाचे असेल तर अपार कष्टाची तयारी, जिद्द आणि व्यवस्थेचा पाठिंबा लागतो. आपण मार खातो ते तिसऱ्यांत. वैयक्तिक क्रीडा प्रकारांत आपल्याकडे जे काही यश मिळाले आहे ते सर्व त्या त्या खेळाडूंचे यश आहे. मग ती सायना नेहवाल असो विश्वनाथन आनंद असो वा नेमबाज अंजली वेदपाठक वा आताचा आदित्य. हे सर्व खेळाडू आपापल्या क्रीडा प्रकारांत चमकले ते त्यांनी घेतलेल्या कष्टांमुळे. त्यांच्या मागे व्यवस्थेचा पाठिंबा नावापुरतादेखील नव्हता. शासन वा स्थानिक नगरपालिका आदींपैकी कोणी त्यांच्यासाठी काही सरावसुविधा उपलब्ध करून दिल्या असेदेखील घडलेले नाही. जागतिक यश मिळाल्यावर जनतेच्याच पैशांतून त्यांचा सत्कार करताना आपण छायाचित्रात येऊ यासाठी सत्ताधारी धडपडतात. पण अशी छायाचित्रे काढण्याची संधी अनेकांना अनेकदा मिळावी यासाठी त्यांच्याकडून काहीही होत नाही. कोणत्याही क्रीडा प्रकारात नैपुण्य मिळवण्यासाठी अपार वेळ द्यावा लागतो. तसा तो दिल्यास उपजीविकेसाठी आवश्यक ते अन्य कौशल्य कमवता येऊ शकत नाही. त्यामुळे अनेक मुलामुलींमध्ये क्रीडा क्षेत्रात चमकण्याची क्षमता असूनही पालक त्याबाबत धोका पत्करू शकत नाहीत. याउलट क्रिकेटचे. एक तर तेथे संधी आणि पैसा दोन्ही आहे. त्यात आयपीएल नामक सर्कस सुरू झाल्याने दुय्यम वा तिय्यमांनाही रोजगाराच्या संधी उपलब्ध झाल्या. तेथेही फार काही दिवे लावता आले नाहीत तर पैसे कमावण्यासाठी बेटिंग वगैरे बाहेरख्याली उद्योग आहेतच. तेव्हा प्राधान्याने अनेकांचा ओढा असतो तो क्रिकेटकडे यात आश्चर्य नाही. आदित्यच्या सुवर्णपदकाचे वा जर्मनीत हॉकीच्या कनिष्ठ विश्वचषक स्पर्धेत भारतीय मुलींनी इतिहास घडवून प्रथमच कांस्यपदक जिंकले, याचे कौतुक करावयाचे ते या पाश्र्वभूमीवर.
या कौतुकमापनासाठी क्रिकेटचा निकषदेखील लावता येऊ शकेल. भारतीय क्रिकेट संघाने परदेशी दौऱ्यात सर्वच्या सर्व सामने जिंकण्याचा विक्रम फारा दिवसांत आपल्याकडे घडलेला नाही. हंगामी कप्तान विराट कोहली याच्या नेतृत्वाखालील भारतीय संघाने झिम्बाब्वेच्या दौऱ्यावर हे करून दाखवले आणि दुबळ्या का असेना यजमान संघाला ५-० असे पराभूत केले. क्रिकेटपटूंवर दौलतजादा करण्यासाठी टपूनच बसलेले सत्ताधीश कोहली याच्या या कथित विराट यशाबद्दल त्याच्या संघावर पुन्हा एकदा बक्षिसांची लयलूट करणारच नाहीत असे नाही. भारतीय क्रिकेटपटूंच्या विशाल झोळीत मणामणाने बक्षिसे पडत असताना लक्ष जावयास हवे ते झिम्बाब्वेच्या परिस्थितीकडे. त्या देशाच्या क्रिकेट मंडळाकडे क्रिकेटपटूंना मानधन देण्यापुरतेदेखील धन शिल्लक नाही. इतकेच काय भारतीय संघाच्या तेथील दौऱ्यात यजमान संघातील खेळाडूंना प्रवासाचा खर्च स्वत:च्या खिशातून करण्यात सांगण्यात आले होते. यावरून त्या देशातील क्रिकेट मंडळांची आणि क्रिकेटपटूंचीदेखील काय अवस्था असेल याचा अंदाज बांधता यावा. हे एवढय़ाचसाठी लक्षात घ्यावयाचे की त्यांच्या देशात क्रिकेटपटूंचे कोणतेही अवास्तव चोचले पुरवले जात नाहीत.
अशा वेळी आपल्याकडेदेखील क्रिकेटला मिळणाऱ्या प्रोत्साहनातील काही वाटा तरी अन्य क्रीडा प्रकाराकडे तातडीने वळवण्याची गरज आहे. तसे करण्यात आपल्याला अपयशच आले तर आपले खेळांमधले घर कौलारूच राहील. त्याचा मजबूत आणि सशक्त इमला तयार होऊ शकणार नाही.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on August 6, 2013 5:01 am

Web Title: cricket killing other sports in india
Next Stories
1 दुर्गे.. दुर्घट भारी
2 अग्रलेख- एका विचारयात्रेचा प्रारंभ
3 तृतीयपानी अशोभनीय
Just Now!
X