फुटबॉलच्या तुलनेत खूपच कमी देशांमध्ये क्रिकेट खेळले जात असूनही त्याची लोकप्रियता अफाट आहे, याची प्रचीती ऑस्ट्रेलिया व न्यूझीलंड यांनी संयुक्तरीत्या आयोजित केलेल्या एकदिवसीय सामन्यांच्या विश्वचषक स्पर्धेत पाहावयास मिळाली. मात्र ही लोकप्रियता वाढत जात असतानाच उपांत्यपूर्व फेरीतील सामन्यांच्या वेळी स्टेडियममधील अनेक गॅलऱ्या रिकाम्या असतात हा एक प्रकारे या खेळाचाच पराभव आहे. दीड महिना चाललेल्या या स्पर्धेची सांगता यजमान ऑस्ट्रेलियाच्या विजेतेपदानेच झाली. जणू काही त्यांनीच ही स्पर्धा जिंकावी या दृष्टीनेच कार्यक्रम पत्रिका तयार करण्यात आली असावी व न्यूझीलंडने आपल्या मोठय़ा भावास जिंकू देण्यासाठी हेतुपूर्वक खराब कामगिरी केली असावी अशी शंका चाहत्यांना आली नाही तर नवलच. दक्षिण आफ्रिका व न्यूझीलंड यांच्यातील उपांत्य लढतच अंतिम सामन्यासारखी खेळली गेली असे म्हटले तर ते फारसे वावगे ठरणार नाही. अंतिम सामन्यात ऑस्ट्रेलियन गोलंदाजांनी वर्चस्व गाजविले. त्यांच्याच गोलंदाजांना सामन्याचा व मालिकेचा मानकरी ही दोन्ही पारितोषिके देण्यात आली असली तरीही एकूण या स्पर्धेसाठी तयार करण्यात आलेल्या खेळपट्टय़ा व आंतरराष्ट्रीय क्रिकेट परिषदेने (आयसीसी) तयार केलेली नियमावली फलंदाजांसाठीच धार्जिणी व गोलंदाजांसाठी अन्यायकारक म्हणावी लागेल. १९९२ मध्ये याच दोन देशांमध्ये विश्वचषक स्पर्धा आयोजित करण्यात आली होती. त्या वेळी फक्त आठ शतके नोंदविली गेली होती. यंदा ३८ शतके नोंदविली गेली. त्यातही मार्टिन गप्तिल व ख्रिस गेल यांनी प्रत्येकी एक द्विशतक टोलविले. यावरून मैदाने फलंदाजांसाठीच अनुकूल होती हे प्रकर्षांने दिसून येते.  ही स्पर्धा सुरू होण्यापूर्वी भारताच्या गोलंदाजांची प्रभावी कामगिरी होईल व हा संघ उपांत्य फेरीत स्थान मिळवील असा कोणी अंदाजही केला नसेल. मात्र उपांत्य फेरीपर्यंत भारतीय संघाने फलंदाजी व गोलंदाजी या दोन्ही आघाडय़ांवर सातत्यपूर्ण कामगिरी करीत अपेक्षा उंचावल्या होत्या. उपांत्य फेरीत कांगारूंनी व्यावसायिक दृष्टिकोन ठेवीत भारताची सपशेल निराशा केली. विश्वविजेतेपदासाठी एखादाच मॅचविनर असून उपयोग नसतो, त्याकरिता संघात किमान दोन-तीन मॅचविनर पाहिजेत हे त्यांनी दाखवून दिले. दक्षिण आफ्रिकेच्या संघास ‘चोकर’ अशी उपाधी लावली जाते. त्यांनी हा शिक्का काही अंशी पुसण्याचा प्रयत्न केला. उपांत्य फेरीत त्यांना हातातोंडाशी आलेली विजयाची संधी साधता आली नाही, ती त्यांच्याच भरवशाच्या खेळाडूंनी केलेल्या अक्षम्य चुकांमुळेच. कुमार संगकारा याने लागोपाठ चार शतके टोलवीत अपेक्षा उंचावल्या, मात्र एकखांबी तंबू कोसळतो याचाच प्रत्यय त्यांच्या वाटेस आला. पाकिस्तान व वेस्ट इंडिज संघांतील खेळाडूंनी दिशाहीन व केवळ वैयक्तिक महत्त्वाकांक्षा ठेवीत आम्ही खेळतो हे पुन्हा सिद्ध केले. शेरेबाजी व बेशिस्त वर्तनाबद्दल मानधनात कपात हा काही उपाय नाही. अशा वृत्तीस आवर घालण्यासाठी काही सामन्यांसाठी बंदी घालणे हीच सर्वोत्तम शिक्षा असली पाहिजे. अद्ययावत यंत्रणा उपलब्ध असतानाही पंचांच्या कामगिरीबाबत भरपूर टीका होत असेल तर आयसीसीने याबाबत काही ठोस उपाययोजना करणे आवश्यक आहे. आर्यलड, संयुक्त अरब अमिराती, अफगाणिस्तान यांच्यासारख्या संघांनी यंदा केलेली कामगिरी लक्षात घेऊन विश्वचषक स्पर्धेची मुख्य फेरी अधिकाधिक संघांना खुली न करता केवळ दहाच संघांपुरतीच ही स्पर्धा ठेवण्याचा आयसीसीचा निर्णय हा खेळास मारकच आहे; किंबहुना हा संघटकांनी केलेला खेळाचा पराभवच आहे.