पुरुषांनी गर्भनिरोधकांचा वापर करण्याऐवजी नैतिकतेचे पालन करावे हा विचार नैतिकतेच्या दृष्टीने श्रेष्ठ असू शकतो. पण एचआयव्हीसारख्या आजारांचा चिंताजनक फैलाव रोखण्याचे सामथ्र्य संस्कृतीच्या वर्तमानकाळाकडे आहे की नाही याचा विचारही आवश्यक आहे.
प्रत्येक सजीव शरीरात मन नावाची एक यंत्रणा असते. आचरणाचे सारे नियंत्रण या अदृश्य यंत्रणेकडूनच होत असते, आणि काही अवयवांद्वारे ते व्यक्त होत असते. मनामधून निर्माण होणारी आचरणाची आंदोलने व्यक्त होण्यात नाक, कान आणि गळ्याची भूमिका महत्त्वाची मानली जाते. म्हणजे, नाकाला एखाद्या गोष्टीचा सुगावा लागला म्हणून लगेचच त्याकडे कान लावावेत किंवा नाही आणि कानाने एखादी गोष्ट ऐकली की ती लगेच बोलून दाखवावी की नाही, याचे भान या अवयवांना असणे आवश्यक असते. हा वैज्ञानिक नियम नाही, पण नैतिक सिद्धान्त आहे. अभिव्यक्तीच्या या सिद्धान्ताला वैद्यकशास्त्राशी देणेघेणे नाही. त्यामुळे नाक, कान आणि घसा यांचे वैद्यकशास्त्रीय जाणकार असलेल्या प्रत्येकालाच या नैतिक सिद्धान्ताशीही काही देणेघेणे असलेच पाहिजे असेही नाही. तरीही, या अवयवांच्या वापरातील विवेकबुद्धीवरूनच त्या त्या व्यक्तीची, कुटुंबाची किंवा समाजसमूहाची नैतिकता किंवा संस्कृती स्पष्ट होत असते. म्हणून, चांगली संस्कृती रुजविण्यासाठी, प्रत्येक चांगल्या गोष्टीची सुरुवात व्यक्तीपासून करावी असे म्हटले जाते. व्यक्ती, कुटुंब, समाज आणि राष्ट्र या क्रमाने त्याचा प्रसार व्हावा म्हणजे चांगल्या गोष्टी भक्कमपणे रुजतात, असे म्हणतात. येथे हे सारे विस्ताराने मांडण्याचे कारण म्हणजे, नाक, कान व घसा यांच्या शारीरिक रचनेचे केवळ वैद्यकीय ज्ञान असलेल्या प्रत्येकास या अवयवांचे सामाजिक महत्त्व ज्ञात असतेच असे मानण्याचे कारण नाही. देशात सत्तांतर झाल्यानंतर केंद्रीय मंत्रिमंडळात आरोग्यमंत्री असलेले डॉ. हर्ष वर्धन हे नाक कान आणि घशाचे तज्ज्ञ आहेत, असे म्हणतात. म्हणजे, ते या अवयवांचे केवळ विकार जाणतात आणि वैद्यकीयदृष्टय़ा त्यामध्ये असलेले दोष दूर करण्याचे पुरेसे ज्ञान त्यांनी अवगत केलेले आहे. पण, या अवयवांच्या सांस्कृतिक आणि सामाजिक जबाबदारीचे भान त्यांना त्यांनी अवगत केलेल्या ज्ञानातून असावयालाच हवे असे मात्र नाही. कदाचित म्हणूनच, हर्ष वर्धन यांच्या मनात उमटणारी विचारांची आंदोलने काहीसा संभ्रम सोबत घेऊनच जगासमोर व्यक्त होऊ लागली असावीत. भारतीय संस्कृती ही भारतीय समाजव्यवस्थेची एक ओळख आहे. या व्यवस्थेची सुरुवातच व्यक्तीपासून होत असते. या संस्कृतीचा अभिमान असणे, ती जपणे किंवा सामाजिकदृष्टय़ा संस्कृतीचे आचरण व्हावे अशी इच्छा असणे हे नुकसानकारक निश्चितच नसल्याने, त्यात काहीही गैरदेखील नाही. एके काळीच्या समाजव्यवस्थेत, समाजाच्या दैनंदिन जीवनातील समस्या सोडविण्याची जबाबदारी राजसत्तेवर होती आणि समाजाचे सांस्कृतिक, नैतिक आचरण जपण्याची जबाबदारी, धर्मसत्तांच्या हाती होती असे म्हणतात. या दोन्ही व्यवस्था स्वतंत्रपणे काम करीत असत. त्यांच्या परस्परांच्या कारभारात हस्तक्षेप होत नसे. त्यामुळे या दोन्ही व्यवस्था सुरळीतपणे सुरू होत्या. कधीकाळी संघर्षांची स्थिती आलीच, तर कोणत्या व्यवस्थेचे तात्कालिक महत्त्व किती हेही ठरलेले असल्याने संभ्रम फैलावण्याआधीच संघर्ष संपलेला असायचा, असेही सांगितले जाते. कदाचित, संस्कृती किंवा परंपरा म्हणून आजही ज्याचा उल्लेख केला जातो, त्याचे नेमके हेच वेगळेपण होते.
आज मात्र, सत्तापदावरील जबाबदारांकडूनच या व्यवस्थांची सरमिसळ सुरू असल्याचे दिसत आहे. सत्ताकारण की संस्कृतिकारण या संभ्रमातून सत्तापदस्थांमध्येच संस्कृतिसंघर्ष उफाळेल की काय अशा शक्यतेची बीजे रुजू लागली आहेत. सत्तापदावर आल्यानंतर, आपल्या वाटचालीचा आराखडा निश्चित करताना आपण सत्ताकारण करणार की संस्कृतिकारण करणार याचा प्राधान्यक्रम ठरविला पाहिजे. डॉ. हर्ष वर्धन हे कट्टर हिंदुत्ववादी विचारसरणी मानणाऱ्या राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे सच्चे पाईक आहेत. त्यांना ते लपविण्याचेही कारण नाही. कारण त्या विचारसरणीचा प्रभाव असलेल्यांच्या हाती सत्तेचे संपूर्ण सामथ्र्य एकवटलेले आहे. तरीदेखील, संस्कृतिप्रसार हे सत्ताधीशांचे प्राधान्यक्रमाचे काम असले पाहिजे, असे मानणे योग्य होणार नाही. देशाच्या स्वातंत्र्यानंतर समाजासमोर असंख्य समस्यांचे डोंगर आ वासून उभे राहिलेले आहेत. या साऱ्या समस्यांवर केवळ संस्कृतिप्रसार हेच एकमेव उत्तर आहे, असे मानणे सध्याच्या परिस्थितीशी विसंगत होईल. त्यामुळे, त्या समस्यांची भौतिक उत्तरे शोधणे महत्त्वाचे आहे.
अशा परिस्थितीत, समस्याग्रस्त समाजाला सुखाचे, चांगले दिवस दाखविण्यासाठी संस्कृती हेच एकमेव उत्तर असल्याच्या भावनेतून सत्ताधीशांनी आपला कार्यक्रम आखला, तर कदाचित तो भरकटण्याचीच शक्यता अधिक. डॉ. हर्ष वर्धन यांच्या वक्तव्यातून त्यांचा समाजपरिवर्तनाचा कार्यक्रम भरकटण्याच्या दिशेनेच जाणार की काय अशी शंका उमटू लागली आहे. गर्भनिरोधकाचा वापर करण्यापेक्षा नैतिकतेचे आचरण करा, असा संदेश आपल्या या आरोग्यमंत्र्यांनी जगाच्या व्यासपीठावरून दिला, तेव्हा या संभ्रमाची आंदोलने पहिल्यांदा उमटून गेली. संस्कृती आणि नैतिकतेचे भान या समाजाची वाटचाल रुळावर ठेवण्यासाठी आवश्यक बाबी आहेत, याबद्दल दुमत नसले, तरी ज्या संस्कृतीचा आपण सातत्याने उल्लेख करत आलो आहोत, ज्या हजारो वर्षांच्या परंपरांचा अभिमान आपण मिरवत आलो आहोत, ती संस्कृती आणि त्या परंपरादेखील काळाच्या ओघात किती बदलत चालल्या आहेत, याचे भान आपल्याला राहिलेलेच नाही. भूगोल, भाषा आणि भोजन ही आपल्या भारतीय संस्कृतीची तीन वैशिष्टय़े आहेत, असे मानले जाते. भारताच्या भौगोलिक रचनेनुसार तेथील भाषा बदलत जाते, आणि विभिन्न जीवनशैलीनुसार भोजनपद्धतीही बदलत जाते. अशा वैविध्यपूर्ण संस्कृती हजारो वर्षांपासून एकत्र नांदतात, हेच मुळात भारतीय संस्कृतीचे वैशिष्टय़ आहे. ज्या काही समान धाग्यांनी हे वैविध्य सांधले गेले आहे, ते धागे काळाच्या ओघात किती बदलले आहेत, किती नाजूक होऊन गेले आहेत, हे लक्षात घेतले तर ज्या संस्कृतीचा जप केला जातो, त्याच्याशी वर्तमानाचे नाते किती घट्ट राहिले आहे, हे नेमके लक्षात येऊ शकते. दसरा, दिवाळीसारखे सण हे देशाच्या सांस्कृतिक विभिन्नतेला एकत्र आणणारे धागे मानले जातात. आजकाल या सणांचेही इव्हेण्टीकरण होऊ लागले आहे. दसऱ्याच्या सणावर मेगा ऑफरचा धंदा स्वार झाला आहे, तर दिवाळीसारख्या सणांवर बाजारपेठांनी कब्जा केला आहे. संस्कृतीची मानचिन्हे म्हणून मिरविल्या जाणाऱ्या विवाह सोहळ्यांनाही धंदेवाईक स्वरूप आले आहे. जोडीदाराच्या संशोधनापासून विवाह ते मधुचंद्रापर्यंतच्या साऱ्याचे व्यवस्थापन करणारी धंदेवाईक पॅकेजे बाजारात उपलब्ध झाल्यापासून विवाह हादेखील सांस्कृतिक आणि कौटुंबिक सोहळा राहिलेला नाही. अशा डळमळीत पायावर स्वत:चा तोल सावरण्याची कसरत करणारी संस्कृती सध्याच्या भौतिक प्रगतीच्या काळात नैतिकतेचा पाया भक्कम राखू शकेल की नाही, हा चिंतेचा विषय आहे. संस्कृतीची जोपासना आणि संवर्धन करणाऱ्या व्यवस्थांनी त्याची चिंता केलीच पाहिजे. सत्ताकारण करणाऱ्यांनी मात्र, समाजाचे हित भक्कम पायावरच उभे असले पाहिजे, याची जाणीव ठेवली पाहिजे.
पुरुषांनी गर्भनिरोधकांचा वापर करण्याऐवजी नैतिकतेचे पालन करावे हा विचार नैतिकतेच्या दृष्टीने श्रेष्ठ असू शकतो. पण एचआयव्हीसारख्या आजारांचा चिंताजनक फैलाव रोखण्याचे सामथ्र्य संस्कृतीच्या वर्तमानकाळाकडे आहे की नाही याचा विचारही आवश्यक आहे. कारण सत्ताधीशांच्या अशा संस्कृतिसंघर्षांतून समस्याग्रस्त समाजात संभ्रमावस्था माजली, तर सावरणे आणखी कठीण होईल.