सरकारी नोकरदार वर्गाला मिळणाऱ्या निवृत्तिवेतनावर वेतन आयोगाचे नियंत्रण असते. वाढत्या महागाईशी काही प्रमाणात सुसंगत असणारे हे वेतन काही हजार रुपयांच्या पटीत असते, ही गोष्ट निराळी. मात्र ‘ईपीएस -९५’ या योजनेद्वारे मिळणारे निवृत्तिवेतन ५०० रुपयांच्या आत असते! (२५ लाख लाभधारकांना रु. ५००/- पेक्षा कमी आणि सहा लाख लाभधारकांना रु. ५००/- ते १०००/- : संसदीय समितीचा अहवाल) ‘महागाईनुसार यात यथावकाश वाढ करण्यात येईल,’ अशा त्या वेळी सरकाने दिलेल्या तोंडी आश्वासनाची बात सोडाच; पण उलट या योजनेतील मूळ तरतुदींनादेखील कात्री लावण्यात आली आहे. या योजनेद्वारे मिळणारे निवृत्तिवेतन गेल्या १९ वर्षांत एकदाही एका पशानेही वाढलेले नाही. जणू एवढय़ा महागाई वाढलीच नसल्यामुळे आजही या निवृत्त कामगार कुटुंबांनी दरमहा हजार/पाचशे रुपयांत गुजराण करीत (शक्य झाल्यास जिवंत) राहावे अशी मायबाप सरकारची भूमिका आहे. नुकतेच निवडणुकींच्या मुहूर्तावर हे निवृत्तिवेतन कमीतकमी एक हजार रुपये करण्याचा निर्णय झाला आहे असे ऐकतो. मात्र निवृत्तिवेतन महागाई निर्देशांकाशी नियमाने संलग्न करणे या माफक अपेक्षेची उपेक्षा संपण्याची कोणतीही चिन्हे नाहीत. नुकत्याच जाहीर झालेल्या सत्ताधारी पक्षाच्या निवडणूक जाहीरनाम्यातही यावर मौन पाळलेले आहे. प्राप्तिकराच्या कक्षेत येणाऱ्या ज्येष्ठ नागरिकांची करसवलत वाढीची मागणी मान्य होते, मात्र ज्यांची प्राप्तीच गोठवलेली आहे अशा, सरकारकडून फसवणूक झालेल्या खासगी क्षेत्रातील निवृत्त-ज्येष्ठ लोकांच्या तोंडाला पाने पुसण्याचेच सर्वपक्षीय धोरण दिसून येते.       
 अशा स्थितीत ज्येष्ठांच्या प्रश्नाकडे लक्ष वेधण्यासाठी लोकसभा निवडणुकीत ज्येष्ठ मतदारांनी ‘नोटा’चा (None Of The Above) पर्याय वापरावा, असे आवाहन राज्यातील सर्व १.४ कोटी ज्येष्ठ नागरिकांना करण्यात येते आहे. ज्येष्ठांची संघटना असलेल्या आइस्कॉन आणि फेस्कॉमचे राज्यात पाच लाखांहून अधिक सदस्य आहेत, तसेच इतरही ज्येष्ठ नागरिक संघटना या निर्णयात सहभागी झाल्या आहेत..
..ज्येष्ठ आणि निवृत्तिवेतनधारकांनी हे आवाहन गंभीरपणे पाळण्याखेरीज दुसरा मार्ग दिसत नाही.     
प्रमोद तावडे, डोंबिवली

गावस्कर तरी कसे?
‘बरखास्तच करा ..’ हा अग्रलेख (२८ मार्च) वाचला.  क्रिकेट मंडळाची सूत्रे कोणाकडे असावीत, हे सर्वोच्च न्यायालयाने ठरवणे अजिबातच पटत नाही. गावस्कर पूर्वी वादग्रस्त ठरले आहेत. १९८० साली मुंबई कसोटीतील गावस्कर-असिफ इक्बाल यांची नाणेफेक संशयास्पद ठरली होती. तसेच, गावस्कर यांच्या दादर युनियन क्लबमधील लॉकरमध्ये सापडलेले तीन हजार डॉलर, प्रशिक्षण संस्थेसाठी सरकारने दिलेला भूखंड ही प्रकरणे सर्वश्रुत आहेत. तेव्हा मंडळाची सूत्रे गावस्कर यांच्या हाती देणे खरोखरच अतक्र्य आहे.
– केदार अरुण केळकर,  दहिसर(प.)

त्यातल्यात्यात आनंद!
विश्वनाथन आनंदने कॅन्डिडेट्स स्पध्रेत मिळवलेले निर्वविाद वर्चस्व कौतुकास पात्र आहे. परंतु, जगज्जेत्या मॅग्नस कार्लसनला हरविण्याकरिता आनंदला आपला अनुभव पणाला लावत अपारंपरिक खेळ करावा लागेल असे वाटते. आपल्या देशाने उगवत्या बुद्धिबळपटूचा शोध घेण्याकरिता विशेष प्रयत्न करावेत. क्रिकेटपायी इतर खेळांकडे होणारे दुर्लक्ष अन्यायकारक वाटते, कारण एकेकाळचा ‘सभ्य लोकांचा’ तो खेळ गेल्या काही वर्षांत सामान्य क्रिकेटप्रेमींचीही विश्वासार्हता गमावून बसला आहे.
केतन र. मेहेर, विरार (पूर्व)

‘आयपीएल’च बंद करा
सर्वोच्च न्यायालयाचा दणका मिळाल्यानेच श्रीनिवासन जागे झाले व त्यांनी पद सोडले. यातून क्रिकेटप्रेमींचा विश्वासघात श्रीनिवासन यांनी केला, हेही उघड झाले आहे. चेन्नई सुपर किंग व राजस्थान रॉयल्सने या हंगामात खेळू नये असेही न्यायालयाने सुचविले आहे. तेव्हा आता आयपीएलचाही गाशा गुंडाळण्यास हरकत नसावी.
महेश कुलकर्णी, डोंबिवली

नक्षल्यांना ठेचाच
काही दिवसांच्या अंतराने नक्षलवाद्यांचे हल्ले होतात, जीवितहानी होते आणि मन विषण्ण होऊन परत तीच वेळ येते. याला पायबंद घालता येत नाही, हे पटत नाही. उपग्रह छायाचित्रण, मोबाइल वेध  यांसारख्या आधुनिक तांत्रिक सुविधांचा फायदा आपल्याला घेता येत नसेल तर परदेशी उपग्रहांची मदत घ्या पण नक्षलवाद्यांना ठेचून काढा.
एकदा काय तो निर्णय घेऊन नक्षली भागातील लोकांना आगाऊ सूचना न देता सन्याच्या एका तुकडीने अत्यंत नियोजनबद्धरीत्या जिल्हा जरी िपजून काढला (जंगलातील अड्डे ,लपवलेली शस्त्रे, दारुगोळा) आणि संशयितांना ताब्यात घेऊन उरलेल्यांचे पुनर्वसन केल्यास आपल्या सन्याचे, लोकांचे प्राण वाचतील. निषेध वगैरे करून स्वस्थ बसण्याची वेळ कधीच निघून गेली आहे.
नाहक माणसे मारणे हा विकृत आनंद फक्त नक्षलवादीच घेऊ शकतात कारण त्यांना खात्री असते की, शासन हतबल आहे, आदिवासी आपल्याला घाबरून असतात, त्यांना मदत करण्याचे नाटक केले की आदिवासी आपल्याला वश होतात आणि मुख्य म्हणजे राजकारणी लोकांना पसे चारले की आपला उद्देश सफल होतो.
एकदा असा प्रयत्न करून बघण्यास काय हरकत आहे?
सतीश कुलकर्णी, माहीम, मुंबई

देवधर्म चिकित्सेबाहेर ठेवणे, हेच ‘आस्तिक’लक्षण
‘मूíतपूजेपलीकडे धर्म..’ या पत्रात (लोकमानस २९ मार्च) म्हटले आहे, ‘..अनेक आस्तिक तत्त्वनिष्ठ आणि सत्यवादी असतात. चांगले समाजकार्य करतात. रसिकही असतात.’ हे खरेच आहे. सज्जन माणसे सत्कृत्ये करतात तर दुर्जन माणसे दुष्कृत्ये करतात. मग ती माणसे नास्तिक असोत वा आस्तिक. पण सज्जन आस्तिकांच्या धर्मभावनांना आवाहन करून त्या चेतविल्यास ते दुष्कृत्य करण्यास प्रवृत्त होतात, असा अनुभव प्रत्येक जातीय दंगलीच्या वेळी येतो. तसे सज्जन नास्तिकाच्या बाबतीत कधीही घडत नाही.
पत्रलेखिका पुढे म्हणतात, ‘कित्येक आस्तिक माणसे प्रखर चिकित्सक आणि बुद्धिप्रामाण्यवादी असतात.’ हे मात्र खरे मानता येत नाही. पुष्कळ आस्तिक बुद्धिमान असतात. अनेक क्षेत्रांत त्यांची बुद्धी चांगली चालते, हे खरे. पण देवा-धर्माची ते कधीही चिकित्सा करीत नाहीत. कारण सर्व धर्मवचने सत्य आहेत अशीच त्यांची श्रद्धा असते. ‘संशयात्मा विनश्यति’ हे गीतावचन त्यांना खरे मानावेच लागते. मग चिकित्सा कसली करणार?
आस्तिकांना काही गोष्टींवर श्रद्धा ठेवणे अपरिहार्य असते. तर बुद्धिप्रामाण्यवादात श्रद्धेला स्थानच नसते. त्यामुळे ‘आस्तिक माणसे बुद्धिप्रामाण्यवादी असतात’ असे म्हणणे हे ‘वदतो व्याघात:’चा प्रकार आहे.
प्रा. य. ना. वालावलकर.

मोदी, मुंडे..आणि ‘समन्वय’!
केंद्रात नरेंद्र मोदी यांना भाजपने ‘पंतप्रधानपदाचे उमेदवार’; तर महाराष्ट्रात गोपीनाथ मुंडे यांनी स्वत:ला भावी मुख्यमंत्री म्हणून ठरवून टाकले आहे. त्यासाठी जी जी काही राजकीय खेळी त्यांना कारावीशी वाटते ते ती करण्याच्या मागे लागले आहेत. विनायक मेटे यांना महायुतीत सामील करून घेणे हाही त्यातीलच एक भाग. असे आपल्याला सोयीचे परस्पर निर्णय घेऊन ते महायुतीतील इतर पक्षांच्या गळी उतरवीत आहेत. मराठी माणसाच्या न्याय्य हक्कांसाठी लढणाऱ्या मनसेला महायुतीची दारे यापुढे कायमची बंद करणाऱ्या शिवसेनेला ‘जातवार आरक्षण नको’ या  आपल्या धोरणाला मुरड घालायला मुंडे यांनी भाग पाडले.
त्यामुळे ‘महायुती’तील सर्व नेत्यांची मातोश्रीवरील समन्वय बठक हा केवळ आता एक उपचाराचा भाग ठरतो की काय, अशी शंका येते.
मोहन गद्रे, कांदिवली.

.. तर पवार यांच्यावर उपचार कोण करणार?
देशात काँग्रेसच्या विरोधात संतापाची लाट निर्माण झाल्याचे पाहून राष्ट्रवादीचे जाणते नेते शरद पवार हे सध्या भाजपाचे पंतप्रधान पदाचे उमेदवार नरेंद्र मोदी यांच्यावर  वार करत आहेत . शरद पवार यांच्या ताज्या म्हणण्यानुसार मोदी यांचे संतुलन ठीक नाही; तर मग दिल्लीत रात्री जाऊन मोदींची भेट कशाला घेतली होती? पवार यांनी भाजपच्या सरकारचे कौतुकही केले होते, मोदींना न्यायालयाने क्लीन चीट दिली म्हणाले, पवार हे सत्तेच्या बाजूने पळणारे नेते आहेत. त्यामुळे त्यांचा काही नेम नाही. पवारांनी शपथ घेऊन सांगावे की ,देशात जर भाजपाचे सरकार आले तर मी भाजपबरोबर जाणार नाही. पण पवार हे धूर्त राजकारणी आहेत .पण उद्या भाजपाचे सरकार आले तर पवारांवर उपचार कोण करणार ?
– रमेश अबिरकर, डिकसळ (ता कळंब , जि.उस्मानाबाद)