माणसाच्या जन्माला येऊन साधायचं काय, हे सेना महाराजांनी त्यांच्या अभंगात स्पष्ट सांगितलंय, असं बुवा म्हणाले तेव्हा हृदयेंद्रच्या मनात आलं, खरंच काय काळ असेल तो! जेव्हा सेना महाराज पंढरीत येत होते आणि तिथे ज्ञानेश्वर, सोपानदेव, निवृत्तीनाथ, मुक्ताबाई, नामदेवांसह अनेकानेक साक्षात्कारी संतांचा दिव्य सहवास सहज लाभत होता.. ‘वर्षत सकळ मंगळी। ईश्वरनिष्ठांची मांदियाळी। अनवरत भूमंडळीं। भेटतु भूतां।।’ याचाच जणू प्रत्यय येत होता.. काय विलक्षण अनुभव असेल तो? विचारांत हरवलेल्या हृदयेंद्रकडे पाहात योगेंद्रनं विचारलं..
योगेंद्र – आपल्याकडे मोजके संत सोडले तर अनेक संत असे आहेत, ज्यांच्या जीवनाबद्दल फारशी माहिती मिळत नाही..
बुवा – खरं आहे ते, पण कित्येकदा त्यांचे अभंग हाच त्या शोधाचा आधार ठरतात.. सेना महाराजांचंच पाहा ना! ते बादशहाच्या पदरी कामाला होते तेव्हाचा एक प्रसंग त्यांनी दोन अभंगात लिहिला आहे.. एक अभंग सविस्तर आहे, दुसरा चारच चरणांचा.. आपण सविस्तर अभंगाचा दाखला पाहू.. पण त्यासाठी मूळ गाथाच पाहावी लागेल.. (ज्ञानेंद्र ‘सकळ संत गाथे’चा एक खंड पुढे करतो.. त्यात शोध घेतात, अभंग मिळताच प्रसन्न चेहऱ्यानं बुवा बोलू लागतात..) एकदा सकाळी पूजाअर्चा केल्यानंतर सेना महाराज ध्याननिमग्न झाले होते.. तोच दूत आले.. बादशहानं सेना महाराजांना बोलावलाय म्हणून सांगू लागले.. आपल्या भक्ताला ध्यानतन्मय अवस्थेत पाहून मग श्रीहरीनं काय केलं? अभंगात सेना महाराज म्हणतात, ‘‘ जाणुनि संकट श्रीहरी। धोकटी घेतली खांद्यावरी। त्वरें आला राजदरबारी। देखुनि हरी क्रोध निमाला।।’’ म्हणजे सेना महाराज ठरल्यावेळी आले नाहीत, म्हणून बादशहा आधी क्रोधित झाला असावा. तर सेना महाराजांचं रूप घेतलेल्या श्रीहरीला पाहून त्याचा राग निवळला.. मग काय झालं? ऐका, ‘‘राया सन्मुख बैसून। हाती दिधले दर्पण। मुख पाहे विलोकून। मूर्ती दिसे चतुर्भुज।।’’
कर्मेद्र – आता दाढी करताना सेना महाराज बादशहाच्या समोरच बसले असणार, मग दर्पणात प्रतिबिंब कसे दिसले?
बुवा – तुमची शंका रास्त आहे, पण ते दाढीच करीत होते,  हे मानायला काही आधार नाही. पुढचा चरण पाहिला की लक्षात येतं, श्रीहरी बादशहाच्या डोईला तेल चोपडायला सरसावले होते.. सेना म्हणतात, ‘‘हात लाविला मस्तका। वृत्ती हरपली देखा। राव म्हणे प्राणसखा। नित्य भेट मजलागी।।’’ ते रूप पाहून आणि मस्तकावर श्रीहरीनं हात ठेवताच रायाची वृत्ती हरपली आणि रोज मला भेटत जा, असं बादशहा उद्गारला.. ‘‘मग केले तेलमर्दन। वाटी बिंबला नारायण। विसरला कार्य आठवण। वेधले मन रूपासी।। भोवतां पाहे विलोकून। अवघा बिंबला नारायण। तटस्थ पाहती सभाजन। नाहीं भान रायासी।।’’ सेना महाराजांच्या रूपातील विठ्ठलानं तेलमर्दन केलं तेव्हा तेलाच्या वाटीत पुन्हा हरीचंच रूप.. भान हरपून रायानं सभेकडे नजर टाकली तर प्रत्येकाच्या जागी हरीच दिसू लागला! या भावावस्थेत राया म्हणाला, ‘‘राव म्हणे हरीसी। तुम्ही रहावे मजपाशी। तुजविण न गमे दिवसनिशी। हरी म्हणे भाकेसि न गुंते मी।।’’ काय आहे पहा! प्रेमाच्या जोरावर लहान-थोर हा भेदही कसा लयाला जातो पहा.. बादशहा प्रेमप्रवाहात वाहात म्हणाला की, तू माझ्याच जवळ राहा. तुझ्यावाचून मला करमणार नाही.. तर प्रभू काय ठामपणे सांगतात? ‘भाकेसि न गुंते मी!’ मी कुणाच्या वचनात गुंतत नाही! ‘‘मग प्रधानें काय केलें। राया स्नानासी पाठविलें। रायें होन दिधले। हरीनें ठेविले धोकटींत।।’’ राजा स्नानास गेला तेव्हा प्रधानानं होन म्हणजे तेव्हाची नाणी दिली.. ती हरीनं धोकटीत ठेवली आणि परतला.. सेना महाराजांना सायंकाळी बादशहानं परत बोलावलं आणि सकाळचं रूप दाखवं, असा हट्ट धरला तेव्हा धोकटीतले होन पाहून त्यांना सगळा उलगडा झाला.. ते म्हणतात, ‘‘शुद्ध नाही याती। नाहीं केली हरि भक्ति। शिणविला कमळापती। नाही विरक्ती बाणली अंगी।।’’ आपण अगदी सामान्य आहोत, भक्ती नाही की विरक्ती नाही, तरीही हरी आपल्यासाठी धावला, या गोष्टीनं सेना महाराज अतिशय भारावले.. त्यांच्या जीवनात या गोष्टीनंच मोठा पालट घडला..
चैतन्य प्रेम