मुंबई-पुणे एक्स्प्रेस हायवेवरून प्रवास करताना मृत्यू ओढवलेल्या कलावंतांमध्ये आणखी दोघांची भर पडली. आनंद अभ्यंकर व अक्षय पेंडसे यांच्याआधी भक्ती बर्वे तसेच विहंग नायक यांनाही अपघाती मृत्यूने गाठले होते. अभ्यंकर आणि पेंडसे पुण्याहून मुंबईकडे येत असताना त्यांच्या गाडीला ट्रकने धडक दिली, त्यात पेंडसे यांच्या दोन वर्षांच्या मुलाचे आयुष्य सुरू होताहोता संपले तर पेंडसे यांच्या पत्नी जबर जखमी झाल्या. या घटनेमुळे नाटय़-चित्रपट आणि चित्रवाणी मालिका क्षेत्रावर शोककळा पसरणे स्वाभाविकच होते. आधीच कलावंताचे आयुष्य बेभरवशाचे, अनिश्चित आणि अस्थिर असते. कारकिर्दीत कित्येक चढउतार कलावंतांना पाहावे लागतात, त्याचे पडसाद त्यांच्या व्यक्तिगत जीवनातही उमटत असतात. या सगळय़ाला तोंड देत कणखरपणे आणि मनाचा तोल ढळू न देता आयुष्याला सामोरे जाणे म्हणजे एक तारेवरची कसरतच असते. अलीकडच्या काळात नाटक, चित्रपट, मालिका, इव्हेण्ट्स, पाहुणे म्हणून सार्वजनिक वा खासगी कार्यक्रमांना ‘अर्थपूर्ण’ हजेरी लावणे- अशा अनेकानेक दगडांवर पाय ठेवत कलावंत जगत असतात. एकीकडे झटपट नाव, प्रसिद्धी, पैसा, ग्लॅमर मिळत असतानाच कुठल्याही क्षणी जीवघेण्या स्पर्धेमुळे आणि या क्षेत्रांशी संबंधित बाजाराभिमुख वृत्तीमुळे कलावंत काळोखाच्या, विस्मृतीच्या गर्तेतही कोसळू शकतात. ही सततची टांगती तलवार मानेवर वागवत कलावंत जगत असतात. पैसा- प्रसिद्धी यांमुळे कलावंतांची जीवनशैलीही बदलते, गरजा वाढतात. त्या भागवण्यासाठी अधिक पैसा कमावणे क्रमप्राप्त होते. या वाढत्या गरजांना अंत नसतो. घर, गाडी, फार्महाऊस, ऐषारामी- चैनी राहणीमान, या सगळय़ासाठी पैसा लागतो. शिवाय कलावंत म्हणून चलतीचे दिवस असेतोवरच हे सारे प्राप्त करायचे असते, भविष्यासाठीही भक्कम तरतूद हवी, याहीसाठी धावावे लागतेच. मग मिळेल ते काम स्वीकारणे, तीन-तीन शिफ्टमध्ये काम करणे, नाटकाचे प्रयोग, मालिका आणि चित्रपटाचे शूटिंग, इव्हेण्टमधला सहभाग, फीत कापणे.. अशी चौफेर धावपळ करावी लागते. हे उरीपोटी धावणेच कधी तरी जीवघेणे ठरू शकते, हे माहीत असून धावावे लागणे ही आजच्या सर्वच कलावंतांची शोकांतिका आहे. आरोग्यासाठी खाण्यापिण्याची पथ्ये कितीही पाळली, संयम राखला तरी विश्रांतीची मानवी गरज मारून, रात्री-अपरात्रीचा प्रवास दिवसभर शिणल्यानंतर करणे म्हणजे स्वत:हून धोक्याशी खेळणे, हे कटू वास्तव भक्ती बर्वेच्या निधनापासून समोर आले, तरी कुणी बोध घेत नाही. मृत्यूची अपवार्ता आल्यावर, हळहळीच्या पलीकडे आजचे कलावंत जात नाहीत. आनंद अभ्यंकर या लाघवी, प्रसन्न व्यक्तिमत्त्वाच्या कलावंताचा अकाली मृत्यू सुन्न करणारा आहेच.. आयुष्याची सोनेरी स्वप्ने हळूहळू साकार होत असल्याचा अनुभव घेणारे तरुण कलावंत अक्षय पेंडसे यांची कारकीर्द नुकती कुठे बहरू लागली होती आणि व्यक्तिगत आयुष्यातही ते स्थिरावू पाहत होते. अशात मृत्यूने त्यांच्यावर आणि त्यांच्या लहानग्यावर घाला घालून ही स्वप्ने उद्ध्वस्त केली. अभ्यंकर आणि पेंडसे यांच्या आप्तांना हे आघात सहन करण्यास बळ मिळो, अशी प्रार्थनाच आपण करू शकतो. मात्र, कलावंत म्हणून जगण्याच्या आजच्या अति-द्रुतगतीच्या मार्गावर धावताना, धोक्याच्या सूचना वाचावयास कलावंतांनी शिकले पाहिजे.