नामदेवांच्या मुलांमध्येही व्यवहारावरून भांडण झालं होतं! नामदेवांचे पुत्र नारा महाराज यांनी एका अभंगातच ते नोंदवून ठेवलं आहे, असं अचलानंद दादा म्हणाले तेव्हा हृदयेंद्रला अपार आश्चर्य वाटलं. दादांनी तो अभंगाचा संदेश हृदयेंद्रच्या भ्रमणध्वनीवर पाठवला. त्यावर बोलणं मात्र झालं नाही. रात्र फार झाल्यानं दादा वरच्या बर्थवर झोपायला गेले आणि खालच्या बर्थवर पहुडलेला हृदयेंद्र काचेतून बाहेरचं धावतं आभाळ पाहात होता.. एकादशीनंतर गुरूपौर्णिमेकडे वाटचाल करणारा चंद्र.. म्हटलं तर पूर्णच म्हटलं तर पूर्णत्वाला चार दिवस बाकी.. एका दशेत स्थिर झाल्यावर चौथी अवस्था असलेल्या तुर्येनंतरच पूर्णत्व, हेच जणू तो चंद्र सांगत होता.. आपल्या मनातल्या या विचारानं हृदयेंद्रला हसू आलं.. दिसणाऱ्या प्रत्येक गोष्टीतून सद्गुरू आध्यात्मिक बोधच सांगत असतात. तो ग्रहण झाला पाहिजे, असं त्याला वाटलं. त्याला आठवलं. एकदा जपाला बसला असताना कुठूनसा एक लहानसा धागा वाऱ्यानं उडत त्याच्या समोर पडला. तो पाहताना त्याला वाटलं, सुईच्या छोटय़ छिद्रातून दोरा ओवायचा तर तो एकसंध लागतो. त्यासाठी त्याचे टोकाचे तंतू विखुरले असतील तर तेवढा भाग तोडावा लागतो किंवा ओल्या बोटानं तो दाबून एकसंध करावा लागतो.. एकसंध झाल्याशिवाय तो छिद्रातून जातच नाही. त्याप्रमाणे विखुरलेलं मन एकाग्र झाल्याशिवाय साधनेत ओवलं जातच नाही.. एकदा लहानशा गल्लीतून जाताना त्याच्यासमोरून दोन माणसं बोलत जात होती. एक म्हणाला, आधीच ही गल्ली एवढीशी. त्यात वाहनांचं दुहेरी पार्किंग करून ठेवलंय. चालणं तरी जमेल का? त्याला वाटलं, गुरुजीच विचारत आहेत, आधीच आयुष्य छोटं त्यात तुम्ही अनंत इच्छांची गर्दी करता, मग साधनापथावर चालणं जमेल का? गुरुजींच्या या आंतरिक बोधसोबतीच्या जाणिवेनं हृदयेंद्रचं मन सुखावलं.. त्यानं सहज म्हणून भ्रमणध्वनी हाती घेतला.. कुठल्याशा आठवणीनं त्याला हसू आलं.. कर्मू म्हणाला होता, ‘‘भ्रमणध्वनी कसला? हा भ्रामकध्वनीच आहे! पुण्यात असलेला माणूस मी नाशकात आहे, असं बिनदिक्कत सांगतो!! या भ्रमणध्वनीमुळे माणसापर्यंत पोहोचता येतं, पण त्याच्या मनापर्यंत पोहोचता येतंच असं नाही.. संपर्क खूप सोपा झालायं, संवाद मात्र खालावलाय.. त्याला दादांनी नुकत्याच पाठवलेल्या नारा महाराजांच्या अभंगाची आठवण झाली.. तो विलक्षण अभंग तो वाचू लागला.. भावंडांची व्यवहारावरून होणारी भांडणं काही नवी नाहीत.. नामदेवांच्या चार पुत्रांचंही व्यवहारावरून झालेलं कडाक्याचं भांडण त्या अभंगात होतं.. अभंग असा होता..
पुंडलिका द्वारीं होतसे वेव्हार। नामयाचीं पोरें भांडतातीं।। १।। येऊनियां चौघे उभे ठेले सत्वर। बोलतातीं पोरे नामयाची।। २।। आमुचा अंकीं लागताती पुराणीं। नामयाचे ऋणी बांधलासी।।३।। नामयाचा नारा बैसलासे द्वारीं। विठोबावरी आळ आला।। ४।।
अभंगाचा अर्थ दादांनी सांगितला नाही.. तो तुम्हीच लावा किंवा नंतर वेळ मिळाला तर पाहू, असं ते म्हणाले होते त्यामुळे हृदयेंद्रची उत्सुकता वाढली होती.. अभंगाचा अर्थ नीटसा कळत नव्हता, पण काहीतरी कळल्यागत वाटतंही होतं.. जे काही मनाला भिडत होतं तेवढय़ानंही त्याचे डोळे पाणावत होते.. बापाच्या मालमत्तेवरून भावंडांची भांडणं होतात, इथं बापही जगावेगळा आणि पोरंही जगावेगळी! विठ्ठलाच्या महाद्वाराशी जमलेली नामयाची पोरं त्याच्या डोळ्यासमोर उभी ठाकली.. व्यवहारावरून त्यांच्यात भांडण जुंपलं होतं, पण खरंच ते त्या चौघांमधलं भांडण होतं, का विठोबाशी होतं? हा कुठला व्यवहार होता? हा कुठला दावा होता? कुठल्या ऋणाचा हवाला होता? विठोबावर कोणता आळ त्यांनी घेतला होता? प्रश्नांच्या या वावटळीनं हृदयेंद्रच्या मनात विचारांची उलथापालथ सुरू होती.. त्यानं डोळे मिटले.. गुरुजींची प्रार्थना केली, माझ्या बुद्धीला काही उकलत नाही.. मग त्याला वाटलं, देशभर कुठेही जा.. देवाच्या द्वाराशीही आज व्यवहार बोकाळला आहे.. देवाचं दर्शन हवं तर आधी लक्ष्मी-दर्शन घडवावं लागतं.. ज्या द्वाराशी कधीकाळी भावभक्तीचा व्यवहार उमलला तिथे हे विपरीत का घडावं?
चैतन्य प्रेम