ज्येष्ठ लेखिका ज्योत्स्ना देवधर, शैलजा राजे आणि सुमन बेहरे या तिघींची निखळ मैत्री हा साहित्य जगतामध्ये सर्वाच्याच कौतुकाचा विषय होता. यापैकी ज्येष्ठ लेखिका शैलजा राजे यांचे चार वर्षांपूर्वी निधन झाले, तर ज्येष्ठ लेखिका ज्योत्स्ना देवधर यांनी  १७ जानेवारी रोजी अखेरचा श्वास घेतला. या मैत्रीच्या आठवणींना उजाळा दिला आहे  या मैत्रीतील अखेरचा दुवा असलेल्या ‘माहेर’ आणि ‘मेनका’ या मासिकाच्या माजी संपादक सुमन बेहरे यांनी.
आमची मैत्री ६० वर्षांपासूनची, म्हणजे गेल्या सहा दशकांची. शैलजा राजे या ‘माहेर’च्या पहिल्या लेखिका. तिला मी शैला म्हणत असे. शैलाच्या लेखानेच १९६१ मध्ये ‘माहेर’ची सुरुवात झाली. त्या वेळी शैला आकाशवाणीमध्ये जात होती. त्यामुळे तिची आकाशवाणीमध्ये नोकरीस असलेल्या ज्योत्स्ना देवधर हिच्याशी ओळख झाली. एकदा शैला विजयानगर कॉलनी येथील ‘माहेर’च्या कार्यालयामध्ये आली तेव्हा तिच्यासमवेत ज्योत्स्ना देवधर होती. शैलाने माझी तिच्याशी ओळख करून दिली. त्या वेळी ज्योत्स्ना देवधर हे नाव लेखिका म्हणून लोकप्रिय होऊ लागले होते. त्यामुळे एका लेखिकेशी माझी ओळख झाली याचा मला आनंद होता, पण या ओळखीचे रूपांतर मैत्रीमध्ये कधी झाले हे आम्हा तिघींनाही समजले नाही. लेखिका म्हणून ज्योत्स्ना ‘माहेर’ परिवारामध्ये आली आणि आमच्या घरातलीच एक होऊन गेली. एखाद्याशी आपलं जमून जातं, जुळवावे लागत नाही असे आमचे जुळून गेले.
केवळ आम्ही तिघी मैत्रिणी म्हणून एकत्र आलो असे नाही, तर आमच्या तिघींचे यजमान हेदेखील एकमेकांचे चांगले मित्र झाले. जणू आमचा सहाजणांचा ग्रुप असावा इतके तेसुद्धा आमच्या मैत्रीशी समरस झाले होते. आम्ही तिघी कथाकथनाला जायचो तेव्हा हे तिघेजण सहल म्हणून आमच्याबरोबर येत असत. एकत्र हसत-खेळत राहून गप्पा मारायच्या, गाणी म्हणायची असे ते मंतरलेले दिवस होते. आम्ही तिघी वेगळ्या आहोत असे आम्हाला कधी वाटलेच नाही. आमची मैत्री म्हणजे तीन डोकी आणि एक शरीर असाच काहीसा प्रकार आहे, असे म्हणावे लागेल. आमच्या मैत्रीतील आणखी एक गंमत म्हणजे आम्हा तिघींचा जन्म १९२६ या एकाच वर्षांतील. ज्योत्स्नाचा जन्म २८ फेब्रुवारीचा. शैलाचा १२ मार्चला आणि माझा १३ एप्रिलला. म्हणजे एकापाठोपाठच्या महिन्यातीलच. त्या अर्थाने आम्ही समवयस्क होतो. आमच्या तिघींचे यजमान गेले. चार वर्षांपूर्वी शैला गेली आणि आता ज्योत्स्नादेखील गेली. आमच्या सहाजणांमध्ये केवळ मी एकटीच उरली आहे.
ज्योत्स्ना देवधर हिने आत्मचरित्र लिहावे अशी माझी इच्छा होती. तसे मी तिला सुचविलेदेखील. तिचे हे आत्मचरित्र राहूनच गेले. ‘एरियल’ या मेनका प्रकाशनने प्रकाशित केलेल्या पुस्तकामध्ये तिचे व्यावसायिक आत्मचरित्र आले आहे. हिंदूी भाषा बोलणारी ज्योत्स्ना मराठी साहित्यामध्ये आली कशी आणि घडली कशी हे त्या पुस्तकामध्ये आहे. मात्र, कौटुंबिक आठवणींवर आधारित आत्मचरित्र येणे हे भावी पिढीतील लेखिकांच्या दृष्टीने महत्त्वाचे आहे, असे मी तिला समजावले. पण, ‘नको त्या जुन्या आठवणी’ असे म्हणत तिने आत्मचरित्र लिहिले नाही.
मकरसंक्रांतीला ज्योत्स्नाचा मला फोन आला. ‘गुळाच्या पोळ्या घेऊन ये’, असे ती मला म्हणाली. त्यामुळे दुसऱ्याच दिवशी मी गुळाच्या पोळ्या आणि तिळगूळ घेऊन गेले. मला पाहताच तिला आनंद झाला. आम्ही दोन तास रम्मी म्हणजे पत्ते खेळलो. ज्योत्स्ना हिला खूप काही बोलायचे होते. मनातले बोलायचे होते, पण  प्रकृती अस्वास्थ्यामुळे तिला बोलता येत नव्हते. तोंडातल्या तोंडात पुटपुटण्याचा ती प्रयत्न करायची, पण वयोमानामुळे मला ऐकायला कमी येते. पुढे तीन दिवसांनी ज्योत्स्ना आपल्यात नाही ही दु:खद बातमी ऐकायला मिळेल, अशी कल्पनादेखील आली नव्हती.
लेखिका म्हणून ज्योत्स्ना ‘ग्रेट’ होती, हे तर जगजाहीर आहे. त्याविषयी मी काही बोलणे योग्य होणार नाही. तिचे लेखन उत्तम होते. भाषा समृद्ध होती. आकाशवाणीमध्ये खूप चांगली माणसे तिला मित्र आणि सहकारी म्हणून भेटली. ‘ही माझी मैत्रीण सुमन’, अशाच शब्दांत तिने अनेकांशी माझी ओळख करून दिली. तिच्यामुळेच मीदेखील आकाशवाणीसाठी लेखन करू लागले. आम्ही एकमेकींजवळ मन मोकळं करायचो. घरगुती गोष्टी बोलत असू. आम्ही जे बोलू ते आमच्यामध्येच राहणार, बाहेर जाणार नाही आणि त्याचा गवगवा होणार नाही याची खात्री आम्हा तिघींनाही होती.
एकमेकींच्या घरी राहायला जायचो. शैला आणि ज्योत्स्ना या लेखिका होत्या. तशी काही रूढार्थाने मी काही लेखिका नाही. मी संपादक होते, पण मला लेखनाची आवड होती. हक्काने हाक मारण्याची जागा आणि केव्हाही मदत मागावी अशी जिवलग मैत्रीण असेच मी शैला आणि ज्योत्स्ना यांचे वर्णन करेन. मैत्रिणी आणि जवळच्या नातेवाईकांनी एकत्र येऊन ज्योत्स्नाची पंचाहत्तरी साजरी केली होती. साहित्य लेखनाच्या बळावर एवढी पारितोषिके मिळाली तरी ज्योत्स्नाला त्याचा कधी गर्व झाला नाही. पारितोषिकांची रक्कम एकत्र करून तिने महाराष्ट्र साहित्य परिषदेला देणगी दिली. तिचे आवडते लेखक शरच्चंद्र चटर्जी यांच्या नावाने मराठीतील उत्तम साहित्यकृतीला शरदबाबू पुरस्कार प्रदान केला जावा ही त्यामागची तिची दृष्टी होती. हा तिचा मोठेपणाच म्हणावा लागेल.
अत्यंत हुशार, तडजोड न करणारी आणि प्रत्येक गोष्टीमध्ये पुढाकार घेणारी अशी होती. कधी नैराश्य आले किंवा उदास वाटू लागले की तिला माझ्याशी बोलावे असे वाटायचे. मी आणि शैला, आम्ही जितक्या जवळच्या होतो तेवढे कोणी फारसे तिच्याजवळ जाऊ शकले असेल, असे वाटत नाही. आम्ही मैत्रिणी कौटुंबिक सुख-दु:खाच्या वाटेकरी असायचो. ‘इतक्या मोठय़ा लेखिकेची मैत्रीण आहे याचाच अर्थ माझ्यामध्येही काही गुण आहेत’, असे मला वाटत असे. आम्ही तिघींनीही जीवन आणि मैत्री ‘एन्जॉय’ केली. दु:ख विसरून आनंदाचे क्षण लक्षात ठेवले म्हणजे पुढच्या आयुष्याला आधार मिळतो. मला समजून घेत असा आधार ज्योत्स्ना देवधर हिने मला दिला.

What Devendra Fadnavis Said?
“पंतप्रधान मोदींच्या आशीर्वादाने चांद्रयान चंद्रावर उतरलं, त्याचप्रमाणे चंद्रपूरचं यान..”, देवेंद्र फडणवीसांचं वक्तव्य चर्चेत
Buldhana lok sabha
बुलढाणा : नरेंद्र खेडेकर-हर्षवर्धन सपकाळ यांच्यात दिलजमाई; आधी मैत्रीपूर्ण लढतीचे ट्विट आता फक्त मैत्री
Leaders of Mahayuti gathered in Kolhapur Determination of sanjay Mandaliks victory
कोल्हापुरात महायुतीचे नेते एकवटले; मंडलिक यांच्या विजयाचा निर्धार
Ram Satpute Answer to Praniti Shinde
प्रणिती शिंदेंच्या पत्राला राम सातपुतेंचं उत्तर, “धर्म आणि जातींमध्ये फूट पाडून इतकी वर्षे…”