अलेक्झांडर काही परत येणार नाही, हे कळत होतं तिला. कणाकणानं झिजत झिजत तो गेला. पण तो कसा गेला हे तरी कळावं ही तिची इच्छा होती. ती आता पूर्ण होईल..
दोनच दिवसांपूर्वी लंडनच्या न्यायालयात एक खटला नव्यानं उभा राहिला. एका खुनाचा. हा खून नक्की कोणी केला याबद्दल अनेकांच्या मनात खात्रीवजा संशय आहे. किंबहुना अनेक आंतरराष्ट्रीय अभ्यासकांना माहीतच आहे यामागे कोण आहे ते. तो खून झाला कसा याचाही मोठय़ा प्रमाणावर अभ्यास सुरू आहे. तो ज्या पद्धतीनं केला गेला ती पद्धत पाहता तो होताना आसपासच्याही अनेकांना त्या जीवघेण्या पदार्थाची बाधा झाली असावी असा दाट संशय आहे सुरक्षारक्षकांच्या मनात. हा सगळा तपशील पुढे येईलच कथानकाच्या ओघात. सध्या मुद्दा हा आहे की हा खुनाचा खटला जरी लंडनमध्ये सुरू झाला असला तरी खून झालेली, आणि करणारीही, व्यक्ती ब्रिटिश नव्हती. आणि नाही.
अलेक्झांडर लिटविनेंको हे खून झालेल्या व्यक्तीचं नाव. तो गुप्तहेर खात्यात होता. रशियाच्या. हा देश सोविएत रशिया असा होता तेव्हा त्या देशाच्या गुप्तहेर यंत्रणेचं नाव तसं अनेकांना माहीत असायचं. केजीबी नावाची ही पाताळयंत्री यंत्रणा रशियाच्या नावातून सोविएत गेल्यावर नवीन नावानं ओळखली जायला लागली. पीएसबी हे तिचं नाव. रशियाचे विद्यमान अध्यक्ष व्लादिमीर पुतिन हे पूर्वी केजीबीचे प्रमुख होते. आता रशियाचे अध्यक्ष या नात्यानं अर्थातच तेच पीएसबीचं नेतृत्व करतात. तर या पीएसबीत हा अलेक्झांडर गुप्तहेर होता.
एकविसाव्या शतकाची पहाट उगवत असताना, १९९९ साली रशियात नवाच इतिहास रचला जात होता. दिवसाही मद्यधुंद अवस्थेत असणारे तत्कालीन अध्यक्ष बोरिस येल्तसिन यांच्या विरोधात चांगलीच नाराजी दाटून होती. एक तर त्यांच्या काळात रशियन अर्थव्यवस्था डबघाईला आलेली होती. त्यामुळे सामान्य माणसाचं जगणं हराम झालेलं होतं. येल्तसिन आता जनसामान्यांना नकोसे झाले होते. तेव्हा त्यांनी आपला वारस म्हणून व्लादिमीर पुतिन यांची निवड केली आणि जग एकविसाव्या शतकात प्रवेश करत असताना पुतिन हे उपाध्यक्ष बनले.
त्या सुमारास रशियात अचानक चेचेन बंडखोरांचे हल्ले वाढू लागले होते. भर मॉस्कोत हे चेचेन फुटीरतावादी घातपाती कृत्ये करत होते. त्यामुळे साहजिकच त्यांच्या विरोधात मोठय़ा प्रमाणावर नाराजी व्यक्त होऊ लागली होती. या इस्लामी बंडखोरांना चेचायलाच हवं असाच साधारण जनमताचा कौल. त्याचा आदर करत रशियन सरकारनं या चेचेन बंडखोरांच्या विरोधात धडाक्यानं कारवाई सुरू केली. लष्करच उतरलं आपल्या सर्व ताकदीनिशी. मोठय़ा प्रमाणावर नरसंहार झाला. अनेक चेचेन मारले गेले.
पण खरी मेख इथेच आहे.
हा सगळाच बनाव होता असं १९९९ साली मॉस्कोत झालेल्या एका पत्रकार परिषदेत सांगितलं गेलं. त्यात अलेक्झांडर होता. चेचेन्सची हत्या करता यावी, जनमत आपल्या बाजूनं वळवता यावं यासाठी त्यांच्याकडून दहशतवादी हल्ले होत असल्याचं दाखवलं गेलं. प्रत्यक्षात हे हल्ले चेचेन बंडखोरांनी केलेच नव्हते. मॉस्कोत येऊन हे असं उघड आव्हान देण्याइतकी त्यांची ताकद नाही. अशी सगळी माहिती या पत्रकार परिषदेत देण्यात आली. अलेक्झांडर आणि त्याच्या काही सहकाऱ्यांना हा सरकारपुरस्कृत अनावश्यक िहसाचार बघवला नाही, म्हणून त्यांनी हा उद्योग केला. हा काळ सीमेवरचा. येल्तसिन यांचा अस्त आणि पुतिनोदय होत असतानाचा.
पीएसबी स्वस्थ बसणं शक्यच नव्हतं. अलेक्झांडर याची सेवेतनं हकालपट्टी करण्यात आलीच. पण तुरुंगवासाची शिक्षाही त्याला भोगावी लागली. आपली कार्यालयीन मर्यादा ओलांडण्याचा ठपका त्याच्यावर ठेवण्यात आला. पुढे तो सुटला. पण सरकारी गुप्तहेर यंत्रणा त्याच्या मागावर सतत असायची. पुतिनविरोधक म्हणून त्याच्यावर लक्ष होतं सरकारचं. पुढे पुढे हा जाच वाढला. त्याचा फोन चोरून ऐकला जाऊ लागला. हालचालींवर नियंत्रण आलं. बायकोलाही या गुप्तहेरीचं लक्ष्य केलं जाऊ लागलं. शेवटी त्या दोघांनी निर्णय घेतला. देशत्यागाचा. एके काळचा गुप्तहेरच तो. चोराच्या वाटा चोराला ठाऊक असतात त्याप्रमाणे बनावट नावानं त्यानं पारपत्र वगरे बनवलं आणि त्या दोघांनीही रशिया सोडला. कायमचा.  इंग्लंडकडे त्यांनी राजाश्रय मागितला. मायदेशात होणाऱ्या अन्यायाचं कारण होतंच. त्यात ब्रिटिश गुप्तहेर यंत्रणेला अलेक्झांडरचं महत्त्व सांगायची गरज नव्हती. त्यामुळे त्याचं काम झालं. २००० पासून त्या दोघांनी लंडनला आपलं घर मानलं.
इंग्लंडमध्ये राहून अलेक्झांडर रशियाचे नवे अध्यक्ष पुतिन यांच्याविरोधात वातावरणनिर्मिती करतच होता. पुतिन यांचा बुरखा फाडणं हे त्याचं उद्दिष्टच बनलं. त्यानं पुस्तकच लिहिलं पुतिन यांच्यावर. अनेक आंतरराष्ट्रीय संघटना, स्वयंसेवी संस्था यांना अलेक्झांडर याचा आधार वाटू लागला. त्याचं महत्त्व वाढू लागलं. आता इंग्लंडमध्ये असल्यामुळे रशियन सरकार प्रत्यक्षपणे त्याला काही करू शकत नव्हतं. आणि दुसरं म्हणजे एमआय-६ या नावानं ओळखली जाणारी ब्रिटिश गुप्तहेर यंत्रणाही अलेक्झांडरच्या मागे उभी होती. त्याचंही अलेक्झांडरला संरक्षण होतं. नाही म्हटलं तरी ब्रिटिश सरकार आणि त्या मार्गाने अमेरिकेला अलेक्झांडरकडे जी माहिती होती तीत रस होता. ही दोन्ही सरकारं पुतिन यांना मिळेल त्या मार्गानं रोखण्याचा प्रयत्न करीत होतीच. त्यामुळे अलेक्झांडर त्यांच्यासाठीही उपयोगाचा.
तोही इमानेइतबारे पुतिनविरोधाचं काम करत होता. देशत्याग केला तरी त्याचा देशाशी संपर्क होताच. शिवाय त्याच्याच गुप्तहेर खात्यातल्या अनेकांशी त्याचे अजूनही सौहार्दाचे संबंध असायचे. लंडनला कोणी आले की त्यांच्या भेटीगाठी व्हायच्या. असंच एकदा २००६ साली त्याचे काही मित्र त्याला भेटायला आले. दुपारची वेळ. तिघेही चहा प्यायला गेले एका पंचतारांकित हॉटेलात. बऱ्याच गप्पाही झाल्या त्यांच्या.
त्याच रात्री अलेक्झांडरला उलटय़ा सुरू झाल्या. थांबेचनात. शेवटी रुग्णालयात दाखल करावं लागलं त्याला. पण डॉक्टरही चक्रावले. सगळ्या चाचण्या केल्या तरी कशातच काही सापडेना. आजारही सापडत नाही आणि अलेक्झांडरही बरा होत नाही. औषध तरी काय देणार. दोन चार दिवसांनंतर भयानकच काही व्हायला लागलं. अलेक्झांडरचे केस झडू लागले. शरीरावरचा एक न एक केस गळून गेला. अगदी भुवया आणि पापण्यासुद्धा. अन्न पोटात राहीना. काहीच उपाय चालत नव्हता. साधारण अडीचेक आठवडय़ात अलेक्झांडर गेलाच. भर रुग्णालयात. डॉक्टरांची तज्ज्ञ पथकं समोर हजर असताना कोणीही काहीही करू शकलं नाही. कणाकणानं झिजत झिजत तो गेला.
आता त्याच्याच मरणाचा खटला सुरू आहे. त्या वेळी काय झालं ते काहीही कोणाला कळलं नाही. पण यामागे कोणी प्रचंड शक्ती आहे, हे अनेकांना कळत होतं. विशेषत: त्याच्या पत्नीला. मरीना हिला. तिनं अनेक आंतरराष्ट्रीय दरवाजे ठोठावले. शेकडोंना भेटली ती. एकाच मागणीसाठी. अलेक्झांडर काही परत येणार नाही, हे कळत होतं तिला. पण तो कसा गेला हे तरी कळावं ही तिची इच्छा होती. ती आता पूर्ण होईल. अलेक्झांडर याचं थडगं उकरून त्याच्या शवाची पुन्हा आंतरराष्ट्रीय तज्ज्ञांच्या देखरेखीखाली तपासणी केली गेली. दोन दिवसांपूर्वी न्यायालयात तो सगळा तपशील दिला गेला. वैद्यकतज्ज्ञांनी साक्ष दिली. त्यातून जे काही झालं ते समोर आलं. वाचून भीतीनं शहारा यावा असा हा तपशील.
अलेक्झांडर याच्या चहात पोलोनियम २१० हे किरणोत्सारी रसायन मिसळलं गेलं होतं. ते अत्यंत जहाल असतं. एक थेंबसुद्धा अनेकांचा प्राण घ्यायला पुरतो. हे काय करतं, तर अगदी एक ग्रॅम पोलोनियम एका सेकंदाला १,००,००००००००००००००. एकावर १६ शून्य. इतके अल्फा किरण प्रसारित करतं. अलेक्झांडरच्या शरीरात गेल्यावर साधारण २४ तासांत त्याच्या शरीराचा कोपरा न कोपरा या पोलोनियमनं ताब्यात घेतला. पुढच्या २४ तासांत त्याच्या शरीराची एकही पेशी अशी राहिली नाही की जी या किरणोत्सारापासून वाचू शकेल. माणसाच्या शरीरात अब्जावधी पेशी असतात हे लक्षात घेतल्यावर याचा अर्थ कळेल. तर अशा तऱ्हेनं अलेक्झांडर याचं शरीर पूर्णपणे ताब्यात आल्यावर या पोलोनियमनं फक्त एक केलं. त्याच्या शरीरातली प्रत्येक पांढरी पेशी वेचून नष्ट केली. पांढऱ्या पेशी रोगप्रतिकार शक्तीसाठी महत्त्वाच्या असतात. आपल्या शरीरातल्या रक्षक म्हणजे या पांढऱ्या पेशी. त्याच नाहीशा झाल्यावर अलेक्झांडर शिल्लक राहणं शक्यच नव्हतं. तो कणाकणानं गेला तो यामुळे.
हे पोलोनियमसारखं द्रव्य सरकारदरबारी अतिउच्च नियंत्रण असल्याखेरीज कोणाच्या हाती कसं काय लागू शकेल? तेव्हा अलेक्झांडरच्या हत्येमागे कोण आहे, हे उघड आहे. त्याचे मारेकरी कोण आहेत हेही कळलंय. त्याला चहा पाजणारे कोण होते त्यांचीही माहिती मिळालीय. त्यातला एक रशियन पार्लमेंटचा, डय़ुमाचा, सदस्य आहे.
काय होणार त्यांचं? शिक्षा होईल का त्यांना? त्यांच्यामागचा खरा सूत्रधार कोण हे जगासमोर येईल का? मरीनाला हे प्रश्न पडलेत.
या आधुनिक, प्रगत, सुसंस्कृत वगरे जगात अशा अनेक मरीना असतात. उत्तराच्या शोधात. मारुती कांबळेचं काय झालं.. याचं उत्तर तरी कुठे अजून मिळालंय आपल्याला?
-गिरीश कुबेर