16 December 2017

News Flash

दशक जीमेलचे.. आणि आशियाचे!

‘जीमेल इज डिफरन्ट, हिअर्स हाउ’ अशा इंग्रजी विषय-शीर्षकाचा विरोप (ईमेल) आला, की दहा वर्षांपूर्वीच्या

मुंबई | Updated: April 3, 2014 1:08 AM

 ‘जीमेल इज डिफरन्ट, हिअर्स हाउ’ अशा इंग्रजी विषय-शीर्षकाचा विरोप (ईमेल) आला, की दहा वर्षांपूर्वीच्या एप्रिलमध्ये तो अधाशासारखा वाचला जाई. हे दशकभरापूर्वीचे वाचक नव्यानेच जीमेलचे खातेदार झालेले असत.. स्वत:च्या विरोपपेटीत (इनबॉक्समध्ये) आलेला हा पहिला विरोप नव्या युगाचीच नांदी ठरणारा आहे, याची यांपैकी अनेकांना कल्पनाच नसेल, अनेकांना त्याही वेळी ती आली असेल! दहा वर्षांपूर्वी अवतरलेली जीमेल ही विरोपसेवा त्या वेळच्या इतरांपेक्षा निराळी होतीच, शिवाय गुगलचे भक्कम पाठबळ तिच्यामागे असल्यामुळे नवनवीन तंत्रे अवलंबून वापरकर्त्यांला सुखी ठेवण्याची काळजीही घेतली जाणार, एवढी खात्री मात्र अनेकांना होती. पण जीमेल वापरण्यासाठी त्या काळी निमंत्रण आवश्यक असे. प्रत्येक जीमेलधारकाला दोनच निमंत्रणे पाठवता येत, पुढे ती चार झाली. ब्लॉगर आदी अन्य साधनांच्या वापरकर्त्यांना जीमेल या सेवेनेच जीमेलचे हे एवढे अप्रूप अनेक कारणांसाठी होते. हॉटमेल वा याहू आदी सेवा फारतर २० मेगाबाइट साठवणक्षमताच देत असताना, जीमेलने थेट एक गिगाबाइट साठवणीचे भांडारच देऊ केले होते. जीमेलची ही क्षमता आता ३६ गिगाबाइटपर्यंत किंवा त्याहीपुढे आहे. गुगल ही कंपनीच लहान होती तेव्हा त्यांच्याकडे आलेल्या पॉल बुक्हाइट याने ‘कामातून उरलेल्या २० टक्के वेळातील प्रकल्प’ म्हणून जी विरोपसेवा विकसित केली, ती म्हणजे जीमेल. ही सेवा इतरांपेक्षा आगळीच हवी, यासाठी तिच्या दिसण्यापासून ते तांत्रिक क्षमतांपर्यंत किती तरी गोष्टी निराळ्या आणि त्या वेळी काळापुढल्या होत्या. उदाहरणार्थ, अगदी पहिल्या दिवसापासून मोबाइल फोनवरही जीमेल पाहता येईल, अशी तांत्रिक व्यवस्था होती; तेव्हा त्या क्षमतेचे मोबाइलच जास्त नव्हते. निळ्या-करडय़ा रंगाचे हॉटमेल पिवळ्या-जांभळ्या रंगाचे याहू यांच्यापेक्षा अगदी स्वच्छ दिसणारी, पांढऱ्यावर गुगलच्या चार रंगांचा अगदी माफकच वापर असणारी ही विरोप-खिडकी, पुढल्या काळात इंटरनेटवर रंगरंगोटीपेक्षा वापरक्षमतेलाच महत्त्व येणार, अशा नव्या सौंदर्यशास्त्राची ग्वाही देणारी होती. हॉटमेलच्या सुबीर भाटियांनी ‘मोफत ईमेल सेवे’चे जे पाऊल जीमेलच्या आठ वर्षे अगोदर उचलले, त्यापेक्षा जीमेलचे पाऊल किती तरी पुढले ठरले, कारण वापरात असलेला भागच तेवढा ‘रीलोड’ होण्याची सोय जीमेलमध्ये होती. पुढील दहा वर्षांत जीमेलने स्वत:मध्ये अनेक बदल घडवले. चॅट आणि ईमेल यांचे एकत्रीकरण, मग व्हिडीओ चॅटचाही समावेश, मोठमोठे जोडदस्त (अटॅचमेंट) पाठवण्याची आणि प्राप्तकर्त्यांला एकाच विरोपातील अनेक जोडदस्त ‘झिप फाइल’च्या स्वरूपात साठवता येण्याची सोय, अशा छोटय़ामोठय़ा उपयुक्त बाबी जीमेलनेच प्रथम हेरल्या. गुगलही बलाढय़ होत गेले आणि मेघनिविष्ट (क्लाऊड) साधनांमुळे, ‘गुगल ड्राइव्ह’ साठय़ामुळे तसेच ‘गुगल क्रोम’सारख्या ब्राऊझरमुळे तर, घरचा संगणक आणि हीच साधने असलेला कुठलाही अन्य संगणक यांत काही फरकच राहिला नाही. जीमेलचा दहावा वाढदिवस परवाच्या १ एप्रिल रोजी प्रामुख्याने अमेरिकी प्रसारमाध्यमांनी अभिनंदनपर संपादकीय मजकुरानिशी साजरा केला, त्यापैकी ‘टाइम’ साप्ताहिकाच्या संकेतस्थळाने तर मायक्रोसॉफ्टऐवजी गुगललाच इंटरनेटमधील क्रांतीचे श्रेय जवळपास दिले! परंतु जीमेलमुळे जग खरोखरच कसे बदलले, याबद्दल या अमेरिकी माध्यमांनी एक गोष्ट लक्षात घेतली नाही.. गुगल व जीमेल सध्या ५७ भाषांत वापरता येते, त्यांपैकी निम्म्याहून अधिक भाषा आशियाई आहेत! जीमेलच्या ५० कोटी वापरकर्त्यांपैकी २७ कोटी आशियातच आहेत. जीमेलचे अभिनंदन केवळ दशकपूर्तीनिमित्त नव्हे, ‘आशियाई दशका’ची पावले ओळखल्याबद्दलही करावयास हवे.

First Published on April 3, 2014 1:08 am

Web Title: decade of gmail and asia