भाजपच्या राष्ट्रीय अध्यक्षपदी राजनाथ सिंह यांची पुन्हा निवड झाल्यानंतर पक्षाने सार्वजनिक पातळीवरील आपली प्रतिमा दोन प्रकारे सजवण्याचा प्रयत्न सुरू केलेला दिसतो. गुजरातचे मुख्यमंत्री नरेंद्र मोदी यांनी दिल्लीत महाविद्यालयातील विद्यार्थ्यांसमोर केलेले भाषण वाचल्यावर कुणाच्याही हे सहजपणे लक्षात येईल की मोदी आणि राजनाथ सिंह यांनी दोन वेगवेगळ्या भाषा वापरण्याचे ठरवलेले आहे. मोदी यांनी आपले विकासाचे नाणे वाजवत राहायचे आणि पक्षाध्यक्षांनी आणि अन्य नेत्यांनी राममंदिरापासून ते हिंदुत्वापर्यंतच्या सगळ्या ‘आवडत्या’ विषयांवर बोलत राहायचे. विषयांची ही वाटणी समाजातील दोन वेगवेगळ्या गटांना आकर्षित करण्यासाठी आहे. मोदी यांचे भाषण गुजरातमधील विकासाचे गुणगान करणारे होते.  विद्यार्थ्यांसमोरच्या या भाषणात युवक नेमक्या ज्या गोष्टीचा विचार करतात, त्याच बाबींवर भर देत भाजपच्या अन्य विषयांबद्दल बोलण्याचे मोदी यांनी कटाक्षाने टाळलेले दिसते. जे गुजरातमध्ये घडू शकले, ते देशभरातही घडू शकते, असे सांगत अमेरिकेलाही मागे टाकण्याचे स्वप्न दाखवत त्यांनी तरुणांच्या दुखऱ्या भागावर हळूच फुंकर मारली. आपण पंतप्रधानपदाचे दावेदार आहोत की नाही, हे सांगण्याची मग त्यांना गरजच उरली नाही. सलग चौथ्यांदा मुख्यमंत्री झालेल्या मोदींना देशाचे नेतृत्व करण्याची संधी आता आपोआप चालून आली आहे, असे चित्र पक्षातीलच काहींनी रंगवायला सुरुवात केली आहे.  संघाच्या आशीर्वादाने पक्षाध्यक्षपद मिळालेल्या नितीन गडकरी यांच्या कार्यकाळात भाजपने आणि संघानेही मोदी यांच्यापासून ‘एक हाथसे नाप’ ठेवून त्यांना दिल्लीवारी करण्यापासून परावृत्त करण्यात यश मिळवले होते. राजनाथ सिंह यांच्या पुनरागमनानंतर सारी चक्रे पुन्हा उलट गतीने फिरू लागली आहेत, असे आजचे चित्र असले तरी त्याबाबत अद्याप संघाने आपली भूमिका स्पष्ट केलेली नाही. संघाच्या पद्धतीमध्ये जाहीर वक्तव्य करण्यापेक्षा कृतीवर भर दिला जातो. ती कृतीही अशा स्वरूपाची असते, की ती कोणाच्या आदेशावरून झाली, याचा पत्ता लागत नाही.  राम मंदिराचा प्रश्न पुन्हा ऐरणीवर आणून त्याला गुजरातच्या विकासाच्या मॉडेलची जोड देणे अशा दुहेरी पातळीवर भाजपने आपली नीती आखलेली दिसते. त्यामुळेच मोदी यांच्या वक्तव्याला कोणत्याही धार्मिक गोष्टी चिकटणार नाहीत, याची काळजी पक्षाला घेता येईल. आता मोदी कुंभमेळ्याला उपस्थित राहणार आहेत, तेथे आतापासूनच धर्म संसद भरवून कुंभमेळ्याचे राजकीय आखाडय़ात रूपांतर करण्यास प्रारंभ झाला आहे. त्यापूर्वीच मोदी यांची तुलना पंडित नेहरू यांच्याशी करण्यास सुरुवात झाली आहे आणि विश्व हिंदू परिषदेने मोदी यांच्या पंतप्रधानपदाच्या उमेदवारीस पाठिंबाही देऊ केला आहे. मात्र रालोआतील सर्व पक्षांना या मुद्दय़ावर एकत्र आणणे ही निश्चितच सोपी गोष्ट नाही. राजकारण, विकासकारण आणि धर्मकारण अशा तीन तागडय़ांच्या तराजूत भाजप आता बसला आहे. भाजपमधील नेतृत्व बदलाने मोदी यांची दिल्लीवारी अधोरेखित करण्याचा प्रयत्न केल्यामुळे पक्षातील दुखावलेल्या आणि मोदीविरोधक मानल्या जाणाऱ्या नेत्यांची कोंडी होणे स्वाभाविक आहे. मोदींचे तरुणांसमोरील भाषण आणि कुंभमेळ्यातील हिंदुत्वाबद्दलची आक्रमक भाषणे यांपैकी कशाला राष्ट्रीय पातळीवर महत्त्व द्यायचे, याचा निर्णय करताना भाजपची कोंडी मात्र होणार आहे.