सोया सॉसची बाटली वर निमुळती होत गेलेली असते, तिचा तळ मोठा असतो आणि मुख्य म्हणजे तिच्या झाकणाला दोन छिद्रे असतात. अगदी थोडासाच सोया सॉस हवा असेल तर या बाजूचे छिद्र आणि थोडा जास्त चालणार असेल तर त्या बाजूचे! मुख्य म्हणजे, बंद बाटलीतील द्रवपदार्थ बारीक छिद्रातून ओतताना बाटलीची जी खुळखुळ्यासारखी हलवाहलवी करावी लागते, ती सोया सॉस ओतताना मात्र कधीच करावी लागत नाही, कारण दुसरे छिद्र नेहमीच बाटलीत हवा राहावी याची काळजी घेण्यास समर्थ असते. ही बाटली अशीच असते, हे आपण सारे जण गृहीत धरून चालतो म्हणून तिच्याकडे आपले एवढे लक्ष जात नाही.. पण १९६१ साली जपानी वस्तुसंकल्पकार केन्जी इकुआन यांनी या बाटलीचे डिझाइन केले, तोवर ती तशी नव्हती. हे केन्जी इकुआन रविवारी (८ फेब्रु.) कालवश झाले, तोवर ‘बुलेट ट्रेनचा डिझायनर’ अशीही त्यांची ख्याती झालेली होती. वारा कापत, सणाणून धावणाऱ्या बुलेट ट्रेनचा ‘चेहरामोहरा’ विमानासारखाच असणार, हे लोकांना आज पटते; पण आकार पूर्णपणे पालटण्याचे श्रेय केन्जी इकुआन यांचेच.
मानवी जीवन सुकर करण्याचे ‘प्रॉडक्ट डिझाइन’ वा वस्तुसंकल्पन क्षेत्राचे सर्वोच्च ध्येय केन्जी यांना सहज साधले नव्हते. त्यामागे मेहनत होती आणि एक शोकांतिकासुद्धा. टोक्यो शहरात १९२९ मध्ये जन्मलेले केन्जी १६ वर्षांचे होते, शिकण्यासाठी घरापासून दूर होते, तेव्हा हिरोशिमाहून बातमी आली.. तेथे राहणारे त्यांचे वडील आणि अख्खे कुटुंबच, अणुबॉम्बच्या आघातांत गतप्राण झाल्याची. वडिलांच्या मृत्यूनंतर केन्जी यांनी हिरोशिमाच्या जपानी बुद्ध मंदिरात संन्यासदीक्षा घेतली. झेन बुद्धपंथाचे पालन करताना त्यांना जाणीव झाली, की हे जग सुंदर करण्यासाठी काही तरी निर्माण केले पाहिजे. निर्मितीत आपला हातभार असला पाहिजे. मग टोक्योला जाऊन, तेथील राष्ट्रीय ललित कला विद्यापीठातून त्यांनी कलाशिक्षण घेतलेच, १९५६ साली अमेरिकेलाही जाऊन तेथील ‘आर्ट सेंटर कॉलेज ऑफ डिझाइन’चा अभ्यासक्रम त्यांनी १९५७ मध्ये पूर्ण केला. त्याच वर्षी ‘जीके इंडस्ट्रिअल डिझाइन असोसिएट्स’ हा व्यवसाय त्यांनी जपानमध्ये सुरू केला. सोया सॉसनंतर तीनच वर्षांत ‘अकिता शिन्केसान ट्रेन’चे डिझाइन त्यांनी केले आणि त्यानंतरची काही वर्षे ‘यामाहा’च्या विविध मोटारसायकली त्यांनी संकल्पित केल्या. बैलाच्या वशिंडासारखी टाकी या मोटारसायकलींना होतीच, ती अधिक सुबक करून केन्जी यांनी मागचे आसन आणखी उंच केले.. पाठीचे दुखणे कमी करणाऱ्या या एका कृतीसाठी आज भारतातल्या हजारो तरुण बाइकस्वारांनीही केन्जी‘सान’ यांना दुवा द्यायला हवा.