आमुचा तूं ऋणी ठायींचाची देवा। मागावया ठेवा आलों दारा।। वर्म तुझें आम्हां सांपडलें हातीं। धरियेलें चित्तीं दृढ पाय।। बैसलों धरणें कोंडोनियां द्वारीं। आंतूनि बाहेरी येवों नेदीं।। हे चरण योगेंद्रनं पुन्हा म्हटले. मग तो म्हणाला..
योगेंद्र – इथवर हृदू तू सांगितलेला अर्थ बरोबर वाटतो.. नव्हे प्रचलित अर्थापेक्षाही पटतो, पण पुढच्या दोन चरणांशी या अर्थाचा सांधा जुळत नाही.. गाडीनं सांधा बदलल्यानं खडखडाट व्हावा तसं भासतं.. मग तू सांगितलेला अर्थ तरी चुकीचा असावा किंवा पुढचा अर्थ वेगळ्याच मार्गानं जात असावा, असं वाटतं..
हृदयेंद्र – मलाही प्रथम तसंच वाटत होतं की या चरणांची क्रमसंगती आहे की नाही.. बघ, आतापर्यंत खऱ्या भक्तीची सखोलता सांगितली. आता काय म्हणतात? तुजमज सरी होईल या विचारें। जळो भांडखोरें निलाजरीं।। भांडवल माझें मिरविसी जनीं। सहस्त्र वोवणी नाममाळ।।
कर्मेद्र – गाथेत या ओळींचा अर्थ काय दिलाय?
हृदयेंद्र – योगा, तू म्हणतोस त्याप्रमाणे गाथेतल्या अर्थातही हे चरण आले की खडखडाट होतोय.. पहा पूर्णच अर्थ वाचतो.. आमुचा तूं ऋणी ठायींचाची देवा। मागावया ठेवा आलों दारा।। म्हणजे हे देवा तू आमचा मूळचाच ऋणकरी आहेस म्हणून आम्ही स्वात्मभावाचा ठेवा तुझ्या द्वारी मागावयास आलो आहोत.. वर्म तुझें आम्हां सांपडलें हातीं। धरियेलें चित्तीं दृढ पाय।। बैसलों धरणें कोंडोनियां द्वारीं। आंतूनि बाहेरी येवों नेदीं।। म्हणजे तुझे पाय आम्ही चित्तात दृढ धरले आहेत हेच तू हाती सापडण्याचे मुख्य साधन आम्हाला सापडले आहे. मी तुमचे दाराशी धरणे देऊन तुम्हाला आत कोंडून टाकले आहे. आता आतून बाहेर येऊ शकणार नाहीस.. आता पुढचे दोन चरण.. तुजमज सरी होईल या विचारें। जळो भांडखोरें निलाजरीं।। भांडवल माझें मिरविसी जनीं। सहस्त्र वोवणी नाममाळ।। या चरणांच्या प्रचलित अर्थाचा आधीच्या चरणांच्या प्रचलित अर्थाशीही सांधा जुळत नाही! बघ या चरणांचा अर्थ काय दिलाय? अशा करण्याने, म्हणजे मी तुम्हाला आत कोंडलंय आणि आता बाहेर येऊ देणार नाही, अशा करण्याने तुमची आणि आमची बरोबरी होईल म्हणून भांडखोरपणाने निर्लज्ज होणे, यास आग लागो.. आता इथे बघा भांडखोर कोण आहे आणि कुणाचं निर्लज्ज होणं अभिप्रेत आहे, हे स्पष्ट होत नाही. पुढे म्हणतात, विष्णुसहस्त्रनाममाळा हे माझं भांडवल आहे, असं तू मिरवत आहेस..
योगेंद्र – आता जो निस्सीम भक्त आहे, ज्यानं भगवंताचे पाय चित्तात दृढ धरले आहेत आणि त्याला अंतरंगातून तो क्षणमात्र जाऊ देत नाही तो भगवंताला नामाचं भांडवल तू मिरवत आहेस, असं कसं म्हणेल?
हृदयेंद्र – म्हणजेच होतेच ना अर्थाची खडखड?
कर्मेद्र – मग तू लावलेला अर्थ काय आहे?
हृदयेंद्र – मी काही ठरवून अर्थ लावत नाही.. जसा वाटतोय तसा सांगतो.. पहिल्या तीन चरणांत भक्तीची दृढता सांगितली. तशी दृढता भक्त म्हणवणाऱ्यांनी आपल्या अंतरंगात आहे का, हे तपासावं, हेच या चरणांतून सुनावलं. आता ‘तुजमज सरी होईल या विचारें। जळो भांडखोरें निलाजरीं।। भांडवल माझें मिरविसी जनीं। सहस्त्र वोवणी नाममाळ।।’ या चरणांत अशा स्वयंघोषित भक्तांना तुकाराम महाराज आणखी कडवे बोल सुनावताहेत, असं मला तरी वाटतं.. जो भक्तीचं पाखंड करतो त्याला खऱ्या भक्ताची भीतीच वाटते. ज्यानं भगवंताला अंतरंगात धारण केलं आहे, अशा भक्ताच्या निंदेसाठी ते सरसावतात. तुकाराम महाराजांना मंबाजीचा त्रास झाला तो या प्रतीचा होता. प्रत्येक संताला कथित धर्मधुरीणांकडूनही त्रास झाला आहे. तो का? या भक्ताला भगवंताचीच सर येईल, या विचारानं ते हा उपद्व्याप करीत असतात. त्यासाठी या भक्ताशी भांडण्यापर्यंतचा प्रयत्न ते करतात. अशा निर्लज्ज प्रयत्नांना आग लागो, असं तुकाराम महाराज सांगतात. खरी भक्ती तर हा पाखंडी करीत नाही, पण या भक्तीचं भांडवल मिरवून लोकांमध्ये आपलीच नाममाळ दुमदुमत राहील, असा प्रयत्न करतो.
योगेंद्र – इथे अर्थामध्ये विष्णुसहस्त्रनामाचा उल्लेख आहे.
हृदयेंद्र – उपासनेचं प्रतीक म्हणून तो घेतला पाहिजे. दिखाऊ उपासनेचं भांडवल मिरवत पाखंडी भक्त आपलीच नाममुद्रा कायम राखण्याची धडपड करतात, असा त्याचा अर्थ भासतो.
चैतन्य प्रेम