हिंदू धर्मात वैष्णव भक्तीची सुरुवात साधारणत: भागवत पुराण या इ.स.पू. २५० च्या सुमारास रचलेल्या श्रीकृष्णाचे चरित्र व नवविधा भक्ती सांगणाऱ्या ग्रंथापासून मानता येते. त्यानंतर इ.स.च्या दुसऱ्या शतकात महाभारतात समाविष्ट केलेल्या गीतेने ‘भक्तिमार्ग’ हा ‘ज्ञान, कर्म व ध्यानयोग’ यांच्याप्रमाणेच, पण सर्वसामान्यांना समजेल व जमेल असा मोक्षप्राप्तीचा साधा-सोपा मार्ग आहे, असे सांगितले.
साधारणपणे धार्मिक हिंदू माणसाला असे वाटते की, ब्रह्मा, विष्णू व महेश हे त्यांचे तीन मुख्य देव हे स्वयंभू ईश्वर असल्यामुळे ते हिंदू धर्माच्या सुरुवातीपासून त्यात होते; पण हे खरे नव्हे. ऋग्वेदकालीन वैदिक धर्मात या देवता नव्हत्या आणि आर्याच्या इंद्र, वरुण, अग्नी, वायू अशा ज्या प्रमुख देवता होत्या त्या आज काळाच्या पोटात गडप झालेल्या आहेत. ऋग्वेदात ‘ब्रह्मणस्पती’ अशी स्तोत्रपठणाची एक सामान्य देवता आहे; पण ती देवता आज हिंदू धर्मात ‘सृष्टीचा प्रजापती’ मानलेला प्रमुख स्वयंभू ‘ब्रह्मदेव’ नव्हे. तसेच ऋग्वेदात असलेली विष्णू किंवा वृषाकपी ही देवता, इंद्र व इंद्राणीचा हरकाम्या नोकर आहे. तो अर्थातच आज हिंदू धर्मात सहस्रनामांनी गौरविलेला व दशावतार घेणारा ‘सृष्टीचा पालनकर्ता विष्णू’ नव्हे. त्याचप्रमाणे ऋग्वेदातील रुद्र हा आजच्या हिंदू धर्मातील महादेव, शिवशंकर, महेश नव्हे. ऋग्वेदातील रुद्र ही एक गौण देवता असून यज्ञात इतर देवतांना आहुती देऊन उरलेसुरले रुद्राला अर्पण केले जाई. सारांश असा की, वेदरचना काळात (इ.स.पू. ३००० ते इ.स.पू. १५००) ब्रह्मा, विष्णू, महेश या आजच्या हिंदू धर्मातील प्रमुख देवतांचा कुठेच उल्लेख नसून त्या तीनही ‘नवीन आलेल्या देवता’ आहेत. शिवाय आर्याचे काटेकोर नियमबद्ध यज्ञ म्हणजे काही आजच्यासारखी ‘भक्ती’ नव्हती.
वेदांनंतर रचले गेलेले हिंदू धर्माचे तत्त्वज्ञानविषयक ग्रंथ उपनिषदे (वेदान्त) यांतील प्रमुख उपनिषदांचा रचनाकाळ इ.स.पू. १५०० ते इ.स.पू. १००० हा असावा. ऋग्वेद काळात पुष्कळसा ‘प्रवृत्तीपर’ असलेला वैदिक धर्म या काळात व नंतर बहुश: ‘निवृत्तीपर’ बनलेला आहे. तरीही बृहदारण्यक, छांदोग्य, ऐतरेय इत्यादी सुरुवातीच्या कुठल्याही प्रमुख उपनिषदांमध्ये ‘वैष्णव’ आणि ‘शैव’ ही दर्शने किंवा या भूमिका आलेल्या नाहीत. ‘वैष्णव’ भूमिका अशी आहे की, विष्णू किंवा केशव, माधव इत्यादी हा लक्ष्मीचा पती, जगाचा पालनकर्ता असून तो पाण्यात- क्षीरसागरात शेषशायी नागावर- शयन करतो व प्रलयानंतर त्याच्यापासून सृष्टीची पुनरुत्पत्ती होते. शैव भूमिकेप्रमाणे शिव म्हणजे मंगलमय, कल्याणकारी, स्वयंभू, विश्वनिर्माता हा देवांचा देव महादेव होय. हा तुलनेने सहज प्रसन्न होणारा भोलानाथ, प्रसन्न झाल्यावर सढळ हाताने देणारा, समुद्रमंथनात आलेले विष स्वत: पिऊन जगाला विनाशापासून वाचविणारा, नीलकंठ, महातपस्वी, कैलासावर राहणारा, पार्वतीपती शिवशंकर होय.
बहुधा, इ.स.पू. १३व्या शतकात, पण प्राचीनतम उपनिषदांनंतर केव्हा तरी वेदव्यास, भीष्म, श्रीकृष्ण, पांडव, कौरव इत्यादी पात्रे काळाच्या रंगमंचावर येऊन महाभारत युद्ध प्रत्यक्ष घडून गेले असावे व त्यावर आधारित ‘महाभारत’ या जगातील सर्वात मोठय़ा आदिकाव्याची रचना स्वत: व्यासमुनी व त्यांच्यानंतरच्या एक हजार वर्षांत ‘वैशंपायन’ व ‘सौती’ या प्रतिभावंतांनी केलेली आहे; परंतु आज उपलब्ध असलेले महाभारत हे त्यांच्यानंतरही शेकडो वर्षांत किती तरी अनामिक व अनाहूत लेखकांनी आपापली भर टाकलेले असे आहे.
तसेच आजची अठरा अध्यायांची गीता हा छोटा ग्रंथ ज्याला अनेक हिंदू आपला धर्मग्रंथ मानतात, ती मूळ महाभारतातील स्वत: श्रीकृष्णाने अर्जुनाला केलेला उपदेश आहे असे मानले जाते; पण ते नेमके तसे नसून गीता ही महाभारत युद्धानंतर बारा-पंधराशे वर्षांनंतर केव्हा तरी महाभारत ग्रंथात हुशारीने टाकलेली ‘भर’ आहे, असे संशोधक म्हणतात. याचा एक पुरावा हा की, गीतेची भाषा पाणिनीय व्याकरण अनुसरणारी, तुलनेने आधुनिक भाषा आहे. पाणिनीचा काळ इ.स.पू. ६वे शतक असा असून महाभारत युद्धकाळी तो व त्याची भाषा अस्तित्वातच नव्हती. दुसरा मुद्दा असा की, गीता ग्रंथाची संपूर्ण रचना वैष्णवीय भूमिकेच्या उदयानंतरची व श्रीकृष्णाला विष्णूचा अवतार म्हणजे परमेश्वर गृहीत धरून झालेली आहे असे स्पष्ट दिसते. आता महाभारत युद्ध जरी श्रीकृष्णाच्या जीवनकाळातच घडलेले आहे व तो जीवित असतानाच जरी काही थोडे लोक त्याला परमेश्वर मानीत होते तरी तेव्हा त्याचे परमेश्वरत्व सर्वमान्य झालेले नव्हते. म्हणजे श्रीकृष्णाची ‘विष्णू अवतार’ ही भूमिका तेव्हा सर्वमान्य झालेली नव्हती. म्हणून तर महाभारत युद्ध घडले.
हिंदू धर्मात शैव आणि वैष्णव या भूमिका केव्हापासून स्वीकारल्या गेल्या वा लोकमान्य व सार्वत्रिक झाल्या ते नेमके काही सांगता येत नाही; परंतु वेदकाळात व उपनिषदांच्या सुरुवातीच्या दोन दशकांत तरी त्या नक्की प्रचलित नव्हत्या असे दिसते. मग तोपर्यंत हे विष्णू आणि महेश कुठे होते ते पाहू या. तेव्हा शिवशंकर हा बहुधा वेदपूर्व सिंधू संस्कृतींतील अनार्य किंवा असुरांचा देव असावा असे दिसते, कारण पुष्कळ असुर शिवशंकराला ईश्वर मानीत होते. विष्णू हासुद्धा त्याच असुर संस्कृतींतील ईश्वर असणे शक्य आहे; पण नंतरच्या काळात केव्हा तरी ब्रह्मा, विष्णू, महेश या तिघा ईश्वरांचा वैदिकांच्या देवतामंडलात स्वीकार झाला व ते हिंदू धर्मातील मुख्य देव बनले आणि त्यांनी विश्वव्यवस्थापनाची कामे आपापसात वाटून घेतली. त्यानंतर विष्णुभक्ती व शिवभक्ती हे लोकप्रिय भक्तिमार्ग झाले.
हिंदू धर्मात वैष्णव भक्तीची सुरुवात साधारणत: भागवत पुराण या इ.स.पू. २५० च्या सुमारास रचलेल्या श्रीकृष्णाचे चरित्र व नवविधा भक्ती सांगणाऱ्या ग्रंथापासून मानता येते. त्यानंतर इ.स.च्या दुसऱ्या शतकात महाभारतात समाविष्ट केलेल्या गीतेने ‘भक्तिमार्ग’ हा ‘ज्ञान, कर्म व ध्यानयोग’ यांच्याप्रमाणेच, पण सर्वसामान्यांना समजेल व जमेल असा मोक्षप्राप्तीचा साधा-सोपा मार्ग आहे, असे सांगितले. पुढे इ.स.च्या चवथ्या, पाचव्या शतकांत दक्षिण भारतात शैव व वैष्णव या भक्तिमार्गी पंथांत अनुक्रमे ‘नयनार’ व ‘अळवार’ असे ओळखले जाणारे संत होऊन गेले. त्यांच्यातच पुढे ९व्या शतकात ‘शंकराचार्य’ हे शिवभक्तीच्या नयनार पंथात व इ.स. हजारनंतर विष्णुभक्तीच्या अळवार पंथात ‘रामानुजाचार्य’ हे मोठे विद्वान संत होऊन गेले. जरी शंकराचार्यानी भारतभर अनेक शिव व विष्णू मंदिरांचे जीर्णोद्धार व स्थापना केल्या तरी भारतात भक्तिमार्गाची भक्कम पायाभरणी केली ती रामानुजाचार्यानीच केली असे मानावे लागते, कारण त्यांच्यामुळेच भारतात मध्ययुग भक्तिमार्गमय बनले असे दिसते. पुढे इ.स.च्या पंधराव्या शतकात रामानुजांनी शिकविलेल्या भक्तिमार्गाचा, त्यांच्याच शिष्यपरंपरेतील एक शिष्य रामानंद याने उत्तर भारतात जाऊन प्रसार केला व तिथे विष्णुभक्ती लोकप्रिय केली. पुढे तेथील वैष्णवांत रामभक्ती करणारे व कृष्णभक्ती करणारे (दोघेही विष्णूचेच अवतार असून) असे दोन पंथ पडले. उदाहरणार्थ संत तुलसीदास हे रामभक्त, तर संत सूरदास हे कृष्णभक्त होते. ईश्वर मानवी अवतार घेतो, ही कल्पना जगात फक्त हिंदू धर्मातच आहे. पंधराव्या शतकातील मुसलमान संत कबीर व शीख धर्म संस्थापक गुरुनानक (जे ‘अवतार’ ही संकल्पना मानीत नव्हते) यांच्यावरही रामानंदांचाच प्रभाव होता.
दक्षिण भारतात रामानुजांनंतर तेराव्या शतकारंभी वैष्णव पंथात मध्वाचार्य हे दुसरे मोठे भक्तिमार्गी आचार्य होऊन गेले. खरे तर मुळात ब्रह्मसूत्रांचा भक्तिमार्गाला विरोध होता. तरीही अशा या मोठय़ा भक्तिमार्गी आचार्याच्या व संतांच्या शिकवणुकीमुळे भक्तिमार्गाचा प्रसार होत राहिला व पुढील शतकांमध्ये भक्तिमार्ग भारतभर पसरला. मध्वाचार्याचे वैशिष्टय़ असे की, इतर सर्व पंडित उपनिषदांतील अद्वैत मताची पताका उंचावून धरत असताना मध्वाचार्यानी मात्र द्वैतवाद सांगितला. आत्मा हा परमात्म्याचा अंश नसून तो त्याचे जणू प्रतिबिंब आहे म्हणजे त्या दोहोंत द्वैत आहे असे अद्वैताच्या विरोधी मत त्यांनी ठासून सांगितले व ते त्यांच्या अनुयायांमध्ये प्रचलित आहे. तसे पाहिले तर माणूस ईश्वराची भक्ती करतो म्हणजे तो त्याला वेगळा मानतोच की!
बाराव्या शतकात कर्नाटक व महाराष्ट्राच्या सीमेवर होऊन गेलेल्या महात्मा बसवेश्वरांनी ‘वीरशैव’ हा एकेश्वरी शैव पंथ स्थापन करून ‘ॐ नम: शिवाय’ हा षडाक्षरी मूलमंत्र देऊन शिवभक्ती लोकप्रिय केली. तेराव्या शतकारंभी चक्रधर स्वामींच्या महानुभाव पंथाने महाराष्ट्रात कृष्णभक्ती उचलून धरली. महाराष्ट्रात तेराव्या शतकाच्या अखेरीस ज्ञानेश्वर, त्यांची भावंडे, तसेच नामदेव व पुढील चार-पाच शतकांत एकनाथ तुकारामादी मोठमोठे संत होऊन गेले. त्यांच्या पंथाला ‘वारकरी पंथ’ म्हणतात व तो आज एकविसाव्या शतकातही लोकप्रिय भक्तिमार्गी पंथ आहे. पंढरपूरचा विठोबा हे अवघ्या महाराष्ट्राचे आराध्य दैवत असून तो विठ्ठल हा श्रीकृष्णाचा अवतार आहे व तेच परब्रह्म आहे असा या पंथात विश्वास आहे. अर्थात त्याबरोबरच शिवभक्ती, गणेशभक्ती, दत्तभक्ती (ब्रह्मा, विष्णू, महेश यांचा एकत्रित त्रिमुखी देव) इत्यादी भक्तिमार्गसुद्धा लोकप्रिय आहेतच. एकाच वेळी वेगवेगळ्या रूपांत ईश्वर आहे असे हिंदूंना पटू शकते. तसे हिंदू हे ‘ब्रह्मवादी’ या अर्थी ‘एकेश्वरवादीच’ आहेत; पण ते देवाला अनेक रूपांत पाहतात व दगडाधातूच्या मूर्तीतही प्रतीक रूपाने तो आहे असे ते सोयीसाठी मानतात.