News Flash

व्हिएतनामची कोंडी

चीनच्या दादागिरीसमोर झुकले, तर देशातील राष्ट्रवादी भावना उफाळून येतात. त्यातून चीनच्या नागरिकांविरोधात दंगली सुरू होतात. म्हणजे पुन्हा चीनला दातओठ खाण्यास संधी.

| May 20, 2014 01:06 am

चीनच्या दादागिरीसमोर झुकले, तर देशातील राष्ट्रवादी भावना उफाळून येतात. त्यातून चीनच्या नागरिकांविरोधात दंगली सुरू होतात. म्हणजे पुन्हा चीनला दातओठ खाण्यास संधी. एकीकडे असे त्रांगडे, तर दुसरीकडे या अशा युद्ध, खेळांचे सामने आदींच्या वेळी उफाळून येणाऱ्या राष्ट्रवादी भावनांना गोंजारत बसले, तर त्यातून देशाच्या अर्थव्यवस्थेचेच नुकसान होते. चिनी विस्तारवादाने व्हिएतनामची मोठीच कोंडी केली आहे. अमेरिकेसारख्या बलाढय़ महासत्तेलाही धूळ चारणारा हा चिवट देश. आज त्याची परिस्थिती मोठीच विचित्र झाोली आहे. दक्षिण चिनी समुद्रातील ज्या विशिष्ट क्षेत्रात तेल विहीर खोदण्याचे चीनचे प्रयत्न सुरू आहेत, ते क्षेत्र आपले असल्याचा व्हिएतनामचा दावा आहे. त्याची सत्यता अद्याप ठरायची आहे. त्यासंबंधी हनोई आणि बीजिंगच्या वाटाघाटी, चर्चा वगरे गोष्टी झाल्या. त्यातून काहीही साध्य झाले नाही. त्यानंतर या दोन्ही देशांमध्ये भरसमुद्रात एकमेकांना दात विचकून दाखविण्याचे प्रयोग झाले. चीनच्या तेलशोधक फलाटाभोवतीच्या तीन मल परिसरात चीनने तटबंदी केली आहे. व्हिएतनामी जहाजे अधूनमधून तेथे घुसतात. एकमेकांच्या जहाजांवर, नौकांवर पाण्याचे जोरदार फवारे मारतात. मग दोघेही एकमेकांवर दादागिरीचे आरोप करतात.  चीन आणि व्हिएतनाम हे दोन्ही साम्यवादी देश. व्हिएतनाममधील जनतेने तर केवळ या विचारसरणीसाठी नाप्लाम वगरे बॉम्ब झेलले आहेत. पण तरीही आज भूराजकारणाच्या जागतिक पटावर व्हिएतनामला अमेरिका जवळची वाटते आणि चीन शत्रूवत. काहीसे भारत-चीन संबंधांसारखेच हे. भारतीय जनता १९६२ मधला पराभव विसरू शकत नाही. चीनने १९७४ मध्ये केलेला पराभव व्हिएतनामच्या जिव्हारी लागलेला आहे. सध्याच्या संघर्षांला त्याची किनार आहेच. असे असले तरी चीन आणि व्हिएतनाम यांत पन्नास बिलियन डॉलरचे व्यापारी संबंध आहेत. चीनमधील मजुरीदर वाढल्यामुळे तेथील अनेक उद्योजक आणि व्यापाऱ्यांनी व्हिएतनामकडे नजर वळविली. येथे कुशल-अकुशल मजूर स्वस्तात उपलब्ध. आज व्हिएतनाममधील २०० औद्योगिक क्षेत्रांमध्ये सुमारे १०० बिलियन डॉलरची थेट परकी गुंतवणूक आहे. या अर्थकारणाला धक्का लागणे व्हिएतनामला परवडणारे नाही. त्यामुळे देशातील चिनी उद्योग आणि नागरिकांविरोधातील दंगली काबूत आणणे हे व्हिएतनामी सरकारसाठी राष्ट्रवादी भावनांना गोंजारण्याहून महत्त्वाचे काम होते. ते त्यांनी केले. रॉयटर्सच्या वृत्तानुसार व्हिएतनाम-सिंगापूर औद्योगिक क्षेत्रातील ८० टक्के कारखाने दंगलीमुळे बंद पडले होते. ते पुन्हा सुरू झाले आहेत, पण आता चीनने याचा फायदा उठविणे सुरू केल्याचे दिसते. दंगलग्रस्त चिनी नागरिकांना आणण्यासाठी चीनने खास विमाने पाठविली, जहाजे धाडली. प्रचारयुद्धात चीन याचा पुरेपूर उपयोग करून घेणार हे नक्की. कोणाच्याही ठोस पािठब्याशिवाय उभ्या असलेल्या व्हिएतनामची याबाबतीतही कोंडी झाली आहे. चिनी नागरिकांवर व्हिएतनाममध्ये कसे आणि किती अत्याचार होत आहेत, याच्या कहाण्या आताच प्रसिद्ध होऊ लागल्या आहेत. या अशा प्रोपागंडाचे मूल्य किती असते, ते व्हिएतनामइतके कोणास माहीत असणार? त्यामुळे होता होईल तितकी लवकर ही दंगल शमावी यासाठी त्यांचे प्रयत्न सुरू असल्याचे दिसते. हा वाद अर्थातच एवढय़ात आटोक्यात येणार नाही, पण या निमित्ताने पुन्हा एकदा साम्यवादी विचारांचा एक छोटासा पराभव तेवढा समोर आला. आपल्या स्वार्थाचे असेल तेव्हा या विचारसरणीत राष्ट्रवादाची भेसळही चालू शकते, हे मागे जपानविरोधातील संघर्षांत चीनने दाखवून दिले होते. आता व्हिएतनाममध्ये तेच घडत आहे. जगातील कामगारांनो एक व्हा म्हणणारे एकमेकांविरोधात दंगली करीत आहेत. ही व्हिएतनामइतकीच साम्यवादाचीही कोंडी म्हणावे लागेल.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on May 20, 2014 1:06 am

Web Title: dilemma of vietnam
Next Stories
1 वरदहस्त: कोणाचा? कोणाला?
2 विहंगमनाचा माणूस..
3 मनमौजी
Just Now!
X