आपल्याकडे पूर्वी सगळेच होते. फांद्याफांद्यांवर सोन्याच्या चिमण्या होत्या. घराघरांतून सोन्याचा धूर निघत होता. रस्त्यांतून कार धावत होत्या. त्यांना अनश्व रथ म्हणत. आकाशातून पुष्पक विमानांची जा-ये होती. आकाशवाणी होतच असे. पण दूरचित्रवाणीही होती. त्याशिवाय का धृतराष्ट्रास संजयाने युद्धाचे धावते वर्णन ऐकविले? शून्याचा शोध भारतीयांनी लावला हे खरेच. आयुर्वेद वगरे तर आहेच. पण त्याहीपुढे आपण प्रगती केली होती. मूळपेशींच्या संशोधनाचे श्रेय आज पाश्चात्त्य घेत आहेत. पण मूळपेशी संशोधन, झालेच तर टेस्ट टय़ूब बेबी हे आपलेच. त्याचा पुरावा पुन्हा महाभारतातच आढळतो. गांधारीचे शंभर पुत्र हे या संशोधनाचेच फलित. एड्सवरील उपचारसुद्धा आपल्या प्राचीन ग्रंथांत दिलेले आहेत. गणपती ही तर संगणकाची देवता. गणपतीपुढे माऊस असतो हा त्याचा रोकडा पुरावा. एकंदर काय, तर हजारो वर्षांपूर्वी, जेव्हा सगळे पाश्चात्त्य अजून बर्बरावस्थेतच होते, तेव्हा आपण कितीतरी प्रगत होतो. पण पाश्चात्त्य संस्कारांच्या इंद्रजालात सापडून आपण ते विसरलो. पण आता आपले डोळे उघडले आहेत. थोर इतिहास संशोधक आणि शिक्षणतज्ज्ञ दीनानाथ बात्राजी यांच्यामुळे आज गुजरातेतील ४२ हजार प्राथमिक आणि माध्यमिक शाळांत शिकणारी मुले खऱ्याखुऱ्या ज्ञानगंगेत न्हाऊन निघणार आहेत. भारतीय संस्कृती, ज्ञान, मूल्ये यांचा परिचय होऊन ही मुले तेजोमय होणार आहेत. आज या शैक्षणिक क्रांतीची प्रयोगशाळा म्हणून गुजरातची निवड झाली आहे. खुद्द मुख्यमंत्री आनंदीबेन या प्रयोगाच्या सूत्रधार असून, त्यांनी बात्राजी यांची नऊ क्रांतिकारी पुस्तके शालेय अभ्यासक्रमात सक्तीचे वाचन म्हणून लावली आहेत. हे बात्राजी म्हणजे रा. स्व. संघाशी निगडित असलेल्या शिक्षा बचाओ आंदोलन समितीचे संस्थापक. मुरलीमनोहर जोशी केंद्रीय मानव संसाधनमंत्री असताना ते एनसीईआरटीचे सदस्य होते. त्यामुळे देशातील शालेय पाठय़पुस्तके तद्दन टाकाऊ असल्याच्या मतास आपोआपच वजन प्राप्त होते. विद्यार्थ्यांनी वाढदिवशी केक खाऊ नये, त्याऐवजी गोमातेस चारा भरवावा, गायत्रीमंत्र म्हणावेत, असे त्यांचे मत आहे. त्यामागे अर्थातच केक खाऊन दात खराब होतात, हे विज्ञान आहे. त्यात नतिक मूल्यसुद्धा आहे. इतिहासाबद्दल सांगायचे, तर अखंड िहदुस्थान हे बात्राजींचे स्वप्न. पण एका झटक्यात ते कसे पूर्ण होणार? हळूहळू करता येईल. देशाच्या शैक्षणिक आराखडय़ात बदल करण्यात येणार नाहीत, असे मानव संसाधनमंत्री स्मृती इराणी यांनी राज्यसभेत जाहीर केले असले तरी त्यांनी बात्रा यांना मात्र सगळ्या अभ्यासक्रमांत बदल करण्याचे आश्वासन दिलेले आहे. ते हळूहळू पूर्ण होईल. ताबडतोब सगळ्या पाठय़पुस्तकांचा लगदा करण्यास खर्च खूप येईल. तेव्हा तूर्तास ती तशीच ठेवून, बात्राजींची पुस्तके पूरक वाचन म्हणून लावण्यात आली आहेत. गुजरातमध्ये त्यास यश आले की हे प्रारूप देशभरात राबविता येईल. ते झाले की मुलांची मने भारतगौरवाने भरून जातील. सगळेच आपल्याकडे होते, म्हटल्यावर आता आणखी काही संशोधने करण्यात वेळ का वाया घालवा असे म्हणून ही मुले इतिहासासारख्या विषयांच्या अभ्यासाकडे वळतील. त्याने भारतीय इतिहासास आणखी झळाळी येईल. इतिहासतज्ज्ञ वाय सुदर्शन राव यांनी नुकत्याच जातीवरच्या ओव्या गायल्या. आता बात्राजी भारतगौरवाचे पोवाडे गात आहेत. एकंदर देश एका नव्या क्रांतीकडे चालला आहे. तिकडे ख्रिस्ती मंडळी इंटेलिजन्स डिझाइन, सायंटॉलॉजीत रमली आहे. मुस्लिमांचीही कुराणानंतर या धरणीवर नवे ज्ञान आलेच नाही यावर श्रद्धा आहेच. या सगळ्यांचीच पाठय़पुस्तके केली तर? संपूर्ण जगात केवढी क्रांती होईल!