दिशा कळली तर हा निकाल स्पष्टच दिसतो आहे..
‘या निकालाने राजकारणाची दिशा कळेल’ हे पत्र (लोकमानस, २५ एप्रिल) वाचले. पत्रलेखकाने दिलेला पाठिंबा कौतुकास्पद आहेच आणि राजकारणात साधनशुचिता बाळगणाऱ्या जनांनी यावे या त्यांच्या मताशी असहमती असण्याचे कारण नाही. ‘परंतु मेधाताईंना अपयश आले तर मात्र निवडणुका या केवळ आणि केवळ पसा, साम, दाम, जात-पात, झुंडशाही, दबावतंत्र, प्रसारमाध्यमात जाहिरातींचा महापूर यांच्या जोरावर जिंकल्या जातात आणि तुमच्या सामाजिक कामाला निवडणुकांच्या राजकारणात ‘शून्य किंमत’ असते, हा नकारात्मक संदेश जाण्याचा धोका संभवतो.’ हे वाक्य मात्र पटले नाही. याची तीन कारणे सांगता येतील.
सर्वात महत्त्वाचे कारण म्हणजे नरेंद्र मोदींच्या नावाने मतांचा जोगवा मागणाऱ्या भाजपला मुलुंड/ घाटकोपरमधल्या गुजराती बांधवांचा पाठिंबा मिळू शकतो तो त्यांच्या (आंधळ्या?) मोदीप्रेमामुळे. यात मुख्यत: भाबडे आणि भावनिक राजकारण आहे आणि सध्या तरी इतर घटक त्यात फार परिणामकारक नाहीत. दुसरे म्हणजे मेधाताई ज्या पक्षाचे प्रतिनिधित्व करतात त्याची विश्वासार्हता आता किती, हाही लाखमोलाचा प्रश्न म्हणावा. त्याबाबत उदंड ऊहापोह झालेला आहेच. आणि सर्वात महत्त्वाचे म्हणजे, मेधाताईंचा एकंदरित जो आíथक विचार आणि सुधारणांबद्दल दृष्टिकोण आहे त्याला समाजातल्या उच्च तसेच मध्यम आणि कनिष्ठ  मध्यमवर्गाचा असा कितपत पाठिंबा आहे? मेधाताईंच्या योगदानाबद्दल शंका नाही. गरिबांची बाजू घेऊन जर कोणी लढणार असेल तर त्याला नि:संशय पाठिंबा मिळायला हवा हे खरे आहे. मात्र अगदी नजीकच्या काळात त्यांनी ‘लोकसत्ता’ला दिलेल्या मुलाखतीत- ‘एक्स्प्रेस हायवे’ गडकरींनी लोकांच्या हितासाठी राबवला की स्वत:च्या, असा प्रश्न उपस्थित केला आणि वर २० मिनिटे वाचविण्यासाठी एक्स्प्रेस हायवे बांधला अशीही पुस्ती त्यांनी जोडली.. हे विधान चुकीचे होतेच. शिवाय द्रुतमार्ग काय फक्त उच्चभ्रूंसाठी बांधला गेला का? ज्या कनिष्ठवर्गीय मोटारचालकाला, ट्रकवाल्यांना घाटात पूर्वी आठ-नऊ तास अडकून पडावे लागायचे त्याच्या शारीरिक, मानसिक कष्टांत झालेला बदल त्यांना दिसलाच नाही का? ‘मेधाताई या सुधारणाविरोधी आहेत’ या मताला उदंड लोकाश्रय मिळावा ही गोष्टच पुरेशी हानिकारक. त्यामुळे त्यांच्या विरोधात जाणारी मते ही वर उल्लेखिलेलेल्या रोगांमुळे म्हणणे हे निकालाचा सोयीस्कर अर्थ काढल्यासारखे होईल. जनादेशाचा हा अवमान नाही का?
सौरभ गणपत्ये, ठाणे.

पुतनामावशीचे वंशज इथे कमावतात, तिथे नाही!
भारतात तयार झालेला हापूस आंबा तसेच पडवळ, वांगी, कारली यांसारख्या फळभाज्यांच्या आयातीला युरोपीय संघाने बंदी घातल्याची बातमी (लोकसत्ता, २९ एप्रिल) वाचली. कीटकनाशकांच्या फवारणीचा अतिरेक हे या बंदीचे कारण दिले गेले आहे. आपल्या देशात अशीच घातक रसायनांची प्रक्रिया करून आंबा वा अन्य फळे कृत्रिमपणे पिकवून त्याला लवकर बाजारात आणून भरपूर नफा कमाविण्याचे मार्ग राजरोस अवलंबिले जातात हेही सर्वाना ठावूक आहे. दूध, खवा, मावा यांमध्ये बारमाही भेसळ केली जाते हेही सिद्ध झालेले आहे. हे सर्व प्रकार ग्राहकाच्या आरोग्याला अत्यंत घातक आहेत, याविषयी अनेक शोधलेख प्रसिद्ध झालेले आहेत. या सर्व देश-घातकी व्यापारी घडामोडींचा परामर्श युरोपीय बाजारपेठेने निश्चित घेतला असेल. जी व्यापारी जमात स्वत:च्या फायद्यासाठी स्वकीयांच्या जिवावर उठू शकते, ती परदेशी लोकांबद्दल काय पर्वा करणार, याची खात्री त्या देशांनाही पटली असावी.
युरोपीय वा अन्य पाश्चात्त्य देश / औषधे यांत भेसळ होता कामा नये, याबाबत अत्यंत जागरूक असतात. त्यांच्या देशाच्या नागरिकांच्या आरोग्याची व हिताची काळजी घेणे हे स्वत:चे कर्तव्य आहे, याची त्यांच्या सरकारला जाणीव आहे. तर भेसळ, लबाडी, खोटेपणा ही भारतीय व्यापाऱ्यांची संस्कृती आहे. त्यावर नियंत्रण ठेवण्यासाठी सरकारी यंत्रणा, महानगरपालिकांची यंत्रणा तनात आहेत. पण त्यांची काही ‘मजबुरी’ आहे. शिवाय ‘एकमेका साह्य करू, अवघे धरू वामपंथ’ या तत्त्वज्ञानाने ते भारले गेले आहेत.
याचा परिपाक म्हणजे या पुतनामावशीच्या वंशजांनी विक्रीसाठी आणलेली भेसळयुक्त फळे, कीटकनाशकयुक्त भाज्या, घातक रसायने मिसळलेले विषारी दूध व दुधाचे पदार्थ आपण मुर्दाडासारखे खात आहोत आणि ‘देवाच्या कृपेने भारतात सारे काही आलबेल आहे’ अशी आपल्या मायबाप सरकारची कल्पना आहे! युरोपीय बाजारपेठ ही इतकी दुधखुळी, लाचार, अगतिक आणि गरजवंत नसल्यामुळे या निर्ढावलेल्या निर्यातदारांना त्यांनी ‘करावे तसे भरावे’ हा धडा शिकवला आहे. यात आपल्या गरीब शेतकऱ्याचे नुकसान निश्चितच आहे पण त्याला जबाबदार आपणच आहोत.                                          
अनिल रेगे, अंधेरी (मुंबई)

काळाने उगवलेला सूड?
‘एक प्रख्यात अर्थतज्ज्ञ, एक नोबेल मानकरी’ (लोकमानस, २९ एप्रिल) या प्रकाश बाळ यांच्या पत्रात डॉ. अमर्त्य सेन आणि डॉ. जगदीश भगवती यांच्या कार्याची तसेच विचारातील फरकाची यथोचित ओळख करून दिली आहे. कोणे एके काळी जेव्हा जागतिकीकरण येऊ घातले होते तेव्हा ऑर्थर डंकेल आणि त्याचा मसुदा (ड्राफ्ट) तयार करण्यात त्यांचे सेक्रेटरी म्हणून भगवती यांनीच काम केलेले होते. या कामामुळे त्यांचा नोबेल पुरस्कारासाठीदेखील विचार झालेला होता. ज्या आर्थिक सुधारणा नरसिंह राव यांच्याबरोबर मनमोहन सिंग यांनी राबविल्या त्याचे उद्गाते भगवतीच होते हे आठवल्यावर गंमत वाटते. आता तेच भगवती, मोदी आणि शक्य झाल्यास भाजपला मार्गदर्शन करतील. त्या काळात स्वदेशी जागरण मंच अशी एक संघ विचारप्रणीत संघटना याच आíथक सुधारणांना कडाडून विरोध करीत होती, याचा याचा मोदी आणि भाजपला विसर पडलेला दिसतो. हा काळाने दीनदयाळ उपाध्याय (ज्यांचे आर्थिक विचार महात्मा गांधीशी जुळतात) आणि त्या संघ विचारसरणीवर उगवलेला सूडच आहे. मुक्त  बाजारपेठेत सर्वाना संधीची समानता मिळवून देणे आवश्यक ठरते, अर्थात भारतासारख्या देशात ते अशक्य नाही पण खूपच अवघड कार्य आहे. तसेच गरिबांना, सबसिडीद्वारे मदत अत्यावश्यक ठरते. जे स्पध्रेसाठी सक्षम नाही त्यांना आधी सक्षम करून मग मुक्त स्पध्रेसाठी पाठवणे अपेक्षित आहे. अन्यथा बळी तो कान पिळी. दुर्दैवाने डावी विचारसरणी नामशेष झाल्याने तसेच दीनदयाळ उपाध्याय यांचा विसर पडत चालल्याने भांडवलशाहीच्या मुक्त उधळत चाललेल्या वारूला कोण थांबविणार?
शिशिर सिंदेकर, नासिक.

धर्म :- मानवता,
जात :- भारतीय
‘भारतीय नागरिक एक धर्म सोडून दुसरा स्वीकारू शकतो, परंतु कुठलाही धर्म न स्वीकारण्याचे स्वातंत्र्य त्यास आहे का?’ असा प्रश्न  दिलीप गुमते यांच्या पत्रात (लोकमानस, २८ एप्रिल) आहे. असे धार्मिक स्वातंत्र्य निश्चितच आहे. प्रत्येक नागरिकाला कोणत्याही धर्माचे पालन करण्याचे अथवा कोणत्याच धर्माचे पालन न करण्याचे, स्वातंत्र्य आपल्या संविधानानुसार आहेच.
सर्व धर्म नाकारून, ईश्वर अस्तित्वात नाही हे वैज्ञानिक सत्य स्वीकारून अनेकजण सुख-समाधानाचे, सौहार्दाचे, परस्पर सामंजस्याचे जीवन आनंदाने जगत असतात. जीवनात सुख-दु:खाचे प्रसंग सर्वावर येतात. आस्तिकांपेक्षा नास्तिकांवर अधिक संकटे येतात असा अनुभव मुळीच नाही. ‘देव दीनाघरी धावला’ हे केवळ पुराण कथांत घडते. प्रत्यक्षात नाही. ती एक आशावती श्रद्धा आहे. वास्तव नव्हे. तसेच कोणत्याही अर्जात ‘धर्म :- मानवता, जात :- भारतीय’ असे लिहावे. त्याला कोणी आक्षेप घेऊ शकत नाही (आरक्षणाच्या संदर्भात समस्या संभवते. परंतु आरक्षणाचा संबंध पूर्वजांच्या जाती-धर्माशी असल्याने तिचे निराकरण होऊ शकते.).
प्रा. य. ना. वालावलकर

सेन यांनीही सरकारला खूश केले!
मोदींचे सरकार आल्यास आपली किंवा आपल्या सहकार्याची वर्णी आíथक सल्लागार म्हणून लागेल, असे म्हटल्याने प्रख्यात अर्थतज्ज्ञ भगवती हे ‘गुडघ्याला बािशग बांधून बसले’ आहेत; पण अमर्त्य सेन यांनी असे न केल्याने ते मोठे ठरतात असे प्रकाश बाळ यांनी (लोकमानस, २९ एप्रिल) म्हटले आहे, पण मोदींवर फक्त आíथक धोरणांवर नव्हे तर इतर बाबतींत जहरी टीका निवडणुकीच्या तोंडावर करून अमर्त्य सेन यांनी विद्यमान सरकारला खूश केले हे प्रकाश बाळ सोयीस्कररीत्या विसरले आहेत.
श्रीराम बापट, दादर, मुंबई.