कोणत्याही पराजयानंतर त्याला कोण कारणीभूत झाले, हे ठरवण्यासाठी जसे आरोप-प्रत्यारोप सुरू होतात, तसेच ते भारतीय जनता पक्षातही सुरू आहेत. कोणत्याच पातळीवर हा पक्ष इतरांपेक्षा वेगळा नसल्याचे यामुळे पुन्हा एकवार सिद्ध झाले एवढेच. कर्नाटकातील सत्ता आपल्याच नाकर्तेपणाने गेली, असा आरोप करताना पंतप्रधानपदाचे तहहयात दावेदार लालकृष्ण अडवाणी यांनी स्वकीयांवरच तोफ डागली आहे. भाजपच्या राजवटीत त्या वेळचे मुख्यमंत्री येडियुरप्पा भ्रष्टाचारात सापडल्यानंतर पक्षनेतृत्वाने लगेचच पावले उचलली असती, तर कदाचित परिस्थिती बदलली असती, असे अडवाणी यांचे म्हणणे आहे. हे प्रकरण हाताळताना भाजपच्या त्या वेळच्या नेतृत्वाने संधिसाधूपणा केला, असा त्यांचा आरोप आहे. येडीयुरप्पा यांना पाठीशी घालून पक्षनेतृत्वाने कर्नाटकातील जनतेचा विश्वास गमावला, असा त्यांच्या म्हणण्याचा मथितार्थ. कर्नाटकात सत्तर जागा गमावणाऱ्या भाजपला येडियुरप्पांनी धूळ चारली, असे जे वक्तव्य सध्या केले जाते ते किती बालिश आहे, हे त्यांच्या केजेपी या पक्षाला मिळालेल्या सहा जागांवरून स्पष्ट होते. लिंगायत समाजात अतिशय प्रभाव असल्याचा जो आव ते आणीत होते व त्या आधारे भाजपच्या नेतृत्वाला धमकावत होते, तो प्रभाव त्यांच्या नेतृत्वाखालील पक्षातही दिसायला हवा होता. परंतु अडवाणी यांच्याही हे लक्षात आले नाही. येडियुरप्पा यांच्या गच्छंतीमुळे भाजपला हार पत्करावी लागली, अशी जी कुजबुज भाजपमध्ये सुरू आहे, त्याला उत्तर देण्यासाठी अडवाणी यांनी ब्लॉग लिहून आपल्या मनातली तडफड जाहीर करून टाकली. अडवाणी यांना त्यांच्या पक्षातही कुणी विचारत नाही आणि पक्षाबाहेरील नेत्यांना त्यांचे महत्त्व वाटत नाही. अडवाणींना निदान ब्लॉगलेखनाचा तरी आधार आहे. परंतु ज्यांच्या अध्यक्षीय कारकिर्दीत कर्नाटकातील सारे रामायण घडले, ते माजी अध्यक्ष नितीन गडकरी तर
ब्लॉगच्याही फंदात पडलेले दिसत नाहीत. कर्नाटकातील पराभवानंतर त्यांनी चकार शब्द काढलेला नाही. अध्यक्षीय कारकीर्द संपुष्टात आल्यानंतर भाजपनेही त्यांना खिजगणतीत धरायचे नाही, असे ठरवले असावे. कर्नाटकातील भाजपची सत्ता टिकवून ठेवण्यासाठी आवश्यक असणारे राजकीय शहाणपण फक्त आपल्यापाशीच आहे, असा सूर अडवाणी यांच्या ब्लॉगलेखनात आहे. तेथील खाणमाफियांना अभय देणाऱ्या भाजपच्याच नेत्या सुषमा स्वराज यांच्यावर टिपण्णी करण्याचे टाळून अन्य नेत्यांच्या नावाने खडे फोडण्यापेक्षा अडवाणी यांनी स्वस्थचित्त राहणे अधिक योग्य अशीच पक्षातील अनेकांची अपेक्षा दिसते. आपण काळाबरोबर राहू शकत नाही आणि केवळ अनुभवाचे शहाणपण नव्या राजकीय परिस्थितीत पुरेसे नाही, याची जाणीव अडवाणी यांच्या लेखनात दिसत नाही. त्यामुळेच ब्लॉग वाचताना ते अरण्यरुदन आहे, असे जाणवत राहते. अडवाणी आणि गडकरी या दोघांचीही पक्षातील अवस्था सारखीच असल्याने त्यांना कुणी फारसे गांभीर्याने घेत नाही. गडकरी यांना म्हणूनच कर्नाटकातील घडामोडींवर भाष्य करण्याची आवश्यकता वाटली नाही. अशा विकल अवस्थेत पुढील वर्षी होऊ घातलेल्या लोकसभेच्या निवडणुकीत भाजपला सत्ता हस्तगत करण्याची दिवास्वप्ने पडू लागली आहेत. अशा परिस्थितीत ‘तरीही मी तुम्हाला सांगत होतो’ असे पालुपद आळवणाऱ्यांना कोणते स्थान असेल, हे वेगळे सांगायला नको. भाजपचा ठेवणीतील मोदी रागही कर्नाटकात फारसे यश मिळवू शकला नाही. काम करणाऱ्यांपेक्षा सल्ला देणारेच जास्त, अशी भाजपची अवस्था होण्यापूर्वीच काही हालचाल केली नाही, तर आणखी बिकट होऊ शकते.