प्रवाशांचे हाल कमी करण्याकडे उपनगरी रेल्वे प्रशासनाने गांभीर्याने लक्ष न दिल्याने दिवा स्थानकावर असंतोषाचा भडका उडाला.  हे लोण सर्वत्र पसरू नये, यासाठी तातडीने पावले उचलली गेली पाहिजेत.

अखेर मुंबईच्या उपनगरी प्रवाशांच्या संतापाचा उद्रेक झालाच. कधीतरी हे होणारच होते. मरतुकडय़ा गतीने वर्षांनुवर्षे धावणाऱ्या मध्य रेल्वेने प्रवाशांच्या सहनशीलतेचा अंत पाहण्याचा जणू चंगच बांधला होता. गेल्या काही महिन्यांत एक दिवसदेखील विनाव्यत्यय प्रवासाचा अनुभव प्रवाशांना मिळालेला नसताना, रेल्वे प्रशासन मात्र, तकलादू सुधारणांचा कांगावा करीत स्वत:चीच टिमकी वाजविण्यात गर्क होते. प्रवाशांना सुविधा देण्याच्या नाटकी आविर्भावात गेल्या काही दिवसांपासून उपनगरी रेल्वेत जे काही सुरू होते, त्याने मुंबईच्या रेल्वे प्रवाशांची जीवघेणी कसरत कवडीनेदेखील कमी होणार नाही, हे माहीत असूनसुद्धा जखमेवर फुंकर मारल्याचा आव आणला जात होता. हे सारे कुचकामी आहे आणि उपनगरी रेल्वेचा रोजचा प्रवास विनाव्यत्यय व्हावा एवढी किमान अपेक्षादेखील पूर्ण होत नाही, ही मुंबईकरांची खंत आहे. मुळातच असुरक्षित आणि बेभरवशी दिवस ढकलणाऱ्या प्रवाशाला हाल सहन करण्याची शक्ती देता येत नसेल तर त्यांचे हाल कमी करणे हाच उपाय असतो. उपनगरी रेल्वे प्रशासनाने याचा कधी विचार केला असावा असे दिसत नसल्याने दिवा स्थानकावर असंतोषाचा भडका उडाला. याआधीही अनेकदा रेल्वे समस्यांची केवळ उपेक्षाच झाली. कुणी फलाटाची उंची मोजली, कुणी फलाट आणि गाडीमधील मोकळ्या जागेत घुसून फोटो काढून घेतले, तर कुणी सिग्नलच्या खांबांवर चढण्याचा पराक्रम केला. रेल्वेच्या सगळ्या समस्या मात्र जिथल्या तिथेच राहिल्या. त्या साऱ्या निराशाजनक अनुभवांचाच हा उद्रेक मानला पाहिजे. गेल्या निवडणुकीत मुंबई महानगरीने प्रस्थापितांना झिडकारले. रेल्वे प्रवाशांच्या अपेक्षांची पालखी आता स्वत:च्या खांद्यावर मिरविणारे जेव्हा सत्ता उपभोगत होते, तेव्हा मात्र या समस्यांना वाली नव्हता. दिवा स्थानकावरील आंदोलन आणि राजकारणात अडकलेल्या समस्या यांचा मेळ या निमित्ताने घातला जायला हवा. केंद्रीय रेल्वेमंत्री सुरेश प्रभू यांचा राजकीय प्रवास, कोकणात भाजप रुजविण्याची त्यांच्या खांद्यावरील जबाबदारी आणि ठाण्यातील शिवसेनेचे प्राबल्य अशा राजकारणाचे कंगोरेदेखील दिवा स्थानकावर उमटलेल्या संतापाला कदाचित असू शकतात. त्याच स्थानकावर हे आंदोलन का भडकले यावर कदाचित उलटसुलट चर्चादेखील सुरू राहतील.
पण सामान्य प्रवाशाला त्याच्याशी देणेघेणे नाही. त्याच्या दीर्घकाळ खदखदणाऱ्या संतापाला या आंदोलनाने वाट करून दिली, एवढेच त्याच्या दृष्टीने महत्त्वाचे आहे. या गाडीतील चौथी सीट हा मुंबईकराच्या माणुसकीचा हळवा कोपरा होऊन राहिला आहे. याच उपनगरी प्रवासाने मुंबईकराला सहनशीलताही शिकविली. कदाचित याच सहनशीलतेला गृहीत धरूनच रेल्वे प्रशासन आपल्या कारभाराच्या गतीनेच रेल्वेगाडय़ा हाकत राहिले. रेल्वेची ही बेशिस्तदेखील मुंबईकरांच्या एवढी अंगवळणी पडली आहे, की गाडय़ा धावत आहेत म्हणजेच सुरळीत सुरू आहेत असे मानण्याचीच प्रथा पडली. वेळापत्रकानुसार प्रवाशांची नेआण करण्याची जबाबदारी न पाळणाऱ्या उपनगरी रेल्वेला जाब विचारण्याची हिंमत मात्र सामान्य प्रवासी कायमची हरवून बसला आहे. त्यामुळेच ‘चलता है’ प्रवृत्तीने, प्रवाशांना वेठीला धरतच उपनगरी रेल्वे धावत राहिली. मुंबई ही घडय़ाळाच्या काटय़ावर धावणारी महानगरी आहे आणि ठाण्याच्या पलीकडे मध्य रेल्वेची उपनगरी स्थानके सर्वाधिक आहेत, तेथील प्रवासी संख्या वाढते आहे, याचे भान रेल्वे प्रशासनाने कधीचेच गुंडाळून ठेवले आहे. एकदा रेल्वेच्या डब्यात कोंबून घेतले की तो प्रवासी पुरता रेल्वेच्या अधीन होतो आणि रेल्वे नेईल तेव्हाच ठरलेल्या ठिकाणी पोहोचतो. ही मुंबईच्या उपनगरी प्रवाशाची खंत आहे. याच अगतिकतेवर जणू मीठ चोळत मध्य रेल्वेने गोंधळाचा ताजा विक्रम सुरू केला. यंत्रणांमधील बिघाडांच्या मालिका सुरू झाल्या, तांत्रिक बेदरकारीचा फटका सातत्याने प्रवाशांना बसू लागला, तरीही ढिम्मपणाचे पांघरूण घेऊन झोपा काढणाऱ्या रेल्वेने अखेर सहनशीलतेलाच आव्हान दिले. मध्य रेल्वेच्या दिवा स्थानकावरील प्रवाशांच्या संतापाचा उद्रेक, त्यातून उभे राहिलेले आंदोलन आणि उमटलेल्या हिंसक प्रतिक्रिया हे या आव्हानावरील प्रत्युत्तर आहे.

मुंबईची उपनगरी रेल्वे ही अत्यावश्यक सेवा आहे. ही रेल्वेसेवा विस्कळीत झाली, तर त्याचा फटका मुंबईच्या संपूर्ण दैनंदिन व्यवहाराला बसतो आणि या महानगरीच्या आर्थिक चक्राची गती थंडावते. त्याचा फटका देशाच्या अर्थव्यवहारालाही बसतो, हे वास्तव रेल्वे प्रशासनाने फारसे मनावर घेतलेले नाही. तसे नसते, तर मुंबईच्या उपनगरी रेल्वे प्रशासनाने वेळापत्रकाचे महत्त्वही जपले असते. त्या जाणिवांनी तरी उपनगरी रेल्वेसेवेत सुधारणा होत गेल्या असत्या. सध्या मुंबईच्या उपनगरी रेल्वेमध्ये सुधारणांचा मोठा गवगवा सुरू आहे. मोबाइलवरून प्रवासाचे तिकीट काढण्याच्या योजनेचा एक जंगी कार्यक्रम याच आठवडय़ात रेल्वेमंत्री सुरेश प्रभू यांनी मुंबईत पार पाडला. रेल्वे प्रशासनाने त्याचा मनसोक्त डांगोराही पिटविला. रेल्वेच्या प्रवासात दररोज पिचून जाणाऱ्या मुंबईकरांच्या हलाखीत या सुधारणेमुळे कोणताही बदल होणार नाही, हे माहीत असूनही मुंबईकरांनी या योजनेचे यथाशक्ति स्वागत केले. कारण उपनगरी रेल्वे हीच आपली जीवनवाहिनी आहे, याची त्याला अगतिक जाणीव आहे. उपनगरी प्रवाशाच्या या अगतिकतेशी सुरू असलेला खेळ नव्या वर्षांच्या पहिल्याच आठवडय़ात रेल्वे प्रशासनाच्या अंगाशी आला आहे. तब्बल सात तास वाहतूक रोखून धरणारा तीव्र संताप आटोक्यात आणण्यासाठीही रेल्वे प्रशासनाला बळाचाच वापर करावा लागला. एका तांत्रिक बिघाडामुळे प्रवाशांना कोणतीही पूर्वसूचना न देता वेठीस धरणाऱ्या प्रशासनाचा गाडा रुळावर आणण्यासाठी अखेर प्रवाशावरच लाठय़ा उगारल्या गेल्या. हा प्रकार दुर्दैवी असल्याची प्रतिक्रिया रेल्वेमंत्री सुरेश प्रभू यांनी व्यक्त केली आहे. पण तेवढे पुरेसे नाही. मुंबईच्या उपनगरी प्रवाशांना हलाखीतून मुक्ती हवी आहे. वातानुकूलित उपनगरी गाडय़ा, स्वयंचलित दरवाजे आणि गुजरातेकडे धावणारी बुलेट ट्रेन अशा स्वप्नांनी त्याचा दैनंदिन प्रवास सुकर होणार नाही. मुंबईच्या उपनगरी रेल्वेच्या समस्या सोडविण्यासाठी युद्धपातळीवर उपाययोजना केल्या पाहिजेत, असे डॉ. अनिल काकोडकर यांच्या नेतृत्वाखालील एका तज्ज्ञ समितीने दोन वर्षांपूर्वी केंद्र सरकारला सुनावले होते.

काहीतरी चांगले घडविण्याची मानसिकताच रेल्वे प्रशासनाकडे उरलेली नाही, असे डॉ. काकोडकर यांच्या समितीने म्हटले होते. ‘कार्यक्षमतेला कुरतडणाऱ्या किडय़ांनी’ रेल्वे प्रशासनाला ग्रासले आहे, असे त्यांनी त्या अहवालात नमूद केले होते. तो किडा काढून टाकला नाही, तर रेल्वेवर कडेलोटाचीच वेळ येईल, अशी भविष्यवाणीही या अहवालाने वर्तविली होती. त्यांची भविष्यवाणी खरी करून दाखविण्याचाच चंग उपनगरी रेल्वे प्रशासनाने बांधला असेल, तर मोबाइलवरील तिकिटे, बुलेट ट्रेनची आणि वातानुकूलित, स्वयंचलित दरवाजांच्या उपनगरी गाडय़ांची स्वप्नेदेखील दुरापास्तच ठरतील. मुंबईकरांना विकासाची आस आहे. एखाद्या खुराडय़ाएवढय़ा घरात कायम वावरणाऱ्याची उंची कधी वाढतच नाही, असे म्हणतात. मुंबईच्या रेल्वेत पिचणाऱ्याला त्यातून बाहेर पडण्याची आस आहे. त्याला प्रवासातही मोकळा श्वास हवा आहे.
तो हिरावला जात असल्याच्या संतप्त भावनेतूनच आज एक दिवा भडकला आहे. ते लोण सर्वत्र पसरू नये, यासाठी वेळीच पावले उचलली गेली पाहिजेत. मुंबईकर असलेल्या रेल्वेमंत्र्यांनी प्रवाशांच्या भावना समजून घेतल्या पाहिजेत. भावनांचा उद्रेक लाठीमाराने तात्पुरता दाबून टाकता येईल, पण त्या खदखदत राहिल्या, तर आणखी वेगाने पुन्हा कधीतरी उफाळतील, हे रेल्वे प्रशासनाने लक्षात घेतले पाहिजे.