पोप यांनी मोठी नवलवार्ता सांगावी त्या प्रकारे, कॅथॉलिकांप्रमाणे नास्तिक हे नैतिक असू शकतात, त्यांनाही स्वर्गाची दारे खुली होऊ शकतात असे म्हटले आहे. पण वस्तुस्थिती जरा भिन्न आहे.
कोणत्याही धर्मश्रद्ध माणसास विचारा. तो चिमटीत कंठ धरून हेच सांगेल, की नास्तिक मनुष्यास रौरव नरकाखेरीज अन्य मोक्ष नाही. त्याला स्वर्गाचे दार बंद. हल्ली स्मशानभूमींमध्ये हमखास एक भित्तीचित्र पाहावयास मिळते. त्यात माणसाला मृत्यूनंतर किती प्रकारच्या नरकांतून जावे लागते याचे दिशादर्शन असते. स्वर्गाचे मात्र नामोनिशाणही त्यात नसते. म्हणजे जाणारा जाणार तो जणू थेट नरकाच्या चरकांतच. आता बहुतांश मानवप्राणी आस्तिक आहेत. परंतु त्यांच्याबद्दलही त्या कोणा भित्तीचित्रकाराची ही अशी भावना असल्यावर बिचाऱ्या अल्पसंख्याक नास्तिकांची काय कथा? पण आता त्यांनी काळजी करण्याचे कारण नाही! कोणी काहीही म्हणो, नास्तिकांना स्वर्गात जागा मिळू शकते. कॅथॉलिक चर्चचे सर्वोच्च धर्मगुरू पोप फ्रान्सिस यांनीच हे शुभवर्तमान दिले आहे. आता त्या स्वर्गातल्या जागेचा प्रतिचौरस फूट भाव काही त्यांनी सांगितलेला नाही. फक्त चांगले वागले की जागा मिळू शकेल, असे ते म्हणाले. इटलीमधील ला रिपब्लिका या डाव्या विचारसरणीच्या दैनिकाचे संस्थापक युजेनिओ स्कालफरी हे एक नास्तिक गृहस्थ आहेत. त्यांना पाठवलेल्या एका विस्तृत पत्रात पोप महोदयांनी या आशयाची विधाने केली. नास्तिकांना अर्थातच त्याने कणमात्र फरक पडणार नाही. मुळात पाणिनीच्या एका सूत्रानुसार, ‘नाही’ अशी ज्याची मती असते त्यालाच तर नास्तिक म्हणतात! नास्तिक काहीतरी नाकारतो, कशाचे तरी खंडन करतो. आता हे काहीतरी म्हणजे काय, तर सर्वात प्रथम देव. नास्तिकांना देवच मान्य नसल्याने त्या देवाने त्यांना स्वर्गात बढती दिली काय वा त्यांची नरकात पदावनती केली काय, त्यांना हर्ष वा खेद वाटण्याचे कारण नाही. फार तर या विधानाने ते खळखळून हसले असतील. आस्तिकांच्या जगात मात्र त्याने मोठीच खळबळ माजली. आणि ते स्वाभाविकच होते.
अखेर माणसे देवाच्या द्वारी का म्हणून जातात? तर त्याने चारी मुक्ती साधल्या जातात. आता काही जणांचे तर एवढेही मागणे नसते. छांदोग्य उपनिषदात एक उद्गीथगान आहे. ओम् अदाम् ओम् पिबाम्.. म्हणजे आपण अन्न भक्षण करू, आपण जलपान करू.. हे देव, वरुण, प्रजापती, सविता आमच्यासाठी येथे अन्न प्राप्त करून आणा. तर सर्वसामान्यांच्या प्रार्थना अशा साध्याच भौतिक वगरे असतात. चारी मुक्तीऐवजी त्यांना कर्जमुक्ती हवी असते. चांगली नोकरी, छान छोकरी, पुत्रप्राप्ती, धनवृद्धी, झालेच तर कोणी करणी वगरे केली असेल तर त्यापासून सुटका, असलेच काही हवे असते. थोडक्यात, त्यांच्या दृष्टीने देव आणि बंगाली बाबा यात गुणात्मक फरक नसतोच. त्यासाठी ते मंदिरांत, मशिदींत, गिरिजाघरांत जातात. तासन् तास रांगा लावून दर्शन घेतात. पूजाअर्चा करतात. मेणबत्त्या लावतात. नवस करतात. बरे, एवढी श्रद्धा ठेवूनही हवे ते मिळण्याची खात्री नाहीच. आणि नास्तिकांना मात्र या कोणत्याही कष्टांविना मोफत स्वर्गप्राप्तीची संधी? पोप महोदय म्हणतात, की देवाच्या दयेला अंत नाही. त्याला जे मानत नाहीत त्यांच्यावरही तो दया करतो. हा तर तद्दन अन्याय झाला. हे कमी की काय म्हणून, नास्तिक हे कॅथॉलिकांप्रमाणेच नतिक असू शकतात, असेही त्यांनी सांगून टाकले आहे. हा आस्तिकांच्या मान्यतांना दिलेला मोठाच धक्का आहे. परंतु त्याहून तो ख्रिस्ती धर्म ज्या पायावर उभा आहे त्या पायावरच केलेला आघात आहे.
ख्रिस्ती, इस्लाम यांसारख्या ‘किताबी’ धर्माच्या मुळाशी ईश्वर आणि त्याचे प्रेषित यांच्यावरील डोळेझाक श्रद्धा आहे. तुमची ईश्वरावर, प्रेषितांवर, प्रेषितांनी सांगितलेल्या प्रत्येक शब्दावर श्रद्धा नसेल, तर तुम्ही ख्रिस्ती वा मुस्लीम असूच शकत नाही. तुम्ही केवळ ‘काफीर’ असू शकता आणि अशा अश्रद्धांना स्वर्गच काय या धरतीवरही जागा नाही, असे मानले जाते. तेथे नास्तिकांनाही स्वर्गाची संधी मान्य करून पोप फ्रान्सिस यांनी मोठेच वैचारिक पाऊल उचलले आहे. येथे त्यांनी नास्तिकतेचा हक्कच नकळत मान्य करून टाकलेला आहे. अन्य धर्मीयांना या ना त्या मार्गाने आपल्या धर्मात ओढण्याचा प्रयत्न ख्रिस्ती वा मुस्लीम धर्मगुरू करतात. हे त्यांच्या दृष्टीने केवळ धार्मिक लोकसंख्या वाढवण्याचे कार्य नसते. तो त्यांचा माणसास त्यांच्या दृष्टीने खऱ्या आणि अंतिम धर्माकडे आणण्याचा प्रयत्न असतो. हे चुकीचेच आहे, पण त्यांची ही धर्मश्रद्धा आहे. पोप फ्रान्सिस यांनी आकाशातला पिता आणि नाझरेथचा येशू यांच्याहून अन्यांना भजणाऱ्या लोकांनाच नव्हे, तर कोणत्याच देवदेवतेला न मानणाऱ्यांनाही नतिकतेचे प्रमाणपत्र देऊन स्वर्गाची संधी असल्याचे सांगणे म्हणजे धर्मातराच्या मूळ कारणावरच घाव घालण्यासारखे आहे. व्हॅटिकनने लागलीच, पोप फ्रान्सिस यांना असे म्हणायचे नव्हते, असा खुलासा केला आहे. कोणत्याही धर्मपीठाने हेच केले असते. तेव्हा त्यात विशेष काही नाही. धार्मिकांनी मात्र पोप यांच्या विधानाकडे खुल्या नजरेने पाहावयास हवे.
एकेश्वरवाद, एकग्रंथप्रमाण यांसारख्या गोष्टी धर्माला अंतिमत: कट्टरतेकडेच घेऊन जात असतात. हिंदू धर्म सहिष्णू असल्याचे मानले जाते. एका पातळीपर्यंत त्यात तथ्यही आहे आणि त्याची कारणे हिंदू धर्म हा एकेश्वरवादी वा एकग्रंथप्रामाण्य मानणारा नाही यात आहेत. त्यामुळे देव मानणारा जसा हिंदू असतो, तसाच देव न मानणाराही हिंदू असतो. वेदांना मानणारा जसा हिंदू असतो, तसाच ‘त्रयोवेदस्य कर्तार: भंड, धूर्त, निशाचर:’ असे म्हणणाराही हिंदू असतो. मुळात हिंदू धर्मातील प्रमुख नऊ दर्शनांतील तीन दर्शने नास्तिक आहेत, ही फार महत्त्वाची बाब आहे. यावत् जीवेत् सुखम् जीवेत् नास्ति मृत्युर्गोचर: असा जडवादी दृष्टिकोन देणारे लोकायत दर्शन हे नास्तिकच आहे. सांख्य हे वेदविरोधी आणि अनीश्वरवादी आहेत. पूर्वमीमांसेतील प्रभाकराची धाराही ईश्वाराविना वाहात आहे. पूर्वमीमांसकही जडवादीच आहेत. एवढेच नव्हे, तर िहदूंमधील जगन्मिथ्या मानणारेही अखेर व्यवहारात जगत् सत्य मानूनच चालत असतात. या नास्तिक विचारांचा गळा घोटण्याचा प्रयत्न आस्तिकदर्शनांनी केला नाही असे नाही. त्यांनी चार्वाकाला बदनाम केले. नास्ति मृत्युर्गोचर: ही पंक्ती काढून तेथे ऋणं ऋत्वा घृतं पिबेत् अशी ओळ घालून हे तत्त्वज्ञान कसे आसुरी आहे हे दाखविण्याचा प्रयत्न केला. परंतु तरीही अनीश्वरवादी तत्त्वज्ञानांनी समाजजीवनावर आपली अमीट छाप सोडलीच. नतिकतेने वागण्यासाठी कोणत्याही धर्मग्रंथांची, ईश्वराची आवश्यकता नाही, हे त्यांनी दाखवून दिले.
पोप यांनी मोठी नवलवार्ता सांगावी त्या प्रकारे, कॅथॉलिकांप्रमाणे नास्तिक हे नतिक असू शकतात असे म्हटले आहे. पण वस्तुस्थिती जरा भिन्न आहे. नतिकता हीच नास्तिकतेची पूर्वअट असते, हे त्यांनी लक्षात घेतलेले नाही आणि आस्तिक्यबुद्धी माणसाला नीतिमान होण्यासाठी कधीही उपयोगी पडलेली नाही, याकडे त्यांनी दुर्लक्ष केलेले आहे. ख्रिश्चनांचे क्रुसेड्स, मुस्लिमांचे जिहाद,  हिंदूंच्या पंथांपंथांतील लढाया, अस्पृश्यतेसारख्या अमानवी प्रथा अशा गोष्टींनी लिप्त असलेले धर्माचे इतिहास जरी त्यांनी उघडय़ा डोळ्यांनी पाहिले असते, तरी त्यांना धार्मिकांच्या नतिकतेचा नव्याने विचार करावासा वाटला असता. आणि पाश्चात्त्य जडवाद्यांबरोबरच त्यांनी चार्वाक, कपिल, कणाद यांचीही माहिती घेतली असती, तरी त्यांना नास्तिकांना नतिकतेचे प्रमाणपत्र देण्याची आवश्यकता भासली नसती.
असे असले, तरी पोप फ्रान्सिस यांनी ‘नास्तिकांना स्वर्गाचे दार उघडून’ धार्मिक कट्टरतेचे दार किलकिले केले आहे. त्याचे स्वागतच करावयास हवे. जुन्यापुराण्या कुबट वाडय़ामध्ये अधूनमधून ताज्या हवेचे झोत येणे केव्हाही बरे असते.

Perfect Brush For Healthy Teeth Why Adults Shall Use Kids Tooth Brush
तोंडाची दुर्गंधी कमी करण्यासह ‘या’ फायद्यांसाठी तुम्हीही वापरायला हवा लहान मुलांचा टूथब्रश; डॉक्टर काय सांगतात?
Raj Thackeray
Heat Wave: राज ठाकरेंचं मुक्या प्राण्यांसाठी भावनिक आवाहन
New Year Welcome Kalyan,
कल्याण, डोंबिवलीत नववर्ष स्वागत यात्रांचा उत्साह; ढोल ताशांचा गजर, कलाकारांची उपस्थिती
kanyadan, valid marriage,
वैध लग्नाकरता कन्यादान नाही, तर सप्तपदी महत्त्वाची !