देशाच्या पैसाविषयक व्यवहारांचे नियंत्रण करणाऱ्या रिझव्‍‌र्ह बँकेच्या कार्यकारी संचालक पदाची सूत्रे डॉ. दीपाली पंत-जोशी यांच्या रूपाने एका महिलेच्या हातात आली आहेत. राजस्थानमध्ये रिझव्‍‌र्ह बँकेतच त्या प्रादेशिक संचालक होत्या. १९८१ मध्ये त्यांनी रिझव्‍‌र्ह बँकेच्या सेवेत प्रवेश केला व नंतर त्यांनी मागे वळून पाहिलेच नाही. ‘अर्बन बँक्स अँड करन्सी’ या संस्थेच्या त्या मुख्य महाव्यवस्थापक होत्या. आंध्र प्रदेश राज्याच्या बँकपाल म्हणून त्यांनी काम पाहिले. आंध्र बँकेच्या संचालक मंडळावरही त्यांनी काम केले. बँकिंग व्यावसायिकांना प्रशिक्षण देणाऱ्या संस्थेत त्यांनी तरुण व्यावसायिकांना धडे दिले. ग्रामीण व्यवस्थापन व पत विभागातही त्यांनी मुख्य महाव्यवस्थापक पदावर असताना मोठी भूमिका पार पाडली. आता त्या रिझव्‍‌र्ह बँकेच्या कार्यकारी संचालक झाल्या असताना त्यांच्याकडे ग्रामीण व्यवस्थापन व पत विभाग तसेच ग्राहक सेवा या खात्याची जबाबदारी देण्यात आली आहे. मिसुरीची आयएएस अकादमी व हैदराबाद येथील प्रशासकीय कर्मचारी प्रशिक्षण संस्था तसेच अनेक आंतरराष्ट्रीय परिषदांमध्ये त्यांनी वेळोवेळी आर्थिक विषयांवर व्याख्याने दिली आहेत. ‘जी-२०’ देशांच्या आर्थिक तज्ज्ञांच्या गटात त्यांनी भारताचे प्रतिनिधित्व केले आहे. सोशल बँकिंग, दारिद्रय़ व शाश्वत विकास यांचा विशेष अभ्यास केल्यामुळे असेल, पण हस्तिदंती मनोऱ्यात बसून काम न करता जनसामान्यांच्या अडचणी लक्षात घेऊन आर्थिक धोरणे राबवण्याची हातोटी त्यांना साधली आहे. यापुढे रिझव्‍‌र्ह बँकेत माहिती अधिकारातील अपिलाच्या अंतिम अधिकारीही त्याच असणार आहेत. १९७५-८० या काळात त्यांनी ‘दक्षिण व आग्नेय आशिया यांच्या विकासाचे राजकीय अर्थशास्त्र’ या विषयात अलाहाबाद विद्यापीठातून डॉक्टरेट केली. हार्वर्ड विद्यापीठाच्या त्या फेलो आहेत. सुमारे तीन दशके त्यांनी रिझव्‍‌र्ह बँकेत विविध पदांवर काम केले आहे, त्यामुळे त्यांचा अनुभवही मोठा आहे. विशेष म्हणजे अर्थशास्त्रासारख्या अवघड विषयावर त्यांनी चार ते पाच उत्तम पुस्तके लिहिली आहेत. त्यात ‘पॉव्हर्टी अँड सस्टेनेबल डेव्हलपमेंट’ तसेच ‘सोशल बँकिंग, प्रॉमिस परफॉर्मन्स अँड पोटेन्शियल’ ही पुस्तके विशेष गाजली आहेत.!