प्रसिद्धीलोलुप समाजसेवकांची संख्या कमी नाही. गेल्या ३० वर्षांपासून मेळघाटात आरोग्य व शिक्षणाच्या क्षेत्रात निष्ठेने काम करणारे रवी व स्मिता कोल्हे हे डॉक्टर दाम्पत्य मात्र यास अपवाद आहे. उच्चशिक्षण घेऊनही जाणीवपूर्वक मेळघाटची वाट निवडणारे हे दाम्पत्य कधीही प्रसिद्धीच्या वाटेला गेले नाही. आपण भले आणि आपले काम भले, हीच वृत्ती त्यांनी जोपासली.
गेली तीन दशके बैरागडसारख्या कुठल्याही सोयी नसलेल्या गावात राहणाऱ्या कोल्हेंची संस्था नाही आणि ट्रस्टही. मागासलेल्या आदिवासींना मुख्य प्रवाहात आणण्यासाठी अशा संस्थेची गरजच काय, हा त्यांचा सवाल रास्त आहे. वैद्यकीय शिक्षणानंतर धारणी तालुक्यातले हे गाव कर्मभूमी म्हणून निवडणाऱ्या रवी व स्मिता यांनी प्रारंभी आरोग्यसेवा दिली. नंतर त्यांचा सेवा विस्तार वेगवेगळ्या क्षेत्रांत होत राहिला. गांधी व विनोबा विचाराने प्रेरित होऊन सेवामार्ग निवडणाऱ्या या दाम्पत्याने आदिवासींना शिक्षणाचा मार्ग दाखवला. शासकीय योजनेत राबणाऱ्या मजुरांना किमान वेतन काय असते ते शिकवले. मेळघाटात आजही रेशनिंगची व्यवस्था खिळखिळी आहे. वीस वर्षांपूर्वी तर स्थिती भयावह होती. कोल्हेंनी बैरागड भागात ही व्यवस्था सुधारण्याचा निर्णय घेतला. यासाठी त्यांना आधी शासकीय पातळीवर व नंतर गावगुंडांशी खूप लढावे लागले. यातून जीवघेणे हल्ले झाले तरीही हे दाम्पत्य डगमगले नाही. स्वत: रेशनिंगचे दुकान थाटून त्यांनी आदिवासींना स्वस्त दरात धान्य उपलब्ध करून दिले.
मेळघाटच्या डोंगराळ प्रदेशात शेती करणे कठीण समजले जाते, पण हे आव्हान स्वीकारून कोल्हेंनी ३० एकर शेती घेऊन त्यात नवनवे प्रयोग केले. हे प्रयोग बघा आणि तशी शेती करा, असे आदिवासींना सांगितले. यातून या भागातल्या शेकडो आदिवासींनी प्रेरणा घेतली. आदिवासींना मुख्य प्रवाहात आणायचे तर धर्मबदलाची गरज काय, हा सवाल त्यांनी ख्रिस्ती मिशनरी संस्थांना केला. यावरून त्यांना हिंदुत्ववादी ठरवले गेले, पण हे दाम्पत्य डगमगले नाही. कुपोषण व बालमृत्यूची समस्या व्यापक असल्याने आज मेळघाटात स्वयंसेवी संस्था बऱ्याच आहेत. मात्र, सेवाव्रत घेऊन येथे पाऊल टाकणारे कोल्हे दाम्पत्य पहिलेच.
आजही एका झोपडीवजा घरात, साप व विंचवाच्या सान्निध्यात जगणाऱ्या या कुटुंबाने सेवेसाठी नव्याने येऊ पाहणाऱ्या प्रत्येकाचे स्वागतच केले आहे. बैरागडला आजही संपर्काचे साधन नाही. वर्षांतले सहा महिने संपर्क तुटतो. हे सारे पचवून सेवेशी प्रामाणिक राहणाऱ्या या दाम्पत्याचा मुंबईच्या जोशी फाऊंडेशनने सामाजिक कृतज्ञता पुरस्कार देऊन त्या पुरस्काराचीच उंची वाढवली आहे.

Two minor girls molested in a private tutoring class in nashik
नाशिक : खासगी शिकवणी वर्गात दोन अल्पवयीन मुलींचा विनयभंग
mumbai IIT
मुंबई आयआयटीचे ३६ टक्के विद्यार्थी ‘कॅम्पस प्लेसमेंट’च्या प्रतीक्षेत
piyush goyal
लखलखत्या तरुण तेजांकितांचा आज गौरव; केंद्रीय वाणिज्य व उद्योगमंत्री पियूष गोयल प्रमुख अतिथी
winners of patra chawl
पत्राचाळीतील ३०६ विजेत्यांची घरांची प्रतीक्षा संपेना, भोगवटा प्रमाणपत्र न मिळाल्याने ताबा प्रक्रियेस विलंब