लोकांनी गांधीजींचे ऐकले असते तर सध्याचे जग आणखी सुंदर बनले असते. गांधीजींच्या विचारांमुळे मानवता आणि केवळ स्वत:बद्दल विचार करू नये हे धडे मी घेतल्याचे डॉ. कानू चॅटर्जी परखडपणे सांगतात. कॅलिफोर्निया विद्यापीठातील हृदयरोग दक्षता विभागाचे संचालक याचबरोबर विविध वैद्यकीय आणि वैज्ञानिक संदर्भ मासिकांच्या संपादक मंडळावर भूमिका बजावणाऱ्या चॅटर्जी यांचे नुकतेच ८१व्या वर्षी निधन झाले.
चॅटर्जी यांचा जन्म १९३४मध्ये बांगलादेशमध्ये झाला. बांगलादेश स्वतंत्र झाल्यानंतर त्यांचे कुटुंब निर्वासित म्हणून कोलकातामध्ये आले. शालेय शिक्षण पूर्ण झाल्यावर कोलकाता येथील आर. जी. कार वैद्यकीय महाविद्यालयात त्यांनी वैद्यकशास्त्रातील प्राथमिक शिक्षण पूर्ण केले. तोपर्यंत त्यांचे कुटुंब निर्वासितांच्या छावणीतच राहत होते. तेथून ते थेट पुढे लंडनला रवाना झाले. तेथे त्यांनी रॉयल कॉलेज ऑफ फिजिशियनमध्ये अंतर्गत औषधशास्त्र आणि हृदयरोग विषयाचे प्रशिक्षण पूर्ण केले. यानंतर त्यांनी सॅनफ्रॅन्सिस्को येथे कॅलिफोर्निया विद्यापीठाच्या वैद्यकशास्त्र विभागात नोकरी स्वीकारली. यानंतर २००१ ते २००९ या कालावधीत त्यांच्याच नावाने सुरू करण्यात आलेल्या यूसीएसएफ चॅटर्जी सेंटर फॉर कार्डिक रिसर्च केंद्रात ते काम करत होते.  आपल्या संपूर्ण कारकिर्दीत त्यांनी अनेक डॉक्टरांची जडणघडण केली. त्यांनी शिकवलेले अनेक डॉक्टर सध्या त्यांच्या त्यांच्या क्षेत्रात उच्च पदावर काम करत आहेत. त्यांच्या या कामाबद्दल त्यांना विविध सन्मान मिळाले. यामध्ये उत्कृष्ट शिक्षकाचा कैझर पुरस्कार, एसीसी गिफ्टेड शिक्षक पुरस्काराचा समावेश आहे. २०१४मध्ये त्यांना अमेरिकन हार्ट असोसिएशनतर्फे दिला जाणारा मानाचा हॅरिक पुरस्काराने सन्मानित करण्यात आले. त्यांनी वैद्यकशास्त्राशी संबंधित अनेक पुस्तकांमध्ये सहलेखक म्हणून सहभाग नोंदविला, तर अमेरिकन हृदयविज्ञान महाविद्याल, न्यू इंग्लंड विद्यापीठांच्या जर्नल्समध्ये त्यांनी संपादकीय मंडळातही काम केले.
चटर्जी यांना वैद्यकशास्त्राबरोबरच वाचन करणे आणि भारतीय शास्त्रीय संगीत ऐकण्याची आवड होती.  शेवटची गाण्याची सीडी आपले मित्र आणि पेशंट रविशंकर यांची विकत घेतल्याचे त्यांनी  एका मुलाखतीत नमूद केले होते. रवींद्रनाथ टागोर यांचे संगीत ऐकणेही त्यांना आवडत असे. त्यांच्या निधनानंतर हृदयरोग क्षेत्राचा अभ्यास करणारे डॉक्टर हरपले, चांगले मार्गदर्शक आणि शिक्षक हरपले अशा प्रकारच्या प्रतिक्रिया त्यांच्या चाहत्यांनी ट्विट्स केल्या.