कोकणी भाषा मुळातच गोड. एवढी की, या भाषेत शिवीलासुद्धा प्रेमाची आणि आपुलकीचीच किनार असते, असे म्हणतात. अशी ही भाषा, एखाद्या संवेदनशील, ऋजु मनाच्या समीक्षक, साहित्यिक-कवीच्या लेखणीला लाभली, तर तिचे सौंदर्य अधिकच खुलते. भाषेचा गोडवा आणि साहित्यिकाचे हळवे मन यांचा सुंदर मिलाफ ज्या काही मोजक्या कोकणी कवी-लेखकांच्या लेखणीतून अवतरला आणि कोकणी साहित्याला उंची प्राप्त झाली, त्या साहित्यिकांच्या मांदियाळीत कवी-लेखिका डॉ. माधवी सरदेसाई यांचे नाव वरच्या क्रमांकावर होते. दीर्घकाळ असाध्य आजाराशी झुंजत माधवीताईंनी अखेर सोमवारी जगाचा निरोप घेतला.
प्रसिद्ध कोकणी लेखिका, साहित्य क्षेत्रातील प्रतिष्ठेचा मानला जाणाऱ्या साहित्य अकादमी पुरस्काराच्या यंदाच्या विजेत्या, अशी त्यांची विविधांगी ओळख असली, तरी गोवा विद्यापीठात कोकणी विभागप्रमुख असलेल्या, अतिशय प्रेमळ व समावेशक स्वभावाच्या प्राध्यापक हीच त्यांची ओळख त्यांच्या असंख्य विद्यार्थ्यांनी जपली. गांधीवादी विचारांशी प्रखर निष्ठा असलेल्या माधवीताईंनी ‘जाग’ या साहित्यिक नियतकालिकाच्या संपादनाचे कामही साहित्यसेवेच्या व्रतभावाने केले. नामवंत कोकणी साहित्यिक व ज्ञानपीठ पुरस्कार विजेते साहित्यिक प्रा. रवींद्र केळेकर यांनी हे नियतकालिक सुरू केले. माधवीताईंचे ते मामा. डॉ. केळेकरांच्या पश्चात या नियतकालिकाचा दर्जा कायम राखण्यात माधवीताईंच्या साहित्यिक व संपादकीय कौशल्याचा मोठा वाटा होता. आजारी असतानादेखील कोकणी भाषेच्या उत्कर्षांसाठी त्यांनी समर्पित भावनेने काम केले. त्यांच्या ‘मंथन’ या लेखसंग्रहास नुकताच साहित्य अकादमी पुरस्कार जाहीर झाला होता. त्याआधी ‘बिंब’ हे पुस्तकही समीक्षक- वाचकांच्या पसंतीचे ठरले. भाषाशास्त्रावरील त्यांचे ‘भाषा-भास’ हे पुस्तक, ‘माणकुलो राजकुवर’ हे बालसाहित्य पुस्तक, असे ‘अशिल्ले गांधीजी’ हे अनुवादित पुस्तक कोकणी साहित्यातील मैलाचा दगड मानले जातात. ‘कोकणीवरील पोर्तुगीजांचा प्रभाव’ यावरही त्यांनी सखोल संशोधन केले होते.
मडगावच्या चौगुले महाविद्यालयातून इंग्रजी आणि तत्त्वज्ञान विषय घेऊन कलाशाखेतील पदवी संपादन केल्यानंतर माधवीताईंनी भाषाशास्त्राच्या अभ्यासात स्वत:ला वाहून घेतले. याच क्षेत्रात एम.ए. केल्यानंतर कोकणी व्याकरणाचा चौफेर अभ्यास करीत पीएच.डी. संपादन केली. ‘एका विचाराची जीवितकथा’ या त्यांच्या वैचारिक पुस्तकात त्यांच्या अभ्यासू वृत्तीचे पूर्ण प्रतिबिंब दिसते. मामा प्रा. रवींद्र केळेकर यांच्या पट्टशिष्या ही त्यांची आणखी एक ओळख. ज्येष्ठ पत्रकार राजू नायक यांच्या पत्नी आणि आमदार विजय सरदेसाई यांच्या भगिनी असलेल्या माधवीताईंच्या निधनाने कोकणी साहित्यसृष्टीची हानी झाली आहे.

What Samantha Said?
‘निरागस पतीला का फसवलंस?’, ट्रोलरच्या प्रश्नावर समांथाचं रोखठोक उत्तर, म्हणाली..
How to make raw mango dal mango dal
तुम्ही कधी चटकदार कैरीची डाळ खाल्ली आहे का? नसेल तर ही घ्या सोपी रेसिपी
this is true love old couple eating in one plate
याला म्हणतात खरं प्रेम! एका ताटात जेवणाऱ्या आजी-आजोबांचा व्हिडीओ पाहून नेटकरी झाले भावूक
urvashi rautela answer on marrying rishabh pant
“ऋषभ पंत तुला आनंदी ठेवेल, त्याच्याशी लग्न…”, उर्वशी रौतेलाचं ‘त्या’ प्रश्नावर दोन शब्दांत उत्तर; म्हणाली…