News Flash

डॉ. मेहरू बेंगाली

मुंबई विद्यापीठ हे देशातील पहिल्या तीन अशा जुन्या व नामवंत विद्यापीठांपैकी एक. त्यामुळे या विद्यापीठाच्या सर्वोच्च स्थानी नियुक्ती होण्याचा मान मोठाच म्हणायला हवा.

| May 23, 2014 01:03 am

मुंबई विद्यापीठ हे देशातील पहिल्या तीन अशा जुन्या व नामवंत विद्यापीठांपैकी एक. त्यामुळे या विद्यापीठाच्या सर्वोच्च स्थानी नियुक्ती होण्याचा मान मोठाच म्हणायला हवा. शिवाय कुलगुरूंची निवड ही त्यांच्या केवळ शैक्षणिक कर्तृत्व आणि कामगिरीवरच करण्याचा तो काळ होता. त्या कसोटय़ांना पुरेपूर उतरण्याइतकी विद्वत्ता आणि कर्तृत्व हे डॉ. मेहरूबेंगाली यांच्यात खचितच होते. बेंगाली यांच्याकडे ‘अर्थशास्त्र’ आणि ‘शिक्षण’ या दोन्ही विषयांतील पदव्युत्तर पदव्या होती. पण, त्यांनी पीएच.डी. केली ती ‘मानसशास्त्र’ या विषयात. तीन वेगवेगळ्या विषयांतील पदव्या आणि अभ्यासामुळे बेंगाली यांच्यामध्ये बहुविध दृष्टिकोन विकसित न होईल तरच नवल. आपल्या या अनुभवाचा फायदा त्यांनी २० हून अधिक विद्यार्थ्यांना एम.फिल. आणि पीएच.डी.साठी मार्गदर्शन करून दिला. या विविधांगी दृष्टिकोनामुळेच पुढे त्यांच्याकडून ‘गायडन्स अ‍ॅण्ड कौन्सिलिंग’सारखे गाजलेले पुस्तक लिहून झाले. त्याचबरोबर या तीन वेगवेगळ्या विषयांच्या अभ्यासातून त्यांनी ‘उच्चशिक्षण’ या विषयालाच वेगळा आयाम मिळवून दिला.
मुंबई विद्यापीठातील १९८६ ते १९९२ ही त्यांची कुलगुरूपदाची कारकीर्द फारशी वादग्रस्त ठरली नाही. विद्यार्थी हिताचे अनेक निर्णय त्यांनी या काळात घेतले. त्यापैकी सर्वाधिक महत्त्वाचा निर्णय म्हणजे रत्नागिरी येथे विद्यापीठाचे उपकेंद्र सुरू करण्याचा होता. यामुळे कोकणातील लहानशा गावांमधून विद्यापीठाच्या कलिना अथवा फोर्ट संकुलात कामासाठी येणाऱ्या हजारो विद्यार्थ्यांना त्यांनी दिलासा मिळवून दिला. याशिवाय विद्यापीठात अनेक विषयांचे पदव्युत्तर अभ्यासक्रम सुरू करण्यात बेंगाली यांनी महत्त्वाची भूमिका बजावली. कलिना येथील संकुलाच्या विकासात त्यांचा मोठा हातभार होता. मुंबई विद्यापीठाच्या पहिल्या महिला कुलगुरू म्हणून यशस्वीपणे आपली भूमिका पार पाडल्यानंतर त्यांची विद्यापीठ अनुदान आयोगावर निवड करण्यात आली.
 १९८४ ते १९८६ या काळात त्या विद्यापीठाच्या शिक्षणशास्त्र विभागाच्या प्रमुख म्हणून कार्यरत होत्या. त्या आधी सेंट झेवियर्स महाविद्यालयाच्या ‘इन्स्टिटय़ूट ऑफ एज्युकेशन’मध्ये व्याख्यात्या म्हणून कार्यरत होत्या. ‘फेसिंग मॉडर्न एज्युकेशनल चॅलेन्जेस’, ‘चाईल्ड सायकॉलॉजी अ‍ॅण्ड चाईल्ड गायडन्स’ आदी पुस्तकांबरोबरच ‘गायडन्स इफ यू प्लीज’ आणि ‘फेसिंग मॉडर्न एज्युकेशन चॅलेंजेस – अ टीचर्स मॅन्युएल’ अशा मार्गदर्शन पुस्तिकाही बेंगाली यांनी लिहिल्या. शिक्षण क्षेत्राबरोबरच ‘मुंबई पारसी पंचायत’, राष्ट्रीय अल्पसंख्याक आयोग, राज्य अल्पसंख्याक आयोग येथेही उल्लेखनीय काम करून वयाच्या ८४व्या वर्षी, बुधवारी त्यांनी जगाचा निरोप घेतला.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on May 23, 2014 1:03 am

Web Title: dr mehru bengali passed away 2
Next Stories
1 एम. पी. अनिल कुमार
2 गॉर्डन विलिस
3 व्यक्तिवेध: एन. श्रीनिवासन
Just Now!
X