‘व्हॉट मॅन..’ दोनच शब्द, छोटासाच प्रश्न, पण या दोनच शब्दांत अहमदनगर जिल्ह्य़ातील मागच्या पिढीतील अनेकांचा उत्कर्ष दडला आहे. हे जिव्हाळ्याचे दोन शब्द आता नगरकरांना ऐकायला मिळणार नाहीत! आत्मीयतेने ही चौकशी करणारे अहमदनगर महाविद्यालयाचे सेवानिवृत्त प्राचार्य डॉ. थॉमस बार्नबस यांचे नुकतेच शिकागोमध्ये (अमेरिका) वयाच्या ९५ व्या वर्षी निधन झाले. गेली ३० वर्षे ते अमेरिकेत स्थायिक झाले होते.
नगर जिल्ह्य़ाच्या शिक्षण क्षेत्रात कमालीचा जिव्हाळा असणारे व्यक्तिमत्त्व म्हणून बार्नबस यांचा उल्लेख केला जातो. ‘टी. सर’ याच नावाने ते ओळखले जात. १९५२ ते १९८० अशी तब्बल २८ वर्षे ते अहमदनगर महाविद्यालयाचे प्राचार्य होते. या काळात अनेक विद्यार्थी त्यांच्या हाताखाली घडले. मराठी रंगभूमी आणि चित्रपट क्षेत्रातील ज्येष्ठ अभिनेते मधुकर तथा मामा तोरडमल, नंतरच्या काळात सदाशिव अमरापूरकर, श्रीनिवास भणगे, सतीश आळेकर हे त्यांचेच विद्यार्थी. टी. सरांनी केवळ विद्यार्थीच घडवले असे नाही, तर असंख्य प्राध्यापक, अनेक प्राचार्यही घडवले. अहमदनगर महाविद्यालय हे नगर जिल्ह्य़ातील पहिले आणि पुढे बरीच वर्षे जिल्हय़ातील एकमेव महाविद्यालय. टी. सरांची कारकीर्द ही सर्वार्थाने सुवर्णकाळ मानली जाते. महाविद्यालय सुरू झाले त्या वेळी ते मुंबई विद्यापीठात होते. पुढे पुणे विद्यापीठ झाल्यानंतर अहमदनगर महाविद्यालय या विद्यापीठात समाविष्ट झाले. या कार्यक्षेत्रात अनेक वर्षे विद्यापीठाच्या खालोखाल अहमदनगर महाविद्यालयाचा क्रमांक लागे, त्यामागे टी. सरांची दूरदृष्टी आणि गुणग्राहकता होती. ते स्वत: रसायनशास्त्राचे विद्यार्थी आणि अध्यापक. स्वाभाविकपणेच शास्त्र शाखेकडे त्यांचे अधिक लक्ष होते. त्या काळात शास्त्र शाखेतील बरेचसे विषय एक तर पुणे विद्यापीठात, नाही तर फक्त अहमदनगर महाविद्यालयात शिकवले जात. रसायनशास्त्रासाठी अध्यापक घ्यायचा तर, टी. सर तो राष्ट्रीय रासायनिक प्रयोगशाळेतून (एनसीएल) आणत. त्याला तेथे मिळणाऱ्या सवलती, तसे वेतनही नगरसारख्या ग्रामीण भागात उपलब्ध करून देत. विद्यार्थ्यांना त्या काळात ईबीसीसारखी सवलत नव्हती, त्याची कसर टी. सर स्वत:च्या वेतनातून भरून काढत. आपल्या वेतनातून गरजू विद्यार्थ्यांची फी भरणारा असा प्राचार्य विरळाच. पुणे विद्यापीठाचे तत्कालीन कुलगुरू दत्तो वामन पोतदार, आचार्य रजनीश (ओशो), रावसाहेब पटवर्धन, एस. एम. जोशी, ना. ग. गोरे, मामासाहेब दांडेकर अशा दिग्गजांचा त्या काळात महाविद्यालयात वावर होता, तो टी. सरांमुळेच!