आपल्या वारशाचे पुनर्मूल्यांकन करून त्याचा आधुनिकतेशी मेळ घालत आधुनिक होणे हा विचार म्हणून छानच आहे. पण व्यवहारात त्याचा अर्थ सनातनत्वाकडे झुकत असतो. हे रोजचे वास्तव आहे. तेव्हा याचे नेमके काय आणि कसे करायचे हे मोरेसरांनी सांगितले असते तर प्रतिपादनातील वैचारिक येळकोट टळला असता.
आम्ही वाचू पण आणि नाचू पण अशी घोषणा अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाचे अध्यक्ष डॉ. सदानंद मोरे यांनी दिली असल्यामुळे येथून पुढे या संमेलनास रिकामटेकडय़ांचा उद्योग म्हणणाऱ्या सर्वाची मोठी पंचाईत होणार आहे. याचे कारण संमेलनात काही मंडळी वाचणार, काही नाचणार आणि काही एकाच वेळी दोन्हीही करणार म्हटल्यावर तेथे रिकामटेकडेपणाला वावच राहिलेला नाही. तेव्हा साहित्य संमेलन हा मोरेसरांनी म्हटल्याप्रमाणे खरोखरच मराठी अस्मितेचा उत्सवी आविष्कार आहे हे आता साऱ्यांनाच मान्य करावे लागणार आहे. आता या संमेलनात नाचणारांची संख्या जरा जास्त असते, किंबहुना आपल्या नाचण्याबागडण्याकरिताच हे साहित्याचे अंगण आपणास महामंडळाने दिले आहे असे मानणारी मंडळीच येथे जास्त दिसतात व त्यांच्यातून साहित्यिक बिचारे शोधून काढावे लागतात. तसे नसते तर साहित्य संमेलनास सध्या जे लिलिपुटीनांच्या उंचीच्या स्पध्रेचे स्वरूप आले आहे ते आलेच नसते. सध्याच्या संमेलनातील नर्तकगण पाहता हे संमेलनही पूर्वीच्या संमेलनांहून फार वेगळे आहे असे म्हणता येणार नाही. अशा कोणत्याही संमेलनाचे सूप वगरे वाजल्यानंतर त्यातून नेमके काय मिळाले, त्याचे फलित काय, असा एक प्रश्न परंपरेने माध्यमी चच्रेस घेतला जातो. हे संमेलन अजून संपायचे आहे. तेव्हा आताच तो सवाल करणे हे कोणास अप्रस्तुत वाटू शकेल. मात्र मागील संमेलनांचा अनुभव आणि या संमेलनाची एकूणच कार्यक्रम पत्रिका पाहिल्यानंतर यातून वाचकांच्या हाती तीर्थाटन आणि अध्यक्षीय भाषण यापरते फार काही वेगळे लागेल अशी शक्यता दिसत नाही. तीर्थाटनाची चर्चा ध्वनिचित्रफीत वगरे दाखवून वृत्तवाहिन्यांना अधिक चांगल्याप्रकारे करता येईल. तेव्हा येथे केवळ अध्यक्षीय लेखी भाषणावर चर्चा करणे योग्य ठरेल. अध्यक्षीय भाषण हा प्रत्येक संमेलनाचा अविभाज्य भागच असतो. तेव्हा मोरे यांनीही ते केले यात विशेष काय आणि ते संमेलनाचे फलित कसे असू शकेल, असा प्रश्न येथे पडू शकतो. गेल्या काही संमेलनांची -त्यास अर्थातच अपवाद आहेत- अध्यक्षीय भाषणे पाहिल्यानंतर त्यात चर्चा करण्यासारखे तरी काय आहे असेही कोणास वाटू शकते. मोरे यांचे लेखी भाषण मात्र त्यास अपवाद आहे. कारण ते हल्ली लुप्त होत चाललेल्या निबंधांच्या गंभीर परंपरेस साजेसे आहे.  
असे म्हणतात की, आपण कोठून आलो हे माहीत असलेले बरे असते. त्यामुळे कोठे आहोत आणि कोठे जायचे आहे हे ठरविणे सोपे जाते. डॉ. सदानंद मोरे यांनी आपल्या अध्यक्षीय भाषणात मराठी साहित्य प्रवाहाचे हे येणे कोठून झाले त्याचा सविस्तर नकाशा त्यांच्या खास प्रासादिक प्राध्यापकी शैलीत चितारला आहे. ‘चला जरा मुळांकडे ’ ही सध्याच्या जागतिकीकरणाने भेलकांडलेल्या सर्वच मानवसमूहांची जी हाक आहे तिला धरूनच ही शोधयात्रा आहे. मोरे यांच्या या भाषणाचे सरळसरळ तीन भाग दिसतात. पहिला भाग हा अध्यक्षीय भाषणाच्या परंपरेला साजेसा असाच आहे. परंपरेनुसार भाषणाची सुरुवात ही स्थळमाहात्म्याने करायची असते. जेथे संमेलन भरते त्या स्थळाचे गुणवर्णन करणे, त्याचे आणि मराठीचे नातेवळ सांगणे असे ते सर्व असते. त्यानुसार मोरे यांनी पंजाब व महाराष्ट्र यांच्या ऐतिहासिक व धार्मिक संबंधांची बखरच येथे मांडली आहे. भाषणाचा दुसरा भाग मराठी साहित्याच्या मूळ प्रवाहाची चर्चा करतो. हा प्रवाह उगम पावतो तो तेराव्या शतकाच्या उत्तरार्धात. चक्रधरांचा महानुभाव पंथ आणि ज्ञानेश्वरांचा वारकरी पंथ यातून या वाङ्मयप्रवाहाचा प्रसव झाला आहे. ज्ञानदेवांपासून नामदेव, तुकाराम ते निळोबाराय िपपळनेरकरांपर्यंत म्हणजे सुमारे पाच शतके तो अविरत वाहता होता. येथील सर्वसामान्य लोकांनाही आपण त्या प्रवाहाचे घटक असल्याचे भान होते. वारकरी पंथातील साहित्यनिर्मिती पुढे अठराव्या शतकात स्थगित झाली असली, तरी लावणी वाङ्मय, नंतर टिळक, सत्यशोधकी लेखक, दलित साहित्य ते थेट चित्रे-नेमाडे-कोलटकरांच्या पिढीपर्यंत या प्रवाहाशी असलेली सांधेजोड दिसून येते, हे मोरे यांनी दाखवून दिले आहे. या प्रवाहाचे वैशिष्टय़ म्हणजे ते मराठी समाजाच्या आंतरिक गरजांतून निर्माण झाले होते आणि याच्या उलट आपण ज्याला आधुनिक साहित्य म्हणतो त्याला हा पाया नव्हता. ते या मातीतले पीक नव्हते. या उसनवारीच्या आधुनिक साहित्याने मराठी परंपरेशी असलेली नाळ खंडित केली याची खंत मोरे यांच्या मनात आहे. आणि अशी खंत करण्याचे कारण मोरे यांच्या मनात असलेल्या येथील माणसांबद्दलच्या कळवळ्यात आहे. हे व्यक्त केल्यानंतर मोरे यांच्या भाषणाचा अखेरचा भाग येतो.
‘साहित्य क्षेत्रातील उत्तराधुनिकतेची गाठ अर्थव्यवस्थेतील भांडवलशाहीशी, उत्तर भांडवलशाहीशी किंवा नवभांडवलशाहीशी आहे हे विसरता कामा नये. या टकराटकरीतच शेतकऱ्यांवर आज आत्महत्यांच्या प्रसंगांना तोंड द्यायची वेळ आली आहे.’ हे मोरे यांचे प्रतिपादन अत्यंत महत्त्वाचे असून, येथे तुकाराम, फुले आणि ‘मराठी माणसाची मानसिकता, वैचारिकता प्रगट करणारे’ र. वा. दिघे अशी परंपरा खंडित झाल्यामुळे हे घडले असावे काय, या सवालापर्यंत मोरे आपणास घेऊन येत आहेत. या ठिकाणी त्यांनी साहित्यिकांपुढील दोन महत्त्वाची आव्हाने अधोरेखित केली आहेत. पहिले आव्हान शेतकऱ्याला त्याच्या मूळ स्वभावाची, तात्त्विक बठकीची जाणीव करून देण्याचे आहे. दुसरे व्यक्तीच्या स्वतंत्रतेपासून, स्वायत्ततेपासून आणि प्रतिष्ठेपासून सुरू झालेली भांडवलशाही आता नेमक्या त्याच गोष्टींच्या मुळावर आली आहे. सध्याच्या या भांडवलशाह्य़ोत्तर भांडवलशाहीवर उतारा म्हणून काही शक्ती धर्माचे हत्यार घेऊन पुढे सरसावल्या आहेत. अशा परिस्थितीत आपण आपला विवेक कसा शाबूत ठेवायचा असे आव्हान आहे. मराठी भाषेच्या भूमीत विवेकवेलीची लावणी करू या अशी हाक मोरे यांनी दिली आहे. पण मुद्दा ती कशी करायची हा आहे.
मराठी साहित्याच्या मूळ प्रवाहाशी म्हणजेच संतपरंपरेशी जोडून घेतल्याने हे आव्हान पेलता येईल असे मोरे यांच्या विवेचनाचे सार दिसते. हा खरा गोंधळाचा भाग आहे. आधुनिक साहित्यविचार आणि मूल्ये यांनी आजचे सामाजिक प्रश्न निर्माण झाले आहेत की झपाटय़ाने बदलत असलेल्या काळाचे आव्हान पेलताना येणारे भेलकांडलेपण सहन न होऊन परंपरेच्या गुहेत सुरक्षा शोधण्याच्या वृत्तीतून त्या प्रश्नांची धार निर्माण झाली आहे हे एकदा नक्की करावयास हवे. संतसाहित्याचा विचार आपण केवळ जीवनार्थ वा ‘फॉर्म’ या अंगाने करतो की त्यात धर्मविचारही येतो हे नीट सांगावयास हवे. आपल्या वारशाचे पुनर्मूल्यांकन करून त्याचा आधुनिकतेशी मेळ घालत आधुनिक होणे हा विचार म्हणून छानच आहे. पण व्यवहारात त्याचा अर्थ सनातनत्वाकडे झुकत असतो. हे रोजचे वास्तव आहे. तेव्हा याचे नेमके काय आणि कसे करायचे हे मोरेसरांनी सांगितले असते तर प्रतिपादनातील वैचारिक येळकोट टळला असता. पण सदानंदांच्या या ऐतिहासिक साहित्यिक बखरीमध्ये नेमका हाच भाग अस्पष्ट आहे. अखेर ‘महात्मा गांधी हा आजच्या काळातील सर्वात महान विवेकवादी नेता होता’ हे मोरे यांचे म्हणणे जरी खरे असले तरी त्यांच्या विवेकवादाची हत्या करण्यास प्राचीन परंपरेशी जोडून घेण्याची वृत्तीच कारणीभूत ठरली आहे हे कसे नाकारता येईल?

pankaja munde manoj jarange (1)
“ही गोपीनाथ मुंडेंची औलाद कधी…”, मनोज जरांगेंवरील कथित टीकेवर पंकजा मुंडेंचा खुलासा
article about elon musk india visit elon musk investment in india
अन्यथा : जगी ज्यास कोणी नाही, त्यास..
Ram Navami 2024 Shubh Yog
२०२४ च्या रामनवमीला अत्यंत शुभ योग जुळून आल्याने ‘या’ राशी होणार श्रीमंत? ‘या’ रूपात दिसू शकते श्रीरामकृपा
Bacchu kadu and navneet rana
“मोठे भाऊही म्हणता, माफीही मागता, तुमच्या एवढा लाचार माणूस…”; बच्चू कडूंची रवी राणांवर बोचरी टीका