दरवर्षी कमालीचा लहरी पाऊस, त्यात मातीचा कस संपून गेलेला, भरपूर धान्य घेण्यासाठी जातिवंत वाणाचा अभाव, अशा प्रतिकूलतेत एका शेतकऱ्याच्या घरातील मुलाला प्रश्न पडतो की जगातील कोटय़वधींच्या पोटातील भूक शमवायची असेल तर काय करता येईल? आणि मग त्याच्या मनात भूकमुक्त जगाचे स्वप्न जन्म घेते. हरितक्रांतीचे प्रणेते एम. एस. स्वामिनाथन आणि नॉर्मन बोरलॉग यांच्या मार्गदर्शनाखाली हा मुलगा गव्हाच्या सुमारे ४८० वाणांची नव्याने पैदास करतो आणि त्याला ‘कृषीक्षेत्रातील नोबेल’ मानले जाणारे ‘वर्ल्ड फूड प्राइझ’ हे पारितोषिक मिळते.. ही स्वप्नवत् वाटणारी कथा, डॉ. संजय राजाराम यांची आहे. नुकताच त्यांना हा पुरस्कार जाहीर झाला.
राजाराम हे बोर्लॉग यांचा वारसा चालवणारे खरेखुरे शेतीतज्ज्ञ आहेत. शेती संशोधनातील उत्तुंग व्यक्तिमत्त्व म्हणजे बोर्लॉग. बोर्लॉग यांचेच वारसदार म्हणून राजाराम यांनी आपल्या प्रयत्नात कोणतीही कसूर ठेवली नाही. सातत्यशील प्रयोगाने, अंत:प्रेरणेने राजाराम यांनी गहू आणि मक्यांचे वाण अधिकाधिक सुधारले. मुख्य म्हणजे, निरनिराळ्या देशांत आणि निरनिराळ्या मोसमांतही आलेल्या वाणांचे संकर त्यांनी केले. इथे ते बोर्लॉग यांच्या पुढे गेले. त्यामुळे शेतकऱ्यांचे उत्पादन दुपटी ते तिपटीने वाढवण्यास मदत झाली. आज जगातील गव्हाचे उत्पादन २०० दशलक्ष टनांनी वाढले आहे. राजाराम यांच्या कर्तृत्वाचा हा बहुमान आहे. संजय हे जन्माने भारतीय, पण १९६८ साली पुढील शिक्षणासाठी ते ऑस्ट्रेलियास गेले आणि तेथून अमेरिकेत. सध्या ते मेक्सिकोचे नागरिक आहेत.   
१९४३ साली उत्तर प्रदेशातील एका शेतकरी कुटुंबात संजय राजाराम यांचा जन्म झाला. शाळेत असताना वाराणसीतील सर्वात हुशार असा बहुमान संजय यांनी मिळवला. राज्य सरकारची शिष्यवृत्ती मिळवून ते हायस्कूलमध्ये आले. तेथून त्यांनी १९६२ साली जौनपूर महाविद्यालयातून बीएएस ही कृषी विभागातील पदवी संपादन केली. त्यानंतर एम. एस. स्वामिनाथन यांच्या मार्गदर्शनाखाली उच्च प्रतीचे वाण तयार करण्यासाठी लागणारे संशोधन करत १९६४ साली त्यांनी पदव्युत्तर शिक्षण पूर्ण केले.
संजय यांना अनेक पुरस्कारांनी सन्मानित करण्यात आले आहे. यात भारताकडून पद्मश्री, अमेरिकेचे रँक पारितोषिक या पुरस्कारांचा समावेश आहे. पुरस्कार सतत कार्यशील राहण्यास प्रेरणा देतो. या पुरस्कारातून आलेली रक्कम मी जगातील गरिबांची भूक संपवण्यासाठीच वापरणार आहे, अशी विनयी हमी त्यांनी दिली आहे.