रासायनिक अभियंता डॉ. तारेक अबू हमेद (वय ४२) हे मूळचे पॅलेस्टिनी. पूर्व जेरुसलेममध्ये ते राहतात. इस्रायलचे पूर्ण नागरिकत्व नसतानाही त्यांची इस्रायलच्या विज्ञान तंत्रज्ञान मंत्रालयात उपमुख्य वैज्ञानिक म्हणून नेमणूक झाली आहे. त्यांनी अपारंपरिक ऊर्जा स्रोतांच्या क्षेत्रात मोठे काम केले आहे. ‘पॅलेस्टाइन व इस्रायल यांच्यात राजकारणापेक्षा विज्ञान-तंत्रज्ञान संशोधनातील सहकार्याला महत्त्व देणे गरजेचे आहे,’ असे त्यांचे मत आहे. विज्ञानाच्या मदतीने सांस्कृतिक व सामाजिक सहकार्य सहज शक्य आहे असे त्यांना वाटते. त्यांचा जन्म १९७२ मध्ये बेथलहेम येथे झाला. नंतर त्यांनी तुर्कस्तानात गाझी विद्यापीठातून बीएस्सी व एमएस्सी या पदव्या घेतल्या. अंकारा विद्यापीठातून रासायनिक अभियांत्रिकीची पदवी घेतली. मिनसोटा विद्यापीठ व ‘वेझमान इन्स्टिटय़ूट ऑफ सायन्स’ या इस्रायली संस्थेतून त्यांनी डॉक्टरेटनंतरचा अभ्यास केला. इस्रायल केमिस्ट्री सोसायटी, इस्रायल सस्टेनेबल एनर्जी सोसायटी व अमेरिकन सोलर एनर्जी सोसायटी या संस्थांचे ते सदस्य आहेत.
 पश्चिम किनारा व इस्रायली सीमेवरील सूर बहेर गावात त्यांचे बालपण गेले. उन्हाळ्यात तेथे येणाऱ्या लोकांच्या सहवासात राहून त्यांनी इंग्रजी भाषा शिकून घेतली, इतर संस्कृतींचा शोध घेतला. वैज्ञानिक सहसा भाषा व संस्कृतीच्या वाटय़ाला जात नाहीत, पण त्यांनी या दोन्ही गोष्टी विज्ञानास पूरक असल्याचे म्हटले आहे. पेट्रोलियम पदार्थाचे विघटन, पेट्रोल व डिझेलला पर्याय शोधण्यासाठी त्यांनी संशोधन केले. वेझमान संस्थेच्या आवारात असलेल्या क्लोर गार्डन येथील विज्ञान केंद्रात विद्यार्थ्यांच्या सहली घडवून त्यांना विज्ञानविषयक संकल्पना अधिक स्पष्ट करून सांगितल्या.
अरावा इन्स्टिटय़ूट फॉर एन्व्हायर्न्मेंटल स्टडीज या संस्थेच्या अपारंपरिक ऊर्जा केंद्राचे व्यवस्थापक म्हणून काम केल्यानंतर त्यांनी विज्ञान मंत्रालयातही व्यवस्थापक म्हणून दोन वर्षांपूर्वी काम सुरू केले होते. पर्यावरण क्षेत्रात सामाजिक जबाबदारीने काम करणाऱ्या हमेद यांना प्रतिष्ठेचे डॅन डेव्हिड पारितोषिक देऊन गौरवण्यात आले आहे. ‘बियाँड द डार्क माऊंटन्स’ या पत्रकार एलिझर यारी यांच्या पुस्तकात हमेद यांची मुलाखत आहे. त्यात ते म्हणतात की, सूर बहेर येथे राहून आपण व्यक्तिमत्त्व दुभंगाचा अनुभव घेतला, कारण पूर्व जेरुसलेममधला माणूस हा इस्रायली असतोही अन् नसतोही. जॉर्डनच्या पासपोर्टवर तो अरब जगात कुठेही भटकू शकतो. कुणाचेच नसलेल्या हमेद यांना विज्ञान मंत्रालयात मोठे पद देऊन ‘आपण कुणाचेच नाही’ ही त्यांच्या मनातील एक मोठी खंत इस्रायलने दूर केली आहे.