‘शिवाजी अंडरग्राऊंड इन भीमनगर मोहल्ला’ या नाटकाच्या निर्मात्यांमध्ये वाद उद्भवल्याचे वृत्त (लोकसत्ता, ९ फेब्रु.) वाचले. हे नाटक ज्या उद्देशाने रंगमंचावर आलेले आहे तो बघता हा वाद वेदनादायक आहे. ‘सृजन’ या अनियतकालिकाच्या दिवाळी अंकात नंदू माधव, संभाजी भगत, राजकुमार तांगडे, कैलाश वाघमारे, प्रवीण डािळबकर यांच्यासह राहुल भंडारे आणि युवराज मोहिते यांची या नाटकाच्या निर्मिती प्रक्रियेबद्दलची मते व्यक्त झालेली आहेत. त्या पाश्र्वभूमीवर हा वाद केवळ आíथक कारणांतून किंवा श्रेयासाठीच्या खोटय़ा संकल्पनांतून उद्भवलेला आहे. या नाटकाचा निर्माता कोण किंवा इतर बाबींपेक्षा या नाटकातून जो विचार मांडला जातोय तो आजघडीला अत्यंत महत्त्वाचा आहे. या नाटकाच्या यशाचे खरे श्रेय निर्माता-दिग्दर्शकांपेक्षा नाटकाची मूळ संकल्पना ज्यांची आहे त्या संभाजी भगत, लेखक राजकुमार तांगडे आणि त्यातील ग्रामीण भागातील शेतकरी कलावंतांचेच आहे हे विसरता कामा नये.
तेव्हा भीमनगर मोहल्ल्यात अंडरग्राऊंड असलेले हे निर्थक वाद नाटकाशी संबधित असलेल्यांनी गाडून टाकून नाटकाचा विद्रोही आशय समकालीन समाजाच्या गळी उतरवणे आणि तो पुढील पिढय़ांपर्यंत पोहोचविण्यावर आपले लक्ष केंद्रित केले तर फार बरे होईल.  
या नाटकाचं व्यावसायिक यश हे या नाटकाच्या निर्माता-दिग्दर्शकांना अनपेक्षित असावं. आता हे नाटक व्यावसायिक आणि सामाजिक अशा दोन्ही पातळ्यांवर यशस्वी ठरत आहे. या नाटकामुळे काही वाद निर्माण होतील अशी भीती संबंधितांना सुरुवातीला वाटत असावी ती आता नाटकाच्या यशस्वितेनंतर दूर झाली असावी आणि त्यामुळे आता हे असले क्षुल्लक वाद निर्माण होत असावेत. व्यवहार थोडासा बाजूला ठेऊन संबंधितांनी हे नाटक अधिकाधिक लोकांपर्यंत पोहोचवावं हीच अपेक्षा.
अरिवद सुरवाडे, उल्हासनगर

हा वैज्ञानिक दृष्टिकोन नाही!
‘महामार्गावरील अपघाताची चर्चा होते, मात्र रस्त्याच्या कडेला असलेल्या दारूच्या दुकानावर चर्चा होत नाही. ही दुकाने हलवली तर अपघात होणार नाहीत’ – ‘अंधश्रद्धा निर्मूलन समिती’चे  संस्थापक डॉ. नरेंद्र दाभोलकर यांचे हे उद्गार आहेत (लोकसत्ता ११ फेब्रु.). वैज्ञानिक दृष्टिकोनाचे प्रसारक डॉ. दाभोलकर यांनी असे म्हणणे हे आश्चर्यकारक तर आहेच शिवाय त्यांच्या वस्तुनिष्ठतेच्या भूमिकेशी ते विसंगतही आहे. रस्त्यावरील दारूची दुकाने हलवल्याने अपघात होणार नाहीत या त्यांच्या वाक्याला काय आधार आहे? मोटार अपघातांत दारू पिऊन गाडी चालवल्याने होणाऱ्या अपघातांचे प्रमाण जास्त असते हे मान्य करूनही दुकाने बंद करून अपघात कसे कमी होतील, हे समजायला मार्ग नाही. रक्तात विशिष्ट प्रमाणापेक्षा (१०० एम.एल. रक्तात ०.०३% पेक्षा जास्त) प्रमाणात अल्कोहोल असताना, म्हणजेच दारू पिऊन गाडी चालवू नये हा गुन्हा आहे आणि पोलीस सावध असतील आणि नियमाचे काटेकोरपणे पालन करणारे नागरिक असतील तर अशी वेळ येणारच नाही. जे वाहन चालवत नाहीत पण ज्यांना मद्याचा आस्वाद घायचा आहे त्यांच्यावर अशी सरसकट दुकाने बंद केल्याने अन्याय होईल.
 दुकान बंद करायला सांगणे म्हणजे मुलींनी तोकडे कपडे घालू नयेत म्हणजे बलात्कार होणार नाहीत, असे सांगण्यासारखे आहे .
दाभोळकर सरांनी असे विधान करताना आपल्या शास्त्रशुद्ध अशा वैचारिक बठकीला धक्का लागणार नाही याची काळजी घ्यायला हवी.
शुभा परांजपे, पुणे</p>

आनंद कसला? खंत वाटली पाहिजे
‘फाशीच्या दोराला लटकलेले राजकारण ’ (विशेष संपादकीय, १० फेब्रु.)मधील लोंबणाऱ्या राजकारणाचा लंबक आता कुठे झेपावतो ते पाहणे बाकी आहे. दिरंगाईने घेतलेल्या या निर्णयाची कारणे अनेक असू शकतात, पण माझ्या मते एक तर या वातावरणाचा फायदा घेऊन निवडणुका जाहीर होतील. या घटनेनंतर जे आनंदोत्सव वगरे साजरा करण्याचे प्रकार झाले ते जरा खटकतात. या घोर अपराध्याला योग्य शिक्षा झाली त्यात मोठा पराक्रम कसला आलाय? ती व्हायला सर्वोच्च न्यायालयाच्या निर्णयानंतरही आठ वष्रे लागली याची आपणा सर्वानाच खंत वाटली पाहिजे. फाशी देण्याचा निर्णय काँग्रेस‘श्रेष्ठींच्या’ होकारानंतरच झाला असणार हे उघड आहे, जणू हा एकटय़ा शिंदे यांचाच निर्णय आहे असे चित्र आता रंगवले जात आहे. पण हा निर्णय कुणाही एकटय़ाचा असू शकत नाही, हे लक्षात ठेवले पाहिजे.  
राम  ना. गोगटे, वांद्रे पूर्व.

म्हाडाच्या मैदानात.. ‘एका यज्ञासाठी’.. !
‘एका डुबकीसाठी’ हे शनिवारचं संपादकीय (९ फेब्रु.) आम्हाला फार भावलं. त्यातला धार्मिक उत्सवांचे आíथक-राजकीय फायदे हा मुद्दा एकदम पटला. कारण आम्ही शिवधाम संकुल, ओबेरॉय मॉलसमोर, िदडोशीचे रहिवासी याचा पुरेपूर अनुभव गेली नऊ र्वष घेत आहोत.
यज या संस्कृत धातूचा अर्थ त्याग. यज्ञ म्हणजे भक्तीपूर्वक पूजा आणि देवप्राप्तीसाठी त्याग,पण आजच्या काळातला यज्ञ त्याग नसून लाभ असतो. आमच्या संकुलात मध्यभागी असलेल्या, १९ इमारतींनी वेढलेल्या मदानात कुणी एक ‘मां वरदायिनी समिती’ सहस्रचंडी-नवकुंडी या नऊ-दहा दिवस चालणाऱ्या महायज्ञाचं आयोजन करत असते. ‘म्हाडा’ची मालकी असलेल्या या मदानात यज्ञ करण्यासाठी आयोजक रीतसर परवानगी घेऊन म्हाडाच्या शर्तीचा सपशेल भंग करत असतात. यज्ञात संकुल-रहिवाशांचा सहभाग नगण्य आणि बाहेरून हजारोंच्या संख्येने येणारी गर्दी. शेकडो पुरोहित-कार्यकत्रे- भक्तगणांचा मुक्काम दहा-बारा दिवस मदानातच पडलेला आणि  यज्ञविधीसोबतच त्यांचे शारीरिक विधीही मदानातच. ही ओंगळवाणी दृश्ये करणाऱ्यांना नाही; तरी बघावी लागणाऱ्यांना, विशेषत: महिलांना लाज आणणारी असतात.
मुलांच्या परीक्षा काळात सकाळपासून रात्रीपर्यंत ध्वनिक्षेपकावरून ‘स्वाहा..स्वाहा’चं कर्कश मंत्रोच्चारण, यज्ञकुंडामधून शेकडो किलो तूप, धान्य जाळणं, सकाळ-संध्याकाळच्या मेजवान्यांनंतरची उष्टी-खरकटी इतस्तत: फेकणं, यज्ञसमाप्तीनंतर स्टायरोफोमच्या थाळ्या, यज्ञकुंडांच्या ‘पवित्र’ विटा मदानात टाकून देणं हेही असतंच. महानगरपालिकेची पाण्याची नळवाहिनी बेकायदा फिरवून मुंबईच्या सामान्य करदात्यांच्या आíथक हिताविरुद्ध आयोजकांनी केलेल्या वर्तनाचे पुरावेही इथल्या रहिवाशांकडे आहेत.    
मुळात महाराष्ट्रात दुष्काळ असताना दहा दिवस शेकडो किलो तूप, धान्य धर्माच्या नावाखाली जाळणं समर्थनीय नाहीच. भारतीय संस्कृतीतल्या कुटील ब्राह्मणशाहीचा अवशेष म्हणून धिक्कारल्या गेलेल्या यज्ञसंस्थेचं अलीकडे होत असलेलं पुनरूज्जीवन निषेधार्हच आहे. या विशिष्ट यज्ञाचं बटबटीत व्यापारी स्वरूप, तिथे भक्तांनी देवीमांच्या नावे देणग्या, वस्तू, सोन्याचे दागिने देण्यासाठी केली जाणारी भडक आवाहनं, त्या बदल्यात संतान, फ्लॅट, नोकरीप्राप्तीची दाखवली जाणारी प्रलोभनं वगरेंचे निकटचे साक्षीदार असलेल्या संकुल-रहिवाशांना या यज्ञात धर्म, परमार्थ, भक्ती वगरे शोधूनसुद्धा सापडत नाही. आयोजकांचा आणि हितसंबंधीयांचा वैयक्तिक लाभ मात्र उघडपणे दिसतो.
अनेक वष्रे असे वेठीला धरले गेल्यानंतर सहनशक्तीचा कडेलोट झालेल्या  संकुल-रहिवाशांनी आता हा येत्या २४ फेब्रु.पासून आयोजलेला यज्ञ होऊ न देण्याचा निर्धार केला आहे. नियमांचा अभ्यास करून, म्हाडा आणि संबंधित यंत्रणांना अर्ज-विनंत्या करून, एकमेकांचे प्रबोधन करत, एकजूट ठेवत सनदशीर मार्गाने यंदा आणि नेहमीसाठीच यज्ञ रोखण्याचे प्रयत्न चालवले आहेत. यात महिला आघाडीवर आहेत. यंत्रणांवर आणि लोकप्रतिनिधींवर टीका करणाऱ्यांना मुद्दाम सांगायला पाहिजे की म्हाडा आणि कुरार पोलीस स्टेशन इथल्या अधिकाऱ्यांनी संवेदनशीलतेने आणि सामाजिक भान बाळगत रहिवाशांचं म्हणणं समजून घेऊन अजूनपर्यंत तरी यज्ञ-आयोजनास परवानगी दिलेली नाही. स्थानिक नगरसेवक सम्यक दृष्टीचे अ‍ॅड. ज्ञानमूर्ती शर्मा यांचाही रहिवाशांना पािठबा आहे.
तरीही काही राजकीय पक्ष आणि यज्ञाचे लाभार्थी गट दृढनिश्चयी रहिवाशांवर दबाव आणण्याचा प्रयत्न करत आहेत. त्यातच सदर यज्ञासाठी आमंत्रित महंतांनी रहिवाशांच्या विरोधाचा निषेध म्हणून दोनशे साधूंसह याच मदानात आत्मदहन करण्याचा इशारा दिल्याचंही आमच्या कानावर आलं आहे.
– हवनत्रस्त यज्ञबाधित निर्मल दुग्गल, मेधा कुळकर्णी, ऊर्मिला शर्मा, श्यामला कुळकर्णी, मृणाल रेडिज, प्राची दांडेकर, अरुणा लेले, नवनीता परमार आणि वसुधा तळाशीकर व अन्य  (शिवधाम संकुल नागरिक मंच)