News Flash

बुकमार्क : ‘दरबारी’ राजकारणाचे अंतरंग

गेल्या चार दशकांतल्या भारतीय राजकारणाचा पट जाणून घेण्यासाठी हे पुस्तक उपयुक्त ठरू शकते. तवलीन यांचे अनेक नेत्यांशी चांगले संबंध होते. त्यामुळे बरीच नवी माहिती कळण्यास

| August 3, 2013 01:01 am

गेल्या चार दशकांतल्या भारतीय राजकारणाचा पट जाणून घेण्यासाठी हे पुस्तक उपयुक्त ठरू शकते. तवलीन यांचे अनेक नेत्यांशी चांगले संबंध होते. त्यामुळे बरीच नवी माहिती कळण्यास मदत होते. मात्र काही ठिकाणी आपण तत्कालीन पंतप्रधान किंवा मंत्र्यांच्या किती जवळच्या वर्तुळात होतो हे दाखवण्याचाही खटाटोप त्यांनी केला आहे. दरबारी राजकारणाशी ते तसे सुसंगतच म्हणायला हवे.
आपल्याकडे दरबारी राजकारणाला एक वेगळाच अर्थ आहे. कार्यालय किंवा निकटवर्तीयांच्या कोंडाळ्यात बसून राजकीय सूत्रे हलवणे अशा अर्थाने हा शब्द वापरला जातो. ज्येष्ठ पत्रकार आणि स्तंभलेखिका तवलीन सिंग यांचे ‘दरबार’ हे पुस्तक  गेल्या चार दशकांतल्या राष्ट्रीय राजकारणाचे विविध पैलू उलगडते. बंदिस्त समाजवादी अर्थव्यवस्था ते बाजारचलित व्यवस्था हा प्रवास कसा झाला त्याचा आढावा त्यांनी घेतला आहे. देशभर फिरताना तसेच दिल्लीत प्रमुख राजकीय नेत्यांच्या अंतस्थ वर्तुळात वावरताना आलेले अनुभव, त्यामधून मिळणाऱ्या बातम्या रोचक पद्धतीने ‘दरबार’मध्ये तवलीन यांनी सांगितल्या आहेत.
१९८४ च्या लोकसभा निवडणुकीत राजीव गांधी यांच्या बाजूने लाट होती हे आपले भाकीत कसे बरोबर ठरले आणि इतरांना या लाटेचा अंदाज कसा आला नाही हे सांगताना त्यांनी थोडी फुशारकीही मारली आहे. याचबरोबर इंदिरा गांधी यांचा कालखंड, संजय गांधी यांचा उदय, आणीबाणी, सरकारी अधिकाऱ्यांचे आणीबाणीतले वर्तन यात आलेले अनुभव आणि सत्तेच्या जवळ असलेल्या व्यक्तींची वर्तवणूक याचे यथार्थ चित्रण केले आहे.
राजीव गांधी आणि सोनिया गांधी हे सुरुवातीच्या काळात राजकारणापासून अलिप्त होते. मित्रपरिवारातही राजकीय विषयांवर ते फारशी चर्चा करत नसत. पुढे दोघांवरही महत्त्वाच्या राजकीय जबाबदाऱ्या पडल्या. त्याचे विश्लेषण तलवीन सिंग यांनी केले आहे. राजीव गांधी आणि सोनिया यांच्या मित्रपरिवारात त्या होत्या. मैत्री निभावणे हा सोनियांचा उत्तम गुण त्यांनी नमूद केला आहे. त्याच वेळी राजीव गांधी पंतप्रधान असताना त्यांच्या धोरणावर टीकास्त्र सोडल्यावर सोनियांची झालेल्या खप्पा मर्जीचाही उल्लेख स्पष्टपणे केला आहे.
या पुस्तकातल्या अनेक गोष्टी वाचकांना आधीपासूनच माहीत असल्या तरी सत्तावर्तुळात राहिल्यानंतर यंत्रणा राबवणाऱ्यांची मानसिकता कशी असते, अधिकारी वर्गाची मनमानी कशी चालते हे सांगताना देशाची वाटचाल समाजवादाकडून मुक्त अर्थवस्थेत कशी झाली, त्याचे समाजजीवनावर कसे बदल झाले, हेही सुरेखपणे टिपले आहे.
आज ज्यांचे वय वीस ते पंचवीसच्या आसपास आहे, ती पिढी मुक्त आर्थिक धोरणाच्या कालखंडाच्या आसपास जन्मलेली आहे, त्यांना समाजवादी रचना, त्या वेळी नोकरशाहीची असलेली घट्ट पकड, समाजवादी अर्थव्यवस्थेच्या नावाखाली चाललेला भोंगळ कारभार याची माहिती या पुस्तकातून चांगल्या प्रकारे होऊ शकते. उदाहरणच द्यायचे झाले तर तत्कालीन पंतप्रधान चंद्रशेखर यांनी एक पदयात्रा काढली होती. त्या वेळी त्यांच्याबरोबर फिरत असताना उत्तर प्रदेशातील बलिया मतदारसंघातील परिस्थितीचे वर्णन तवलीन यांनी मार्मिकरीत्या केले आहे. समाजवादावर अढळ निष्ठा असलेल्या चंद्रशेखर यांच्या मतदारसंघात मूलभूत सुविधांचा अभाव होता, मात्र इतर अनावश्यक गोष्टींवर त्यांनी निधी कसा खर्च केला हे सांगत त्यांच्या विचारातला विरोधाभास त्यांनी पुढे आणला. अर्थात राष्ट्रीय नेते अशी प्रतिमा असल्याने चंद्रशेखर यांना या मतदारसंघातल्या मतदारांनी नेहमी साथ दिली हे त्यांनी आवर्जून नमूद केले आहे.
तवलीन यांचे अनेक नेत्यांशी चांगले संबंध होते. त्यामुळे बरीच नवी माहिती पुढे येते. सध्या केंद्रीय मंत्री असलेल्या जयंती नटराजन या राजीव गांधी यांच्या हत्येवेळी काँग्रेसच्या युवा नेत्या होत्या. तामिळनाडूतील श्रीपेरुम्बुदूर येथे राजीव यांची हत्या झाली, त्या दिवशी सभेच्या ठिकाणी नटराजन उपस्थित होत्या. मात्र राजीव गांधी यांच्या सूचनेवरून काही तरी आणण्यासाठी त्या बाजूला गेल्या, तेवढय़ात स्फोट झाला. मात्र नटराजन बचावल्या, हा प्रसंग त्यांनी नमूद केला आहे. आणीबाणीच्या काळातले संजय गांधी यांच्या निकटवर्तीयांचे वर्तन आणि सरकारी अधिकाऱ्यांच्या अरेरावीची अनेक उदाहरणे दिली आहेत. आणीबाणीत माहिती आणि प्रसारणमंत्री म्हणून इंदरकुमार गुजराल यांना हटवून एकाएकी विद्याचरण शुक्ला यांना हे खाते देण्यात आले. ‘हम करे सो कायदा’ या धारणेतून कशी दंडेली सुरू होती याचीही काही उदाहरणे त्यांनी दिली आहेत. प्राप्तिकर खात्याचा दुरुपयोग उद्योजक आणि राजेरजवाडय़ांना धमकावण्यासाठी व्हायचा. अधिकारी छापा टाकण्यासाठी जायचे आणि राजवाडय़ातून महत्त्वाच्या वस्तू घेऊन यायचे, मात्र सत्ताधीशांच्या भीतीपोटी बोलणे अवघड होते. अशा तपशिलांनी हे पुस्तक रोचक झाले आहे.
आणीबाणीतील राजकीय हालचालींची विशेष माहिती दिली नसली तरी माध्यमांवर कसे र्निबध होते, त्यामुळे ‘खऱ्या’ बातम्यांसाठी त्या काळी उपलब्ध असलेल्या एक-दोन परदेशी नभोवाणी वाहिन्यांवरच अवलंबून राहावे लागत होते. आणीबाणीनंतर भिन्न विचारांचे पक्ष एकत्र येऊन जनता पक्ष स्थापन झाला. मात्र त्यांचा कारभार भोंगळ कसा होता याची अनेक उदाहरणे तवलीन यांनी सांगितली आहेत. त्यापैकी तत्कालीन पंतप्रधान मोरारजी देसाई, चरणसिंह आणि इंदिरा गांधी यांचे जनता दरबार कसे चालायचे याची उदाहरणे मजेशीर आहेत. जनता दरबारात जरी काम मार्गी लागले नाही तरी बोलण्याची इंदिरा गांधी यांची हातोटी होती. मोरारजींनी जनता दरबारात समस्या मांडायला आलेल्यांनाच कसे सुनावले हे तवलीन यांनी लिहिल्यावर त्यांनी त्यांना बोलावून खडसावले. या घटनांतून त्या वेळच्या पंतप्रधानांचा अपरिपक्वपणा दिसतो.
आणीबाणीनंतर केवळ इंदिरा गांधी किंवा संजय गांधी यांच्यावर सूड उगवण्याच्या प्रयत्नात जनता सरकार अप्रिय झाले. त्या वेळी परराष्ट्रमंत्री असलेले अटलबिहारी वाजपेयी पंतप्रधान झाले असते, तर देशातील चित्र बदलले असते असे भाकीत वर्तवायला त्या विसरत नाहीत. त्यासाठी  त्यांनी त्यावेळी परराष्ट्रमंत्री असलेल्या वाजपेयी यांच्या कारकिर्दीचा आढावा घेतला आहे.
या पुस्तकात एका पक्षाला किंवा विचाराला अनुकूल भूमिका न घेता जे दिसले किंवा सत्तेच्या जवळ असलेल्या व्यक्तींशी बोलून काहीशा तटस्थपणे परिस्थिती मांडण्याचा प्रयत्न केला आहे. त्यात काही वेळा आपण तत्कालीन पंतप्रधान किंवा मंत्र्यांच्या किती जवळच्या वर्तुळात होतो हे दाखवण्याचाही खटाटोप आहे. इंदिरा गांधी पुन्हा सत्तेत आल्यावर संजय गांधी यांचे प्रस्थ कसे वाढले, १९७८ मध्ये राजीव गांधी यांची सार्वजनिक जीवनातली पहिली मुलाखत आपल्या तत्कालीन संपादकांना कशी मिळवून दिली याचा काहीसा गौरवाने उल्लेख आहे. संजय गांधी यांच्या अपघाती निधनाने हळूहळू राजीव राजकारणात सक्रिय झाले.
तवलीन यांनी केलेले पंजाबमधील दहशतवादाचे वर्णन शहारे आणणारे आहे. ऑपरेशन ब्लू स्टारच्या वेळी गुप्तचर यंत्रणेकडून नीट माहिती न मिळाल्याने लष्कराचे कसे नुकसान झाले याची खंत वरिष्ठ अधिकाऱ्यांनी व्यक्त केल्याची माहिती दिली आहे. ऑपरेशन ब्लू स्टारनंतर महिनाभरात जम्मू-काश्मीरमधील लोकशाही मार्गाने निवडून आलेले फारूख अब्दुलांचे सरकार बरखास्त करून इंदिरा गांधी यांनी चूक केली, त्याचे कसे दूरगामी परिणाम झाले, याबद्दलही त्या लिहितात.
इंदिरा गांधी यांची हत्या, त्याच वेळी त्यांच्या जवळच्या वर्तुळातील आर.के. धवन यांच्याबाबत घेण्यात आलेला संशय, याच गडबडीत तणाव असताना लपूनछपून धवन यांची नाटय़मयरीत्या कशी भेट घेऊन वस्तुस्थिती जाणून घेतली हे वाचताना अनेक गोष्टी उघड होतात. इंदिरा गांधी यांच्या हत्येनंतर राजीव गांधींवर ध्यानीमनी नसताना जबाबदारी पडली. जनता आशास्थान म्हणून राजीव यांच्याकडे पाहत होती. देशाला २१ व्या शतकात नेताना त्यांनी अनेक स्वप्ने पाहिली. राजीव यांची स्वच्छ प्रतिमा आणि संगणक क्रांतीसाठी सॅम पित्रोदा यांची घेतलेली मदत, मात्र या सगळ्यात संगणक आयात करण्याबाबतच्या धोरणात सातत्य नव्हते याबाबतचा विरोधाभास तवलीन यांनी पुढे आणला आहे. राजीव गांधी खऱ्या अर्थाने राजकारणी नव्हते. तरुणांमध्ये ते लोकप्रिय होते. मात्र बोफोर्स प्रकरणानंतर त्यांची लोकप्रियता कमी झाली.
तवलीन सिंग यांचा राजीव गांधी यांचे नातेवाईक अरुण नेहरू, त्यांच्या पत्नी यांच्या वर्तुळात राबता होता. आज राजकारणात झळकत असलेले नवीन पटनाईक, वसुंधरा राजे अशा भिन्न विचारांच्या व्यक्तींशीही त्यांची ओळख अशाच वर्तुळातून झाली. सुरुवातीला राजकारणाविषयी तिटकारा असलेल्या सोनिया नंतर हळूहळू राजकारणात सक्रिय होऊन काँग्रेसच्या सर्वोच्च नेत्या कशा झाल्या, याचे तपशीलवार वर्णन त्यांनी केले आहे.
थोडक्यात गेल्या चार दशकांतल्या राजकारणाचा पट जाणून घेण्यासाठी हे पुस्तक चांगले आहे.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on August 3, 2013 1:01 am

Web Title: durbar tavleen singh
Next Stories
1 नेट परीक्षेतील विसंवाद
2 मोदी यांचे तर्कशास्त्र!
3 अणुऊर्जेची ‘बंद’ चर्चा!
Just Now!
X