एकनाथी भागवतात दुसऱ्या अध्यायात, मनुष्यजन्माला येऊन भगवंताचं भजन करून माणूस काळावरही कशी मात करू शकतो, हे सांगण्याच्या ओघात एक फार महत्त्वाची ओवी आली आहे ती म्हणजे, ‘‘सांडूनि श्रीकृष्णचरण। इंद्रादि देवांचें करितां भजन। ते देव मृत्युग्रस्त पूर्ण। मा भजत्याचें मरण कोण वारी।।’’ या ओवीचा अर्थ जाणून घेताना आधी ‘श्रीकृष्ण’ म्हणजे कोण, हे लक्षात घेतलं पाहिजे. श्रीकृष्ण म्हणजे सद्गुरू. त्या सद्गुरूचे चरण म्हणजे त्याचा मार्ग, त्या मार्गानं होणारी वाटचाल. त्यांच्या चरणानुसार, त्यांच्या पावलामागे पाऊल टाकत मी जगू लागतो ते होतं सद् आचरण. त्यांच्या चरणानुसार वाटचाल चालू झाली की तोवरची भ्रमंती थांबते. तोवरची भ्रमंती मनाची होती. मन हे अकरावं इंद्रिय आहे. थोडक्यात माझ्या इंद्रियांच्या ओढीनुसार मी या जगात वावरत होतो. देव म्हणजे देणारा. इंद्रियं मला सुख देतात, शरीरश्रम वाचविणाऱ्या वस्तू मला सुख देतात, अनुकूल व्यक्ती मला सुख देतात, अनुकूल परिस्थिती मला सुख देते या भावनेनं सुख देणाऱ्या या इंद्रियरूपी, वस्तुरूपी, व्यक्तीरूपी, परिस्थितीरूपी देवांच्या भजनात मी दंग होतो. पण ही इंद्रियं नंतर शिथील होणार आहेत. त्यांची शक्ती क्षीण होणार आहे. ज्या शरीराची ही इंद्रियं आहेत ते शरीर तर नष्टच होणार आहे. वस्तू, व्यक्ती, परिस्थितीलाही हा बदलाचा आणि नाशाचा नियम लागू आहे. मग जे स्वत: मरणाच्या तोंडचा घास आहेत ते माझं मरण कसं दूर करणार? या ओवीला आणखी एक आधार आहे तो कृष्णचरित्रातलाच. गोकुळातले गोप इंद्राची वार्षिक पूजा करीत असत. श्रीकृष्ण त्यांना म्हणाले, त्यापेक्षा हा गोवर्धन पर्वत आमच्या गायीगुरांना चारा देतो, तो ढग अडवतो म्हणून पाऊसही पडतो. मग इंद्राऐवजी याच गोवर्धनाची पूजा का करू नये? मग गोकुळवासी त्या गोवर्धनाची पूजा करू लागतात. इंद्र खवळतो आणि वादळी वृष्टी सुरू करतो. गोवर्धनाच्या पूजेसाठी जमलेले बालगोपाळ आणि म्हातारेकोतारेही घाबरून जातात. कृष्ण त्यांना धीर देतो आणि सांगतो, हा गोवर्धनच आपलं रक्षण करील. मग एका करंगळीवर हा गोवर्धन तो तोलून धरतो आणि त्या खाली सर्वाना गोळा करतो. गोवर्धन एका करंगळीवर कसा काय तोलला जाईल, या विचाराने जो तो आपल्या हातातल्या लाठय़ाकाठय़ांनी टेकू द्यायचा प्रयत्न करतो. श्रीकृष्ण समजावतात, तुम्ही काही न करता आधी स्वस्थ बसा. तरी त्यांचा टेकू द्यायचा उद्योग थांबत नाही. गोवर्धन तोलला जात नाहीच पण त्यांचे हात मात्र दुखू लागतात. मग काहीजण विचार करतात, थोडा हात खाली तर घेऊन पाहू. हळुहळू सारेचजण हात खाली घेऊन शांत बसतात. एका हाताच्या करंगळीनं गोवर्धन तोलला आहे आणि दुसऱ्या हातात बासरी घेऊन कृष्ण ती वाजवू लागतात. त्या नादानं मुग्ध होऊन सारे गोपगोपी, मुलं, म्हातारीकोतारी, प्रौढ माणसं इतकंच काय, गायीगुरंही कृष्णाभोवती गोळा होऊन चित्रवत बसतात. बाहेरच्या वादळाची जाणीवही उरत नाही, मग भीतीचा तर प्रश्नच नाही! या कथेचा गूढार्थ आपण ‘पूर्ण-अपूर्ण’ या सदरातही पाहिला होताच. तो पुन्हा पाहू.