11 December 2017

News Flash

बेरजेनंतरची वजाबाकी

मुख्यमंत्रिपदाचा शपथविधी ही तशी काही एरवी खास नोंद घ्यावी अशी घटना नव्हे. तो एक

मुंबई | Updated: December 28, 2012 4:06 AM

मुख्यमंत्रिपदाचा शपथविधी ही तशी काही एरवी खास नोंद घ्यावी अशी घटना नव्हे. तो एक उपचार असतो. परंतु गुजरातचे मुख्यमंत्री यांनी या साध्या प्रशासकीय उपचारास राष्ट्रीय राजकारणाच्या कोंदणात बसवले आणि त्यामुळे त्यांचा शपथविधी हा आगामी घटनांची नांदी आहे किंवा काय अशी कुजबुज सुरू झाली. भाजपप्रणीत राष्ट्रीय लोकशाही आघाडीचा चेहरा हा असा असेल असे गांधीनगर येथील शपथविधीच्या अनुषंगाने सांगितले जात असून त्यामुळे या शपथविधीकडे बारकाईने पाहावे लागेल. नरेंद्र मोदी यांचा सलग विजय ही त्यांच्या राजकीय क्षमतेची चुणूक आहे, यात शंका नाही. राज्याच्या खेळपट्टीवर मोदी आता चांगलेच स्थिरावलेले असल्याने त्यांना अधिक आव्हानात्मक परिस्थितीची गरज वाटू लागली असल्यास त्यातही काही गैर आहे असे म्हणता येणार नाही. हे राष्ट्रीय आव्हान पेलायचे तर त्यांना अनेकांची साथ लागेल. मोदी यांच्यासारखेच देशभरात अनेक राज्यांत विखुरले गेलेले अनेक सुभेदार आहेत. त्यांना मोदी यांच्याइतके वलय नसेल कदाचित. परंतु मोदींइतकीच कार्यक्षमता त्यांनीही दाखवलेली आहे. तेव्हा अशा अनेकांची मदत मोदी यांना लागणार हे उघड आहे. त्या मदतनिधी संकलनाची सुरुवात मोदी यांनी स्वत:च्या शपथविधीपासूनच केली. त्यामुळे प्रकाशसिंग बादल ते ओमप्रकाश चौताला ते जयललिता ते ठाकरे बंधू ते रामदास आठवले आदींनी या शपथविधीस उपस्थित राहून मोदी यांच्याबरोबर आपले कसे सौहार्दाचे संबंध आहेत ते दाखवण्याचा प्रयत्न केला. यातील काहींची गरज मोदींना लागणार आहे तर काही जण मोदी यांच्या मदतीवर अवलंबून आहेत. तेव्हा त्या अर्थाने हा शपथविधी म्हणजे समानधर्मीयांचे संमेलन ठरले आणि त्यात काहीही अनुचित नाही. परंतु या सगळय़ातून काय साध्य होऊ शकेल याचा विचार करावयास हवा.
महाराष्ट्रातून शिवसेनेचे कार्याध्यक्ष उद्धव ठाकरे, महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे राज ठाकरे आणि रिपब्लिकन पार्टीचे रामदास आठवले असे तीन बिगर भाजप नेते या शपथविधीस उपस्थित राहिले. यापैकी राज ठाकरे यांचे मोदीप्रेम सर्वश्रुत आहे आणि उभयतांनी ते कधी लपवण्याचा प्रयत्न केलेला नाही. गुजराती मोदींची मराठी आवृत्ती बनण्याचा राज ठाकरे यांचा प्रयत्न असल्याचे बोलले जाते. तेव्हा मोदी यांच्या शपथविधीस राज यांना खास निमंत्रण आले त्यात काही नवल नाही. परंतु तेथे राज गेले आणि उद्धव नाही असे चित्र निर्माण झाले असते तर त्यामुळे सेनेची पत अधिकच घसरली असती. त्यामुळे उद्धव ठाकरे यांनीही तेथे हजेरी लावली. जोपर्यंत उद्धव यांचे तीर्थरूप, शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे हयात होते तोपर्यंत मोदी हे खरे आणि पहिले हिंदुहृदयसम्राट नाहीत अशी सेनेची अघोषित भूमिका होती. त्यामुळे सेनाप्रमुख असताना सेनेने मोदी यांना फारसे महत्त्व दिले नाही. तसे ते दिले असते तर सेनेची नव्याने पांघरली गेलेली हिंदुत्वाची झूल विरली असती. परंतु सेनाप्रमुख काळाच्या पडद्याआड गेल्याने सेनेस नव्या हिंदुहृदयसम्राटाची गरज लागणार हे उघड आहे. ती पूर्ण झाली नाही तर सेनेचे अनेक बुरूज ढासळतील असे स्पष्ट जाणवू लागल्याने उद्धव ठाकरे यांनाही गांधीनगरास जावे लागले. मूळ आश्रयदाते असलेल्या शरद पवार यांनी पाठ फिरवल्यापासून रिपब्लिकन रामदास आठवले हे मिळेल त्या राजकीय ताकदीस लोंबकळण्याच्या प्रयत्नात असतात. सध्याच्या त्यांच्या सेनाप्रेमामागे हे कारण आहे. त्यामुळे उद्धव यांचे बोट धरून तेही जातीय, धर्माध वगैरे मोदींच्या शपथविधीस हजर राहिले. हा चळवळीचा विजय आहे वगैरे शहाजोगपणा आता त्यावर ते करतीलही. परंतु त्यांना आणि त्यांच्या युक्तिवादास विद्यमान राजकीय व्यवस्थेत काडीचीही किंमत नाही. रामदास आणि त्यांचे सध्याचे आश्रयदाते उद्धव ठाकरे यांची काळजी वेगळीच आहे. २०१४ च्या निवडणुकीत मोदी यांच्या नेतृत्वाखाली भाजपने महाराष्ट्रात राज ठाकरे यांच्या मनसेशीही पाट लावायचा आग्रह धरला तर आपले काय होईल, ही या मंडळींची विवंचना आहे. तामिळनाडूतून अण्णा द्रमुकच्या जयललिता यांनी या शपथविधीस हजेरी लावणे राष्ट्रीय राजकारणाच्या दृष्टिकोनातून महत्त्वाचे आहे. गेल्या निवडणुकीत भाजपचे द्रविडी गणित चुकले म्हणून वाजपेयी यांची सत्ता गेली. तेव्हा मोदी त्या आघाडीवर आतापासूनच मोर्चेबांधणी करू लागले आहेत. खेरीज, त्या राज्यात भाजपस स्थान आणि भवितव्य दोन्हीही नाही. तेव्हा जयललिता यांच्याशी मोदी यांनी सौहार्दाचे संबंध ठेवणे हे बेरजेचे राजकारण झाले. पंजाबातून प्रकाशसिंग बादल आणि त्यांचा अकाली दल आताही भाजपबरोबर आहे. तेव्हा शपथविधीस बादल यांची उपस्थिती फार काही वेगळे सांगणारी नाही. तीच गत शेजारील हरयाणाच्या चौताला यांची. त्यातही धक्का बसावे असे काही नाही. या शपथविधीतील अनुपस्थितीची दखल घ्यावी असे नेते तीन. एक बिहारचे नितीशकुमार. त्यांच्या जनता दलाने मोदी यांना सातत्याने विरोध केला आहे. त्यामागे बिहारातील राजकारण आहे. त्या राज्यात मोठय़ा प्रमाणावर असलेल्या मुसलमानांना मोदी यांच्यासाठी दुखावण्याची चूक नितीशकुमार करण्याची सुतराम शक्यता नाही. पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांच्याबाबतही हेच म्हणता येईल. त्या राज्यातही मुसलमानांची संख्या लक्षणीय आहे. तेव्हा ममता बॅनर्जी उपस्थित राहिल्या असत्या तर ते आश्चर्य ठरले असते. या दोन मुख्यमंत्र्यांपैकी नितीशकुमार हे मोदी यांचे कडवे विरोधक आहेत आणि ममता बॅनर्जी यांचा भरवसा कोणालाच देता येणार नाही अशी परिस्थिती आहे. तिसरी लक्षणीय अनुपस्थिती होती ती बिजू जनता दलाचे प्रमुख आणि ओदिशाचे मुख्यमंत्री नवीन पटनाईक यांची. ते अर्थातच नितीशकुमार यांच्यासारखे कडवे मोदीविरोधक नाहीत. या भाजपेतर नेत्यांच्या जोडीला मोदी यांच्या स्वपक्षीय वसुंधराराजे, नितीन गडकरी, लालकृष्ण अडवाणी, मनोहर र्पीकर, शिवराजसिंग चौहान अशा सगळय़ांनीच हजेरी लावली. याचा अर्थ भाजपने आता मोदी यांच्या नेतृत्वाची अपरिहार्यता मान्य केली असा होऊ शकतो.
तथापि मोदी यांच्या सलग तिसऱ्या विजयाने भाजपच्या राष्ट्रीय स्वप्नांना पंख मिळाले असले तरी त्यातील एका त्रुटीची आठवण त्या पक्षास करून द्यायलाच हवी. ती म्हणजे अटलबिहारी वाजपेयी यांची वा तत्सदृश नेतृत्वाची. आक्रमक हिंदुत्वाने गुजरात राज्याच्या छोटय़ा अंगणात मोदी यांना विजयी करून दिले असले तरी राष्ट्रीय पातळीवर गेल्यास मोदी यांना सर्वात मोठी उणीव जाणवणार आहे ती वाजपेयी यांची. मोदी यांच्याप्रमाणेच त्यांचे पूर्वसुरी लालकृष्ण अडवाणी यांनी भाजपस हिंदुत्वाच्या बळावर विजयाच्या समीप आणले. त्यांच्याच काळात भाजपच्या लोकसभा सदस्यांची संख्या १९८४ साली फक्त दोन होती ती १९९१ साली १२० वर गेली. परंतु सत्तेचे नेतृत्व करायची जेव्हा वेळ आली तेव्हा कर्कश अडवाणी यांच्यापेक्षा सौम्य वाजपेयी हे अनेकांना स्वीकारार्ह वाटले. जवळपास २२ पक्षांची मोट बांधत सरकार चालवणे वाजपेयी यांनाच जमले ते त्यांच्या लाघवी सहिष्णुतेमुळे.
या सहिष्णू नेतृत्वाचा पूर्ण अभाव आज मोदी आणि भाजप यांच्यात आहे. शपथविधीच्या समारंभास इतक्या सगळय़ा नेत्यांना आणून आपण बेरजेचे राजकारण करू शकतो हे दाखवण्यात मोदी यांना यश आले, हे मान्यच. परंतु या अंकगणितात आवश्यक तो हातचा घेण्यासाठी वाजपेयी यांच्यासारखी सहिष्णुता मोदी आणि भाजपला दाखवावी लागेल. अन्यथा बेरीज होऊनही पदरी वजाबाकीच पडण्याचा धोका अधिक.

First Published on December 28, 2012 4:06 am

Web Title: editorial on narendra modi oath