राजकीय वादामुळे आणि त्यातून आलेल्या कटुतापूर्ण अप्रियतेमुळे काळही त्यांना झिडकारेल, इतकी अनंतमूर्तीची योग्यता नक्कीच लहान नाही. स्वत:च्या काळाबद्दल भविष्याच्या काळजीपोटी लिहिणारा आणि हेही लिखाण रंजक करणारा साहित्यिक आपण गमावला आहे.
‘संस्कार’ या शब्दाला आज जे वजन, जे वलय आणि जे महत्त्व प्राप्त झाले आहे, ते १९६० च्या काळात होतेच असे त्या काळचे साहित्य पाहून तरी म्हणता येणार नाही. यापुढे ज्यांचे नाव ‘दिवंगत’ म्हणून घ्यावे लागेल, ते कन्नड साहित्यिक यू आर अनंतमूर्ती हे त्या साठच्या दशकातच बहरले आणि ‘साठीच्या दशकाचा बंडखोर झेंडा’ त्यांच्याही खांद्यावर अनेकांनी पाहिला. त्या दशकापूर्वी, ‘ब्राह्मण नाही हिंदुहि नाही, न मी एक पंथाचा’ यासारख्या ओळी लिहिणारे केशवसुत कन्नडमध्ये नव्हते. त्या भाषेत डावी ‘प्रगतिशील साहित्य’ चळवळ होऊ पाहात होती, ती पुरेशी रुजलीच नाही. साहित्यात लघुकथा, कादंबरी अशा घाटांचे प्रयोग करणारे शिवराम कारंथ आणि मस्ति व्यंकटेश अय्यंगार हेच आपले पूर्वसुरी, असे नव्या कन्नड साहित्यिकांना साठच्या दशकातही मान्य करावे लागले. मात्र त्या परंपरांचे ओझे खांद्यावर घेण्यात अर्थ नाही, आपण आपल्याच काळाच्या प्रश्नांना भिडायचे आहे, हे ठरवणाऱ्यांपैकी एक म्हणजे उडुपि राजगोपालाचार्य अनंतमूर्ती.
देशभर कीर्ती पसरावी असे अनेक प्रसंग अनंतमूर्तीच्या आयुष्यात आले. कर्नाटक सरकारने त्या राज्यातील सर्वोच्च साहित्यपुरस्कार त्यांना दिलेले होतेच, पण ज्ञानपीठ – तेही कन्नड साहित्यातील एकंदर योगदानाबद्दल- २० वर्षांपूर्वी त्यांना मिळाले आणि १९९८ मध्ये पद्मभूषण सुद्धा. शिवाय, याच काळात ते नॅशनल बुक ट्रस्ट आणि साहित्य अकादमीचे पदाधिकारी या नात्याने कार्यरत होते. त्या निमित्ताने देशभरच्या साहित्यिकांत त्यांची नित्य ऊठबस होती. परंतु मे २०१४ मध्ये त्यांना प्रसिद्धी मिळाली ती नरेंद्र मोदी सत्तेत आल्यास मला हा देश सोडून जावेसे वाटेल, अशा वक्तव्यामुळे. राजकारणात बहुसंख्यांना अप्रिय ठरणारी वक्तव्ये कोणीही, कितीही सकारण आणि मनापासून केली, तरीही अशा वक्तव्याला वावदूक आणि ते करणारांना प्रसिद्धीस हपापलेले ठरवून टाकण्याची राजकीय सोय असते. ती सोय अनंतमूर्तीना झिडकारण्यासाठी फार उपयोगी पडली. इतकी की, एकही साहित्यिक त्यांच्या बोलण्याचा अर्थ तरी समजून घ्या असे म्हणावयास उठला नाही. तरीही, नेत्यावर आपले प्रेम किती हे त्याच्या विरोधकांचा आपण द्वेष किती करतो यावरूनच ठरणार, असे मानणाऱ्या काहीजणांनी अनंतमूर्तीना धमक्या दिल्या. अखेर अनंतमूर्तीचे वक्तव्य काहीही असले तरी मोदी सत्तेत आलेच, तेव्हाही अनंतमूर्तीना पाकिस्तानचे तिकीट पाठवतो आहोत असा देखावा स्वतला मोदीसमर्थक म्हणवणाऱ्यांनी केला होता. अनंतमूर्ती यांनी ब्रिटनमधील बर्मिगहॅम विद्यापीठातून पीएच.डी. केली,  पेंग्विन हे त्यांचे प्रकाशक, ब्रिटनमध्ये राहणारे काही भारतीय साहित्याभ्यासक अनंतमूर्ती यांना मानणारे, परंतु अनंतमूर्ती देश सोडून जाणार म्हणजे पाकिस्तानातच जाणार, असे या राजकीय कार्यकर्त्यांनी ठरवल्याचे यातून दिसले होते.
राजकीय वादामुळे आणि त्यातून आलेल्या कटुतापूर्ण अप्रियतेमुळे काळही त्यांना झिडकारेल, इतकी अनंतमूर्तीची योग्यता नक्कीच लहान नाही. त्यांना फारतर डावलले जाईल, त्यांच्या साहित्याला अनावश्यक मानले जाईल, कदाचित उद्या देशातील विद्यापीठांनाही अनंतमूर्तीचे साहित्य अभ्यासाला लावण्याचा निर्णय राजकीयदृष्टय़ा व्यवहार्य नसल्याचा साक्षात्कार होईल. तेवढय़ाने अनंतमूर्तीचे साहित्य अभ्यासण्यायोग्य नाही, असा अर्थ निघू शकणे निव्वळ अशक्य आहे. हे खरे की, अनंतमूर्ती हे बहुप्रसवा आणि सर्वसंचारी लेखक. कादंबरीकार हीच त्यांची चिरस्थायी ओळख, परंतु ‘क्लिप जॉइंट’सारख्या महत्त्वाच्या कथेसह अनेक लघुकथा, काही कविता, कैक टीकालेख, यांखेरीज नैमित्तिक समीक्षा, स्फुटलेख असेही लेखन विपुल करणारे. परंतु साहित्यकृतींच्या संख्याबळापेक्षा त्यांचा पीळ महत्त्वाचा मानला, की मग अनंतमूर्तीची महत्ता कळू लागेल. त्यांनी जाती-वर्गप्रधान, पुरुषप्रधान वास्तवाचा आधुनिक काळातील फोलपणा उघड केला, असे त्यांचे मूल्यमापन तर गेल्या काही वर्षांत झालेलेच आहे. परंतु साठच्या दशकातील बरेच साहित्यकर्मी हे गोष्ट सांगावी की  नाही, नवा फॉर्म- आकृतिबंध वापरला नाही तर आपण नवे कसे ठरणार, आदी फजूल प्रश्नांच्या जंजाळात फसू लागले होते, त्या वेळी अनंतमूर्तीनी धाडस दाखवले. गोष्टच सांगण्याचे धाडस. प्रसंगांतून पुढे जाणारी गोष्ट. प्रसंगदेखील कलाटणीदार. पात्रांचे स्वभावदर्शन पुढे जाणार तेही प्रसंगांद्वारेच. अरेषीय कथन वगैरे योजून कथानक जटिल करण्याच्या नव-फंदात अनंतमूर्ती पडत नसत. परंतु त्यांचे बळ त्यांच्या कथानकाच्या आत ज्या न सुटलेल्या गाठी असतात त्यांमध्ये होते. या गाठी थेट आपल्याच भारतीय परंपरांच्या. त्यात या परंपरेचे जे स्थानिक रूप उडुपि- कारवार- उत्तर कर्नाटक भागात अनंतमूर्ती यांनी लहानपणापासून पाहिले, ते म्हैसूरच्या विद्यापीठात इंग्रजी वाङ्मय शिकताना किंवा पुढे ब्रिटनमध्ये गेल्यावर त्यांना भयावहरीत्या जुने, किडके वाटले असणे साहजिक आहे. परंतु हा किडकेपणा कथानकातूनच उघड होत-होत वाचकांपर्यंत कसा पोहोचेल, याकडे अनंतमूर्तीनी लक्ष दिले. समाजकथन करण्यासाठी व्यक्तीदर्शन, असे त्यांच्या पात्रांचे स्वरूप असे. समाजाचे रूप दाखवण्यासाठी लिहिणारा तो साहित्यिक, हीच त्यांची एका अर्थाने राजकीय भूमिका होती. यामुळेच त्यांनी अनेक समकालीनांचा स्नेह गमावला.  
हा समाजकथनाचा आग्रह त्यांच्यानंतर आलेल्या कन्नड साहित्यिकांना अप्रस्तुत वाटला. अनंतमूर्ती कन्नड साहित्यात ‘नवोदय’ आणणाऱ्यांपैकी होते, तर त्यांच्या नंतरचे नवोदयी साहित्यिक व्यक्तिनिष्ठ- मानसिक आंदोलनांचे चित्रण करणारे लिखाण करू लागले. याहीपेक्षा, अनंतमूर्तीना अभिप्रेत असणारा समाज आहे तरी कोणता? जो समाज ते कादंबऱ्यांतून दाखवत आहेत ते निव्वळ रूपक आहे.. समाज असा असू नये म्हणत अनंतमूर्ती हे अखेर काहीशा नेहरूवादी स्वप्नाळू समाजरचनेकडे बोट दाखवत आहेत, असाही आक्षेप होता. मला अमुकवादी – तमुकवादी ठरवणार असाल तर मी गांधीवादी समाजवादी आहे हे मीच सांगतो, अशी कबुली अनंतमूर्ती स्वतच देत. पण टीकाकार हेच स्पर्धक आणि त्यांचा त्वेष हाच द्वेषदेखील, अशी समीकरणे असल्यामुळे काहीवेळा अनंतमूर्ती हे जणू खलनायक आहेत, अशा थाटात त्यांच्याविषयी बोलले जात असे.
या टीकाकारांनी, स्पर्धकांनी, द्वेष्टय़ांनी अनंतमूर्ती यांच्या संस्कार, भारतपुत्र अशा अव्वल कादंबऱ्या वा त्यांची भाषांतरे वाचली पाहिजेत. दलित, ब्राह्मण हीदेखील रूपकेच आहेत हा आक्षेप पटण्याजोगा आहे. पूर्वास्पृश्य वा पूर्वउच्चांबद्दल या लेखकाला काही म्हणायचे नव्हते. त्याला आजच्या- त्याच्याच- काळाबद्दल आणि भविष्याच्या काळजीपोटी काही बोलायचे होते. परंपरांना चिकटून बसणारा समाज प्रलोभनांशी कसा वागतो आणि थेट पोटाचा प्रश्न आला की कोणत्या तडजोडी करायला तयार होतो, मग या तडजोडीच्या टेकीस आलेल्या समाजातून लाभांचे लोणी कोण खातो, असे प्रश्न त्यांच्या ‘संस्कार’मधून समजले, तर या कादंबरीचे सार्थक झाले असे म्हणता येईल. कादंबरीचे कथानक रंजक आहे. कुठल्याशा ब्राह्मणबहुल गावातील एक बदफैली, बदनाम माणूस मरतो. त्याला जातिबहिष्कृत केलेले नसल्यामुळे त्याच्या अंत्यसंस्कारांचा प्रश्न निर्माण होतो, पण कोणीही हे अमंगळ काम करण्यास तयार नसते. या बदनाम माणसाचे ‘अंगवस्त्र’ असलेली चंद्रा पैशाचे- दागिन्यांचे आमीष दाखवते, तरीही लोकलज्जेस्तव त्याला न बधता गाव उपासात दिवस काढू लागते, अखेर तडजोड होते, पण ती अशी की, जाणारा गेला आणि आपण राहिलो- ते आपण आता कसे आहोत- याची जाणीव गावातील प्रत्येकाला व्हायला हवी. याच अस्वस्थतेनिशी गोष्ट संपते.
पण अनंतमूर्तीची ‘दिवंगत’ गोष्ट आता सुरू झाली आहे. ते गेले, आपण उरलो आहोत. आपण त्यांना बंगलोरचे नाव बेंगळूरु करा सुचवणारे म्हणून लक्षात ठेवणार की त्यांच्या कादंबऱ्यांनी उपस्थित केलेल्या प्रश्नांसाठी त्यांचे कृतज्ञ राहणार, हा प्रश्न आहे.