चांगले शिक्षण महाग असते किंवा त्यासाठी प्रचंड खर्च करावा लागतो, या भ्रमातून मुक्त होण्याचा प्रयत्न करणाऱ्या मुंबईच्या प्रेमा जयकुमार आणि कोल्हापूरच्या धनश्री तोडकर या दोन युवतींचे अभिनंदन करत असताना त्यांचे अनुकरण होण्याची गरजही व्यक्त करायला हवी. या दोघींनी चार्टर्ड अकौंटंटच्या परीक्षेत जे उज्ज्वल यश मिळवले, ते त्यांच्या कष्टाचे आणि अभ्यासाचे फलित आहे. समाजातील सर्व प्रकारच्या दुर्बल घटकांतील मुलांमध्येही उत्तम शिक्षण मिळवण्याची जी धडपड दिसून येते, त्याचे दर्शन चार्टर्ड अकौंटंटसारख्या अतिशय अवघड आणि प्रतिष्ठित अभ्यासक्रमाच्या निकालावरून घडते. देशातील एकमेव मान्यताप्राप्त संस्था म्हणून ‘दि इन्स्टिटय़ूट ऑफ चार्टर्ड अकौंटंट्स ऑफ इंडिया’ या संसदेने विशेष ठराव करून स्थापन केलेल्या संस्थेला जी जगन्मान्यता मिळाली, त्याचे कारण देशातील अतिशय ज्येष्ठ व्यावसायिक तिचे निरलसपणे संचालन करतात. वशिलेबाजी, भ्रष्टाचार आणि राजकारण यापासून मुक्त राहून केवळ उच्च दर्जाचे शिक्षण देणारी ही संस्था भारतातील सर्व संस्थांच्या हिशोब तपासणीतील कच्चे धागे शोधून काढणारे चार्टर्ड अकौंटंट घडवत असते. रिक्षाचालकाची मुलगी म्हणून प्रेमा जयकुमारने आणि चहाचा गाडा चालवणाऱ्याची मुलगी म्हणून धनश्री तोडकरने अतिशय विपरीत परिस्थितीशी झुंज देत हे यश मिळवले आहे. या परीक्षेत केवळ बौद्धिक क्षमतांचीच कसून तपासणी होत असल्याने फक्त अभ्यास करण्याने अणि चिकाटी दाखवल्याने त्यात यश मिळू शकते, हे या दोघींनी सिद्ध केले आहे. वैद्यकीय, अभियांत्रिकी, व्यवस्थापन, विधी यांसारख्या विद्याशाखांमध्ये प्रवेश मिळवण्यासाठीच प्रचंड पैसे जमवावे लागतात. प्रवेश मिळवल्यानंतर अभ्यासक्रम पूर्ण होईपर्यंत प्रचंड प्रमाणातील शुल्क आणि अन्य साधनांवरील खर्च यामुळे पालक अक्षरश: बुडून जातात. एवढा खर्च करून मिळणाऱ्या या शिक्षणाची तुलना शेतीतील ‘नगदी पिकां’शी केली जाते. याचा अर्थ ही जी आर्थिक गुंतवणूक केली जाते, ती नंतरच्या काळात दामदुपटीने वसूल करणे भाग पडते. चार्टर्ड अकौंटंट हा अभ्यासक्रम देशातील अगदी हाताच्या बोटावर मोजता येणाऱ्या अशा प्रतिष्ठित आणि उत्तम आर्थिक कमाई मिळवून देणाऱ्या अभ्यासक्रमांपैकी एक आहे. त्यासाठी एकूण शुल्क ४० हजार रुपयांच्या घरातले आहे. अभ्यासक्रमाच्याच काळात करावयाच्या उमेदवारीसाठी त्या विद्यार्थ्यांला सुमारे ५४ हजार रुपये स्टायपेंड मिळते. केवळ अभ्यासावर आणि कष्टावर अवलंबून राहून हा अभ्यासक्रम पूर्ण करता येतो हे लक्षात घेऊन या दोन्ही मुलींनी आपले भविष्य घडवण्याचा घेतलेला निर्णय अतिशय कौतुकाचा आहे. गेल्या काही वर्षांमध्ये व्यावसायिक अभ्यासक्रम ही दुभती गाय झाली आहे आणि समाज त्याचा बळी बनत आहे, अशा स्थितीत अतिशय कठोर दर्जा टिकवणाऱ्या या अभ्यासक्रमाच्या वाटेला जाऊन यश मिळवणे ही सोपी गोष्ट नाही. देशात आजमितीस फक्त दोन लाख चार्टर्ड अकौंटंट्स आहेत आणि हे प्रमाण दर दहा हजार लोकांमागे १.६ एवढे आहे. अमेरिकेतील हेच प्रमाण १५, तर ब्रिटनमध्ये १८ आणि ऑस्ट्रेलियात २२ असे आहे. यंदा या परीक्षेस बसलेल्या ३०,९७६ विद्यार्थ्यांपैकी फक्त ५०७५ विद्यार्थ्यांना उत्तीर्ण होता आले, तर  या अभ्यासक्रमाच्या प्रवेशासाठी बसलेल्या १ लाख ४९ हजार विद्यार्थ्यांपैकी फक्त ५६ हजार विद्यार्थी उत्तीर्ण झाले आहेत. अशा अभ्यासक्रमात या दोन कंपन्यांनी मिळवलेले यश नुसते उज्ज्वल नाही, तर देशातील नव्या सामाजिक जाणिवांचे द्योतक आहे.