‘विश्वासार्हता विज्ञानाकडेच’ हे प्रा. यशवंत वालावलकर यांचे पत्र (लोकमानस, १५ ऑक्टो.) कथित धर्मिकांसह अनेकांच्या डोळ्यात अंजन घालणारे आहे. या छोटय़ाशा पत्रातून, झोपलेल्यांनी आणि झोपेचे सोंग घेतलेल्यांनी योग्य बोध घ्यावा. वास्तविक विज्ञान आणि मानवतावाद यांचा प्रचार आणि प्रसार हे प्रत्येक भारतीयाचे घटनादत्त कर्तव्य आहे. शिक्षणाच्या गाभाघटकात त्याचा समावेश आहे. असे असतानाही आज विज्ञानाकडे पाठ फिरवून अज्ञानाची उपासना होते आहे. आज शालान्त शिक्षणापर्यंत विज्ञानाकडे विषयाची रचना निश्चितपणे अशी आहे की, त्यामुळे अज्ञानाची जळमटे २५ वर्षांपूर्वीच हटायला हवी होती.
उदाहरणार्थ, आठवीत शिकलेला ‘ऊर्जा अक्षयते’चा नियम सांगतो की, विश्वात ऊर्जा निर्माण करता येत नाही किंवा नष्ट करता येत नाही. इतके शिकल्यावर हवेतून चेन, भस्म, अंगठी.. काढण्यावर विश्वास कसा काय बसू शकतो? खरेतर यापकी विज्ञानाचा नियम किंवा बाबा-बापूंची लबाडी यातले एकच सत्य असू शकते. समजा विज्ञानाचा नियम खोटा असेल तर मग दिसणारे टीव्हीवरचे चित्रही खोटे मानायला हवे! इतके विज्ञानाचे सत्य साधेसरळ आहे. मात्र मठांतली गर्दी वाढतच जाते. कोणीतरी भोंदू म्हणतो म्हणून आपण खजिना शोधू पाहतो आहोत! यात आपले नेतृत्वदेखील मागे नाही याचे कारण कार्यकारणभाव तपासण्याची बुद्धी माणसाला मिळालेली असतानाही त्याचा विचार न करणे हेच होय. आजही विश्वातील अनेक कोडी माणसाला उलगडलेली नाहीत. अनेक शोध अद्याप बाकी आहेत. ही कोडी केवळ विज्ञानालाच समजतील, कारण कार्यकारणभाव कसा समजू शकतो याची पद्धत माणसाला विज्ञानामुळेच सापडते आहे.
परवाच्या पायलीन वादळाची घटना वैज्ञानिकांनी ज्या नियोजनबद्ध रीतीने हाताळली आणि लाखो लोकांचे प्राण वाचवले त्यावरून अज्ञानाच्या उपासकांनी आणि प्रचारकांनी सुद्धा बोध घ्यावा. वादळ येण्यापूर्वी आणि गेल्यानंतरही हे उपासक जसे गुपचूप बसले तसे नेहमीच गप्प बसावे म्हणजे भारतीयांनी योग्य विचार कसा करावा, याची प्रक्रिया सुरू होईल. असे झाले तरच वैज्ञानिक पायावर उभा असलेला नतिक समाज उभा राहू शकेल. उन्नावचा ‘गुप्त खजिना’ परवाच कव्हर करायला आलेल्या ओ.बी. व्हॅन पाहिल्यावर तर कीव आली. माध्यमांनी खपते ते विकू नये. लोकशिक्षणाची जबाबदारी त्यांना टाळता कशी येईल?
शांताराम गजे, अकोले

दोन महिने उलटले; आता काय कराल?
दोन महिने उलटून गेले तरी डॉक्टर नरेंद्र दाभोलकरांचे खुनी हातास लागत नाहीत याला काय म्हणणार?
या विषयासंदर्भात काही विचार आणि उपाय मनात आले ते असे :
१) खुन्यांना पकडण्यात पोलिसांची पथके अपयशी ठरली असल्याने आता या तपासकामासाठी नामचीन गुंडांना, शार्प शूटर्सना ‘सुपारी’ द्यावी .
२) राज्यकर्त्यांनी त्यांच्या श्रद्धेय बाबा, बुवा, महाराजांना साकडे घालून त्यांच्या मार्गदर्शनाप्रमाणे पोलिसांना कामाला लावावे, पोलीस स्वत:ची बुद्धी वापरत असल्यास तात्काळ प्रतिबंध करावा.
३) एखाद्या ज्योतिषाचा सल्ला ‘मॅनेज’ करून त्याचा सल्ला म्हणून ही फाइल बंद करावी.
४) खुनी/ सूत्रधार जरी मिळाले तरी त्वरित न पकडता २०१४ ची निवडणूक जाहीर झाली की पकडावे.
५) या विषयावरून लक्ष उडावे म्हणून अन्य एखादी ‘दुर्दैवी घटना’ घडवून आणावी.
– मधुकर घारपुरे, सावंतवाडी (सिंधुदुर्ग)

कळवळा खरा आहे ना? बिल्डरकडून भरपाई घ्या!
एखादे बांधकाम दीर्घकाल अनेक न्यायालयीन प्रक्रियेतून तपासून गेल्यावर देशाचे सर्वोच्च न्यायालय ते अवैध असल्याचा निकाल देते व ते तोडण्यासाठी आदेश देते. असे करताना मानवतावादी दृष्टिकोनातून पीडितांना आपली सोय करण्यासाठी काही काळ देते, तेव्हा त्या काळाचा उपयोग काही नेत्यांना हाताशी धरून सर्वोच्च न्यायालयाचा आदेश फिरवण्यासाठी मुख्यमंत्र्यांवर दबाव आणण्यासाठी करणे उचित ठरत नाही.
अवैध बांधकामे वैध केली गेली तर तो आदेश अनेक अवैध बांधकामे, जी आज कारवाईसाठी विचाराधीन आहेत, तीही आपोआप वैध ठरवण्यासाठी वापरला जाईल व भविष्यात बांधकाम व्यावसायिकांना अवैध बांधकामे बिनबोभाट करण्यास मुक्तहस्त देईल. पीडितांना बिल्डरकडून उचित नुकसानभरपाई मिळवून देण्यासाठी ठोस व कडक पावले उचलणे आणि त्यासाठी पूर्वलक्ष्यी प्रभावाने कायदा बनवणे हे सरकारने सर्वप्रथम कर्तव्य मानावे आणि त्याची प्रामाणिकपणे पूर्तता करावी. सुज्ञ व कार्यक्षम मुख्यमंत्री ती नक्कीच करतील ही अपेक्षा. पीडितांची न्याय्य मागणी लक्षात घेऊन त्यांच्या बाजूने उभ्या राहणाऱ्या नेतेमंडळींनीही बिल्डरांकडून नुकसानभरपाई मिळवण्यासाठी प्रभावी प्रयत्न करून आपला कळवळा खरा आहे हे दाखवण्याची संधी साधावी.
-प्रदीप चं. कीर्तिकर, चारकोप (कांदिवली)

मुंबईचे रणजी-कर!
अष्टपैलू, उपयुक्त खेळाडू अजित आगरकर याची क्रिकेट-निवृत्ती फारशी अनपेक्षित नसली तरी एक जिद्दीचा मुंबईकर क्रिकेटवीर म्हणून आगरकरची आठवण राहीलच. संघाच्या नेहमीच आत-बाहेर राहिला, तरी आगरकरच्या गुणवत्तेबद्दल शंका नसावी. मागील मोसमात त्याने मुंबईला रणजी स्पर्धा जिंकून दिली पण त्यावेळीही विनाकारण चर्चा-वादंग झाले आणि हा गुणी खेळाडू काहीसा दुखावला गेला. निवृत्तीच्या घोषणेनंतर आगरकरला सलाम करावासा वाटतो.
यंदाच्या रणजी संघात तेंडुलकर- आगरकर नसणार. विशाल दाभोळकर सोडल्यास एकही ‘कर’ नसणार! वाडेकर, गावस्कर, बांदिवडेकर, वेंगसरकर, असे एक ना अनेक मुंबई-‘कर’ आडनावांचे खेळाडू या रणजी संघात असत. हा ‘कर’-महिमा आता कमी झाला, याला काळाचा महिमा म्हणावे का?
शरद वर्तक, चेंबूर

तिहेरी बाइकस्वारांवर कारवाई हवीच  
मुक्त मार्गावर मोटरसायकलीच्या अपघातात दोघांचा मृत्यू व एक जखमी झाल्याचे वृत्त २१ ऑक्टोबरच्या लोकसत्तेत वाचले. घटना वाईट असलीतरी त्याला जबाबदार हे तिघे जणच आहेत याकडे दुर्लक्ष होता नये आणि जो युवक जखमी आहे त्याच्यावर कायद्याप्रमाणे कठोर कारवाई व्हायला हवी. कारण दुचाकी मग ती स्कूटर असो वा मोटरसायकल, फक्त दोनच जणांसाठी आहे. तीन मोठय़ा माणसांनी बसून वेगात ती हाकायची फॅशन गेल्या दोन-तीन वर्षांतच आली. कारण आमचे पोलीसच तिकडे दुर्लक्ष करू लागले आहेत. असे वीर आपला जीव धोक्यात घालतातच, पण इतर निरपराध लोकांच्या जीवाशीही खेळतात याचे भान पोलिसांना नको का? तिघांनी दुचाकीवरून आणि आता तर विरुद्ध दिशेनेही जाण्याचा प्रघात मुंबईत रुळत आहे. वाहतूक शिस्तीची जाणीव करून देण्यासाठी आपण पोलिसांना सहकार्य करून काही कार्यक्रम करणार असल्याचे ‘बिग बी’ ने म्हटल्याचे प्रसिद्ध झाले होते. असे शोभेचे कार्यक्रम करण्यापेक्षा पोलिसांनाच त्यांच्या कर्तव्याची जाणीव त्याने करून दिली तर त्याने जास्त फायदा होईल. असे वीर दिसल्यावर नुसता दंड न घेता निष्काळजीपणा, प्राण विघातक कृत्य अशा गंभीर गुन्ह्यांचे आरोप ठेवून कडक कारवाई झाली तरच या प्रकारांना आळा बसेल.  
– राम  ना. गोगटे, वांद्रे (पूर्व)