X

राज्यकर्त्यांच्या प्रतिमा

रुबाबदार, तडफदार.. सर्व समाजापेक्षा, लोकांपेक्षा वेगळे राज्यकर्ते! किंवा, एक हात उंचावून दिशा दाखवणारे नेते..

रुबाबदार, तडफदार.. सर्व समाजापेक्षा, लोकांपेक्षा वेगळे  राज्यकर्ते! किंवा, एक हात उंचावून दिशा दाखवणारे नेते..  राज्यकर्त्यांच्या या प्रतिमा अशाच कशा? ‘तुमच्यातलाच मी एक’ असे सांगणाऱ्या नेत्यांनाही तसे ‘दाखवून देणारी’ प्रतिमानिर्मिती का हवी असते?  हे सारे आजचे आहे की अगदी प्राचीन काळापासूनचे?  याच्या उत्तरांचा हा उलगडा..

प्रसिद्ध दिवंगत व्यंगचित्रकार आर. के. लक्ष्मण यांना एका मुलाखतीत असं विचारलं गेलं, की तुम्ही नवनवीन येणाऱ्या सर्व राजकीय व्यक्तींची व्यंगचित्रं, इतक्या चपखलपणे कशी काय टिपू शकता? त्यावर लक्ष्मण म्हणाले की, ‘राजकीय नेतेच हळूहळू त्यांच्या व्यंगचित्रांप्रमाणे दिसू लागतात!’ यातला विनोदाचा भाग सोडून देऊ या पण गेली हजारो र्वष, मानवी संस्कृतीच्या उदयापासून विविध राज्यकर्त्यांनी, त्यांची एक विशिष्ट प्रतिमा समाजमनामध्ये बिंबवण्याकरिता खास प्रयत्न केले आहेत. चित्रं, शिल्पं, पुतळे, स्मारकं, छायाचित्रं, चित्रफिती, जाहिराती असे अनेक प्रकार काळाच्या ओघात वापरले गेले. समाजाने या प्रतिमा कधी स्वीकारल्या तर कधी नाकारल्या. वर्तमानपत्रातील रोजची व्यंगचित्रं ही समाजाने राजकीय व्यक्ती, राजकारण, सामाजिक परिस्थिती आदींवर केलेलं एक प्रातिनिधिक भाष्य असतं. नुकतंच गेल्या आठवडय़ात सुप्रीम कोर्टाने सरकारी जाहिरातीतील नेत्यांच्या प्रतिमांवर बंदी घातली. त्यामुळे वर्तमानपत्रातील राजकीय नेत्यांच्या पान भरून येणाऱ्या जाहिराती बंद होतील! पण ते असो..

नेता लोकांनी निवडलेला असो, की त्यांच्यावर लादला गेलेला; तो स्वत:च्या जनमानसातील प्रतिमेबाबत फार जागरूक होतो व यातूनच ‘प्रतिमांना’ महत्त्व येतं. अनेक वेळा ते त्याकरिता एखादा सल्लागार किंवा जाहिरात कंपनीला हाताशी धरतात.

सर्वसाधारणपणे असं मानलं जातं की, एखाद्या विकायच्या वस्तूप्रमाणे राजकीय नेत्यांची प्रतिमा समाजामध्ये मांडली जाते; काही वेळा जबरदस्तीने तर काही वेळा अगदी सहज नैसर्गिकपणे व त्या प्रतिमेला जनता पुन:पुन्हा प्रतिसाद देत राहिल्यानेच समाजात स्थिर होते. पण याच वेळेला हेसुद्धा लक्षात घ्यायला हवे की, समाजातील लोकांची मानसिकता, त्यांच्या गरजा, इच्छा-आकांक्षा बदलत असतात, त्यामुळे त्यांचा या प्रतिमांविषयीचा प्रतिसाद बदलत राहतो. यातूनच निवडणुकीच्या माध्यमांतून ते आपलं मत व्यक्त करतात. पुन्हा सत्तेत आणतात किंवा सत्ताबदल घडवतात. थोडक्यात प्रतिमांच्या प्रतिसादरूपी वापरातून राजकीय पक्ष व तितकेच समाजातील लोक एकत्रितरीत्या प्रतिमा घडवत असतात; प्रतिमा घडत असतात.

जे राजकीय नेत्यांबाबत दिसून येतं तीच गोष्ट धार्मिक नेत्यांबाबतही लागू होते. या सर्व गोष्टींचा एक छानसा इतिहास आहे तो आपण पाहू.

अगदी प्राचीन संस्कृतींमध्ये जिथे, कदाचित गटनेता, समूहनेता, अशांतून हळूहळू राजा, राजकीय नेता ही गोष्ट स्थापित झाली असावी, आजच्या इराक, इराण या देशांत सापडलेल्या प्राचीन संस्कृतीच्या अवशेषांत अनेक समूहांच्या राजांच्या प्रतिमा सापडतात. गुडेआ, हम्मुराबी, नरमसीन, सारगाँ, असुरनसीरपाल, सायरस अशी नावं असलेल्या राजांच्या प्रतिमा दिसतात.

राजांच्या प्रतिमांत ते तरुण, ताकदवान- बलदंड, पण त्याच वेळेला संवेदनशील अशी प्रतिमा तयार करायचा प्रयत्न दिसतो. विशेषत: गुडेआ राजाच्या प्रतिमेत, तुळतुळीत टक्कल, भारदस्त चेहरा, बळकट हात पण हातामध्ये पाण्याची सुरई किंवा घराची प्रतिकृती हे सांगायला की, पाहा या वैराण प्रदेशात पाणी, घरं देणारा हा राजा किती चांगला आहे. खरंच रोटी-कपडा-मकान, बिजली-सडक-पानी हे ‘देणारे’ राज्यकर्ते ही किती जुनी

गोष्ट आहे. सारगाँ, नरमसीन, असुरनसीरपाल यांनी आपली ‘शौर्यवान’ ही प्रतिमा निर्मिण्यासाठी सिंहांची शिकार, युद्धांचे प्रसंग, धीरगंभीर दाढी वाढवलेली व्यक्तिचित्रणं करतात. यानंतरचे चित्रण येतं ते आपण देव किंवा कमीत कमी देवाचे दूत, सेवक आहोत, अशी प्रतिमा तयार करण्याचा प्रयत्न. जो हम्मुराबी या बॅबिलोनियन राजाने केला. त्याने त्याच्या राज्यातील कायदे लिहिलेला एक स्तंभ उभारला. त्या स्तंभाच्या वर हम्मुराबी हात जोडून उभा आहे व देवाकडून कायदे ऐकतो आहे. जे खाली स्तंभावर लिहिले आहेत. आहे की नाही गंमत. कोण देवाने निर्मिलेले कायदे मोडेल?

इजिप्शियन राजेसुद्धा देवानंतर आपणच या अर्थाच्या प्रतिमानिर्मितीत गुंतलेले. परिणामी अखनातेन हा राजा सोडला तर सर्व राजे एकसारखेच दिसतात. रोमन सम्राटही ग्रीक पुतळ्यांच्या आधारावर आपल्या ‘आदर्श’ प्रतिमा तयार करण्यात गढून गेले. या ‘आदर्श’ प्रतिमांची एक गंमतच आहे. इटालियन प्रबोधनकालीन शिल्पकार मायकेल एन्जेलो याने लॉरेन्झो आणि त्याच्या भावांसाठी बनवलेल्या थडगंशिल्पांत ती दिसून येते. त्याने लॉरेन्झोचे बनवलेले शिल्प (व्यक्तिचित्र) त्याच्यासारखे बिलकूल दिसत नाही. त्याबद्दल लॉरेन्झोने त्याला विचारले, तर मायकेल एन्जेलो म्हणाला की, आपल्या मृत्यूनंतर आपण कसे दिसत होतात हे कोणाच्याही लक्षात राहणार नाही. आपलं कार्य, कीर्ती हेच लक्षात राहणार आहे. मी आपलं व्यक्तिचित्र आपल्या कीर्तीला साजेलसं असं केलं आहे!

या आदर्श संकल्पनेची अजून एक छटा आहे ती म्हणजे जे आहे, वास्तव आहे, त्यापेक्षा वेगळीच लोकांना आवडेल अशी प्रतिमा निर्माण करायची. ही प्रतिमा वास्तवाहून खूप वेगळी, काहीशी फसवी, खोटी असू शकते.

१७ व्या शतकातील स्पॅनिश दरबारी चित्रकार दिएगो बेलाक्वा (स्पेलिंग मात्र Velasquez) याने राजा फिलीपची रंगवलेली प्रतिमा पाहा. हा राजा प्रत्यक्षात दिसायला अगदीच सुमार, चेहऱ्यावर एक प्रकारचा बावळट भाव, राजाला न शोभेल असा! बेलाक्वाने त्याची दोन-तीन व्यक्तिचित्रं करीत अगदी तेज:पुंज, तरुण देवदूतासारखी प्रतिमा तयार केली. आजकाल फोटोशॉपमध्ये ज्याप्रमाणे काम करतात त्याप्रमाणे.

अशा प्रकारच्या प्रतिमा निर्मिण्याकरिता मग, कपडे, घोडे, शस्त्रं, दागिने, ध्वज आदी राजकीय चिन्हं, चेहऱ्याचा रंग, केस वाढवण्याची, आकार देण्याची पद्धत. नेपोलियनचा ‘हेअर कट’ हा प्रसिद्ध आहेच! अशा कित्येक गोष्टी मग वापरल्या जाऊ लागल्या.

राजकारण्यांच्या प्रतिमांत दोन भाग असतात- एक म्हणजे ते सर्व समाजापेक्षा, लोकांपेक्षा वेगळे आहेत. अशा अर्थाने प्रतिमा निर्माण होते, केली जाते. जी त्या व्यक्तीभोवतीच केंद्रित राहते. युसूफ कार्शच्या प्रसिद्ध विन्स्टन चर्चिल यांच्या फोटोसारखी. किंवा राजकीय नेता आपली प्रतिमा वेगळ्या प्रकारे निर्माण करतो. तो स्वत:चं ‘वेगळेपण’ हे सांगून निर्माण करतो, की ‘मी कोणी वेगळा नाही, मी आपल्यासारखाच एक सामान्य आहे’ काहीसं अण्णा हजारे, अरविंद केजरीवाल यांच्यासारखं! अर्थातच असं म्हणून हे इतर राजकारण्यांसारखं सत्तेच्या केंद्रस्थानी राहतातच हे आपण सध्या पाहतोच आहोत.

एखाद्या नेत्याला समाजातील, तळागाळातील लोकांनी स्वीकारलं किंवा त्याची प्रतिमा तळागाळातील लोकांपर्यंत पोहोचली, की समाज त्या प्रतिमेला घडवतात. भारतात बाबासाहेब आंबेडकरांची प्रतिमा या पद्धतीने घडवली गेली आहे.

त्यांच्या प्रत्यक्षातील दिसण्यापेक्षा, एक माणूस, त्याचा गोल चेहरा, चष्मा, निळा कोट, कोटाला पेन, पूर्ण पुतळा असेल तर कोट, पॅण्ट, बूट, एका हातात पुस्तकं व बऱ्याच वेळेला रोमन ऑगस्ट्स किंवा ज्युलियस सीझरप्रमाणे एक हात उंचावून दिशादर्शक आ

विर्भाव असं आंबेडकरांचं चित्रण होतं. गावोगावचे पुतळे, भित्तिचित्रं, होर्डिग्जवर असेच आंबेडकर दिसतात. मग ते कधी बुद्धाच्या शेजारी उभेही असतात. कधी पिंपळाच्या पानामध्ये तर कधी धर्मचक्रासह दिसतात. हे सगळं थक्क करणारं आहे. राजकीय नेत्याची व्यक्तिगत प्रतिमा ही निर्माण होते व बऱ्याच वेळा त्याच्या मृत्यूनंतर कदाचित विस्मृतीतही जाते, पण त्याचं तत्त्वज्ञान, राजकीय विचारधारा या संबंधातील काही चिन्हं, प्रतिमाही जर का निर्माण होऊन, नेत्याच्या प्रतिमेसोबत समाजात पोहोचली असली तर कदाचित या नेत्याची समाजमनातील प्रतिमा फार मोठा काळ टिकून राहते; असं निरीक्षणांद्वारे लक्षात येते. त्याविषयी पुढच्या वेळेला पाहू.

*लेखक चित्रकला महाविद्यालयांचे अभ्यासक्रम सल्लागार आणि कलासमीक्षक आहेत.