तीन वर्षांपूर्वी जानेवारीतल्या याच आठवडय़ात इजिप्तमध्ये क्रांती झाली. होस्नी मुबारक यांचे सरकार लोकांनी उलथवून लावले. एका हुकूमशाहीचा अंत झाला. फेसबुक, ट्विटर आणि मेणबत्त्यांतून व्यवस्था बदलता येते असा साक्षात्कार जगभरातील अनेक ‘दुसऱ्या स्वातंत्र्य’वीरांना झाला. त्यांच्यासाठी कैरोतील तहरीर चौक स्फूर्तिस्थानच बनला. पण केवळ ३६ महिन्यांत त्या क्रांतीच्या चिंधडय़ा उडाल्या आहेत. ज्या तहरीर चौकाने लोकशाहीची हाक दिली, त्याच तहरीर चौकाने गेल्या शनिवारी लष्करशहांना दिलेल्या निमंत्रणाच्या हाका ऐकल्या. फिल्ड मार्शल अब्देल फताह अल-सिसी यांनी देशाच्या अध्यक्षपदाचे उमेदवार म्हणून येत्या निवडणुकीत उभे राहावे, असा ‘आदेश’ लष्कराच्या सुप्रीम कौन्सिलने दिला आहे. हजारो अल-सिसीसमर्थकांनी तहरीर चौकात जमून त्यावर परवा शिक्कामोर्तब केले. लष्कर आणि जनता हा एकच हात आहे, अशा स्वरूपाच्या घोषणा त्या वेळी देण्यात आल्या होत्या. अर्थात यात विशेष असे नाहीच. मुस्लीम ब्रदरहूडच्या अतिरेकाला कंटाळलेल्या जनतेने लष्कराचे स्वागत केले नसते तरच त्यात नवल. पण इजिप्तच्या नागरिकांना एकूणच लष्करशहांबद्दल आकर्षण आहे. गामेल अब्दल नासेर, अन्वर सादत, त्यांच्यानंतर आलेले मुबारक हे सगळे लष्करी अधिकारीच होते. अल-सिसी ही त्याच परंपरेची पुढची पायरी आहे. तहरीर चौकातील क्रांतीनंतर लोकशाही मार्गाने सत्तेवर आलेल्या मोर्सी यांना याच सिसी यांनी पदच्युत केले होते. खरे तर तो लोकक्रांतीचाच पराभव होता. क्रांतीनंतर लोकशाही मार्गाने सत्तेवर आलेले मोर्सी हे अ-लोकशाहीवादी शक्तींच्या हातातील बाहुले बनले होते. मुस्लीम ब्रदरहूड या अतिरेकी संघटनेची कार्यक्रमपत्रिका घेऊनच ते राज्य करीत होते. अखेर त्यांच्याविरोधातही लोक तहरीर चौकात उतरले. आणि त्याचा परिणाम ‘लष्करी क्रांती’त झाला. मोर्सी यांना सत्ता सोडावी लागली. या पराभवाचा अर्थ स्पष्टच होता. विद्यमान व्यवस्था भुईसपाट करायची, तर तुमच्या हाती नव्या व्यवस्थेचा नकाशा हवा. इजिप्तमधील क्रांतीच्या सेनानींकडे तो नव्हता. त्याचा फायदा मुस्लीम ब्रदरहूडसारख्या सुसंघटित पक्षाने उचलला. आज लष्कर या अतिरेक्यांच्या विरोधात असल्याने लोकांचा लष्कराला पाठिंबा आहे. आगामी निवडणुकीत सिसी यांचा विजय जवळजवळ निश्चित आहे. पण त्या पुढचा मार्ग मात्र सोपा नक्कीच नाही. मोर्सी यांना पदच्युत केल्यामुळे संतापलेल्या इस्लामी अतिरेक्यांनी संपूर्ण देश वेठीस धरलेला आहे. गेल्याच शनिवारी, एकीकडे तहरीर चौकात क्रांतीचा तिसरा स्मृतिदिन मोठय़ा उत्साहात साजरा केला जात असताना, सिनाई प्रांतात दहशतवाद्यांनी लष्कराचे हेलिकॉप्टर पाडले. सिसी यांच्यापुढे प्रतिक्रांतीचे केवढे मोठे आव्हान आहे याचा अंदाज येण्यास हे उदाहरण पुरेसे आहे. अल-कायदाशी संबंधित असलेल्या अन्सार बैत अल-मकदीस या गटाने हे हेलिकॉप्टर पाडल्याचा दावा केला आहे. या गटाला लिबिया आणि सीरियामध्ये जे सुरू आहे तेच इजिप्तमध्ये घडवायचे आहे हे स्पष्टच आहे. सिसी हे आव्हान किती ठामपणे हाताळतात त्यावर अर्थातच हे सारे अवलंबून आहे. हे ओझे पेलताना त्यांना अर्थव्यवस्थेकडेही दुर्लक्ष करून चालणार नाही. आज तिची अवस्था तोळामासा आहे आणि देशातील अराजक पाहता ती एवढय़ात सुधारण्याची शक्यता नाही. त्यामुळे अखेर एकच प्रश्न राहून राहून समोर येत आहे, की इजिप्तमधील त्या जनक्रांतीने नेमके साधले तरी काय? या देशाचा प्रवास तर आगीतून फुफाटय़ात असाच झाला आहे. जगभरातील ‘दुसऱ्या स्वातंत्र्य’वीरांनी या ३६ महिन्यांच्या पूर्ण वर्तुळातून योग्य तो धडा घेतला म्हणजे झाले.