अमुक लोक सामाजिक जाणीववाले, म्हणून आपण त्यांच्याचकडून कायम सामाजिक जाणिवेची अपेक्षा करत राहिलो! हा टप्पा ओलांडून पुढे जायचं, तर आपली कलाजाणीव आणखी वाढणार की नाही, याचा विचार करावा लागेल. ‘समाजचित्रं’ या शब्दाचा आग्रह सोडून देऊ हवंतर, पण ‘प्रचारकी’ हा शब्द मात्र आपल्या डोक्यातून काढून टाकावाच लागेल..
शिल्पा गुप्ता, विवान सुंदरम यांच्याबद्दल लिहिताना यापूर्वी वापरल्या गेलेल्या ‘समाजचित्रं’ या शब्दाला काही जणांनी जोरदार आक्षेप घेतला आहे. ‘सामाजिक जाणिवेच्या कले’ची परंपराच असताना मुद्दाम ‘समाजचित्रं’ हा शब्द वापरण्याचं कारण काय, असा हल्लाच होता हा. त्याला उत्तर (प्रत्युत्तर) देणं फारसं शक्य नाही. पण त्या निमित्तानं ‘सामाजिक जाणिवेची कला’ या श्रेणीबद्दलची आपणा मराठी कलाप्रेमींची अपेक्षा एकारत गेली आणि खरंच या कलाप्रवाहांपेक्षा ‘समाजचित्रां’चा प्रवाह निराळा काढता येतो का, याबद्दल थोडं कबुलीवजा/ आत्मपरीक्षणवजा लिखाण आवश्यक आहे.
‘सामाजिक जाणिवेची कला’ असा शब्दप्रयोग मराठीत रूढ होता तो एकोणीसशे ऐंशीच्या दशकात किंवा तोपर्यंत. त्यानंतर हळूहळू सामाजिक जाणिववाल्यांचं महत्त्व कमी झालं. पाडण्यात आलेली मशीद, कुणी कुणाविरुद्ध घडवल्या हे माहीत असूनही ‘लोकक्षोभ’  ठरलेल्या दंगली अशा घटनाक्रमानं गाजलेल्या १९९० च्या दशकात तर ‘सामाजिक जाणीव’ वगैरे शब्द बिनमहत्त्वाचे किंवा खोटे वाटणारे ठरले आणि मग विसविशीत झालेल्या, समाजभावनाच हरवलेल्या समाजाचा भाग असलेली व्यक्ती कशी असते याचं दर्शन मराठीतल्या ‘नव्वदोत्तरी कविते’त घडू लागलं.
या मानानं चित्रकलेची गती खूपच निराळी होती. एकतर चित्रकला फक्त ‘मराठी’च होती असं नव्हे. शिवाय, सामाजिक जाणीव चित्रांमध्ये अगदी दूरान्वयानं दिसायची कधीकधी! अशा अवस्थेत मराठी साहित्यातल्या ‘सामाजिक जाणिवे’शी परिचित असलेल्या मराठी भाषकांना फक्त सुधीर पटवर्धनच तेवढे आपले वाटण्याची कारणं एकापेक्षा अधिक होती. ‘डॉ. पटवर्धनही मराठीच’ याच्याशी त्याचा फार संबंध नव्हता. कामगारवर्ग, मुंबईचं जीवन, शहरीकरण यांबद्दलचा आशय पटवर्धनांच्या चित्रांमध्ये होता. हा आशय सामाजिक जाणिवेची मराठी कविता (नारायण सुर्वे, नामदेव ढसाळ, विवेक मोहन राजापुरे, इ.) वाचणाऱ्यांना भिडणाराच होता. पटवर्धनांची चित्रं ही समाजाबद्दलच्या आपल्या मूल्यजाणिवा, आपल्या आदर्श-कल्पना यांच्यानिशी ‘वाचता’ येत होती. भले चित्रकार डॉ. पटवर्धन यांना थोडं वेगळं काही म्हणायचंय किंवा कलादृष्टय़ा त्यांनी केलेले प्रयोग (चित्रातलं अवकाश-विभाजन;  फर्नाद लेजरसारख्या चित्रकाराच्या भौमितिक- दंडगोल हातपाय दाखवण्याच्या शैलीपासून ते जुन्या जपानी चित्रकारांच्या निसर्गचित्रांतली डोंगर दाखवण्याची शैली इथवरच्या कलेतिहासाचं स्वत:च्या चित्रात संमिश्रण आणि आत्मीकरण, आदी प्रयोग) अशा ‘चित्र-वाचका’ला कळतही नसतील, पण मराठी माणसाच्या- किंवा ‘वाचकां’च्या – डोळय़ांना पटवर्धनांनी चित्रांची सवय लावली.
या पटवर्धनांना हल्ली काहीजण थेटच प्रश्न विचारू लागले- ‘तुमच्या चित्रांमधला विद्रोह कमी झाला का हो?’
हा प्रश्न विचारणं, त्यातही तो पटवर्धनांच्या उपस्थितीत आणि त्यांच्या एखाद्या व्याख्यानानंतर वा प्रकट मुलाखतीनंतर विचारणं, हाच जणूकाही मोठ्ठा विद्रोह!
अशा वेळी पटवर्धन अनेकदा फक्त पाहतात. एखाद्यानं चालवलेलं विश्लेषण नीट ऐकून घेतल्यासारखे. त्या क्षणी जर प्रश्नकर्ता आणि ‘श्रोते’ पटवर्धन यांची नजरानजर झाली, तर प्रश्नकर्त्यांला कळावं की आपणही कधीमधी ऐकून घेण्याच्या भूमिकेत असतो तर हा प्रश्न इतक्या आक्रस्ताळेपणानं पडलाही नसता.
पटवर्धनांची चित्रं मराठी संवेदनशील लोकांनी ‘वाचली’ नक्कीच आहेत, पण त्या चित्रांचं ‘ऐकून घेणं’ हे काही आपल्याकडून पुरेशा प्रमाणात झालं नाही. त्याचंही कारण बहुधा ‘सामाजिक जाणिवे’चं जे उरलंसुरलं ओझं आपण पटवर्धनांकडे देऊन टाकलं, यातच शोधावं लागेल.
पटवर्धन त्या ओझ्यानं बांधले गेले नव्हते. त्यांच्या चित्रांना ज्या प्रयोगांची आस आहे, त्यांचा संबंध चित्रकलेच्या इतिहासाशी आहे. दृश्यात समाजाचं ‘अमुक असंच’ प्रतिनिधित्व करणारे, अमकंच दाखवणारे आपण कोण, या प्रश्नाची सोबत चित्रं काढू लागले तेव्हापासूनच त्यांना आहे. त्या प्रश्नाची उत्तरं कलेतिहासातून शोधता येतील, एवढं काम जागतिक चित्रकलेत झाल्याची कल्पना त्यांना असल्याचं त्यांची (गेल्या दहा-बारा वर्षांतली) चित्रं सांगतात.
थोडक्यात असं की, सुधीर पटवर्धन यांच्या चित्रांमधून ‘चित्रपणा’ वजा करता येत नाही. या चित्रांमधली कौशल्यपातळी वगैरेंबाबत कौशल्यवादी चित्रकर्मीकडून वाद घातले जाऊ शकतात कदाचित; पण ती चित्रं आहेत, हे नाकारता येणार नाही. म्हणून ती आपल्याला आवडतात. म्हणून ती ‘वाचता’ आल्याचं समाधान असतं, वगैरे.
समाजाबद्दल प्रश्न पाडणारी दृश्यकला-कृती म्हणजे समाजचित्र, हे वर्णन पटवर्धनांच्याही चित्रांना लागू पडेल. पण पटवर्धनांच्या चित्रांतले प्रश्न फक्त समाजाबद्दलचे नाहीत. ते चित्रांबद्दलचेही आहेत. सामाजिक जाणीव त्या चित्रांत शोधता येते हे खरं, परंतु फक्त तेवढाच त्या चित्रांचा हेतू असू शकत नाही.
इथं पटवर्धनांचं उदाहरण आपल्यापुरतं, आतापुरतं पूर्ण होतं. कोणत्याही कलावंताला राजकीय/ सामाजिक अजेंडा आणि कलेचा अजेंडा यांची रुजवात घालावीच लागत असणार, हा जुना धडा नव्यानं शिकायला मिळतो.
प्रश्न त्यांचा आहे, जे हा धडा शिकणं तात्पुरतं बाजूला ठेवतात. पूर्ण विचारान्तीच, कलेचे प्रश्न बाजूला ठेवून फक्त लोकांचे प्रश्नच मांडण्याचं काम या कलाकृतीनं केलं तरी चालेल, असं ठरवतात. असे अनेक जण. तेही दृश्यकलावंतच.
या कलावंतांना हीरो व्हायचं असतं का? सामाजिक/ राजकीय नेतृत्व करायचं असतं का? अर्थातच नाही. काही वेळा तर एकटेपणा, आत्मक्लेश इथवर मजल मारूनही या ‘कलाकृती’ घडतात. तुषार जोगचं एक उदाहरण आपण इथं मांडू शकतो. त्यानं एकदा मुंबई ते चीन असा प्रवास स्वत:च्या मोटरसायकलचं नाव ‘रोसिनान्ते’ ठेवून (हे पवनचक्क्याविरोधक डॉन क्वियोटच्या घोडय़ाचं नाव) केला आणि वाटेत आपलं नर्मदा ते चिनी ‘थ्री गॉर्जेस’ या महाप्रकल्पांमुळे येणारे ‘विकासा’चे प्रश्न, त्या कथित विकासामुळे पिचलेले लोक हे सारं पाहून ब्लॉगवर शब्दांत लिहायचा प्रयत्न केला.
चित्रांना भिडून चालणार नाही, आता थेट समाजालाच भिडलं पाहिजे, असं वाटून केलेलं हे काम आहे. नवजोत अल्ताफ या तर अनेकदा आधी थेट समाजाला भिडल्या. बस्तरच्या आदिवासींशी, सांगली परिसरातल्या वेश्यांशी, मुंबईकर आणि न्यूयॉर्ककर सामान्य माणसांशी नवजोत यांनी विविध प्रकारे संवाद साधला. मग त्या संवादाचं फलित किंवा त्या संवादाचं डॉक्युमेंटेशन म्हणून गॅलरीत काही दृश्यकलाकृती (व्हिडीओ, फोटो किंवा आदिवासींनीच केलेल्या कलाकृती) मांडल्या गेल्या.
इथं एक प्रश्न उपस्थित होतो- दृश्यकलेचाही हेतू केवळ ‘संवाद साधणं’ हाच आहे, असं मानता येतं का? या प्रश्नावरून दोन तट आहेत. इंग्रजीत ‘आर्ट कम्युनिकेट्स. बट इज आर्ट कम्युनिकेशन?’ अशा जरा गोंधळवणाऱ्या शब्दांत हा प्रश्न मांडता येतो.
पुन्हा सुधीर पटवर्धनांचा आधार घेऊ. त्यांच्या चित्रांनी आपल्याशी खूप चांगला संवाद साधला आहे, हे खरं. पण निव्वळ ‘संवाद साधणं’ हे त्या चित्रांचं काम नव्हतं. कलात्म अस्फुटता, मोघमपणा हेही त्या चित्रांना हवं होतं. ‘हेच नव्हे, हेही’ हा जो कोणत्याही कलात्म आकलनाचा प्राण असतो, तोच याही चित्रांचा होता आणि आहे. ‘संवाद साधून अमुक गोष्ट पोहोचवायची, अमुक परिणाम साधायचा’ असा हेतू या चित्रांतून कमीच दिसतो.
आपण पटवर्धनांचं सविस्तर उदाहरण घेतलं, ते फक्त त्यांचं म्हणून नव्हेच..
‘सामाजिक जाणिवेची कला’ आणि ‘समाजचित्रं’ या शब्दांमधला संभाव्य फरक अधोरेखित करण्यासाठी या चर्चेचा उपयोग व्हावा म्हणून. परिणाम, संवाद या तात्कालिक मूल्यांपेक्षा कलामूल्यंच पटवर्धनांच्या चित्रांनी महत्त्वाची मानली हे आता निर्विवाद आहे, म्हणून त्यांचं उदाहरण.
पण त्यापुढला भाग असा की, ही तात्कालिक मूल्यंच अधिक असोशीनं मानणाऱ्या कलेलासुद्धा आता आपण कलेच्या प्रांतात जागा देतो आहोत. आपले डोळे ३०-३५ वर्षांपूर्वीचे असते, तर ‘ही प्रचारकी कला’ असं म्हणून आपण खुशाल बाजूला झालो असतो. ‘प्रचारकी’ ही फार मोठी शिवी असल्यासारखा हा शब्द वापरला जाई, तो तसा वापरला जात नाही. हे दृष्टी-विस्तारणाचं काम करण्यासाठी भारतात तरी पटवर्धनांचा हातभार लागलेला आहे. ते स्वत: प्रचारकी कलेपासून दूर राहिले, पण ज्या मर्यादा मी पाळतो त्या दुसऱ्यांनी पाळल्या नाहीत तरीही माझी हरकत नाही, अशी शहाणी जाणीव पटवर्धनांच्या प्रेक्षकाला मिळत राहिली.
समाजचित्रं हा शब्द अद्याप नवीन आहे. पण कलामूल्यं झुगारून समाजमूल्यांना महत्त्व देणाऱ्या आणि तरीही कला म्हणून आपली कृती सादर करू पाहणाऱ्या सर्व प्रयत्नांना यापुढे ‘समाजचित्रं’ म्हणू या का?
आपल्या ‘सामाजिक जाणिवे’चा विस्तार व्हायचा असेल, तर एका पिढीपूर्वी आपल्या जाणिवांनी ‘कौशल्यपातळी’चा उंबरठा जसा ओलांडला, तसा ‘कलामूल्यां’च्या आग्रहाचा उंबरठाही आता का ओलांडू नये? प्रश्न ‘समाजचित्रं’ किंवा असा एखादा शब्द टिकून राहण्याचा नाहीच.
प्रश्न आपल्या दृष्टीच्या विस्ताराचा आहे.