News Flash

किरकिऱ्यांचे रडगाणे

कुणी माजी मित्रपक्षावर दोषारोप करणे तर कुणी तोलूनमापून अनुल्लेख करणे, या दोन टोकांच्या मध्ये विधानसभा निवडणुकीचा प्रचार फिरत राहिला.

| October 14, 2014 12:03 pm

कुणी माजी मित्रपक्षावर दोषारोप करणे तर कुणी तोलूनमापून अनुल्लेख करणे, या दोन टोकांच्या मध्ये विधानसभा निवडणुकीचा प्रचार फिरत राहिला. राज्याचे नेतृत्व करू पाहणारे अजूनही कसे इतिहासाच्या सोयीस्कर दलदलीतच अडकून पडले आहेत, वर्तमानावर स्वार होऊन भविष्य घडवू पाहणाऱ्या तरुणाईच्या स्वप्नांपासून हे पक्ष किती योजने दूर आहेत, याचेही दर्शन प्रचारकाळात घडलेच.
तलवारी, वाघनखे, अफझल खान, उंदीर, दिल्लीहून स्वारी, बलात्कार, लेंगा आदी प्रतीकांचा वापर देशातील सर्वात प्रगत म्हणवून घेणाऱ्या महाराष्ट्र या राज्यातील विधानसभा निवडणुकीत या वेळी झाला. त्या अर्थाने ही निवडणूक ऐतिहासिक म्हणावयास हवी. या राज्याचे नेतृत्व करू पाहणारे अजूनही कसे इतिहासाच्या सोयीस्कर दलदलीतच अडकून पडले आहेत, याचे दर्शन यानिमित्ताने झालेच. पण त्याच वेळी वर्तमानावर स्वार होऊन भविष्य घडवू पाहणाऱ्या तरुणाईच्या स्वप्नांपासून हे राजकीय पक्ष किती योजने दूर आहेत, याचाही अंदाज आला. तेव्हा अनेक अर्थानी ऐतिहासिक ठरेल, अशा महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीचा प्रचार एकदाचा संपला. तो जेव्हा सुरू होता, तेव्हा त्यात एकमेकांच्या नावे रडगाणे गाण्याचा कार्यक्रमच अधिक होता. त्यामुळे या विधानसभा निवडणुकीत प्रचाराला वेळ कमी मिळाला ही बाब सामान्य नागरिक तसेच राजकीय पक्षांच्याही पथ्यावर पडली असेल. याचे कारण या वेळी राजकीय पक्षांसमोर काहीही मुद्दा नव्हता आणि नागरिकांनाही ते माहीत होते. त्यामुळे निवडणुकीत काही आगळेच प्रकार घडले. सर्वसाधारणपणे कोणत्याही निवडणुकीत मते मागायला जाणाऱ्याचा प्रयत्न असतो वा असावयास हवा ते आपण इतरांपेक्षा किती चांगले आहोत, हे दाखवणे. या वेळी तसे नव्हते. प्रचारात त्यामुळे भर होता तो आपल्यापेक्षा इतर किती वाईट आहेत, हे सांगण्यावर. कोणत्याही राजकीय पक्षाला साधारणपणे आपण कसे नागवले वा फसवले गेलो हे सांगावयास आवडत नाही. कारण ते राजकीय पौरुषात बसत नाही. त्यामुळे आपण बळी जाणारे नाही तर बळी घेणारे आहोत, असा आव आणण्याकडेच सर्व राजकीय पक्षांचा कल असतो. या समजास या निवडणुकीने छेद दिला. सत्तेवर दावा सांगणाऱ्या तीन प्रमुख पक्षांच्या निवडणुकीतील प्रचारात नन्नाचा पाढा मुक्तपणे गायला गेला. शिवसेना, राष्ट्रवादी काँग्रेस आणि काँग्रेस हे ते तीन पक्ष. ही बाबही एका अर्थाने ऐतिहासिकच.     
प्रचारात चिरका सूर लावण्यात आघाडीवर होती ती शिवसेना. १५ वर्षांच्या काँग्रेस-राष्ट्रवादीच्या कंटाळवाण्या कारभारानंतर या वेळी आपणास सत्तेची निर्विवाद संधी आहे, अशी शिवसेनेची खात्री आहे. त्यास पहिल्यांदा तडा दिला सेनेचा २५ वर्षांचा जोडीदार असलेल्या भाजपने. या निवडणुकीत सत्तासंधी जशी सेनेला आहे तशीच आपल्या निमित्ताने भाजपलाही आहे, त्यामुळे भाजप आपली दादागिरी गुमान मान्य करील, असा सेनेचा होरा होता. भाजपचे नवे अध्यक्ष अमित शाह आणि कंपूने तो अगदीच धुळीस मिळवला. परिणामी ही निवडणूक एकेकटय़ाने लढवण्याची नोबत सेनेवर आली. सेनेचा सूर प्रचारात सुरुवातीपासून किरकिराच लागला तो यामुळे. प्रचाराचा सुरुवातीचा काळ सेनेने भाजपने आपल्याला कसा दगा दिला हेच ऐकवण्यातच घालवला. त्यासाठी सेनेने मिळेल त्या उपमा, उत्प्रेक्षा अलंकारांची भरती आपल्या शब्दसंग्रहात केली आणि प्रसंगी इतिहासदेखील नव्याने लिहिला. अमित शहा आणि नरेंद्र मोदी दुकलीवर टीकास्त्र सोडताना सेनाध्यक्षांनी अफझल खानास महाराष्ट्रावरील स्वारीसाठी दिल्लीमार्गे यायला लावले. दिल्लीत बसून भाजपचे नेतृत्व करणारे शहा आणि मोदी यांच्या या निवडणुकीतील वाढत्या प्रस्थास दिल्लीश्वरांचा हस्तक्षेप म्हणणे एक वेळ क्षम्य. परंतु त्यास अफझल खानाची दिल्लीहून स्वारी असे म्हणणे अगदीच हास्यास्पद. शिवाजी महाराजांच्या साम्राज्यास नख लावू पाहणारा अफझल खान दिल्लीहून नव्हे तर विजापुरातून महाराष्ट्रावर चाल करून आला होता. शिवाजी महाराजांचा वारसा सांगणाऱ्या शिवसेनेकडून अशी चूक घडणे अगदीच अक्षम्य. हा प्रमाद काँग्रेस वा राष्ट्रवादीकडून घडला असता तर या दोन पक्षांना शिवाजी महाराजांविषयी कसे काहीच ममत्व नाही, असा उलट प्रचार सेनेकडून झाला असताच असता. यानंतरही सेनेचा प्रचार हा भाजपने आपणास कसे नागवले आणि भाजप किती कृतघ्न आहे, याची दर्दभरी कहाणी सांगण्यातच गेला.
या तुलनेत सत्ता राखू पाहणाऱ्या आणि काँग्रेसशी असलेली १५ वर्षांची सोयरीक तोडणाऱ्या राष्ट्रवादी काँग्रेसकडे स्वत:चे मिरवावे असे काहीच नाही. त्यामुळे त्यांचाही भर होता तो आपला सहकारी काँग्रेस किती नालायक आहे, हेच सांगण्यात. या काँग्रेसचे मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण हे किती निष्क्रिय आहेत हे सिद्ध करण्यातच राष्ट्रवाद्यांनी प्रचाराचा बराच काळ व्यतीत केला. त्यात या पक्षाचे ज्येष्ठ नेते, मावळत्या सरकारातील उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांनी आपल्यालाही कधी कधी भ्रष्टाचाराची चाड असू शकते याची जाणीव करून देण्यासाठी पृथ्वीराज चव्हाण यांच्यावर बिल्डरधार्जिणेपणाचा आरोप करून पाहिला. खरे तर प्रचाराच्या या तापलेल्या वातावरणात त्याने बरीच खळबळ उडावयास हवी होती. परंतु तसे काहीही झाले नाही. खुद्द राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांनीदेखील त्याकडे लक्ष दिले नाही. आता यामागे भ्रष्टाचाराविषयी जनतेत तयार झालेली उदासीनता आहे की हा आरोप अजितदादांनी केला हे कारण यामागे आहे हे समजण्याइतकी जनता सुज्ञ नक्कीच आहे. त्याच वेळी काँग्रेसजनांकडेही निवडणुकीत दाखवण्यासारखे काहीच नव्हते. मतदारांकडे घेऊन जावी अशी एकच चीज त्यांच्याकडे होती. ती म्हणजे पृथ्वीराज चव्हाण. परंतु त्यांना स्वपक्षीयांनीच अपंग करून टाकलेले असल्यामुळे ते पक्षाच्या प्रचारात एकटेच पडले. खेरीज, महत्त्वाची बाब म्हणजे आपण पक्षाचा चेहरा आहोत, हे पृथ्वीराजना कळेपर्यंत निवडणुका आल्यादेखील. तोपर्यंत ना त्यांना काँग्रेसजनांनी तेवढी उसंत दिली ना पृथ्वीराजना आपण पुढे येऊन लढावे, असे वाटले. त्यामुळे तेही राष्ट्रवादीसारखेच प्रचारात नन्नाचाच पाढा आळवत बसले.    
राहता राहिले दखल घ्यावे असे दोनच पक्ष. एक म्हणजे भाजप आणि दुसरा मनसे. यापैकी मनसेने जमेल तितका आपल्या भूमिकेविषयी गोंधळ निर्माण केला. गेल्या लोकसभा निवडणुकीत त्यांनी मोदी यांना पाठिंबा जाहीर केला होता. या निवडणुकीत त्यांनी याच मोदी यांना प्रथम लक्ष्य केले. परिणामी प्रचार फिरत राहिला तो मोदी यांच्याभोवतीच. म्हणजे नकळतपणे भाजपला जे हवे होते तेच झाले. त्यात एका बाजूला माजी जोडीदार शिवसेना मोदी आणि भाजपच्या नावे ठणाणा करीत असताना प्रत्यक्ष मोदी यांनी शिवसेनेला अनुल्लेखाने मारण्याचे चातुर्य दाखवले. मोदी यांना हे माहीत होते की आपण सेनेवर टीका केल्यास त्याचा फायदा आपल्याला होणार नाही, तो सेनेला होईल. त्यामुळे त्यांनी सेनेचा उल्लेख कोणत्याही प्रकारे करणे टाळले. याचा अर्थ हा की सोनिया गांधी वा मनमोहन सिंग यांच्यावर टीका केल्यावर काँग्रेसजन गुजरातचे तत्कालीन मुख्यमंत्री मोदी यांना प्रत्युत्तर करायला जात, ती चूक मोदी यांनी सेनेच्या बाबत केली नाही. परिणामी भाजपच्या प्रचाराचा सूर या काळात वेगळा लागला.    
आज अखेर ते संपले. नागरिकांनीही सुटकेचा नि:श्वास टाकला असेल. एके काळी निवडणूक प्रचारसभा म्हणजे वक्तृत्वकलेची पर्वणी असे. व्याजोक्ती, वक्रोक्तीच्या पुरेपूर वापराने या प्रचारकाळात मराठी भाषेचे सौष्ठव उठून दिसत असे. तेव्हा राजकारण हे उमद्या, दिलेर स्पर्धेचे होते. प्रतिस्पर्धीस शत्रू मानायची प्रथा रुजायची होती. आता तसे नाही. त्यामुळे निवडणूक प्रचार हा राजकीय उत्सुकांचे गाणे राहिलेला नाही. तो आता किरकिऱ्यांचे रडगाणे झाला आहे.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on October 14, 2014 12:03 pm

Web Title: election campaign end in maharashtra
टॅग : Election Campaign
Next Stories
1 सत्यार्थ आणि सत्यार्थी
2 एक ज्वलंत प्रश्न!
3 नंगे से खुदा भी..
Just Now!
X