‘रिकामे मन म्हणजे सैतानाचे घर’ असते, असे म्हणतात. पण सैतानाने घर केलेली सारी मने मात्र सर्वकाळ रिकामी असतात असे नाही.
तुरुंगात दाखल झालेल्या, कपाळावर गुन्हेगारीचा शिक्का बसलेल्या प्रत्येकाच्या मनात कधी काळी एखादा सैतान घुसलेला असतोच. पण म्हणून, गजाआडच्या अंधारकोठडीतील अशा मनांचे ओझे वाहणारा अवघा तुरुंग हे काही सैतानाचे घर नसते. आणि एखादा गुन्हा शाबीत झाला, म्हणून गुन्हेगार ठरलेल्या प्रत्येक व्यक्तीचे मन सदासर्वकाळ सैतानी विचारांनी भारलेले असते असेही नसते. त्या रिकाम्या मनात सदैव सैतानाचाच वास असतो, असे मानणे बरे नाही. खरेही नाही. कधी तरी मनाच्या रिकाम्या कप्प्यात एखाद्या विचाराचा सैतान डोकावतो, त्या कप्प्याचा आडोसा करून तेथेच लपून बसतो आणि संधी सापडताच तो डोके बाहेर काढतो. अशा वेळी ते मन रिकामे राहत नाही. त्या मनावर त्या सैतानाचा ताबा असतो. मनाच्या अशा अवस्थेत हातून काही घडून जाते, आणि पुढच्या आयुष्याची तुरुंगाच्या दिशेने वाटचाल सुरू होते. मग गजाआडचा प्रत्येक क्षण मन आणखीनच रिकामे करू लागतो, आणि रितेपणाने भरलेल्या मनात मात्र, सैतानाचा स्वच्छंद संचार सुरू होतो. अगोदरच्या स्थितीची संधी साधून मनाच्या कोपऱ्यात दडून बसलेला सैतान आता अवघ्या मनाचा ताबा घेतो. गजाआडच्या या जगण्याचा मनावर होणारा परिणाम विपरीत स्वरूपाचा असू नये, यासाठी तुरुंगवासाच्या शिक्षादेखील सुखकर करण्याच्या संकल्पना जोर धरू लागल्या. रिकाम्या मनाच्या मानगुटीवर बसलेल्या सैतानाला हुसकावण्याच्या उपायांवर मानसशास्त्रीय संशोधन सुरू झाले, आणि तुरुंगांच्या भिंतीआड नव्या पहाटेची किरणे उमटू लागली. महाराष्ट्राच्या पुणे शहरातील येरवडय़ाचे नाव घेतले, की दोन गोष्टी पटकन आठवतात. तुरुंग आणि मनोरुग्णालय. ‘येरवडय़ाला पाठविले पाहिजे’, आणि ‘येरवडय़ाला रवानगी झाली’, अशी वाक्ये एखाद्याच्या बाबतीत कानावर पडली, तर त्याचा एखाद्या व्यक्तीच्या मनाशी काही तरी संबंध आहे, हे वेगळे सांगण्याची गरज राहत नाही. ‘येरवडा’ आणि ‘मन’ यांचे अनेक वर्षांपासूनचे नाते माहीत नाही, अशी व्यक्ती आपल्या आसपास तरी शोधावीच लागेल. येरवडय़ाच्या मनोरुग्णालयात, असंतुलित मनांना स्थिर करण्याचे प्रयोग चालत असताना, कैद्यांच्या मनांमध्ये लपून बसलेल्या सैतानांना हुसकावण्याचा आणि रिकामी मने विधायक विचारांनी भारण्याचा एक वेगळा प्रयोग येरवडय़ाच्याच मध्यवर्ती कारागृहातील कैद्यांवर सुरू झाला आहे. त्यामुळे, मनोरुग्णालयाला लगटूनच असलेले कारागृहदेखील एका अर्थाने ‘मानसोपचार केंद्र’ होऊ पाहत आहे.
सुटकेच्या दिवसाकडे डोळे लावून जिवंतपणाचा पुढचा प्रत्येक दिवस ढकलणाऱ्या एखाद्या कैद्याची मानसिकता कशी असू शकते?.. बराकीच्या दरवाजाचे गज घट्ट पकडून बाहेरचा मोकळा श्वास शोधण्यासाठी हपापलेल्या त्या कैद्यांची मने त्या वेळी कोणत्या विचारांनी भारलेली असू शकतात?.. कधी काळी हातून घडलेल्या गुन्हय़ाबद्दल, केवळ कायद्यानुसार भोगाव्या लागलेल्या त्या शिक्षेचा मनात दडलेल्या सैतानावर काही परिणाम होत असेल का?.. अशाही स्थितीत, तो सैतान हट्टाला पेटून घुसखोरी करून तेथेच दडू पाहत असेल, तर ते मन मोकळे कसे करावे?.. एखादा जुनाट, छळणारा विचार कधी कधी मनाला एवढा चिकटून राहतो, की त्यावर गंज चढला तरी तो तेथून पुसला जात नाही. मग, गुन्हा घडल्यानंतरही मनाला चिकटून बसलेल्या गुन्हेगारी विचारांना पुसून टाकण्यासाठी, एखाद्याला केवळ गजाआड बसवून सुटकेच्या दिवसाची वाट पाहण्याची शिक्षा पुरेशी ठरू शकते का? त्यापेक्षा, या मनावर चढलेल्या जुन्या, गुन्हेगारी विचारांचा गंज पुसण्याचा प्रयत्न करून असे सैतान गाडून टाकणे सोपे ठरते. अशा विचारांतूनच गुन्हेगारांना पुन्हा माणसांच्या जगात आणण्याचे वेगळे प्रयत्न सुरू झाले आहेत. येरवडा कारागृहात सुरू झालेला ‘कम्युनिटी रेडिओ’ हा अशा प्रयत्नांचाच एक भाग आहे. बाहेर अजूनही स्वच्छ उजेड आहे, आणि प्रत्येक रात्रीनंतर नवा दिवस उगवतो, याची जाणीव मानेखाली हाताची उशी करून शून्यपणे छताच्या आढय़ावरचा अंधार न्याहाळत दिवस घालविणाऱ्या कैद्याच्या मनात जिवंत करण्याचा एक प्रयोग सुरू होत आहे. या कारागृहाच्या रेडिओ केंद्रात, कैदीच ‘रेडिओ जॉकी’ बनणार आहेत, आणि तेच या रेडिओवरील कार्यक्रम आखणार आहेत. स्वत:मधील ‘माणसा’चा शोध घेत दिशाहीनपणे वावरणाऱ्या अन्य कैद्यांच्या बराकीच्या जवळजवळ येणारा सुटकेचा दिवस सोपा करण्याचा हा प्रयोग आहे.
‘परिवर्तनाचा प्रयोग’ असे याला आपण म्हणत असलो, तरी हा प्रयोग तितका सोपा नाही. कारण या प्रयोगाचे असंख्य टप्पे आहेत. पुढचा प्रत्येक टप्पा ही प्रयोगाच्या यशाची पुढची पायरी ठरेलच, असे लगेचच स्पष्ट सांगता येण्यासारखे नाही. कारण, मनाच्या रिकाम्या भिंतींवर लटकणारी सैतानी विचारांची वटवाघळे अशा प्रयोगाच्या पहिल्याच झटक्याने लगेचच पळून जाणार नाहीत. उलट, रेडिओवरील एखाद्या कार्यक्रमात हीच वटवाघळे फडफडू लागतील. ‘मी असा का घडलो,’ याचा शोध घेणारा एखादा कैदी नकळत आपल्या हातून घडलेल्या गुन्हय़ाची कबुली देताना, दुसऱ्या एखाद्या रिकाम्या मनात घर करून राहणाऱ्या सैतानाला जागे करणार नाही, हे पाहण्याची जबाबदारी या प्रयोगाच्या जनकांवर पडली आहे. या केंद्रावरील कार्यक्रमांची आखणी कैदी करणार आहेत, सादरीकरणही कैदीच करणार आहेत आणि त्याचे श्रोतेही कैदीच आहेत. म्हणूनच, तुरुंगाच्या चार िभतींआड आणि प्रत्येक बराकीच्या गजाआड घुमणाऱ्या प्रत्येक सुराला, कैद्याच्या आतला, हरवलेला माणूस जागा करण्याच्या जबाबदारीचे आव्हान पेलावे लागणार आहे. सुरांच्या दुनियेलाही स्वभाव असतात, असे मानले जाते. प्रत्येक सुराला स्वत:ची जातकुळी असते. सगळेच सूर नेहमी सर्वच मनांना मोहिनी घालू शकत नाहीत. त्यामुळे गजाआडच्या मनांना मोहिनी घालतील असेच सूर येथे घुमत राहिले पाहिजेत. कारण, या प्रयोगामुळेच, तुरुंग म्हणजे, सैतानाला हुसकावून माणूस जागा करण्याची प्रयोगशाळा ठरणार आहे. येथे शिक्षा भोगणारा कैदी हा जन्मजात गुन्हेगार नसतो. त्याचे माणूसपण कायमचे पुसून गेलेले नसते. केवळ त्यावर साचलेली सैतानीपणाची पुटे पुसण्याचे नवे काम येथे सुरू होणार आहे. मनोरंजनासाठी फिल्मी गाणी रेडिओवर ऐकण्याची सवय कधी काळी प्रत्येकाला असते, तशी या कैद्यांनाही केव्हा ना केव्हा असेल.. पण हा कम्युनिटी रेडिओ आपलीच आत्मकथने ऐकवणारा असेल. त्यावर तुरुंगाधिकाऱ्यांची- कारागृह अधीक्षकांची-  देखरेख असेलच, पण ती नसली तरीही आपणच आपल्या कैदीबांधवांच्या भल्यासाठी त्यांची मने साफ करणारी ‘मन की बात’ करायची आहे, हे साऱ्याच सहभागींना मनापासून पटायला हवे. असा क्षण साधणे हे अशा केंद्राचे पहिले काम असेल.
ते साधले, की दोन गोष्टी सिद्ध होतील. माणूस घडविण्याच्या प्रयोगाला करमणुकीचे साधनही हातभार लावू शकते, आणि दुसरे म्हणजे, सैतानाचा कब्जा असलेल्या मनातही माणूस जिवंतच असतो. तो सैतानाशी लढतही असतो आणि तो कधीच मरत नसतो. या बाबी सिद्ध करण्याच्या अशा आगळ्या प्रयोगांना दाद द्यायलाच हवी.     

wildlife lovers, Tigers, forest, cages,
‘वाघ जंगलात नको, पिंजऱ्यात हवेत का?’ वन्यजीवप्रेमींचा सवाल; प्रकरण काय? जाणून घ्या…
trees in Mumbai being killed by poison
पूर्व द्रुतगती मार्गावरील ५० झाडांवर विषप्रयोग; पालिका अधिकाऱ्यांच्या तक्रारीनंतर अज्ञात व्यक्तीविरोधात गुन्हा दाखल
Mumbai road mastic, Mumbai potholes road,
मुंबई : खड्ड्यांना ‘मास्टिक’ची मलमपट्टी, प्रयोगांना सोडचिठ्ठी देत नव्या प्रशासनाचे जुन्या पद्धतीलाच प्राधान्य
nitin gadkari
चावडी: मी प्रचार (नाही) करणार!